स्वबळाच्या कात्रीत सापडलेले उधोजी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


शिवसेनेने कितीही स्वबळाचा नारा दिला तरी त्यांना स्वबळावर स्वत:चा मुख्यमंत्री करणे म्हणजे जागेपणी स्वप्न पाहण्यासारखे आहे. आज असे अनेक प्रादेशिक राजकीय पक्ष आहेत, ज्यांनी स्वबळावर आपली सत्ता स्थापन केली. परंतु, गेल्या अनेक वर्षांमध्ये ते शिवसेनेला जमलेले नाही. आजकाल त्यांची स्थिती तळ्यात-मळ्यात अशीच झाली आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत नक्कीच विचार करणे गरजेचे आहे.

 

लोकसभेच्या निवडणुका अवघ्या दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. आता लगेचच विधानसभेच्या निवडणुकांचे बिगूल वाजेल. अशा परिस्थितीत राज्यातलं राजकीय वातावरण पुरतं ढवळू लागलं आहे. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची होणारी आघाडी ही युतीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे भाजप-शिवसेना युतीचं घोंगडं असंच भिजत पडलंय. राज्यात सध्या सर्वाधिक गाजणारा मुद्दा म्हणजे हाच, शिवसेना-भाजप युती. सध्या तो एक ‘हॉट टॉपिक’ झालाय, असं म्हटलं तरी चालेल. जातायेता ऐकायला मिळतात त्या याच गोष्टी. असो. पण आज शिवसेनेसारख्या पक्षाची स्थिती मधला कावळा या खेळातल्या ‘कावळ्या’सारखी झाली आहे. ना ‘या’ ठिकाणी जाऊ शकत ना ‘त्या’ ठिकाणी. कितीही स्वबळाची भाषा केली तरी राज्यात स्वबळावर आपला मुख्यमंत्री होणं म्हणजे जागेपणी स्वप्न पाहण्यासारखं आहे. मुख्यमंत्री आमचाच होणार, असं कोणीही कितीही छातीठोकपणे बोललं तरी ते कितपत शक्य आहे, हा प्रश्न त्यांनी स्वत:लाच विचारून पाहावा.

 

२०१४ मध्ये ‘मोदी’ लाटेत त्यांचे अनेक निवडून न येणारे उमेदवारही निवडून आले. त्यावेळी १९.३ टक्के मतं मिळवून शिवसेनेला ६३ जागा जिंकता आल्या होत्या. सध्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभांचा माहोल रंगू लागला आहे. आज असा एकही पक्ष नाही, ज्याने शिवसेनेवर तोंडसुख घेतलं नाही. नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीडमध्ये झालेल्या सभेतही असाच प्रकार घडला. वाघ आणि एका मुलीची गोष्ट सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ‘ती सुंदर मुलगी वाघाला कुत्रं समजून बडवते’ असं म्हणत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेचे वाभाडे काढले. शिवसेनेच्या पंढरपुरात झालेल्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुद्दा उमगत नव्हता. काय बोलायचं, काय नाही अशा द्विधा मनःस्थितीत सापडलेल्या पक्षप्रमुखांचं भाषण कोणाला कळलं हे त्यांनाच ठाऊक. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही त्यांची खिल्ली उडवत उद्धव ठाकरेंचं भाषण कळलं असेल तर त्याला १५१ रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. सध्या उद्धव हे संभ्रमावस्थेत सापडल्याचं चित्र दिसून येत आहे. तोंडावर आलेल्या निवडणुकांसाठी आपल्या आमदार, खासदारांचं समाधान पाहून युती करायची की, आपला संसार वेगळा थाटायचा अशी कात्रीत सापडल्यासारखी अवस्था त्यांची झाली आहे. यातच दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह यांनीदेखील पक्षाच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. त्यातच कोणी आपल्यासोबत आलं तर ठीक नाही तर उखडून फेकून देऊ, असं म्हणत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला इशाराच देऊन टाकला. वरिष्ठ पातळीवर अशी वक्तव्ये होत असताना मात्र, चंद्रकांतदादा पाटील यांनीही युती व्हावी, असा मनोदय व्यक्त केला, तर शिवसेनेचे खा. शिवाजीराव आढळराव-पाटील यांनीही राज्यात शिवसेना-भाजप युतीची गरज असल्याचं म्हटलं. आज एखाद्या पक्षासोबत एकत्र लढणं म्हणजे आपण शरणागती पत्करण्यासारखे असल्याची भीती शिवसेनेच्या मनात आहे. विशेष म्हणजे ही भयाची स्थिती अनुभवण्यास त्यांना ३० वर्षे लागली. त्यातच याच मातीतून तयार झालेल्या पक्षाला इतक्या वर्षांनंतरही स्वबळावर सत्ता स्थापन करता येऊ नये, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. सोबतच ताकद नसतानाही निम्म्या जागा मागणे किंवा भाजपची कोंडी करण्याचे प्रयत्न करण्यासारखे प्रकार आज शिवसेनेकडून सुरू आहेत.

