नवी मुंबई विमानतळावरुन पहिले ‘उड्डाण’ २०१९ मध्ये?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2018   
Total Views |





नवी मुंबई विमानतळाचे काम सध्या सुरु करण्यात आले असून या प्रकल्पाची सध्याची स्थिती, प्रकल्प कधी पूर्ण होणार, विमानतळामुळे होणारे परिणाम आदी गोष्टींची माहिती या लेखात दिली आहे...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 

 

नवी मुंबईतील विमानतळ हा देशातील एक अतिमहत्त्वाचा प्रकल्प गणला जात आहे. तो पनवेल जवळील प्रदेशात योजिला जात आहे. कारण मुंबईतील सध्याच्या सहार विमानतळाची क्षमता परिपूर्णतेच्या पलीकडे पोहोचली आहे आणि शीघ्रगतीने विकास पावणार्‍या मुंबई महानगरीतील यापुढील स्थितीच्या आंतरराष्ट्रीय हवाईवाहतुकीला मोठे आव्हान ठरणार असल्याने या नवी मुंबईत बांधल्या जाणार्‍या एका प्रचंड क्षमतेच्या विमानतळाच्या हरित प्रकल्पाला फार मोठे स्थान प्राप्त झाले आहे. सिडकोच्या विमानतळ वाहतूक विभागाच्या सीजीएम एस. विजयकुमारांच्या बरोबर प्रसारमाध्यमातील श्रीकांत राव व वीणा कुरूप यांच्याबरोबर केलेल्या चर्चेतून या प्रकल्पाच्या टप्प्याच्या प्रगतीचा काही महत्त्वाचा तपशील असा आहे. शहरांची आधुनिक पद्धतीने बांधणी करणार्‍या शहर आणि औद्योगिक विकास महामंडळम्हणजेच सिडको (CIDCO) या सरकारी संस्थेकडून या नवीन विमानतळाचे काम १९९७ पासून होत आहे. या विचारांना गती येऊन २००७ मध्ये तीन हजार कोटी रुपयांच्या पनवेलजवळील मुंबई विमानतळावरचे काम विभागण्याकरिता नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचा संकल्प केला गेला. त्यास त्यावेळीच्या सरकारकडून मंजुरी मिळाली होती. या विमानतळाच्या प्रकल्पाबरोबर नवी मुंबईतील विमानतळाजवळ नैनासारखी अनेक नगरे पण नियोजित केली जात आहेत.
 

सर्व मंजुर्‍या मिळविल्या

या प्रकल्पाला पर्यावरण, वन, सागरी किनार्‍यांजवळील संवेदनशील विभाग, संरक्षण विभाग, खारफुटी विभाग इत्यादी सर्व खात्यांकडून काही अटींनुसार हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. डीजीसीएनी विमानतळाच्या स्थानावरील सर्व सेवावाहिन्या व केबलची दुसर्‍या योग्य ठिकाणी नेण्याबाबत मंजुरी मिळविली आहे.

 

चार समुदायांनी निविदा भरल्या

विमानतळाच्या कंत्राटी कामाकरिता निविदा मागविण्याचे काम २०१४ पासून सुरू आहे. हिरानंदानी समुदाय, जीएमआर एअरपोर्टस् समुदाय, एमआयएएल आणि एमआयए इन्फ्रास्ट्रक्चर अशा चार कंत्राटदार समुदायांनी निविदा भरण्याचे ठरविले होते. प्रत्यक्ष विमानतळाच्या भूखंडावरील खोदकाम मार्च २०१६ पासून सुरू आहे. २०१७ मध्ये जीव्हीकेची सहकंपनी असलेल्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची निविदा मिळविली. प्रत्यक्ष बांधकामास ऑक्टोबरमध्ये सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. हे प्रकल्प काम पी.पी.पी. (खाजगी-सार्वजनिक संस्थांच्या जोडीने) नमुन्यात करावयाचे आहे. त्यात एमआयएएल कंपनी जी काम करणार आहे, त्यांचे भांडवलाचे प्रमाण ७४ टक्के अधिक सिडकोच्या भांडवलाचे प्रमाण २६ टक्के राहणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते फेब्रुवारी २०१८ मध्ये झाले.

