एका अर्णवची कहाणी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
 
ही कहाणी आहे, अर्णव नावाच्या एका अत्यंत हुशार तरुणाची. अर्णवचा अकरावीचा वर्गमित्र सौम्यदीप्त बॅनर्जी याने सांगितली आहे. अर्णव दिसायला चांगला होता. गुबगुबीत होता. मुख्य म्हणजे गणिताचे उदाहरण कितीही किचकट किंवा अवघड असो, तो पाच मिनिटांतच सोडवीत असे. सौम्यभाषी अर्णवचे आवडते लेखक सुनील गंगोपाध्याय आणि अब्दुल बशर होते. सौम्यदीप्त व अर्णव दोघेही वसतिगृहात राहात होते. कुणाचीही गणिताची समस्या अर्णव सोडवीत असे. तो उत्कृष्ट शिक्षक होता. तो शाळेत गणिततज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होता. सौम्यदीप्त सांगतो- हे 1996 सालचे दिवस होते आणि आम्ही दोघेही नारायणपूरच्या रामकृष्ण मिशन निवासी शाळेत होतो. आमच्या परिसरातील दहावीतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी याच शाळेत प्रवेश घेत असत. कोलकात्याला लागून असलेल्या 24 परगणा जिल्ह्याचे जिल्हास्थान असलेल्या बारासात गावचा अर्णव होता. याच गावात कधी काळी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय कनिष्ठ न्यायाधीश म्हणून नोकरीला होते. आजच्याप्रमाणेच त्या काळीही, आयआयटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे, हुशारीचा एक मापदंड होता. आपल्या आवडत्या आयआयटीमध्ये प्रवेश मिळावा म्हणून ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे, हे तेव्हा प्रत्येकाचेच ध्येय असायचे. या शाळेतील बहुतेक विद्यार्थी आयआयटी खडगपूर निवडायचे कारण ते सर्वात जवळ होते. अपेक्षेप्रमाणे अर्णवला प्रवेशपरीक्षेत उत्तम गुण मिळाले आणि तो आयआयटी खडगपूरला गेला. आता तो एक अत्यंत हुशार शास्त्रज्ञ म्हणून बाहेर पडणार, याची आम्हाला खात्री होती. परंतु, अर्णवने पहिल्या वर्षीच शिक्षण सोडले आणि तो हातात शस्त्रे घेऊन नक्षलवादी झाला. अल्पावधीतच तो नक्षल्यांच्या फार वरच्या श्रेणीत दाखल होऊन पुरुलिया व बर्दवान भागातून सूत्रे हलवू लागला. परंतु, 16 जुलै 2012 ला अर्णवला अटक होईपर्यंत अर्णवचा हा प्रवास मला माहीत नव्हता.
 
 
अर्णवचा आता कॉम्रेड विक्रम झाला होता. तो बंगालचा उच्च श्रेणीतील नक्षलवादी असल्याचे वृत्तपत्रांत आले. कम्युनिस्ट व तृणमूल सरकारने त्याच्यावर 30 गुन्हे दाखल केले होते. गुप्तचर खात्याचे अधिकारी पार्थ विश्वास आणि लहानपणचा त्याचा मित्र व आता शिक्षक असलेला सौम्यजित बसू यांची हत्या करण्याचा प्रमुख गुन्हा अर्णववर होता. त्याला अटक केली त्या वेळी त्याच्याकडे एके-47 बंदूक व बरीच काडतुसे सापडली. सौम्यदीप्त बॅनर्जी पुढे लिहितो- आईवडिलांचा एकुलता एक असलेला, अत्यंत हुशार अर्णव या मार्गाला लागेल, याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. आयआयटीच्या प्रथम वर्षातच तो नक्षलवादी चळवळीकडे ओढला गेला. पहिल्या सेमिस्टरमध्ये तो प्रथम आला होता. त्यानंतर मात्र त्याची घसरण होत गेली आणि नंतर कॉलेजमधून नाहीसा होऊन तो पुरुलियातील अयोध्या नामक जंगलात गेला. आजकाल नक्षल्यांबद्दल अनेकांना पुळका येत असतो. परंतु, एक लक्षात ठेवा की, देशातील पोलिस वा सैन्याविरुद्ध एके-47 उचलणारे कडवे डावे इतके धोकादायक नाहीत, जितके या नक्षल्यांना प्रेरित करणारे, योजना आखणारे, त्यांच्यासाठी पैसा गोळा करणारे आणि महत्त्वाचे म्हणजे शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नक्षलवादाकडे आकर्षित करणारे धोकादायक असतात.
 
