शहर विकास आराखड्यासाठी पुणे अभियांत्रिकीच्या विद्यार्थी पथकाची भुसावळ भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2019
Total Views |

भुसावळ, १६ जानेवारी
भुसावळ शहराचा विकास आराखड्यासाठी आ. संजय सावकारे यांच्या शिफारशी अन् पाठपुराव्याने पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नगरनियोजन(एम टाउन प्लॅनिंग)विभागाच्या पहिल्या वर्षाच्या ३१ विद्यार्थ्यांचे पथक शहराच्या आठवडाभराच्या भेटीवर आजपासून आले आहे. ते येत्या २३ जानेवारीपर्यंत शहराची पाहणी करुन प्राध्यापक प्रताप रावल व इतर विविध विभागांच्या मान्यवर अधिष्ठाते व अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली विकास आराखड्यावर काम करणार आहेत.


अशा प्रकल्पासाठी भुसावळ न.प.चे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुलकर ,नगराध्यक्ष रमण भोळे व नगरपालिकेच्या पदाधिकार्‍यांचासुध्दा पाठपुरावा आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्याशाखेचे प्रा. पी. एम. रावल व संचालक बी. बी. आहुजा यांनी हा सकारात्मक पुढाकार घेत या प्रकल्पासाठी सूचना केल्या आहेत. विकास आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेचे पार्श्‍वभूमि अभ्यास, प्रत्यक्ष कार्यस्थळ(साईट) अभ्यास व सर्वेक्षणोत्तर अभ्यास हे तीन टप्पे राहणार आहेत.


पार्श्‍वभूमि अभ्यासात भुसावळ शहर आणि त्याची ओळख, ठिकाण, हवामान, स्वाभाविक रचना(टोपोग्राफी), ऐतिहासिक संदर्भ, वैशिष्ट्ये आणि त्याच्या निवडणूक प्रभाग सीमा यांचा समावेश आहे. शहराच्या जमीन वापराच्या पद्धती(पॅटर्न) आणि इतर नगरे व शहरांशी त्याची जोडणी(कनेक्टिव्हिटी) यांचाही शहराच्या वाढीचा आवाका शोधण्याचेदृष्टिने अभ्यास महत्वपूर्ण आहे. असे अनेक पैलू शहराची समज आणि शाश्‍वत नियोजन यात कळीची भूमिका बजावणारे असतात. या अभ्यासाचा आधार शहरात केल्या जात असलेल्या विविध सर्वेक्षणांना मिळणार आहे.


प्रत्यक्ष कार्यस्थळ(साईट) अभ्यासात प्राथमिक सर्वेक्षण आणि दुय्यम माहिती संकलन(सेकंडरी डाटा कलेक्शन)यांचा समावेश असणार आहे. प्राथमिक सर्वेक्षणात प्राकृतिक व सामाजिक पायाभूत सुविधा अभ्यास, वाहतूक सर्वेक्षण आणि घराघरांचे सर्वेक्षण यांचा समावेश असेल. दुय्यम माहिती संकलनात पाणीपुरवठा यंत्रणा, गटारींची रचना, कचरा व्यवस्थापन, विजवाहिन्यांचा लेआउट, परिघाकृती (कंटूर) लेआउट तसेच जुन्या विकासात्मक आराखड्याचाही अंतर्भाव असेल. सर्वेक्षणातून गोळा झालेली माहिती (डाटा) व कागदपत्रे यांचे विश्‍लेषण करुन विकास आराखड्याच्या पुढील प्रस्तावांसाठी अभ्यास केला जाईल. सर्वेक्षणोत्तर अभ्यासात सांख्यिकी आकडेवारी मिळविली जाईल त्यावरुन भुसावळच्या विविध भागातील शक्तीस्थाने , संवेदनशील ठिकाणे, संधी व धोके यांची कल्पना येऊ शकणार आहे. त्यावरुन धोरणे व प्रस्ताव तयार करुन जनतेच्या राहणीमानाच्या दर्जा उंचावता येणे शक्य होइल. वस्तुत: अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रत्येक वर्षाच्या असाईमेंट्स(नेमून दिलेली कामे) शैक्षणिक प्रकारच्या असतात. पण राजकीय नेत्यांच्या प्रेेरणेवरुन केल्या जात असलेल्या या विकासात्मक आराखड्यासाठीच्या सर्वेक्षणाचा प्रथमचसमावेश केला गेला आहे. हा आराखडा भारत सरकार व महाराष्ट्र सरकारला सादर केला जाणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@