 

चार टप्प्यात काम

पहिल्या टप्प्यातील काम म्हणजे दोनपैकी एक धावपट्टी, एक एप्रन, एक टॅक्सीमार्ग, अंशत: टर्मिनल इमारत इत्यादी कामे प्रथम बांधण्याचे ठरले आहे. मोठ्या उल्वा टेकडीच्या सपाटीकरणाच्या कामाचे कंत्राटी कामही नक्की झाले आहे. कारण या स्थानावरचे विमानतळाच्या धावपट्टीचे काम खोळंबले आहे.  या प्रकल्पाचे चार टप्प्यांत काम होणार आहे. शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर या विमानतळाची वार्षिक क्षमता ६० दशलक्ष प्रवासी इतकी वाढणार आहे. प्रथमच्या टप्प्यात १० दशलक्ष, दुसर्‍या टप्प्यात २५ दशलक्ष, तिसर्‍या टप्प्यात ४५ दशलक्ष व अंतिम चौथ्या टप्प्यात ६० दशलक्ष क्षमता होणे, अशी योजना आहे. या पूर्ण प्रकल्पाची स्थूल किंमत १५ हजार कोटी रुपये आहे. टप्पा एक व टप्पा दोन अशा दोन्ही टप्प्यांची मिळून स्थूल किंमत ९ हजार ५०० कोटी रुपये होईल. भूखंडावरील विकासपूर्व कामाचा स्थूल खर्च २ हजार ३५८ कोटी रुपये होईल. हे विमानतळ जेव्हा अंतिम स्वरूपात पोहोचेल तेव्हा ते जगातील प्रवाशांना, सामान नेण्याचे सर्व आधुनिक सेवा-सुविधायुक्त मोठे विमानतळ असेल.

 

प्रथम उड्डाण २०१९ मध्ये

सिडको खात्रीपूर्वक म्हणत आहे की, पहिल्या टप्प्यातील विमानाच्या प्रथम उड्डाणाकरिता लागणारी सर्व कामे पार पाडून डिसेंबर, २०१९ पूर्वी विमानतळावरून उड्डाण होणार. या घाईच्या कामात वर निर्देशिलेली धावपट्टी, एप्रन, टॅक्सीमार्ग आणि टर्मिनल इमारतीचे काम पुरे झालेले असेल.

 

प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन

सिडकोला खात्री आहे की, जमीन संपादन करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल व दुसर्‍या टप्प्याच्या मंजुर्‍या मिळविण्याच्या कामाला गती येईल. सध्या ७५ टक्के प्रकल्पाला लागणारी जमीन सिडकोच्या ताब्यात आहे. प्रकल्पबाधित रहिवाशांची घरे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरिता शिक्षण संस्था, देवळे इत्यादींचे नियोजन सुरू आहे. उर्वरित प्रदेश प्रकल्पबाधित लोकांनी व्यापला असल्यामुळे फक्त २५ टक्के जमिनीच्या भागाचा ताबा घेणे बाकी आहे. या सर्व बाधित जमिनींचा ताबा घेण्यासाठी आम्ही एक आकर्षक प्रयोग राबवित आहोत. या प्रयोगांमुळे जमीन संपादण्याचा प्रक्रियेला गती येईल. जमिनीच्या मोबदल्यात दुसरा प्रकल्पबाधितांच्या जमिनीचा २२ .५ टक्के जमीन नमुना त्यांना दिला जाईल. सुमारे १० गावांतील प्रकल्पबाधित रहिवाशांना पुष्पक नगर म्हणून सर्व सुखसोईंनीयुक्त अशी आधुनिक पद्धतीची वसाहत आम्ही विमानतळाच्या लगत विकसित करत आहोत. तिथे त्यांची सोय करण्यात आली आहे. एकूण ३ हजार ५०० कुटुंबे प्रकल्पबाधित आहेत व त्यांचे सुविधायुक्त पुनर्वसन करणे हे नियोजित आहे. हे सर्व पुढील सहा महिन्यांत पुरे करणे जरुरी आहे. त्यांचे उत्तम प्रकारे पुनर्वसन होण्याकरिता त्या प्रकल्पबाधितांना उद्योग वा नोकर्‍या देणे क्रमप्राप्त आहे,” असेही सीजीएम यांनी सांगितले.

 

सिडकोच्या विमानतळ संरचनेचे काम आधुनिक तंत्रज्ञानासह होणार

सिडकोकडे मजबूत अशा अभियंत्यांचा तसेच वास्तुशिल्पकार, प्रकल्प नियोजनकार इत्यादींचा समुदाय आहे. त्यांनी विश्वातील आधुनिक विमानतळांचा सखोल अभ्यास केला आहे. नवी मुंबई शहरात व्यावसायिक, निवासी किंवा इतर कारणांकरिता इमारत निर्मितींची मोठी वाढ विकसित होत आहे व असा विकास करण्याची सिडकोकडे क्षमता आहे. त्यातून सिडकोने आधुनिक पद्धतीची व कार्यक्षम वाहतूक व्हावी, या उद्देशांनी प्रकल्प पार पाडले आहेत. त्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे विमानतळ प्रकल्प.

