हिंदू हिताय : भाग ३ - शक्ती ओळखणे गरजेचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2019   
Total Views |


 


आपल्या राज्यघटनेने ही राज्यघटना फक्त हिंदूंसाठी तयार करण्यात आलेली आहे, असे काही म्हटलेले नाही. ते म्हणण्याची आवश्यकताही नव्हती, कारण घटना समितीतील नव्वद टक्क्यांहून अधिक सभासद हिंदू होते. देशात हिंदूंची बहुसंख्या होती. बहुसंख्य मुसलमान पाकिस्तानात गेले होते. त्यामुळे जी घटना तयार झाली, ती हिंदूंनी, हिंदूंसाठी, हिंदू हितरक्षणासाठी तयार केलेली घटना असे तिचे वर्णन करायला पाहिजे. या भाषेत घटनेविषयी कुणी बोलत नाहीत. सत्य बोलायला आणि सांगायला घाबरणे हा राजकीय हिंदूंचा स्वभाव आहे. परंतु, त्याला फार किंमत देण्याचे कारण नाही. घटना समितीचे सत्य कुणाला बदलता येणार नाही आणि घटनेचा वैचारिक आशयदेखील कुणाला बदलता येणार नाही. आपल्या घटनेत हिंदूपण ओतप्रोत भरलेले आहे.

 

हिंदू म्हणजे भारतात उत्पन्न झालेल्या शीख, जैन, बौद्ध, आर्य समाज, आदी सर्वांचा समावेश करावा लागतो. ही या सर्वांच्या अस्तित्त्वरक्षणाची इतिहासाने दिलेली महत्त्वाची संधी आहे. मागच्या लेखात तिला शेवटची संधी म्हटले आहे. हे म्हणणे काही अभ्यासकांचे आहे. तिला शेवटची संधी मानण्याचे काही कारण नाही. हिंदू जातीच्या इतिहासात अस्तित्त्वरक्षणाचे असंख्य प्रसंग येऊन गेलेले आहेत. अशा सर्व प्रसंगावर मात करुन हिंदू उभा राहिलेला आहे. यावेळी सुद्धा तो नक्कीच उभा राहणार आहे. संधी शेवटची नसली तरी महत्त्वाची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लाहोरला न झालेले भाषण ‘अनायहिलेशन ऑफ कास्ट’ या नावाने प्रसिद्ध आहे. हे १९३६ सालचे भाषण आहे. या भाषणाचा समारोप करताना बाबासाहेब सांगून गेले की, “हिंदूंनो तुम्हाला स्वातंत्र्य मिळणारच आहे, परंतु माझा प्रश्न असा आहे की, मिळालेल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची क्षमता तुमच्यात आहे का?” त्यांचा संकेत जातीपातीत विभागलेल्या आणि त्यामुळे दुर्बळ झालेल्या हिंदू समाजाकडे आहे. हेच बाबासाहेब १९५५ साली भाषावार प्रांतरचना या आपल्या प्रबंधात म्हणतात की, “पाकिस्तान निर्माण झाले याचा मला आनंद झाला आहे. मला पाकिस्तानचा तत्त्वज्ञ समजतात. एवढे सर्व मुसलमान भारतात राहिले असते तर हिंदूंना स्वातंत्र्य मिळाले असते, परंतु त्यांना सदैव मुसलमानांच्या अधिपत्याखाली राहावे लागले असते, त्यांना मुक्ती मिळाली नसती.” अशा वक्तव्यांचा विचार, “आम्हाला मिळालेली ही महत्त्वाची संधी आहे.” या संदर्भात करावा लागतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला भारत सार्वभौम भारत झाला. राज्यशास्त्राच्या भाषेत सांगायचे तर सार्वभौम भारतीय राज्याची निर्मिती झाली. आपली राज्यघटना निर्माण झाली.

