हिंदू हिताय : भाग ४ - भारतीय विविधतेचा, अस्त्र म्हणून वापर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2019   
Total Views |


 


साखळीच्या दुर्बल कडीला साखळीची सर्वात शक्तीमान कडी समजले जाते, हे विरोधाभासी वाक्य झाले. त्याचा अर्थ असा होतो की, साखळीची शक्ती कायम राहावी, असे वाटत असेल तर तिच्या दुर्बल कडीवर आघात होणार नाही, हे बघावे लागते. दुर्बल कडी सशक्त करणे म्हणजे साखळी सशक्त करणे आहे.


लोकशाहीत मिळालेल्या मतदानरूपी ढाल-तलवारीचा वापर महामूर्खासारखा करायचा की, शहाणपणाने करायचा हे आपल्याला शिकायला पाहिजे. शहाणपण बाजारात विकत मिळत नाही. शहाणपण कुणाकडून उधार घेता येत नाही वा कुणाकडून उसने मागता येत नाही. ते ज्याचे त्याला मिळवावे लागते. ते जसे अनुभवातून प्राप्त होते, तसे योग्य विचार करण्याच्या शक्तीतूनही प्राप्त होते. स्वातंत्र्य मिळून आता ७२ वर्षे झाली. या ७२ वर्षांत ज्याला हिंदू शासन म्हणता येईल, असे अटल बिहारींचे शासन येऊन गेले आणि आता नरेंद्र मोदी यांचे शासन चालू आहे, बाकीची सर्व वर्षे राज्यकर्ते हिंदू आहेत, हिंदू विचारांची त्यांना उत्तम जाण आहे, देशाच्या इतिहासाचीदेखील त्यांना बऱ्यापैकी ओळख आहे, असे असतानादेखील त्यांची राजवट हिंदू समाजाला शक्ती देणारी झालेली नाही. या राज्यकर्त्यांनी हिंदू समाजाला सशक्त करण्याऐवजी तो अधिक विभक्त कसा होईल, तो जातीपातीत कसा तोडला जाईल, हिंदू समाजात असणाऱ्या विविध पंथांत त्याचे विभाजन कसे होईल, याचाच विचार केला आणि हिंदू समाजाला राजकीयदृष्ट्या दुर्बल करून टाकले. याचा परिणाम म्हणून आजचा हिंदू कसा विचार करतो? आपली राज्यघटना हिंदूना सांगते की, जर तुम्हाला सशक्त व्हायचे असेल तर जाती-पातींचा विचार करू नका. अस्पृश्यता गाडून टाका. आपल्या धार्मिक पंथांचा विचार करू नका. पहिली निष्ठा आपल्या देशावर असली पाहिजे. त्यानंतर निष्ठांचा क्रम लागला पाहिजे. देशात दीर्घकाळ राज्य करणार्‍यांनी याच्या उलट शिकवण दिली. त्यांनी सांगितले की, जात विसरू नका. अस्पृश्यता सोडू नका. अस्पृश्य समाजाला त्याच्या मर्यादेतच ठेवा. उमेदवाराची जात बघा आणि मतदान करा. तुमच्या जातीचे प्रतिनिधित्त्व विधानसभेत आणि लोकसभेत किती आहे, याचा सतत शोध घेत राहा. सार्वजनिक ठिकाणी जाती निर्मूलनाची भाषणे करा आणि जातीयवादाचा आरोप सर्व हिंदुत्त्ववादी संघटनांवर ठोकून द्या. हिंदू म्हणजे जात आणि हिंदुत्त्व म्हणजे जातवाद हे लक्षात ठेवा. परंतु, राजकारणात जात विसरू नका, ती जिवंत ठेवा. या विचारसरणीची एक संस्कृती झाली, तिला ‘काँग्रेस संस्कृती’ म्हणतात. या काँग्रेस संस्कृतीत बहुतेक सगळे पक्ष येतात. मायावतींचा बहुजन समाज पक्ष, लालूप्रसाद यांचा जनता दल आणि मुलायम यांचा समाजवादी पक्ष, जेडीयु वगैरे वगैरे सर्व पक्ष या संस्कृतीचे घटक आहेत. हे सगळे पक्ष आपापल्या कार्यक्षेत्रात हिंदू समाजाला जातीपातीत विभागण्याचे आणि त्याला राजकीयदृष्ट्या अतिशय दुर्बल करण्याचे काम सातत्याने करीत असतात.

