चाळीस वर्षाच्या राजकारणात माझं काय चुकलं?- माजी मंत्री एकनाथराव खडसे

    03-Sep-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
चाळीस वर्षाच्या राजकारणात माझं काय चुकलं?-  माजी मंत्री एकनाथराव खडसे
मुक्ताईनगर, २ सप्टेंबर
चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत माझं काय चुकलं, अशी खंत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी मुक्ताईनगर येथे वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात जाहीररीत्या व्यक्त केली.या प्रसंगी दैनिक जळगाव तरुण भारतने प्रसिध्द केलेल्या आ.एकनाथराव खडसे लोकमान्य नेतृत्व या पुरवणीचे मान्यवरांचेहस्ते प्रकाशन करण्यात आले.
 
 
आ.खडसे पुढे म्हणाले की, सरकारने लादलेल्या सर्व परीक्षा उत्तीर्ण झालो असून, सर्वत्र मी निर्दोष सुटलेलो आहे. मग पक्ष पुढे येऊन जनतेला का सांगत नाही, की मी निर्दोष आहे. मी चाळीस वर्ष संघर्ष केला असून राजकारणात मी कुठे चुकलो? हे महाराष्ट्रभर दौरा करून प्रत्येक जिल्ह्यातील जनतेला विचारणार असल्याचे आ. खडसे यावेळी म्हणाले. गेली २८ महिने मी पदापासून दूर असल्याने आता पदाची कोणत्याच प्रकारची अपेक्षा नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पक्षाच्या काही निर्णयांवर नाराज जरी असलो, तरी भारतीय जनता पक्ष सोडणार नाही, असे जाहीरपणे सभेत त्यांनी स्पष्ट केले.
 
 
यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्य मंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, आ. संजय सावकारे, आ. सुरेश भोळे, आ.हरिभाऊ जावळे, मध्य प्रदेश खा. नंदकुमार चव्हाण, खा. रक्षाताई खडसे, खा. नंदासिंग चव्हाण, माजी
आ. दिलीप भोळे, बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे जनक राजेंद्र फडके उपस्थित होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भाजपा पक्ष वाढीकरिता व सत्ता काबीज करण्याकरिता सिंहाचा वाटा हा आ. खडसे यांचा असून अशा बहुजनांच्या नेत्याला तब्बल २८ महिने सत्तेपासूनच नाही,तर पदापासून वंचित ठेवणे हा एक मोठा अन्याय आहे, असे मत माझेच नाही तर जनतेचेसुद्धा आहे. या जनतेच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचे काम मी नक्कीच करेल. माजी आ.खडसे यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे.
 
लोकमान्य नेतृत्व पुरवणीचे प्रकाशन
माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसा निमित्त दैनिक जळगाव तरुण भारततर्फे प्रसिध्द करण्यात आलेल्या ‘ लोकमान्य ’या विशेष पुरवणीचे प्रकाशन आ.एकनाथराव खडसे व मान्यवरांचे हस्ते प्रकाशीत करण्यात आली.
 
 
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेले ना. चंद्रकांतदादा पाटील व ना. दिलीप कांबळे यांच्या हस्ते भारतातील पहिल्या अल्पसंख्याक समाजाकरिता शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजचे भूमिपूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ८२८ घरकुलांचे आदेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योगेश कोलते, राजू माळी, संदीप देशमुख, ललित महाजन, मनोज काळे, दीपक साळुंके, जयपाल बोदडे, सतीश चौधरी, विलास धायडे, निवृत्ती पाटील, विनोद सोनवणेंसह तालुक्यातील पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
 
https://www.facebook.com/Tarunbharatjal/