 
 
अर्णव हा योजना आखण्यात तर सराईत होताच, पण नव्या तरुणांना नक्षल्यांकडे आकर्षित करण्यात त्याचा हातखंडा होता. मी जेव्हा त्याचे छायाचित्र वर्तमानपत्रात पाहिले तेव्हा धक्काच बसला. तो आता हाडांचा केवळ सापळा होता. शाळेत असताना तो इतका गुबगुबीत होता की, मी नेहमी त्याचे गाल ओढत असे. आता ते काहीच राहिले नव्हते. निस्तेज, डोळ्यांभोवती काळी वर्तुळे, ओढग्रस्त चेहरा होता त्याचा. हा माझा अर्णव नव्हता. तो आता कॉम्रेड विक्रम होता. कडव्या डाव्या विचारसरणीबद्दल सहानुभूती दाखविण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की, अर्णव हा काही अपवाद नव्हता. तो नक्षल्यांच्या सुसंघटित यंत्रणेचा एक परिणाम होता. ही यंत्रणा, सहज बळी पडणार्या विद्यार्थ्यांमध्ये सक्रिय असून त्यांना, ‘व्यापक जनहितासाठी’ किंवा ‘राजसत्तेला उलथून टाकण्यासाठी’ हिंसेच्या मार्गावर आकर्षित करीत असते. अर्णवसारखे हुशार, परंतु वरवर अतिआकर्षक भासणार्या एखाद्या विचारांनी वाहून जाणारे विद्यार्थी या यंत्रणेचे लक्ष्य असतात.
या कथेचा सर्वात दु:खद भाग म्हणजे ही नक्षलवादी चळवळ अजूनही फोफावत आहे. कारण, कुठेतरी सर्वात खालच्या पातळीवर भारतातील सर्वात हुशार विद्यार्थी, या तत्त्वज्ञानाच्या संपर्कात येत आहेत आणि ते स्वीकारत आहेत. अत्यंत तल्लख बुद्धीचा मेंदू अतिशय धोकादायक बनत चालला आहे. या अफलातून मेंदूंमुळे नक्षल चळवळ अजूनही तग धरून आहे. याच माओवादी तत्त्वज्ञानामुळे 1970 पासून कोलकात्यातील विद्यार्थ्यांची एक संपूर्ण पिढीच्या पिढी नष्ट झाली आहे. याच्या भयंकर कथा माझे वडील व आजोबा सांगायचे.
 
 
ही सर्व कहाणी सांगितल्यावर सौम्यदीप्त याने आपले मत मांडले आहे आणि ते अधिक विचारणीय व चिंतनीय आहे. तो म्हणतो, भारतातील विद्यार्थ्यांना या कडव्या डाव्या विचारसरणीपासून वाचविण्याचे आपल्यासमोर सर्वात मोठे आव्हान आहे. आयआयटी, आयआयएमसारख्या संस्थांमधून अर्णवसारखे हुशार विद्यार्थी माओवादाकडे जाणे बंद पाडले, तर ही चळवळ आपोआपच मृत होईल. परंतु, हा संघर्ष सुरू आहे. कारण, आपल्याकडील उत्कृष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये माओवाद्यांप्रती सहानुभूती असणारे सक्रिय आहेत आणि ते विद्यार्थ्यांमधील प्रज्ञावानांना शोधून काढत असतात. अलीकडेच अशांना एक नाव मिळाले आहे- शहरी नक्षल. अर्णवसारख्या हुशार तरुणांना, माओवादी चळवळीत भरती होण्यापासून आपण वाचविले नाही, तर शस्त्रांनी या चळवळीचा कितीही खातमा करण्याचा आपण प्रयत्न केला, तर तो कधीही यशस्वी होणार नाही, असा कळकळीचा इशारा सौम्यदीप्तने शेवटी दिला आहे.
 