 

सत्ता हस्तगत करण्याची त्यांची गणिते सोपी असतात. आपल्या जातीची भक्कम वोटबँक तयार करायची. ती अशी सुखासुखी तयार होत नाही. त्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते. पहिली गोष्ट-जातीच्या भावना उद्दीपित करण्याची. दुसरी गोष्ट पक्षबांधणीसाठी लागणाऱ्या पैशाच्या उभारणीची, पक्षाचे कार्यकर्ते फुकट काम करीत नाहीत. त्यांच्या चरितार्थाची सोय करावी लागते आणि तिसरी गोष्ट - बाहुबलाची. ज्याला ‘मसल पॉवर’ म्हणतात. आपल्या कळपातून दुसऱ्या कळपात जाण्याची जर कुणी हालचाल सुरू केली तर त्याला साम, दाम, दंड यांचा वापर करून रोखावे लागते. या पक्षांचे मालक अफाट मालमत्तेचे धनी असतात. धन आपल्याबरोबर जाणार नाही, हे त्यांना समजते. तसेच धन आपल्याबरोबर असेल तर सत्ता आपल्याबरोबर राहील आणि सत्ता आपल्याबरोबर आणण्यासाठी लागणाऱ्या कार्यकर्त्यांचे बळदेखील आपल्याबरोबर राहील. म्हणून ‘धन कमाव, सत्ता जुटाव,’ या तंत्राने चालतात. सर्वांची मायबाप असणाऱ्या काँग्रेसने याबाबतीत सर्वांना मार्गदर्शक कित्ते घालून दिलेले आहेत. हिंदू समाज तोडण्याची काँग्रेसची ताकद या छोट्या पक्षांपेक्षादेखील अफाट आहे. हिंदू समाज हा सर्व प्रकारच्या विविधतेची खाण आहे. विविधता ही त्याची शोभा आहे, ती त्याची शक्तीदेखील आहे, त्याचवेळी हिंदू समाजसंघटनेतील ती सर्वात दुर्बल कडीदेखील आहे. साखळीच्या दुर्बल कडीला साखळीची सर्वात शक्तीमान कडी समजले जाते, हे विरोधाभासी वाक्य झाले. त्याचा अर्थ असा होतो की, साखळीची शक्ती कायम राहावी, असे वाटत असेल तर तिच्या दुर्बल कडीवर आघात होणार नाही, हे बघावे लागते. दुर्बल कडी सशक्त करणे म्हणजे साखळी सशक्त करणे आहे.

 

हिंदू समाजात वेगवेगळे पंथ आहेत. त्यांचे ग्रंथ आहेत. त्यांची विशिष्ट पूजापद्धती आहे. त्यांचे सण-उत्सव, यात्रा स्वतंत्रपणे चालतात. त्या-त्या संप्रदायातील लोक त्याला गर्दी करतात. यातले काही पंथ वेगळे काढून आम्ही हिंदू नाहीत, असा भाव त्यांच्या मनात भरविण्याचे काम काँग्रेस करते. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात शिवधर्माची चळवळ सुरू झाली होती. आम्ही शिवधर्मी आहोत, आम्ही हिंदू धर्मीय नाहीत, हा त्याचा भाव होता. पुन्हा सांगायचे तर हिंदू नावाचा एक ग्रंथ, एक प्रेषित, एक देव मानणारा धर्मच नसल्यामुळे, हिंदू धर्मीय नाहीत या म्हणण्याला काही अर्थ नसतो. त्याचा राजकीय अर्थ असतो. तो असा की, हिंदू हिताचे राजकारण करणार्‍यांशी आमचा संबंध नाही. आम्हाला फाटाफुटीचे राजकारण करायचे आहे. फाटाफुटीचे राजकारण करून सत्तेवर जायचे आहे. काँग्रेसने कर्नाटकात सत्तेवर जाण्यासाठी हिंदू समाजातील लिंगायत पंथाला वेगळे पाडण्याचा प्रयत्न केला. आम्ही हिंदू नाही, असा त्यांच्यात प्रचार केला, त्यांची संमेलने भरविली, तुम्ही धार्मिक अल्पसंख्य झालात, तर तुम्हाला धार्मिक अल्पसंख्याकांच्या सवलती मिळतील, तुमच्या शिक्षणसंस्था असतील तर आरक्षण लागू केले जाणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. त्याचा दुसरा अर्थ होतो की, दलितांना तुमच्या शिक्षणसंस्थेत तुम्ही प्रवेश दिला नाहीत तर तुमचे काही बिघडत नाही. जैनांनादेखील अहिंदूचा दर्जा काँग्रेसने दिलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत हिंदू समाज, ज्या हिंदू समाजात जैन, बौद्ध, शीख आणि सर्व प्रकारचे उपासना पंथ येतात, राजकीयदृष्ट्या एकत्र येऊ नयेत, हे काँग्रेसचे धोरण पं. नेहरूंपासून चालू आहे. हे धोरण सर्वप्रथम इंग्रजांनी भारतात आणले. इंग्रजांना भारत जिंकणे सोपे गेले. कारण त्यांच्याशी लढेल अशी प्रबळ केंद्रसत्ता नव्हती. तेव्हा भारत लहान-लहान राज्यांमध्ये विभागलेला होता. एकेका लहान राज्याला जिंकणे इंग्रजांना कठीण गेले नाही. इंग्रजांनी भारतीयांचे सैन्य उभे केले. त्या सैन्याला प्रशिक्षित केले, पगारी केले, त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली आणि त्यांनाच हिंदू राजांशी लढायला लावले. त्याचे नेतृत्त्व इंग्रजांनी केले आणि या लढाया जिंकल्या. भारतात इंग्रजांचे राज्य निर्माण झाले.

