साहित्यिकांनी वारकरी व्हावे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
 
यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वादाच्या भोवर्यात अडकले आहे. तरीही ते यशस्वी होईल, याची खात्री आहे. आजकाल प्रसिद्धीसाठी वाद आवश्यक झाला आहे. चित्रपटाचेच बघा ना, वाद झाला की तो चित्रपट बर्यापैकी व्यवसाय करतो. त्यामुळे असे वाटते की, हे वाद योजनापूर्वक केले जातात की काय? असो. बर्याच वर्षांनी संमेलनाध्यक्ष निवडणूक न होता निवडण्यात आले आहेत. ही एक अत्यंत सकारात्मक बाब आहे. विनानिवडणूक संमेलनाध्यक्ष निवडला जाणे, हा कायम शिरस्ता व्हायला हवा, अशीच तमाम साहित्यरसिकांची इच्छा आहे. साहित्य संमेलन हे सर्व बाजूंनी यशस्वी झाले पाहिजे. कारण, हा एक उत्सव असतो आणि उत्सवाला गालबोट लागता कामा नये. परंतु, या संमेलनाच्या निमित्ताने काही विचार मांडण्याची मी हिंमत करत आहे.
 
संमेलनाचा अध्यक्ष कोण असावा, हा आजकाल वादाचा विषय होत चालला आहे. परंतु, एक निश्चित की तो मान्यवर साहित्यिक असला पाहिजे. एवढ्यात असे बघण्यात आले आहे की, समीक्षकदेखील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होतात. समीक्षक हे साहित्यिक आहेत का, असा एक प्रश्न अनेक दिवसांपासून मनात घोळत आहे. माझ्या मते समीक्षक हे साहित्यिक नसतात. साहित्यिकांच्या साहित्याची त्यांनी समीक्षा केली असते, एवढेच. एका अर्थाने ते इतरांसारखेच साहित्यरसिक असतात. फरक एवढाच की, ते साहित्य वाचून त्यावरील आपली प्रतिक्रिया ते शास्त्रीय पद्धतीने मांडतात. त्यामुळे ते साहित्यिक होऊ शकत नाहीत. वामपंथी भाषा वापरायची झाली तर ते प्रतिक्रियावादी असतात. वाचकाला साहित्य वाचून जे वाटते ते तो शास्त्रीय चौकटीत मांडू शकत नाही आणि ही समीक्षक मंडळी ते तसे मांडतात, एवढाच काय तो फरक आहे. त्यामुळे वाचक हा जसा साहित्यिक होऊ शकत नाही, तसा समीक्षकही साहित्यिक नसतो, असे मला वाटते. साहित्यिकांनी साहित्यच निर्माण केले नाही तर समीक्षा कशाची करणार? आता या मुद्यावर चर्चा होऊ शकते आणि ती झाली पाहिजे.
 
 
 
 
मागे एकदा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या एका ज्येष्ठ पदाधिकार्याला मी विचारले की, आजकाल समीक्षकांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळू लागले आहे. साहित्यिक उरले नाहीत की काय? ते म्हणाले, दुर्दैवाने आजकाल कुणी साहित्यिक आढळतच नाहीत. त्यामुळे समीक्षक अध्यक्ष होत आहेत. या पदाधिकार्याची ही खंत असली, तरी ते कारण होऊ शकत नाही. साहित्यिक भरपूर आहेत. नवीन पिढीतही आहेत. नवनवे तसेच सकस विचार मांडणारे भरपूर आहेत. महामंडळाने तसा शोध घ्यायला हवा. त्यासाठी मनाची कवाडे खुली असणे आवश्यक आहे. आपण बघतो की, साहित्यविषयक संस्थांवर आजही प्रगतिशील विचारवंतांचा, चळवळ्यांचा प्रभाव आहे. अत्यंत असहिष्णू असणारे हे विचारवंत, आपल्या पठडीबाहेरच्या कुणाही व्यक्तीला जवळ करीत नाहीत. त्यामुळे असेल, यांना कुणी नवा साहित्यिक नजरेस पडत नसावा. साहित्यिकच नाही, इतकी आपली मायमराठी ओसाड झालेली नाही.
 
 
पारंपरिक मराठी साहित्य संमेलनाव्यतिरिक्त अन्य लहान-मोठी साहित्य संमेलने होतात, हे मराठी साहित्य महामंडळाचे अपयश समजले पाहिजे. प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे आणि त्यानुसार ते वेगवेगळी संमेलने घेत असतील, तर त्याने मराठी भाषा समृद्धच होते, अशी सेक्युलरी छाप कारणे निरर्थक आहेत. मुळात साहित्य संमेलनच इतके व्यापक असले पाहिजे की, प्रत्येक मराठीभाषकाला त्यात अभिव्यक्त होण्यात धन्यता वाटली पाहिजे, तशी त्याला पुरेशी संधीही मिळाली पाहिजे, तसेच मराठी भाषेच्या कुठल्याही प्रवाहाला आपल्यावर अन्याय होत आहे, असे वाटायला नको. इतक्या वर्षांच्या प्रवासानंतरही ही भावना आणि हे आश्वासन आम्ही समस्त मराठीभाषकांच्या तसेच मराठीच्या विविध प्रवाहांमध्ये निर्माण करू शकलो नाही, याची खंत संबंधितांना वाटली पाहिजे. एक साहित्य संमेलन सोडले, तर महामंडळाला दुसरे कुठले काम असते माहीत नाही. त्यामुळे इतर वेळी मराठीतल्या समस्त (अगदी विचारभिन्नता असली तरी) प्रवाहांशी संपर्क, समन्वय राखून त्यांना आपल्यासोबत घेण्याची वृत्ती या प्रगतिशील साहित्य चळवळ्यांनी दाखवावी, अशी अपेक्षा आहे.
नाट्य संमेलनाचेही असेच आहे. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कुणी व्हावे? संहिता-लेखकाने की, दिग्दर्शक किंवा कलाकाराने? मुळात नाटक कुणाचे असते? असे म्हणतात की, नाटक हे दिग्दर्शकाचे असते. एक उदाहरण देतो. विजय तेंडुलकरांचे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक पुस्तकरूपात वाचणे आणि त्याचा जब्बार पटेलीय आविष्कार मंचावर बघणे, यात कितीतरी फरक आहे. जी अनुभूती नाटक बघताना येते ती नाटक वाचताना निश्चितच येत नाही. त्यामुळे नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी संहिता-लेखकांना संधी न देता दिग्दर्शक किंवा विख्यात कलाकाराला ती मिळायला हवी, असे मला वाटते.
 
