युथफूल भारत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Sep-2018   
Total Views |


 

 

नुकताच आपण ७२ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला. जरी आपल्या देशाचं वयोमान ७२ वर्षे असले तरी आपला देश ‘तरुणांचा देश’ मानला जातो. कारण, ६५ टक्के लोकसंख्या ही तरुणांची आहे. त्यांचं वय ३५ वर्षे वयोगटापेक्षा कमी आहे. असं म्हणतात की, ज्या देशाकडे तरुणांची संख्या जास्त, तो देश सगळ्यात पुढे असतो. भारत निश्चितच या तरुणाईच्या बळावर पुढे जाणार आहे. आज विविध क्षेत्रांत तरुणाई कल्पकतेच्या आणि कष्टाच्या जोरावर जोरदार वाटचाल करीत आहे. उद्योगक्षेत्रसुद्धा याला अपवाद नाही. मराठी समाजात तर आता तरुण मुले प्राधान्याने व्यवसायक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर येत आहेत. अशाच काही होतकरू तरुण मुलामुलींची ही उद्योजकीय वाटचाल.
 

मालवण, मसाले आणि ‘मास्टर्स’

 

संतोष गावकर. मूळचे मालवणचे. मुंबई उपनगरात एका औषधी कंपनीत नोकरीस होते. १९९६ साली कंपनी बंद पडली. ७ लाख रुपये मिळाले. त्या पैशातून त्यांनी गावी जमीन घेतली आणि आंब्याची कलमं लावली. सोबत रिक्षासुद्धा घेतली. ते रिक्षा चालवायचे. अर्धांगिनी सरिता आणि कन्या स्नेहा सोबत होत्याच. काही वर्षाने गावकरांना रिक्षा चालवताना अपघात झाला. ते घरीच असायचे. लहानगी स्नेहा हे सगळं पाहत होती. हळूहळू जबाबदारीची जाणीव होत होती. बीएमएम करताना तर ही जाणीव आणखी दृढ झाली. तशी गावकरांची गावाला ३५० हापूस आंब्याची कलमं आहेत. त्यातून आंब्याचं उत्पादन मिळतं. त्यावर गुजराण होते, पण आपणसुद्धा आपल्या कुटुंबाला हातभार लावला पाहिजे, असे स्नेहाला वाटू लागले. मालवणमध्ये ‘प्रभा मसाले’ या नावाने मसाल्याचा जो ब्रॅण्ड प्रसिद्ध आहे तो स्नेहाच्या मावशीचा, रसिका मसुरकरांचा. तिने मावशीला सांगितले की, “मलासुद्धा तुझ्यासारखाच व्यवसाय करायचा आहे.” मावशीने तिला प्रोत्साहन दिले. आंगणेवाडीच्या यात्रेस गेल्यानंतर स्नेहा रसिका मावशीकडून मसाले, कोकम सरबत घेऊन येऊ लागली. मुंबईत ओळखीच्या लोकांना ते ती विकू लागली. सध्या स्नेहा साठ्ये महाविद्यालयात संज्ञापन व पत्रकारितेमध्ये ‘मास्टर्स’ करत आहे.

 

ती अन्नपूर्णा, ती उद्योजिका

 

