महाराष्ट्राचे पहिले मतदानकेंद्र मणिबेली गावाला एसडीआरएफ जवानांची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Sep-2018
Total Views |

 

 

 
 
 
नंदुरबार : महाराष्ट्र विधानसभेचा पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ असलेल्या अक्कलकुवा मतदारसंघातील गाव व राज्यातील पहिल्या क्रमांकाचे मतदानकेंद्र असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील मणिबेली या गावाला राज्य आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एसडीआरएफच्या जवानांनी नुकतीच भेट दिली तसेच तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. राज्याच्या उत्तर टोकावर सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले मणिबेली गाव अत्यंत दुर्गम असून आजही तेथे गुजरात राज्याच्या हद्दीतून नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पाच्या जलाशयातून बोटीने जावे लागते.
 

जेमतेम १२० घरे व सुमारे ५०० लोकसंख्या मणिबेली गावात वनवासी समाजाची लोकसंख्या ९९ टक्के आहे. नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या सरदार सरोवर धरण प्रकल्पाच्या पूर्व दिशेस जलाशयाच्या किनाऱ्याला लागून हे गाव आहे. सरदार सरोवर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या वनवासी खेड्यांमध्ये मणिबेलीचा समावेश असून या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या गावात महाराष्ट्राच्या हद्दीतून पोहोचणे अत्यंत अवघड असून अद्यापही या गावात पक्का रस्ता पोहोचलेला नाही. त्यामुळे नर्मदेच्या जलाशयातून गुजरात राज्याच्या हद्दीतून बोटीने पोहोचण्याशिवाय पर्याय नसतो. आता कुठे अक्कलकुवा- मोलगी- मणिबेली रस्ता सुरू होणार असून त्यानंतर महाराष्ट्राच्या हद्दीतून गावात पोहोचणे शक्य होणार आहे. अशा या मणिबेली गावाला एसडीआरएफच्या सुमारे १५ जवानांच्या विशेष तुकडीने भेट दिली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफच्या धर्तीवर जुलै, २०१६ मध्ये एसडीआरएफची स्थापना करण्यात आली असून या दलाचे धुळे व नागपूर असे दोन युनिट्स सध्या कार्यरत आहेत.

 

 

 

मणिबेली गावाला एसडीआरएफच्या तुकडीने पोलीस निरीक्षक के. यु. पवार यांच्या देखरेखीखाली भेट दिली तसेच, पोलीस हवालदार संतोष मोरे, पोलीस नाईक ए. व्ही. लटपटे, पोलीस शिपाई सुनील गिरासे, राहुल पवार, अशोक सोनावणे, रवी धनगर आदींसह १६ जवान यावेळी सहभागी झाले होते. सदर तुकडीने मणिबेली गावाची पाहणी केली तसेच स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. एसडीआरएफतर्फे अशा दुर्गम गावांना अनेकदा भेटी दिल्या जातात तसेच तेथील ग्रामस्थांना पाण्याच्या पातळीबाबत सतर्क करणे, शासकीय मदतीबाबत माहिती देणे, नैसर्गिक आपत्ती येण्यापूर्वी व आल्यानंतर काय करावे याबाबत माहिती देणे, काही प्रात्याक्षिके दाखवणे आदी उपक्रम घेतले जातात. कोणतीही नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा तेथे मदतकार्यासाठी जाण्यास एसडीआरएफ जवान सज्ज असतात. मात्र, ज्यावेळेस अशी कोणतीही आपत्ती नसते तेव्हा अशाप्रकारे त्याबाबत जनजागृती करण्याचे प्रयत्न एसडीआरएफकडून केले जातात,” असे यावेळी या जवानांनी दै. मुंबई तरूण भारतशी बोलताना सांगितले.
 
 
 

 

 

 
      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
@@AUTHORINFO_V1@@