 
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी व्यक्ती नको, असे सर्वच म्हणत असतात. पण, तरीही राजकारण्यांशिवाय या साहित्यिकांचे पानही हलत नाही. असे का? तुम्हाला आपली स्वायत्तता दाखवायची असेल तर ती केवळ व्यासपीठावरील भाषणापुरतीच न दाखवता, शासकीय अनुदानाच्या बाबतीतही दाखविली पाहिजे ना! साहित्य संमेलन शासकीय अनुदानाशिवाय यशस्वी करता आले, तरच मग आम्ही स्वायत्त आहोत असे म्हणता येईल. इकडे शासकीय अनुदान घ्यायचे आणि तिकडे जाहीरपणे राजकारण्यांशी फटकून वागायचे! असा दांभिकपणा का म्हणून? शासकीय अनुदानाशिवाय संमेलन घ्यायचे असेल, तर संमेलनाची संकल्पना बदलावी लागेल. आम्ही संमेलनाला साहित्यिकांचा उत्सव मानतो. तसे न मानता ही साहित्यिकांची वारी आहे असे मानले तर प्रश्नच सुटतो. वारीतील प्रत्येकाला पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची आत्यंतिक आस असते. तशीच आस खुद्द विठुरायालाही असते. तोदेखील आपल्या भक्तांना भेटण्यास आतुर असतो. असे हे दोन आतुरांचे मिलन असते. साहित्य संमेलनात असे का घडू नये? त्यासाठीतरी साहित्यिकांनी हे संमेलन वारी समजले पाहिजे. वारीत सहभागी प्रत्येक जण आपापल्या खर्चाने येत असतो. सोय-गैरसोय सर्व आनंदाने सहन करत असतो. त्याला ओढ असते पंढरीनाथाच्या दर्शनाची. साहित्यिकांनाही आपल्या वाचकांना, साहित्यरसिकांना भेटण्याची ओढ असली पाहिजे. ज्यांच्या प्रतिसादावर आपण समाजात साहित्यिक म्हणून प्रसिद्ध पावतो, त्यांच्या भेटीगाठी, चर्चेसाठी साहित्यिक स्वखर्चाने का म्हणून येणार नाहीत? निश्चित येतील.
 
 
दुसरे असे की, ज्या गावी संमेलन आहे, तिथले लोक तुमचे आदरातिथ्य करतील. तेवढी दानत आणि रसिकता कुठल्याही गावातील लोकांमध्ये आहे. या साहित्यिकांची निवास व जेवण व्यवस्था गावातील साहित्यरसिकांकडे केली तर तोही खर्च वाचतो. शिवाय त्या साहित्यरसिकाची छाती अभिमानाने भरून येईल. त्यांच्यासाठी हे वास्तव्य आयुष्यभर पुरेल अशी आठवण म्हणून राहील. या उपरही जो खर्च लागेल, तो स्थानिक मंडळी सहर्ष वहन करतील. असे झाले तर साहित्य संमेलनाचे एकूणच चित्र बदलून जाईल. त्यात आत्मीयता येईल. आपलेपणा येईल. प्रत्येक जण आपापल्या खर्चाने येत असल्याने, संमेलनातील प्रत्येक क्षण सार्थकी लागेल, असे बघितले जाईल. अनंत फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे, सरकारी अनुदानावर अवलंबून राहण्याचा प्रसंग येणार नाही. आम्ही खर्या अर्थाने स्वायत्त आहोत, हे अनायास सिद्ध होईल. इतक्या निरिच्छ भावाने होणार्या साहित्य संमेलनातील भाषणे, चर्चा, ठराव यांना एक नैतिक चमक येईल, धार येईल. आज नेमके हेच बेपत्ता आहे.
आज साहित्य संमेलन एकसुरी, उपचार म्हणून झाले आहे. त्यात जिवंतपणा आणायचा असेल, मराठी भाषेतील प्रत्येक साहित्यरसिकाला, वाचकाला संमेलन आपले वाटावे अशी इच्छा असेल, तर संमेलनाच्या संकल्पनेपासून, कार्यपद्धतीपर्यंत काहीतरी बदल होणे आवश्यक आहे. त्या भावनेतून मी काही सूचना केल्या आहेत. त्यावर चर्चा झाली तर चांगलेच आहे.
@@AUTHORINFO_V1@@