कोल्हापूर म्हटलं की पैलवान, तांबडा पांढरा या सोबतच आठवते ती कोल्हापुरी चप्पल. संपूर्ण जगात या तीन गोष्टींचा बोलबाला आहे. अपर्णा यापैकी कोल्हापुरी चपलांचा व्यवसाय करते. शिवाजी विद्यापीठातून इंग्रजी विषयातून बीए झाल्यानंतर एमए करत असतानाच तिचं लग्न स्वप्नील कांबळेंशी झालं. ‘अर्थशास्त्र’ विषयात पदवीधर असलेल्या स्वप्नीलचं कुर्ल्यामध्ये ‘कांदेकर फूटवेअर’ नावाचं चपलांचं दुकान आहे. हे दुकान जवळपास ४५ वर्षे जुनं आहे. त्यांच्या आजोबांनी, नंतर वडिलांनी ते सांभाळल्यानंतर आता स्वप्नील समर्थपणे ते दुकान चालवतो. सासरी नांदायला आल्यानंतर अपर्णाने दोन मोठ्या कंपनीत नोकऱ्या केल्या. मोठ्या वर्तमानपत्रांमध्ये महिलांच्या पुरवणीसाठी ‘एक्झिक्युटिव्ह’ म्हणून काम केले. हे करत असताना पतीला मदत म्हणून चपलांचे मार्केटिंग करू लागली. आपण उद्योजिका व्हायचं आणि इतर महिलांनासुद्धा उद्योजिका म्हणून घडवायचं ही आंतरिक इच्छा होती. त्यातून चुनाभट्टी परिसरात महिलांना अगरबत्ती, इमिटेशन ज्वेलरी कशी विकायची याचं प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय शिकवला. अपर्णा तशी अन्नपूर्णा आहे. त्यामुळे तिच्या हातची बिर्याणी आणि केक म्हणजे लाजवाब असं तिच्या घरचे नेहमी म्हणत. त्यातूनच तिला केक, बिर्याणीच्या ऑर्डर्स येऊ लागल्या. हा एक व्यवसायाचा नवीन मार्ग सापडला. सर्व प्रकारच्या चपला ती विकते. काही महिला आवर्जून अपर्णाकडूनच चपला घेतात. अपर्णासुद्धा साठ्ये महाविद्यालयाच्या मास मीडिया विभागातून पत्रकारितेत ‘मास्टर्स’ करत आहे. मात्र तिचं स्वप्न आहे ते प्रचंड यशस्वी असलेली महिला उद्योजिका बनण्याचं आणि इतर महिलांनासुद्धा उद्योजिका म्हणून घडवायचं.

 

‘केक पर्क्स’

 

तशी ‘ती’ व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातलीच. पेशाने इंजिनिअर असलेल्या पंकज शाह यांचा हार्डवेअर आणि मेन्टेनन्सचा व्यवसाय आहे. पत्नी प्रिती शाह गृहिणी. या दोघांच्या पोटी पंक्तीचा जन्म झाला. लहानपणापासून उद्योग-व्यवसाय पाहत आलेली. बँकिग आणि इन्शुरन्स या विषयात मिठीबाई महाविद्यालयातून तिने पदवी मिळवली. लहानपणापासून कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी मित्र-मैत्रिणी केक कापून आनंद व्यक्त करायचे. त्यामुळे केकविषयी एक वेगळीच आत्मीयता पंक्तीच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे कॉलेजमध्ये शिकत असतानाच तिने केक बनविण्याचा एक कोर्स केला. कॉलेज संपल्यानंतर ती एका बँकेत नोकरीस लागली. मात्र, मनातून मात्र ती उद्योजिकाच होती. तिच्या आयुष्यातील पहिली केकची ऑर्डर तिच्या काकीने तिला दिली. दि. १९ मे २०१४ रोजी भावासाठी तिने केक बनविला. केक बनवण्याकरिता ती मैत्रिणीचा ओव्हन वापरायची. मात्र, केकच्या ऑर्डर्समधून ती पैसे जमवू लागली आणि काही महिन्यातच तिने स्वत:चा ओव्हन विकत घेतला. केकसोबत ती ब्राऊनी, कप केक्स, लाव्हा केक, डोनट्स बनवते. नोकरीव्यतिरिक्त मिळालेल्या वेळेत तिने स्वत:चा हा व्यवसाय सांभाळला. गेल्या चार वर्षांत तिने दोन हजारांच्या आसपास ऑर्डर्स मिळविलेल्या आहेत. ‘केक पर्क्स’ नावाने आता तिने स्वत:ची कंपनी सुरू केली आहे. याच वर्षी ‘लीडरशिप सायन्स’ या विषयात तिने मुंबई विद्यापीठातून ‘मास्टर्स’ केले आहे.

