खेलो इंडिया योजना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2019
Total Views |
 
 
 
देशात खेळांना प्रोत्साहन मिळावे आणि खेळातील नवीन टॅलेंट उजेडात यावे, यासाठी सरकारने सप्टेंबर 2015 मध्ये ‘खेलो इंडिया’ योजनेचा शुभारंभ केला. पूर्वीच्या राजीव गांधी खेळ योजना, शहरी खेळ संरचना योजना व प्रतिभा शोध योजना या तिन्ही योजना एकत्रित करून ही नवी योजना सादर केली गेली आहे.
 
देशाच्या तरुण पिढीमध्ये खेळांची संस्कृती रुजावी आणि त्यातून विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे नाव गाजविणारे खेळाडू तयार व्हावेत, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.यानुषांगाने केंद्रीय मंत्रिमंडळाने पुढील 2 वर्षे सुधारित ‘खेलो इंडिया’ कार्यक्रम राबविण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी 1,756 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
 
 
विविध क्रीडा प्रकारांतील 1000 तरुण व प्रतिभावंत खेळाडूंची निवड करून त्यांना सलग 8 वर्षे प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीसह प्रशिक्षण दिले जावे, असे ठरवले आहे. मुलांमधील क्रीडा कौशल्य लहान वयातच हेरून दीर्घकालीन प्रशिक्षणाने गुणवान खेळाडू घडविण्याची अशी योजना देशात प्रथमच राबविली जात आहे.
 
 
देशभरातील निवडक 20 विद्यापीठांना क्रीडा नैपुण्याची केंद्रे म्हणून विकसित करण्याचाही या कार्यक्रमात समावेश आहे. त्यामुळे गुणवान खेळाडूंना त्यांच्या क्रीडा प्रकारातील निपुणता प्राप्त करत असतानाच जोडीला औपचारिक पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे सुलभ होईल. याच कार्यक्रमात 10 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी ‘राष्ट्रीय तंदुरुस्ती मोहीम’ हाती घेतली जाईल. शरीराने धष्टपुष्ट व खेळांमध्ये रस घेणारी तरुण पिढी निर्माण करण्यासाठी यातून प्रयत्न केले जाणार आहे.
 
 
आपल्या देशाचा आकार व लोकसंख्या लक्षात घेतली तर विश्व चॅपियनशिप अथवा ऑलिम्पिकमध्ये आपल्याला मिळत असलेल्या पदकांची संख्या नगण्य म्हणावी लागेल. ही परिस्थिती सुधारण्यासाठी तसेच देशाच्या ग्रामीण भागात असलेले टॅलेंट शोधून काढून त्यांना स्पर्धातून भाग घेण्यासाठी तयार करण्याची ही योजना आहे. त्या दृष्टीने ऑलिम्पिक पोडियम सुरू केले गेले असून त्यासाठी पुरेसा निधीही दिला गेला आहे.
 
 
खेलो इंडियाअंतर्गत मागील वर्षी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत 3500 तरुणांनी सहभाग घेतला होता.
या वर्षी खेलो इंडियाचे दुसरे पर्व महाराष्ट्रातील पुण्याच्या छ. शिवाजी स्टेडियम, बालेवाडी येथे संपन्न होत आहे.
या स्पर्धेत मागील वर्षीपेक्षा तीन पट जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला असून 10 हजार स्पर्धकांचा विविध खेळ प्रकारात प्रवेश झाला आहे.
 
- कल्पेश गजानन जोशी
 
 
 
खेलो इंडिया कार्यक्रमाची उद्दिष्टे:
 
* सामाजिक व लैंगिक भेदभाव न मानता समाजाच्या सर्व थरांना सामावून घेऊन खेळांद्वारे सामाजिक सदभाव निर्माण करणे.
* मागासलेल्या भागातील तरुणांना खेळांकडे आकर्षित करून त्यांना विघातक कारवायांपासून परावृत्त करणे.
* खेळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, तरुणांमध्ये खेळांची आवड निर्माण करणे.
* शाळा व कॉलेज पातळीपासून क्रीडा स्पर्धांचा दर्जा उंचावणे.
* ग्रामीण भागातील तरुणांचे कौशल्य व प्रतिभा जाणून घेऊन त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे व त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
* विविध स्पर्धांतून उजेडात आलेल्या नवखेळाडूंना शिष्यवृत्ती व प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याइतपत सोयी सुविधा, प्रशिक्षण पुरवणे.
 
 
खेलो इंडिया राज्यातही
 
केंद्र शासनाने सुरू केलेली खेलो इंडिया-क्रीडा विकासाचा राष्ट्रीय कार्यक्रम या योजनेची 2018-19 या वर्षापासून राज्यात अंमलबजावणी करण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेमुळे राज्याच्या क्रीडा विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात गती मिळणार आहे.
 
 
या योजनेंतर्गत विविध उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये खेळाच्या मैदानांचा, विकास, क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम, राज्यस्तरीय खेलो इंडिया केंद्राची स्थापना, खेळाच्या वार्षिक स्पर्धा, प्रतिभावंत खेळाडूंचा शोध आणि विकास, खेळाच्या पायाभूत सुविधांचा वापर आणि निर्मिती-सुधारणा, क्रीडा अकादमीसाठी सहाय्य, ग्रामीण आणि देशी खेळांना प्रोत्साहन देणार्‍या स्पर्धा, शाळेतील मुलांची शारीरिक तंदुरुस्ती (तपासणी व मापदंड), महिलांसाठी खेळ-स्पर्धा, दिव्यांगांना खेळाच्या सुविधा व स्पर्धा यांचा समावेश आहे.
 
 
या नवीन योजनेंतर्गत त्या बाबींसाठी केंद्राकडून अतिरिक्त किंवा पूरक निधी उपलब्ध होणार असल्याने जास्तीत जास्त ठिकाणी आणि अधिक उच्च दर्जाच्या क्रीडा सुविधा निर्माण करता येणार आहेत. तसेच उच्च दर्जाचे आणि अधिक प्रमाणात प्रशिक्षक तयार होणार असल्याने त्याचा श्रेष्ठ खेळाडूंना अधिक लाभ होणार आहे. तसेच खेळाडूंना मिळणार्‍या शिष्यवृत्तीतही वाढ करणे शक्य होणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@