 

राज्यघटना निर्मितीसाठी घटनासमिती स्थापण्यात आली. या घटनासमितीत बहुसंख्य हिंदू होते. त्यांना हिंदू समाजाच्या इतिहासाची उत्तम जाणीव होती. आपले तत्त्वज्ञान त्यांना उत्तम समजले होते. आपल्या समोरील प्रश्नांची जाणही त्यांना खोलवरची होती. जे राजकीय स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झाले आहे, ते चिरकाळ टिकविण्यासाठी सामजिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला लवकरात लवकर प्राप्त केले पाहिजे. तिन्ही प्रकारची स्वातंत्र्ये प्राप्त करण्यासाठी घटनाकारांनी राज्यघटनेत घटनात्मक कायद्यात मोडणाऱ्या तरतूदी करुन ठेवल्या आहेत. या देशात बहुसंख्य हिंदूच असल्यामुळे ही तिन्ही प्रकारची स्वातंत्र्ये हिंदूचीच स्वातंत्र्ये ठरतात. आपल्या राज्यघटनेने ही राज्यघटना फक्त हिंदूंसाठी तयार करण्यात आलेली आहे, असे काही म्हटलेले नाही. ते म्हणण्याची आवश्यकताही नव्हती, कारण घटना समितीतील नव्वद टक्क्यांहून अधिक सभासद हिंदू होते. देशात हिंदूंची बहुसंख्या होती. बहुसंख्य मुसलमान पाकिस्तानात गेले होते. त्यामुळे जी घटना तयार झाली, ती हिंदूंनी, हिंदूंसाठी, हिंदू हितरक्षणासाठी तयार केलेली घटना असे तिचे वर्णन करायला पाहिजे. या भाषेत घटनेविषयी कुणी बोलत नाहीत. सत्य बोलायला आणि सांगायला घाबरणे हा राजकीय हिंदूंचा स्वभाव आहे. परंतु, त्याला फार किंमत देण्याचे कारण नाही. घटना समितीचे सत्य कुणाला बदलता येणार नाही आणि घटनेचा वैचारिक आशयदेखील कुणाला बदलता येणार नाही. आपल्या घटनेत हिंदूपण ओतप्रोत भरलेले आहे. आपल्या घटनाकारांनी सर्व हिंदूंना राजकीय सत्ता संपादण्याची जबरदस्त शक्ती दिलेली आहे. पहिली गोष्ट दिली ती म्हणजे सार्वभौमत्त्व. पहिल्या लेखात वर्णन केलेले आम्ही हिंदू, सार्वभौम आहोत, म्हणजे आपल्याकडे राज्य घडविण्याची, त्याला शिखरावर नेण्याची अफाट ताकद आलेली आहे. दुसरी गोष्ट जी आपल्याला प्राप्त झालेली आहे ती मतदान करण्याचा राजकीय अधिकार. मतदान करण्याच्या या राजकीय अधिकाराचा वापर करुन हिंदू हिताची चिंता करणाऱ्या राजकीय पक्षांना, राजकीय नेत्यांना, आपण निवडून देऊ शकतो. आपल्या मूळावर उठलेल्या आणि आपल्यावर सतत आघात करणाऱ्या शक्तींना मतपेटीच्या माध्यमातून आपण खड्ड्यात घालवू शकतो. एवढी अफाट शक्ती आपल्या बोटावरील उमटणाऱ्या शाईची आहे. तो केवळ एक ठिपका नाही, तर एक हिंदू म्हणून मला मिळालेल्या सार्वभौम शक्तीचे ते प्रतीक आहे.

 