 

उद्योजिका घडविणारी उद्योजिका

 

अवघ्या २२ वर्षांची संजना. मात्र आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या २०० पेक्षा अधिक महिलांना तिने उद्योजकतेचे धडे दिले आहे. त्यातून जवळपास ५० महिला, उद्योजिका म्हणून स्वत:चा उद्योग सांभाळत आहेत. संदीप गजाकोष आणि जयश्री गजाकोष या दाम्पत्याची संजना कन्या. हे दाम्पत्य इकोफ्रेण्डली गणपतीसाठी जगात प्रसिद्ध आहे. कागदाच्या लगद्यापासून तयार केलेले त्यांचे गणपती सातासमुद्रापार थेट अमेरिकेत पोहोचलेले आहेत. संजनासुद्धा त्यांना त्यांच्या व्यवसायात लहानपणापासूनच हातभार लावते. त्यामुळे उद्योजकतेचे बाळकडू घरातूनच मिळाले. बारावी नंतर संजनाने कला शिक्षिकेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर क्राफ्ट टीचरचा कोर्सही पूर्ण केला. सध्या ती गोवंडीच्या एव्हरग्रीन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये शिकवते. याचदरम्यान तिने परफ्युम, साबण, पेपर बॅग्ज बनविण्याचं प्रशिक्षण घेतलं. संजनाची आई जयश्री गजाकोश यांचं ब्युटी पार्लर आहे. त्या ब्युटी पार्लरमध्ये काहीतरी आपलं स्वत:चं उत्पादन विक्रीस असावं म्हणून संजना साबण बनविण्यास शिकली. आज ती साबणासोबत परफ्युम, ग्रिटींग कार्ड्स, फोटो अल्बम, विविध कलाकुसरीच्या वस्तू बनवून विकते. सोबतच ती महिलांना हे सर्व बनविण्याचं प्रशिक्षणसुद्धा देते. अवघ्या दोन वर्षांत तिने या माध्यमातून चार ते पाच लाख रुपयांची कमाई केलेली आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या माध्यमातून तिने अनेक महिलांना उद्योजकीय प्रशिक्षण दिले आहे. आपल्यासोबत करोडो रुपयांची उलाढाल करणाऱ्या शेकडो महिला उद्योजिका घडविण्याचं संजनाचं स्वप्न आहे.

 

हाती मेहनत, नयनी स्वप्न...

 

त्याचं वय अवघं सतरा. पहाटे ५ वाजता तो उठतो. कणीक मळतो. त्यानंतर तो कॉलेजला जातो. दरम्यान त्याची आई आणि दोन महिला पोळ्या लाटतात. कॉलेजमधून परतल्यानंतर तो कॅन्टीनमध्ये पोळ्या देऊन येतो. संध्याकाळी पुन्हा कणीक मळून आईला पोळ्या बनवायला मदत करतो. हा प्रचंड मेहनत करणारा मुलगा म्हणजे अजय जाधव. अजयचे बाबा सुनील जाधव एका गार्मेंट कंपनीत काम करतात, तर आई साधना पोळ्या लाटण्याचे काम करते. अजयसोबत त्याचे भाऊसुद्धा या कामात आईला मदत करतात. दिवसाला हे कुटुंब एक हजारांच्या वर पोळ्या लाटते. अजय सध्या बीकॉमच्या पहिल्या वर्षात शिकतो. अत्यंत शांत आणि मेहनती असलेला अजय एका फोटोग्राफरसाठी सहायक म्हणूनसुद्धा काम करतो. मात्र, भविष्यात हॉटेलियर व्हायचं त्याचं स्वप्न आहे.

 

स्नेहा, पंक्ती, अपर्णा, संजना, अजय ही सारी बाविशीतली तरुणाई. मनात प्रचंड ऊर्जा. पडेल ते कष्ट घेण्याची तयारी, सोबतीला आहे कल्पकता. जोडीला आहे मोठ्ठं उद्योजक होण्याचं स्वप्न. या तरुणाईला गरज आहे ती पाठीवर हात ठेऊन नुसतं लढ न म्हणता खिशात हात घालून ते पुरवित असलेल्या सेवेचा लाभ घेण्याची. तेव्हा कुठे हीच तरुणाई खऱ्या अर्थाने घडवेल उद्याचा भारत. कलामांच्या स्वप्नातला महासत्ताधीश असलेला भारत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@