 

वाहतुकीच्या रस्त्यांची कार्यक्षम व्यवस्था

हे विमानतळाचे स्थान पूर्वेकडील चार मार्गिका असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ४ ला इतर रस्त्यांनी जोडलले आहे. पश्चिमेकडे चार मार्गिका असलेल्या मोठ्या कॉन्क्रिट आम्र मार्गाला जोडलेले आहे. सध्याचे उपनगरीय रेल्वेमार्ग आहेत, तेदेखील विमानतळाच्या जवळ आहेत. या विमानतळाला जोडणार्‍या आणखी मोठ्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. आम्र मार्ग आठ मार्गिकांकरिता रूंदीकरण, विस्तारीकरण व दोन्ही बाजूला सेवा रस्ते बांधण्याकरिता तयारी होत आहे. राष्ट्रीय महामार्ग ४ याचे आठ मार्गिकांकरिता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. शीव-पनवेल द्रुतगती मार्गाचे १० मार्गिकांमध्ये रुपांतर होत आहे. वसई-अलिबाग रस्ता तसेच शिवडी-न्हावा एमटीएचएल प्रकल्पाचे कामही हातात घेतले आहे. तसेच मेट्रो व रेल्वेच्या कामातही विमानतळाला तत्परतेने पोहोचण्याकरिता सुधारणा होत आहेत.

 

विमानतळानजिक हरित वातावरण फुलणार

सिडकोने हरित वातावरण स्थापणे हे ध्येय ठेवले आहे. विमानतळाजवळच्या २४५ हेक्टर क्षेत्रांच्या वाघिवली गावातील खारफुटींच्या जंगलांची देखभाल शिवाय कामोठा गावाचे ३१० हेक्टर क्षेत्र व मोहा खाडीजवळ ६० हेक्टर क्षेत्र आणि विमानतळ जागेच्या उत्तरेकडील मोठे पाणवठ्यांचे क्षेत्र अबाधित ठेवण्यात येणार आहे. त्याचा विस्तार व नवीन लागवड करणे व जैवविविधता जगवणे ही कामे सिडकोने करावयाची आहेत.

 

नैना नगराचे नियोजन कसे होत आहे?

आम्ही जाणले आहे की, पनवेलच्या पुढे नियोजित नागरी प्रदेश विकसित झालेला नाही. म्हणून या प्रदेशांचा सिडकोने अभ्यास केला व ५० किमी अंतरावर असलेल्या विमानतळानजिकच्या प्रदेशांवर त्याचा परिणाम लक्षात घेऊन नियोजन सुरू केले. सिडकोकडे या नैना प्रदेशाच्या विकासाची जबाबदारी सरकारने सोपवली आहे. हे क्षेत्र सुमारे ६०० चौ.किमी आहे. त्यापैकी फक्त ५० टक्के क्षेत्र एक स्वरचित सामर्थ्यावर स्मार्ट शहर म्हणून विकसित होऊ शकते.

 

या प्रकल्पामुळे कोणत्या पर्यावरणाच्या अडचणी वाढणार?

दृष्य परिणाम - वायू प्रदूषणात वाढ, जैवविविधतेचा, वन्यप्राण्यांचा व शेतीचा र्‍हास संभवनीय आहे. १० किमी त्रिज्येच्या क्षेत्रांतील २६६ पक्ष्यांच्या स्थानांवर (कर्नाळा सॅन्क्च्युअरी धरून) संक्रांत आली आहे. ३ हजार ५०० कुटुंबांचे पुनर्वसन होणार आहे. त्यांच्यावर शेत सोडणे, इतर व्यवसाय सोडणे व मुलांकरिता शालेय वा उच्च शिक्षणामध्ये व्यत्यय येणे, असे घडले आहे. अदृष्य परिणाम - वैश्विक तापमानात वाढ, अन्नपाण्याची कमतरता होईल. भूजलाचा र्‍हास व राहिलेल्या जलाचे प्रदूषण होईल. १२१ हेक्टर क्षेत्रांच्या जंगलांचा र्‍हास व जंगली श्वापदांचा र्‍हास तसेच १६२ हेक्टर क्षेत्रांच्या खारफुटी व ४०४ हेक्टर क्षेत्रांच्या मडफ्लॅटचा र्‍हास संभवितो. जीवनावश्यक गोष्टींचा र्‍हास. सक्तीच्या पुनर्वसनामुळे अपघात वा मानसिक तणाव वाढू शकतो. प्रकल्पग्रस्तांच्या मोठ्या विरोधामुळे प्रकल्पाचे काम काही थोडे दिवस बंद पडले होते.मोठी उल्वा टेकडी तोडत असताना मर्यादित स्फोटांच्या कामात पाच अभियंत्यांना व काही प्रकल्पबाधितांना इजा झाली होती. त्यांच्यावर त्वरित उपचार करण्यात आले.वर दर्शविलेल्या अडचणी दिसत असल्या तरी सरकारला हा नियोजित प्रकल्प पुरा करणे भाग आहे कारण मुंबईच्या हवाई वाहतुकीवर क्षमतेअभावी फार दडपण आले आहे व त्या विकासाला थांबविता येत नसल्याने हा प्रकल्प वेळेत पुरा करणे अत्यावश्यक आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@