साहित्य संमेलनात कृषिजागर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
 
 

परिसंवादातून बळीराजाला आत्महत्या न करण्याची साद

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी

 

यवतमाळ (विजय कुलकर्णी) : ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘कृषक समाजाच्या चित्रणाबाबत नागरी लेखक उदासीन का?’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबईचे सारंग दर्शने, अकोल्याचे गजानन नारे, आळंदच्या प्रभाकर सलगरे यांनी या विषयावरील आपली परखड मते व्यक्त केली.

 

पत्रकार, लेखक सारंग दर्शने यांनी शेतकरी नेते शरद जोशी यांच्या शेतकरी चळवळीतील कार्याचा व जोशी यांच्या शेतकऱ्यांना समर्पित साहित्याचे विशेषत्वाने कौतुक केले. पण, त्याचबरोबर सृजनशील साहित्याने समाजात संवेदना मात्र जागवली नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली. ते म्हणाले की, “साहित्यिकांकडे शेतकऱ्यांच्या व्यथा आणि हा विषयच समजून घेण्याचा तिसरा डोळा नाही. त्यामुळे साहित्य संमेलनातून शेतकऱ्यांच्या जीवनाचं चित्रण करण्याची प्रेरणा मिळावी”. ही अपेक्षा सारंग दर्शने यांनी व्यक्त केली.

 

अकोल्याच्या गजानन नारे यांनी सर्वप्रथम कृषक समाज, नागरी लेखक यांची व्याख्या उलगडली. त्याविषयी बोलताना नारे म्हणाले की, ग्रामीण जीवनाशी सोयरसुतकं नसलेले नागरी लेखक अनुभवाशिवाय वास्वतवादी साहित्यनिर्मिती करु शकत नाहीत. ग्रामीण लेखकांची संख्या कमी असल्यामुळेच अशा नागरी लेखकांची संख्या वाढली. गरिबी, अशिक्षितपणामुळे फारसे ग्रामीण लेखक घडले नाही. म्हणूनच नागरी लेखकांकडून कृषक समाजाचे रंजक चित्रण झाल्याची खंत नारे यांनी यावेळी बोलून दाखविली. पुढे बोलताना ते म्हणाले की, हळूहळू गावाचेही शहरीकरण होते आहे. नागर-अनागर संस्कृतीची सरमिसळ होत असून आज त्याचेच प्रतिबिंब आपल्या साहित्यात दिसते.

 

लिखित साहित्याबरोबरचं नाट्यलेखनातही कृषक समाजाचं चित्रण नाही. कारण, या क्षेत्रातील मंडळीही शेतकऱ्यांशी, त्यांच्या व्यथांशी निगडीत नसल्याचेही नारे यांनी बोलताना आपल्या भाषणात अधोरेखित केले. आपल्या भाषणाच्या शेवटी नारे यांनी साहित्यिकांना मोलाचे संदेश दिले. साहित्यिकांना उद्देशून ते म्हणाले की, इतर देशातील शेतकऱ्यांचे प्रयोग, त्यांची पिळवणूक ही साहित्यिकांनी सर्वांसमोर आणली पाहिजे आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये म्हणून साहित्यिकांनी लेखन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी साहित्यिकांना केले.

 

सामाजिक जाणिवेतून पत्रकारिता करणारे प्रभाकर सलगरे यांनी कृषिप्रधान देशातच शेतकरी संकटात असल्याचे वास्तव अधोरेखित केले. त्याचबरोबर साहित्य महामंडळाने हा विषय केवळ परिसंवादात न मांडता, त्यासाठी स्वतंत्र संमेलन आयोजित करावे, अशीही मागणी केली. यवतमाळ हा महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा जिल्हा असल्याची खंत व्यक्त करतच सलगरे यांनी शेतीच्या समस्यांवर अजून लिखाण करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी भाव न मिळाल्यामुळे रस्त्यावर फेकलेला कांदा अथवा दूध रसत्यावर ओतल्यावर नागरी लेखकांच्या डोळ्यात अश्रू तरी येतात का, असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला. ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटनच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते झाल्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना एक व्यापक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@