राज्यातील ११ जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस
राज्यात सरासरी ८२३ मि.मी. म्हणजेच एकूण सरासरीच्या ८६.१ टक्के पाऊस झाला असून गेल्या वर्षी याच सुमारास ७४८.९ मि.मी. म्हणजेच ७८.३ टक्के पाऊस झाला होता. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसाच्या नोंदीनुसार ११ जिल्ह्यांमध्ये १०० टक्के पेक्षा जास्त पाऊस पडला असून त्यामध्ये ठाणे, रत्नागिरी, पालघर, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, हिंगोली, अकोला, वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे १६ जिल्ह्यांमध्ये ७५ ते १०० टक्के यादरम्यान पावसाची नोंद झाली असून त्यामध्ये रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, अहमदनगर, कोल्हापूर, जालना, लातूर, परभणी, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच ५० ते ७५ टक्के पावसाची नोंद झालेल्या ७ जिल्ह्यांमध्ये नाशिक, नंदुरबार, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे.
खरीप हंगामात ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी
राज्यात खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र (ऊस वगळून) १४०.६९ लाख हेक्टर असून ३१ ऑगस्ट २०१८ अखेर १३५.९० लाख हेक्टर क्षेत्रावर (९७ टक्के) पेरणी झाली आहे. तसेच ऊस पिकासह असणाऱ्या १४९.७४ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १३७.६३ लाख हेक्टर म्हणजेच ९२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात ३२ लाख ७१ हजार १०५ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्ये, २० लाख ५२ हजार ६४१ हेक्टरवर कडधान्य आणि ४१ लाख ६४ हजार ४४४ हेक्टरवर तेलबिया पिकाची प्रत्यक्ष पेरणी-लागवड करण्यात आली आहे. तसेच ४१ लाख ०२ हजार २०७ हेक्टरवर कापूस आणि १ लाख ७२ हजार ३३३ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आली आहे.
राज्यात भात व नाचणी पिकांच्या पुनर्लागवडीची कामे अंतिम टप्प्यात असून पिके वाढीच्या ते फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहेत. पेरणी झालेल्या पिकांमध्ये आंतर मशागत, संरक्षित पाणी देणे आणि पिक संरक्षणाची कामे सुरु आहेत. कापूस पिकाखालील २६ जिल्ह्यांतील एकूण २० हजार १६० गावांमध्ये कापूस पिकाची पेरणी झाली आहे. काही भागात कापूस पिकावर झालेल्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ४ लाख २० हजार सापळे व १२ लाख ४२ हजार ल्युअर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मागील आठवड्यात केलेल्या उपाययोजनांमुळे ५१९ पैकी ३६६ गावांतील बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आलेला आहे. बोंडअळी नियंत्रणांतर्गत किटकनाशकांसाठी ८ कोटींची तरतूद करण्यात आली असून कीड व्यवस्थापनासाठी अतिरिक्त १७ कोटी देण्यात आले आहेत. कृषी विद्यापीठांनी केलेल्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांनी स्वत: खरेदी केलेल्या किटकनाशकांसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येत आहे.
खत व बियाण्यांची पुरेशी उपलब्धता
रासायनिक खतांचा वार्षिक खत वापर सरासरी सुमारे ६० लाख मे.टन इतका असून त्यापैकी खरीप हंगामात सरासरी ३३ लाख मे.टन तर रब्बी हंगामात सरासरी २७ लाख मे.टन खतांचा वापर होतो. मागील तीन वर्षातील खत वापर, बदलती पीक पद्धती, उपलब्ध सिंचन क्षमता, जिल्ह्यांची मागणी आणि जमीन सुपिकता निर्देशांक इत्यादी बाबींचा विचार करून राज्य शासनाने खरीप हंगाम-२०१८ साठी ४३.५० लाख मे.टन खतांची मागणी केली असून केंद्र शासनाने ४० लाख मे.टन एवढ्या खतांचे नियोजन मंजूर केले आहे. याशिवाय केंद्र शासनाने राज्यासाठी युरिया खताचा एकूण ०.५० लाख मे.टन वाढीव राखीव साठा मंजूर केला आहे.
खरीप हंगामातील अपेक्षित क्षेत्र, मागील तीन वर्षाची सरासरी विक्री आणि बियाणे बदल दर यानुसार पिकनिहाय बियाण्याची गरज निश्चित करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक व खाजगी क्षेत्राकडे उपलब्ध असणाऱ्या बियाण्याची माहिती घेऊन नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी १६.२६ लाख क्विंटल बियाण्यांची गरज असून त्या तुलनेत १६.६३ लाख क्विंटल बियाण्यांची उपलब्धता आहे. शेतकऱ्यांना ३१ ऑगस्टअखेर १५.८६ लाख क्विंटल (९७ टक्के) बियाणे पुरवठा करण्यात आला आहे.
जलाशयांमध्ये ६६ टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा
राज्यातील जलाशयात ४ सप्टेंबर २०१८ अखेर ६६.१ टक्के साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच सुमारास ६४.९५ टक्के साठा होता. यावर्षी आणि गेल्या वर्षीचा तुलनात्मक पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. सर्वाधिक जलसाठा कोकण विभागात ९३.०७ टक्के (९३.९६) इतका उपलब्ध आहे. तसेच पुणे विभागात ८७.२८ टक्के (८५.३४), नाशिक विभागात ६३.२१ टक्के (७१.७१), अमरावती विभागात ५४.१६ टक्के (२६.३७), नागपूर विभागात ४८.५१ टक्के (३३.१०) आणि मराठवाडा विभागात २९.२१ टक्के (४५.४२) इतका साठा उपलब्ध आहे.
राज्यात ३११ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा
राज्यात २७ ऑगस्ट २०१८ अखेर एकूण ३११ टँकर्सद्वारे ३०९ गावे आणि ३२२ वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक १४९ गावांना १५८ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील १८ गावे आणि ३ वाड्यांसाठी २४ टँकर्सचा पुरवठा करण्यात येत आहे.
रोहयोच्या कामावर १ लाख ४० हजार मजूर
राज्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २५ ऑगस्ट २०१८ अखेर ३० हजार ४१० कामे सुरु आहेत. या कामावर १ लाख ४० हजार ५२१ इतके मजूर उपस्थित आहेत. तसेच शेल्फवरील ५ लाखापेक्षा जास्त कामे असून त्या कामांची मजूर क्षमता १२ कोटींहून अधिक आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/