साकारण्याआधीच ‘महागठबंधन’चे तीन तेरा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2019   
Total Views |


मध्यंतरी उत्तर प्रदेशात झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकांचे निकाल लक्षात घेऊन सप-बसपला हुरूप आला आहे. आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेला धक्का पोहोचविणार्‍या कोणत्याही पक्षाशी आम्ही हातमिळवणी करणार नसल्याचे मायावती यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाच्या सरकारने कोणाचेही भले केले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. हे पाहता काँग्रेसला जवळ करण्याची या दोन्ही पक्षांची इच्छा नसल्याचेच दिसून येत आहे.

 

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सर्वच राजकीय पक्षांची त्या दृष्टीने तयारी चाललेली आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाला टक्कर देण्यासाठी ‘महागठबंधन’ करण्याच्या घोषणा करणार्‍या नेत्यांना त्यास अजूनही मूर्त स्वरूप देण्यात आल्याचे दिसत नाही. उलट ज्या घडामोडी घडत आहेत, त्या पाहता असे ‘महागठबंधन’ प्रत्यक्षात येण्याची चिन्हे धूसर दिसत आहेत, असे म्हणायला भरपूर वाव आहे. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष यांनी उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या जागा एकत्रित लढविण्याचा निर्णय घेऊन या प्रत्यक्षात न आलेल्या महागठबंधनास धक्का दिला आहे.

 

समाजवादी पक्ष आणि बसप यांनी उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या ८० जागांपैकी प्रत्येकी ३८ जागा लढविण्याचा निर्णय घेतला. उर्वरित दोन जागा मित्रपक्षास आणि अमेठी आणि रायबरेलीची जागा राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासाठी सोडण्याचे त्या पक्षांनी ठरविले. समाजवादी पक्ष आणि बसप यांनी घेतलेल्या या निर्णयाच्या पाठोपाठ, गेल्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या दोन जागा मिळविलेल्या काँग्रेस पक्षाने त्या राज्यातील लोकसभेच्या सर्व म्हणजे ८० जागा लढविण्याची घोषणा केली. आपण या सर्व जागा स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद आणि प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी केली आहे. समाजवादी पक्ष आणि बसपने दूर लोटल्याने पंचाईत झालेल्या काँग्रेसने, भाजपला आव्हान देणार्‍या कोणत्याही धर्मनिरपेक्ष पक्षाला युतीत सामावून घेण्याची आपली तयारी असल्याचे घोषित केले आहे.

 

समाजवादी पक्ष आणि बसप यांची ही युती म्हणजे ‘ठगबंधन’ असल्याची टीका मुलायमसिंह यादव यांचे बंधू शिवपाल यादव यांनी केली. आपल्या पुतण्याशी न पटल्याने शिवपाल यादव यांनी प्रगतीशील समाजवादी पक्ष (लोहिया) स्थापन केला. आपला पक्ष काँग्रेसशी युती करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या राम मनोहर लोहिया यांनी काँग्रेस पक्षाविरुद्ध लढा दिला, त्याच काँग्रेसच्या वळचणीला जाण्याची तयारी लोहिया यांचे नाव घेणार्‍या पक्षाने चालविली आहे, याला काय म्हणायचे? आपल्या पक्षास बरोबर घेतल्याशिवाय कोणीही भाजपला पराभूत करू शकणार नाही, असेही हे शिवपाल यादव म्हणत आहेत. उत्तर प्रदेशातील खाण घोटाळाप्रकरणी सीबीआयने अखिलेश यादव यांच्याविरुद्ध पावले उचलण्यास प्रारंभ करताच मायावती यांना त्यांचा पुळका आला आणि तुमच्यामागे खंबीरपणे उभे असल्याची हमी त्यांनी अखिलेश यादव यांना दिली. त्याचवेळी केंद्र सरकारवर तोंडसुख घेण्यासही कमी केले नाही. पण समाजवादी पक्ष आणि बसप सत्तेत असताना खाण विभागात ‘लूट’ झाल्याचा आरोप अखिलेश यांचे काका शिवपाल यादव यांनी केला आहे. उगाच भाजप सरकारवर खार खाण्यात काय अर्थ आहे?

