शिवसेनेच्या २१ शाखा बेकायदा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
 
ठाणे : मीरा – भाईंदर येथे असलेली शिवसेना पक्षाची २१ कार्यालये ही बेकायदा असल्याची माहिती प्रशासनाने सादर केली. शिवसेना पक्षाच्या बहुतांश जुन्या शाखा या मीरा भाईंदरमध्ये आहेत. त्यापैकी २१ शाखांची कार्यालये ही बेकायदा असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
 

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महासभेत महापौर डिंपल मेहता यांनी राजकीय पक्षांच्या बेकायदा कार्यालयांवर कारवाई करण्यात यावी. हा मुद्दा उपस्थित केला होता. रस्ते, पदपथ बाधित असलेल्या कार्यालयांवर कारवाई करण्याचा विषय मांडण्यात आला होता. या महासभेत हा ठराव मंजुर करून द्यावा. जेणेकरून बेकायदा कार्यालयांवर कारवाई करण्यात येईल. असे मत आयुक्त बालाजी खतगावकर यांनीही मांडले होते. त्यानंतर राजकीय पक्षांच्या बेकायदा कार्यालयांविषयीची माहिती सादर करण्यास प्रशासनाला सांगण्यात आले होते. आयुक्तांच्या आदेशानुसार प्रभाग अधिकाऱ्यांनी आपल्या हद्दीतील बेकायदा कार्यालयांची माहिती सादर केली.

 

शनिवारी होणाऱ्या महासभेमध्ये आयुक्त ही माहिती सादर करणार आहेत. भाईंदर पश्चिम प्रभाग समिती १ मध्ये येणाऱ्या उत्तननाका, मोर्वा, राई, मुर्धा व गीतानगर येथील शिवसेना शाखांचा या यादीत समावेश आहे. तसेच प्रभाग समिती २ मध्ये प्रभाग कार्यालयांसमोर आणि स्कायवॉकजवळ असलेल्या शिवसेनेच्या दोन शाखांचाही समावेश या यादीत आहे. सिद्धिविनायक इमारतीजवळ असलेले काँग्रेसचे जुने कार्यालयही बेकायदा असल्याचे समोर आले आहे.

 

प्रभाग समिती ३ मध्ये असलेली शिवसेनेची एक शाखा आणि चार वाचनालयेदेखील बेकायदा असल्याचे उघडकीस आले आहे. प्रभाग समिती ४ मध्ये शिवसेनेची चार आणि मनसेची दोन कार्यालये बेकायदा आहेत. प्रभाग समिती ५ मध्ये शिवसेनेचे कंटेनरमध्ये असलेले कार्यालयही बेकायदा आहे. प्रभाग समिती ६ मध्ये देखील शिवसेनेची चार बेकायदा कार्यालये आहेत. उपआयुक्त दीपक पुजारी यांनी ही माहिती प्रभाग अधिकाऱ्यांकडून आली असल्याचे नमूद केले आहे. तसेच या बेकायदा कार्यालयांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी महासभेची मंजुरी मागितली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@