 
निश्चितच, अर्णवची ही कहाणी अंगावर शहारे आणणारी आहे. जे सौम्यदीप्त आज सांगत आहे, ते मोदी सरकारच्या केव्हाच लक्षात आले आहे. संपुआ सरकारच्याही ते लक्षात आले असेल. पण, कारवाई करण्याची हिंमत नरेंद्र मोदी व राजनाथिंसह यांनी दाखविली आहे. पाच शहरी नक्षल्यांना अटक करताच, सर्वोच्च न्यायालयापासून पत्रकारांपर्यंत कसे खवळून उठले आहेत, हे आपण बघतोच आहे. याचा काय अर्थ काढायचा, हे प्रत्येकाने आपल्या लायकीप्रमाणे ठरवावे. तुतीकोडीतील स्टरलाईट कारखाना बंद करण्यामागे जी सोफिया आघाडीवर होती, तिला विमानात असभ्य वागणुकीवरून अटक झाली, तर तिच्या जामिनासाठी न्यायालयात 16 वकील उभे होते! न्यायाधीशदेखील थक्क झाले. या लोकांना अटक करू नका, असे सांगण्यासाठी, या देशातील सर्वोच्च न्यायालयही किती तत्परतेने तयार होते! राष्ट्रपतींनीही ज्याचा दयेचा अर्ज फेटाळला, त्याला फाशी होऊ नये म्हणून, न्यायालय मध्यरात्री आपली दारे उघडतात. कुणाला फोनवरून अटकपूर्व जामीन मिळतो. असो. एनजीओ चालवायचा, प्राध्यापक व्हायचे, शास्त्रज्ञ व्हायचे, वकील/न्यायाधीश व्हायचे आणि काहीच जमले नाही तर पत्रकार व्हायचे. या प्रकारे शहरी नक्षली समाजातच राहून, सरकारचा निधी वापरून, परदेशी देणग्या गोळा करून, या समाजाचेच रक्त शोषत आहेत. वरकरणी अत्यंत साधे, झोलाछाप, खादीचे कपडे घालणारे, समाजाची सेवा करण्याचे ढोंग करणारे हे लोक, जहरी नागापेक्षाही घातक आहेत.
 
शहरी नक्षल हा शब्द रूढ करणारे चित्रपटनिर्माते विवेक अग्निहोत्री म्हणतात की, या लोकांना भाजपा किंवा कॉंग्रेस कुणीही सत्तेवर असले तरी काही फरक पडत नाही. यांना हिंदू संस्कृती नष्ट करायची आहे. ती झाली की, या देशाचे तुकडे-तुकडे करणे, फार सोपे होणार आहे. हे सत्य जाणून, स्वत:ला सुशिक्षित म्हणवून घेणार्या व मानवतेच्या नावाने गहिवरून जाणार्या लोकांनी आतातरी डोळे उघडायला हवे. भारताचे तुकडे करण्यास टपून बसलेल्या या शक्तींना सहानुभूती तर सोडाच, पण मनातदेखील थारा न देण्याचा वसा जर आपण उचलला, तर ती एक फार मोठी देशाची सेवा होईल. सौम्यदीप्तला हेच सुचवायचे आहे...
@@AUTHORINFO_V1@@