 

समाजवादी पक्ष आणि बसप यांची युती झाली असली तरी मागील वेळी या पक्षांची अवस्था काय होती, यावर नजर टाकल्यास कोण किती पाण्यात आहे याची कल्पना येईल. मागील लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने पाच जागा जिंकल्या होत्या. मायावती यांच्या पक्षास एकही जागा मिळाली नव्हती. काँग्रेसने अमेठी आणि रायबरेलीची जागा राखली होती तर भाजपला ७१ जागा मिळाल्या होत्या आणि मित्रपक्ष असलेल्या अपना दलाने दोन जागा जिंकल्या होत्या. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ४०३ पैकी ३१२ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपला ४२.६ टक्के तर समाजवादी पक्ष आणि बसपला प्रत्येकी २२ टक्के मते मिळाली होती. मध्यंतरी उत्तर प्रदेशात झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकांचे निकाल लक्षात घेऊन सप- बसपला हुरूप आला आहे. आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेला धक्का पोहोचविणार्‍या कोणत्याही पक्षाशी आम्ही हातमिळवणी करणार नसल्याचे मायावती यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाच्या सरकारने कोणाचेही भले केले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. हे पाहता काँग्रेसला जवळ करण्याची या दोन्ही पक्षांची इच्छा नसल्याचेच दिसून येत आहे.

 

भाजपविरुद्ध ‘महागठबंधन’ आकारास येताना तर दिसत नाही उलट ‘महागठबंधना’ची सध्या कशी अवस्था आहे, हे माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी जे भाष्य केले त्यावरून दिसून येत आहे. एका मुलाखतीत देवेगौडा म्हणाले की, “माझ्या मुलाच्या शपथविधी समारंभास सर्व विरोधी नेते आणि सहा मुख्यमंत्री व्यासपीठावर उपस्थित होते. त्या दिवशी जी हवा निर्माण केली ती आज आहे का?” आगामी निवडणुकीत काय होईल, हे सांगणे कठीण असल्याचे भाष्यही त्यांनी केले आहे. देवेगौडा यांनी पंतप्रधानपदासाठी आपला राहुल गांधी यांना पाठिंबा असेल, असे म्हणत असतानाच, आगामी लोकसभा निवडणुकीत काय होईल हे जनतेच्या हातात आहे, असे सांगून विरोधकांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असल्याचेच अप्रत्यक्षपणे दाखवून दिले! तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेसला दिल्लीची स्वप्ने पडू लागली आहेत. भाजपवर खोटेनाटे आरोप करण्याचा सपाटा चालूच ठेवला आहे. निवडणूक आयोग, केंद्रीय दक्षता आयोग, सीबीआय, सर्वोच्च न्यायालय अशा महत्त्वाच्या संस्थांची स्वायत्तता सरकारने धोक्यात आणल्याचे आरोप केले जात आहेत. काँग्रेसकडून गोबेल्सच्या प्रचारतंत्राचा वापर केला जात असून खोटे आरोप रेटून केले जात आहेत. दुसरीकडे, हिंदू मतदारांना आपल्या बाजूने कसे वळविता येईल, याचाही प्रयत्न काँग्रेसकडून चालू आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसने या मार्गाचा अवलंब करून हिंदू मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न चालविला आहे. आता शबरीमला प्रकरणी परंपरा ही महत्त्वाची असल्याचे स्पष्ट करून राहुल गांधी यांनी ‘घूमजाव’ केले आहे. त्यामुळे केरळमधील काँग्रेस नेत्यांना नक्कीच हायसे वाटले असणार, असे म्हणता येईल.

 

काँग्रेस आणि अन्य विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना जोरदार उत्तरे देत असतानाच भाजपची निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी चालू आहे. नवमतदारांना ‘घराणेशाही’ पक्ष मान्य नाहीत, त्यात त्यांना रस नाही, त्यांना विकासात रस आहे, याकडे लक्ष वेधून या मतदारांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. अन्य पक्षांप्रमाणे ‘फोडा आणि राज्य करा’ यासाठी किंवा मतपेढी तयार करण्यासाठी आम्ही राजकारणात नाही. आम्ही देशाची सेवा करण्यासाठी राजकारणात आहोत. विकासाचा कार्यक्रम एका नव्या उंचीवर नेण्याची निवडणूक ही एक संधी आहे. ’घराणेशाही’ जोपासणार्‍या पक्षांना आपले स्वत:चे साम्राज्य प्रस्थापित करायचे आहे तर भाजपला जनतेची सत्ता प्रस्थापित करायची आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. एकंदरीत सध्या चारी बाजूंनी भाजपला घेरण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. पुढील काळात अपप्रचाराची आणखी राळ उडविली जाणार, हे उघडच आहे. या सर्व परिस्थितीवर मात करून पुन्हा ‘सब का साथ, सब का विकास’ करणारे सरकार दिल्लीत आणण्याचे आव्हान भाजपपुढे आहे!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@