 

भाजपने बिहारमध्ये जशी युती केली तशीच इथेही करेल, भाजप आपल्यालाही गोंजारत येईल, अशा आशेवर आज त्यांचे काही नेते फिरताना दिसतात. पण प्रादेशिक पातळीवर भक्कम पकड इतक्या वर्षात शिवसेनेला जमवता आली नाही, हे सत्य आहे. काही भाग सोडले तर आजही त्या मानाने त्यांची ताकद ही अपुरीच आहे. म्हणूनच आपली ताकद आणि पत न ओळखता बेडक्या फुगवून, दंड थोपटून कुस्ती खेळायला निघालेल्या उसन्या आव्हानवीरासारखे चित्र शिवसेनेचे झाल्याचे पाहायला मिळत आहे. पूर्वीची शिवसेना आणि आताची शिवसेना यात जमीन-आसमानाचा फरक आहे. सध्या शिवसेना दुटप्पी भूमिकेत आहे. २०१४ सारखी परिस्थिती राहिली नसल्यामुळेच आता आहेत तेवढेही खासदार आणि आमदार निवडून आणण्यास त्यांची दमछाकच होणार आहे. जर युती झाली नाही तर होणार्‍या मतविभाजनाचा सरळ फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसलाच होणार. त्यातच राज्यातही युतीसाठी शिवसेनेने काही अटी ठेवल्याचं वृत्त मध्यंतरी समोर आलं होतं. अर्ध्या-अर्ध्या जागा आणि मुख्यमंत्रिपद अशा काही अटी त्यांनी ठेवल्या होत्या. त्यातच उद्धवच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असतील, असंही वृत्त आलं होतं. ज्यांना आधाराची गरज आहे, सभागृहातल्या कामकाजाचीही माहिती नाही, अशी व्यक्ती मुख्यमंत्रिपदी विराजमान होणं यापेक्षा दुसरा कोणता विनोद असूच शकत नाही. मात्र, या सगळ्या अफवा आहेत, असं सांगत खा. संजय राऊत यांनी असं काहीच ठरलं नसल्याचं सांगितलं. त्यातच युती न करण्याचा निर्णय आपल्या कार्यकारिणीत ठरला असून तो अंतिम असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे आमचा पक्ष हा इतर कोणाच्या नाही तर पक्षप्रमुखांच्याच आदेशावर चालतो, असं म्हणत कार्यकारिणीमध्ये झालेल्या ठरावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास भाग पाडलं.

 

सावजाची शिकार मीच करणार. त्यासाठी दुसर्‍याची बंदूक वापरणार नाही, पण आता बंदुकीची गरज लागणार नाही. सावज दमलंय,” असं एका मुलाखतीत उद्धव म्हणाले होते. परंतु, कोण दमलंय आणि कोण स्वत:हून स्वत:ची शिकार करायला लागलंय, हे सध्याच्या परिस्थितीवरून दिसतच आहे. त्यातच भाजपकडून युतीसाठी मिळणारा अल्टीमेटम आणि पुढची राजकीय वाटचाल अशा दुहेरी मनःस्थितीत शिवसेना आज अडकली आहे. त्यातच अल्टीमेटम संपल्यानंतर शिवसेना आपले भिजत ठेवलेले राजीनामे बाहेर काढणार का किंवा सरकारचा पाठिंबा काढणार का, असे प्रश्न अनुत्तरितच राहणार याची खात्री आहे, तर दुसरीकडे कोणताही अजेंडा नसताना भाजपच्या नावाने गजर करायचा आणि दुहेरी भूमिका स्वीकारायची, असे प्रकार सध्या त्यांच्याकडून सुरू आहेत. निवडणुकांच्या तोंडावरही सामान्यांच्या प्रश्नांना बगल देण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे. एकीकडे भाजपवर सतत टीका करत राहायची आणि दुसरीकडे सत्तेत राहून आपण माहुताचं काम करतोय, असं भासवत राहायचं. आपल्या मित्रपक्षाला डिवचण्यासाठी दुसर्‍यांच्या वक्तव्यांचा आधार घेण्याची पाळी आता त्यांच्यावर येत आहे. ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील, त्यांचाच मुख्यमंत्री असा १९९५ साली फॉर्म्युला तयार करण्यात आला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही अपवादात्मक परिस्थिती सोडता तो स्वीकारला. त्यातच भाजपच्या ११७ आणि शिवसेनेच्या १७१ जागा असतानाही समसमान जागा दोन्ही पक्ष जिंकत होते. त्याचीच परिणती २०१४ मध्ये झाली. भाजपने अर्ध्या जागा मागितल्या आणि युतीचा धनुष्यबाण निखळला. सध्या परिस्थिती उलट आहे. भाजप हा शिवसेनेच्या तुलनेत मोठा भाऊ झाला आहे. अशातच अंतर्गत राजकारणाचाही फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. काही आमदार, खासदार युतीसाठी सकारात्मक असले तरी अंतर्गत गोटातून युतीला मात्र विरोध होत असल्याचं समजत आहे. त्यातच पुढील काळात शिवसेनेचा धनुष्य युवानेते आदित्य ठाकरे हाती घेतील, यात कोणतीही शंकाच नाही. त्यामुळे त्यांना पुढची वाटचाल खडतर ठरू नये यासाठी स्वबळाचा केलेला हा केविलवाणा प्रयत्न तर नसावा ना, असा प्रश्नही मनात घर करून जातो. आता भविष्यात कोणाच्या किती जागा निवडून येतील याबाबत सांगणं जरी कठीण असलं तरी सध्याची परिस्थिती पाहता धनंजय मुंडे यांचं ‘सुंदर मुलीचं’ वक्तव्य मात्र साजेसंच असल्याचं जाणवतं.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@