फ्रँकाइज गोटिए हे जन्माने फ्रेंच आहेत, धर्माने कॅथलिक आहेत, आणि व्यवसायाने पत्रकार आहेत. त्यांच्या तीन लेखांबद्दल मी पुढच्या लेखात लिहिणार आहे. हिंदूंसाठी त्यांनी लेखात वापरलेला शब्दप्रयोग आहे- महामूर्ख. ही एक सभ्य शिवी आहे, परंतु ती हिंदू हिताची आत्यंतिक काळजी करणाऱ्या हृदयातून आलेली आहे, म्हणून ती शिवी वाटत नाही. आपण महामूर्ख कसे असतो? ज्या शक्ती आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, त्या लढण्यासाठी आहेत, आपले रक्षण करण्यासाठी आहेत, आपल्या शत्रूंना झोपविण्यासाठी आहेत, हेच आपल्या लक्षात येत नाही. एक गाव होते. त्या गावातील एक जण नशीब काढण्यासाठी गाव सोडून गेला. तो हुशार, बुद्धीमान आणि शूर असल्यामुळे काही वर्षातच तो सेनापती झाला. त्याची किर्ती गावात पसरली. गावातील एका तरुणाला वाटले की, त्याच्याप्रमाणे आपणही नशीब काढण्यासाठी परदेशात गेले पाहिजे. जो यशस्वी होतो, त्याची नक्कल केली जाते. हा सेनापती गाव सोडून जाताना कसा गेला, याचा त्याने शोध घेतला. त्याच्या लक्षात आले की, गावातून जाताना तो घोड्यावर बसून गेला. त्याच्या एका हातात तलवार होती. पाठीला ढाल होती. बगलेत धनुष्य होते आणि पाठीमागे धनुष्यबाण होते. तोही त्याच प्रकारे प्रवासाला निघाला. गावाने त्याला निरोप दिला. वाटेत चोराने त्याला घेरले. त्याला धरुन पिटले. त्याच्याकडील सर्व वस्तू काढून घेतल्या, घोडाही काढून घेतला. कपडे फाटलेला, मार खाल्लेला तो पुन्हा गावात आला. गावकऱ्यांनी त्याला विचारले, “काय झाले?” तो म्हणाला, “चोरांनी मला घेरले आणि मारले.” ग़ावकरी म्हणाले, “तू त्यांच्याशी लढला का नाहीस?” तो म्हणाला, “एका हाती ढाल आणि एका हाती तलवार, मी कसा लढणार?” ग़ावकरी म्हणाले, “मग तू पळाला का नाहीस?” तो म्हणाला, “मी घोड्यावर बसलेलो मग कसा पळणार?” संत तुकाराम हीच गोष्ट एका अभंगाच्या माध्यमातून अशा प्रकारे सांगतात ; 

 

ढालतलवारें गुंतले हे कर!

म्हणे मी जुंझार कैसा झुंजो॥

असोनि उपाय म्हणे हे अपाय।

म्हणे हायहाय काय करु॥

 

ढाल आणि तलवार लढण्यासाठी असते आणि घोडा पळण्यासाठी असतो, हेदेखील ज्याला समजत नाही, त्याला महामूर्ख म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? हिंदू म्हणून आपल्याला मिळालेले सार्वभौमत्त्व आणि ते व्यक्त करण्याचा आपल्याला मिळालेला मतदानाचा अधिकार हा सिंहासन उलथेपालथे करण्याचा अधिकार आहे, हे जर आपल्याला समजत नसेल तर आपल्यासारखे महामूर्ख आपणच समजले पाहिजे. राजसत्तेविषयी उदासिनता ही फार घातक असते. एक काळ आपल्याकडे असा येऊन गेला की, आपले संतही म्हणू लागले की, होवे कोई भूपती हमे का हानी। कुणीही भूपती झाला तर आमची काही हानी होत नाही, या म्हणण्यात काही अर्थ नाही. २००४ नंतर खऱ्या अर्थाने सोनिया गांधी भूपती झाल्या, मनमोहन सिंग कळसूत्री बाहुले झाले. सोनिया गांधी नाचवतील तसे ते नाचत राहिले. संजय बारु यांनी ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हे पुस्तक लिहिले. आता त्यावरील चित्रपटही आला आहे. तो आपण बघायला हरकत नाही. सोनिया गांधींनी अत्यंत कौशल्याने हिंदू घातक राजकीय विषयसूची चालविली. नरेंद्र मोदी यांना ‘मौत के सौदागर’ ठरविले. जंग जंग पछाडून कुठल्या ना कुठल्या खटल्यात त्यांना अडकविण्याचा प्रयत्न केला, तीच गोष्ट अमित शाह यांच्याविषयी आहे. या दोघांविषयी एवढा विद्वेष का? त्याचे एका वाक्यात उत्तर असे की, हे दोघेही जण हिंदू हितरक्षणास समर्पित आहेत. ‘होवे कोई भूपति’ असे म्हणून चालत नाही. भूपति कोण होणार, हे आमचे आम्हालाच ठरविले पाहिजे. हातातील ढाल आणि तलवार लढण्यासाठी आहे. तलवारीने वार करायचा असतो आणि ढालीने वार झेलायचा असतो. राजसत्ता मिळविण्यासाठी पूर्वीच्या काळी ढाल-तलवारीच्या लढाया कराव्या लागत. आता लोकशाही आहे आणि लढाई मतपेटीची असते. ती आपण समजून घ्यायला पाहिजे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@