मुंबई : हिंदू अध्यात्म आणि सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून दि. ११ जानेवारी ते १३ जानेवारी पर्यंत कोरा केंद्र, बोरीवली पश्चिम येथे हिंदू आध्यात्मिक एवम सेवा प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनीचे उद्घाटन आचार्य बोधात्मानंद जी, (चिन्मय मिशन आणि आचार्य विजय श्री कुलचंद्र सुरिशश्वरजी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी व्यासपीठावर हिदूं आध्यात्मिक एवम सेवा प्रदर्शनीच्या अध्यक्ष डॉ. अलका मांडके, गिरीशभाई शाह, सुरेश भगेरिया, सतीश सिन्नरकर, सुशील जाजू, राजकुमार मटाले तसेच लक्ष्मीनारायण भाला आदी उपस्थित होते. त्यापूर्वी गणेशवंदन करण्यात आले. तसेच तपस्या अकादमीतर्फे पुरुष- प्रकृती बॅले सादर करण्यात आला.
उद्घाटनाच्या पहिल्या सत्रात हिंदू आध्यात्मिक एवम सेवा प्रदर्शनीचे केंद्रीय संयोजक गुणवंत कोठारी यांनी हिंदू आध्यात्मिक एवम सेवा प्रदर्शनीचे प्रयोजन काय हे सांगितले. ते म्हणाले, “भारतीय संस्कृतीच्या दर्शनामध्ये सेवा किंवा दान हे उजव्या हाताचे डाव्या हाताला कळू नये, असा संकेत आहे. याचा परिणाम असा झाला की, हिंदू मंदिर, मठ अगदी पुरातन कालापासून सेवाकार्य, दानधर्म करत असतानाही त्यांच्या या पुण्यकर्मापासून बाकीचे जग अनभिज्ञ राहिले. या सेवाकार्याची माहिती, ओळख समाजासमोर येणे गरजेचे आहे. यादृष्टीने या सेवा प्रदर्शनीचे आयोजन केले आहे. धर्म हा मंदिर-मठ यातून समाजकल्याणासाठी प्रवाही असतो, याची जाणीव नव्या पिढीला व्हावी हासुद्धा या प्रदर्शनीमागचा उद्देश आहे. त्यानंतर बालमुनी यांनी अत्यंत प्रभावीपणे हिंदूंच्या स्वभावाची मांडणी केली.
हिंदू म्हणजे काय हे सांगताना त्यांनी हिंदूच्या इंग्रजी स्पेलिंगचा अर्थ वेगळ्या पद्धतीने मांडला. ते म्हणाले, “एच म्हणजे ह्यूमॅनिटी म्हणजे माणुसकी, आय म्हणजे इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमान एन म्हणजे नोबेल म्हणजे एकमेवाद्वितीय डी म्हणजे डिव्हिनिटी म्हणजे देवत्व आणि यु म्हणजे युनिटी म्हणजेच एकता. ही एकता आहे या सगळ्या विशेष गुणांची. ही एकता म्हणजे हिंदू होय.” तर प्रमुख अतिथी बोधात्मानंद यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये सांगितले की, “देशाच्या उत्थानासाठीही आपल्याला अशाच एकत्रित पद्धतीने काम करायचे आहे. आपला देश जगत्गुरू आहेच पण त्याच्या चिरंतनात्वासाठी, देश आणि संस्कृतीच्या उत्थानासाठी आपण प्रत्येकाने आपल्या परीने त्याग करायला हवा. प्रयत्न करायला हवेत. आपण जिथे असू तिथे देशाच्या समाजाच्या कल्याणाचे चिंतन आणि कार्य करायला हवे.”
यानंतर वीर सन्मान हे दुसरे सत्र झाले. देशाच्या सुरक्षिततेसाठी प्राणाची आहुती देणार्या शहीद जवानांच्या पालकांचा सत्कार या कार्यक्रमामध्ये करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये ६ शहीद जवानांच्या परिवारांचा सन्मान करण्यात आला. लेफ्ट. भूषण अजय परब, विंग कमांडर डॅरियल कास्टलिनो, सिपाई निलेश सावंत, मेजर प्रसाद महाडिक, मेजर कॅ. विनायक गोरे, मेजर अतुल गर्जे या शहीद वीरांच्या परिवारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी होते के. टी. परनाईक (लेफ्ट. जनरल, निवृत्त) विशेष अतिथी म्हणून जयंतीभाई भेडेसिया, (रा.स्व.संघ क्षेत्र संघचालक), मुकेश खन्ना (प्रसिद्ध अभिनेता) होते. यावेळी लेफ्ट. जनरल, निवृत्त के. टी. परनाईक यांनी सैनिकांच्या शौर्याच्या आणि बलिदानाच्या भावनेला नमन करून भारतीय सैनिक देशासाठी बलिदानाची सर्वोच्च भावना ठेवतात, असे नमूद केले. तर, मुकेश खन्ना यांनी हिंदू धार्मिक संस्थांच्या कार्यक्रमाला आलो की, घरच्या गोतावळ्यात आलो असे सांगितले. मुकेश खन्ना म्हणाले की,“आपण जातीपाती धर्मभेद सोडून फक्त भारतीय म्हणून जगायला हवे.”
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/