लढण्यासाठीच्या अनुभूतीचे विशेषत्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2019   
Total Views |


आयुष्यात भोगलेल्या दुःखांचा बाऊ न करता त्या जगलेल्या यातनांच्या अनुभूतीतून अन्यायग्रस्तांंचे दुःखाश्रू सहानुभूतीने पुसणारा खर्‍या अर्थाने माणूस असतो. ते माणूसपण लाभलेले अ‍ॅड. अनिल ढुमणे

 

अ‍ॅड. अनिल ढुमणे हे राज्य सरकारच्या कंत्राटी कामगार सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. मुळात ते भारतीय मजदूर संघ मुंबईचे जनरल सेक्रेटरी, तसेच महाराष्ट्र सचिव तसेच कोकण विभागाचे संघटक आहेत. मजदूर संघाच्या कक्षेत येणार्‍या कायदेविषयक बाबी ते सांभाळतात. भारतीय मजूदर संघाने अनेक औद्योगिक क्षेत्रातले करार यशस्वी केले. एक ना अनेक करार भारतीय मजदूर संघाने तडीस नेले. या सर्व पार्श्वभूमीवर अ‍ॅड. अनिल ढुमणे यांचा सहभाग होता. अर्थात मजदूर संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते असल्याने त्यांचे कामच आहे ते, असे कुणीही म्हणेल. पण या सर्व कामामध्ये अ‍ॅड. अनिल ढुमणे यांचे जगणे विचार करायला लावणारे आहे.

 

नाशिकच्या आनंदराव ढुमणे आणि सोनूबाई ढुमणे यांना तीन अपत्यं. त्यापैकी एक अनिल. आनंदराव टेलरकाम करायचे. सोनूबाई दुसर्‍यांच्या घरी धुणीभांडी करायच्या. घरात सगळ्याच गोष्टींची वानवा. पण त्यावेळी आनंदराव यांनी परिसरातील टेलरिंग काम करणार्‍यांचे संघटन बांधले. टेलरची कमाई वाढावी यासाठी प्रयत्न केले. अहोरात्र काम करूनही आनंद यांची तुटपुंजी मिळकत आणि दुसर्‍यांच्या घरची धुणीभांडी करणारी, थकलेली तरीही घरी येऊनही कुटुंबासाठी काम करणारी सोनूबाई. छोटा अनिल हे सारे पाहत असे. सारखे पाण्यात उभे राहिल्यामुळे सोलवटलेले आईचे तळहात, तळपाय पाहून अनिलला रडू येई. मग तोही आईला मदत करायला म्हणून तिच्यासोबत धुण्याभांड्यांच्या कामाला जाई. अशातच अनिल इयत्ता चौथीत असताना घरचे आधारस्तंभ आनंद क्षयरोगाने वारले. सगळी जबाबदारी आई सोनूबाईवर आली. अनिल यांचा मोठा भाऊ शिक्षण सोडून टेलरिंग करू लागले. जिथे दोनवेळचे जेवण मिळणे, हाच एक सोहळा असे, तिथे प्रत्येक दिवस वंचितांचा प्रतिनिधित्व करत जायचा. अनिल दहावी इयत्तेमध्ये गेले. परीक्षा शुल्काचे 60 रुपयेही भरायला नव्हते. आजपर्यंत आईने एक आणा कर्जावर उधारीवर मुलांचे शिक्षण केले. ती तरी काय करणार? ती उद्वेगाने अनिलला म्हणाली, “बस कर. कामधंद्याला जा.”


पण अनिलने शिकायचे ठरवले. ते एका मिठाईच्या दुकानात वेटरचे काम करू लागले. असंघटितपणे काम करणार्‍या वेटर लोकांना काय भोगावे लागत असेल, त्याचा अनुभव त्यांना आला. असो, वेटरचे काम करून मिळालेल्या पैशातून त्यांनी परीक्षा फी भरली आणि परिक्षेत 66 टक्के गुण घेऊन पास झाले. त्यानंतर ते चतुर्थ श्रेणीची नोकरी करू लागले. त्याचबरोबर आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियनचा डिप्लोमाही करू लागले. समोर काही ध्येय नव्हतेच. रडत कुंथत असलेली परिस्थिती आणि सदैव कष्टाच्या रगाड्यात खितपत असलेले आप्त. या परिस्थितीमधून बाहेर येणे गरजेचे होते. पुढे काम करता करता अनिल यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे अभाविपशी संपर्क आला. महाविद्यालयामध्ये अभाविपचे सीआर म्हणूनही त्यांनी काम केले. अयोध्या रामजन्म तसेच इतरही अनेक राष्ट्रीय आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले. याच कालावधीत अनिल रिक्षाही चालवत. रिक्षाचालकांच्या समस्यांनी त्यांना चैन पडत नसे. “रिक्षाचालकांच्या समस्यांसाठी आपण काही करू शकतो का?,” त्यांचा संपर्क कामगारांना न्याय हक्क मिळवून देणार्‍या भारतीय मजदूर संघाशी झाला. संघाच्या परिचयातून अनिल यांना कळले की, कामगार, असंघटित कंत्राटी कामगार, घरेलू कामगार यांचे प्रश्न खूप आहेत. मजदूर संघाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा अनिल घरकाम करणार्‍या महिलांचे प्रश्न हाताळत, तेव्हा तेव्हा देवाघरी गेलेल्या आईच्या आठवणीने त्यांचे डोळे पाणावत. असंघटित क्षेत्रात काम करताना पैशापैशाला मोताद असणारे कामगार पाहिले की, त्यांना टेलरिंग काम करून खंगलेले वडील आठवत, रिक्षा चालवणारा भाऊ आठवे, स्वतः केलेले घरकाम, वेटरकाम, रिक्षा चालवणे आठवे. त्यामुळे समोर येणारा कोणताही कामगार हा अनिल यांच्यासाठी परका किंवा दुसरा कुणीतरी नसे तर त्या व्यक्तीच्या प्रश्नाशी अनिल यांचे भावविश्व जोडले जाते.

 

भोगलेल्या यातनांचे रडगाणे गाणारे किंवा त्याला विद्रोही स्वरूप देणारे ठिकठिकाणी असतात. पण या दोहोंपलीकडे जाऊन संघटनेच्या चौकटीतून माणुसकीचे विशेषत्व जपणारे खूप कमी असतात. ते विशेषत्व अ‍ॅड. अनिल यांनी जपले. भोगलेल्या यातनांच्या अनुभूतीमधूनच आपल्यासोबतच दुसर्‍यांचेही जीवन बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याबद्दल अ‍ॅड. अनिल सांगतात, त्यांच्यावर भारतीय मजदूर संघाच्या दत्तोपंत ठेंगडी, रमणभाई शहा यांचा प्रभाव आहे. कामगारांच्या प्रश्नावर काम करताना या दोघांची प्रेरणा मनाला आश्वस्त करते की, या भाऊबंदांना मजदूर संघाच्या माध्यमातून आपण न्याय मिळवून द्यायलाच हवा. तसेच मी पुर्णवेळ काम करू शकतो कारण पत्नी मनिषाची साथ आहे. भारतीय मजदूर संघामुळे मी शिकलो आहे की, भूतकाळ बदलता येत नाही पण आपल्यासोबतच इतरांचा वर्तमान बदलता येतो अणि त्याद्वारे भविष्यकाळही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@