 

भारतात इंग्रजांचे राज्य कुणी निर्माण केले? या प्रश्नांचे उत्तर वाचायला अत्यंत कडवट असले तरी हिंदूंनी इंग्रजांचे राज्य भारतात निर्माण केले. हिंदूंनी जर ठरविले असते की, इंग्रजांच्या सैन्यात भरती व्हायचे नाही, तर इंग्रजांना भारत जिंकणे महाकठीण होते. ज्यावेळी इंग्रजांना वाटले की, हे देशी सैन्य आता आपल्याला ऐकणार नाही, आपल्या आज्ञा पाळणार नाही, ते आपल्यावरच गोळ्या घालतील, तेव्हा त्यांनी देश सोडून जाण्याचा निर्णय केला. याचा अर्थ असा झाला की, जेव्हा हिंदू झोपला तेव्हा इंग्रजांचे राज्य सुरू झाले आणि जेव्हा तो जागा झाला, तेव्हा इंग्रजांना भारत सोडून जावे लागले. भारत जिंकणे त्यामानाने सोपे होते, परंतु भारतावर राज्य करणे सोपी गोष्ट नव्हती. इंग्रज धूर्त. त्यांनी हिंदू समाजाचा अभ्यास केला. हिंदू समाज संघटनेचा अभ्यास केला मग त्यांच्या लक्षात आले की, आपल्याला राज्य करायचे असेल तर हिंदूंना जाती-पातीत विभागले पाहिजेत. हिंदू समाजाचे जेवढे तुकडे करता येतील तेवढे केले पाहिजेत. ब्राह्मणांना शत्रूस्थानी स्थापन केले पाहिजे. धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक गुलामीचे सगळे खापर ब्राह्मणांच्या डोक्यावर फोडले पाहिजे. इंग्रजांच्या विरुद्ध ज्यांनी प्रथम चळवळी सुरू केल्या, त्यातील बहुसंख्य ब्राह्मणच होते. इंग्रजांनी ब्राह्मणांना फार कौशल्याने समाजशत्रू करून टाकले. मुसलमानांना हिंदू समाजापासून वेगळे केले. त्यांना विभक्त मतदारसंघ दिले. हिंदू आणि मुसलमान राजकीयदृष्ट्या एक होणार नाहीत, यादृष्टीने इंग्रज यशस्वी झाले. अस्पृश्य समाजालादेखील हिंदूंपासून राजकीयदृष्ट्या त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला, महात्मा गांधीजींनी तो यशस्वी होऊ दिला नाही. हिंदू म्हणजे आक्रमक आर्य, हिंदू म्हणजे आक्रमक आर्य ब्राह्मण, भारताचे मूलनिवासी द्रविड, त्यांची संस्कृती ही सिंधू संस्कृती, आज जंगलात राहणारा आदिवासी हा भारताचा मूलनिवासी, आर्यांनी त्यांना जंगलात हाकलून दिले, हे सांगणारे ग्रंथ इंग्रजांनी लिहिले. शीख हिंदू समाजाचे अंग नाहीत, ते हिंदू नाहीत, हे इंग्रजांनी रुजविले. शीखांच्या मनात वेगळेपणाची भावना निर्माण केली. हिंदू समाजाची विभागणी लढवय्या जाती आणि सामान्य जाती अशी त्यांनी केली. काही जातींना त्यांनी जन्मतःच गुन्हेगार जाती ठरवून टाकले. थोडक्यात जी विविधता आहे तिचे भेदात रूपांतर कसे होईल, याची एक ब्ल्यू प्रिंट इंग्रजांनी तयार केली. काँग्रेसने ही ब्ल्यू प्रिंट स्वातंत्र्यानंतर कचऱ्याच्या टोपलीत टाकून देण्याऐवजी उराशी कवटाळली. म्हणून स्वातंत्र्याला ७२ वर्षे होऊनदेखील प्रचंड शक्तीशाली हिंदू समाज काही उभा राहू शकला नाही. खऱ्या अर्थाने हिंदू शासन दीर्घकाळ भारतात आलेच नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@