गीताधर्मयोगी भिडेशास्त्री : डॉ. मीरा केसकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2018
Total Views |



 

आठव्या वर्षीच डोळ्यांपुढे कायमचा अंधार पसरलेला असता खेड्यात राहणारा एक मुलगा... कसा शिकतो, स्वावलंबी होतो आणि प्रगाढ विद्वान होऊन डोळस जगाचे डोळे दीपवणारा पराक्रम कसा करतो, याची ही कहाणी केवळ अद्भुत आहे. ती सत्यकथा आहे.

 

भारतीय समाजात श्रीमद्भगवद्गीतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘गीताधर्म हाच राष्ट्रधर्म’ हे ब्रीद मनात धरून ज्यांनी पुणे येथे ‘गीताधर्म मंडळा’ची स्थापना केली, त्या वेदशास्त्र संपन्न सदाशिवशास्त्री भिडे या संस्थापकांचे चरित्र नुकतेच प्रकाशित झाले. शास्त्रीबुवांचे चरित्र, चारित्र्य आणि जीवनकार्य हे अत्यंत प्रेरणादायी असल्याने मंडळाने त्याची माहिती आजच्या पिढीला व्हावी, म्हणून ते लेखनकार्य डॉ. मीरा केसकर यांच्याकडे सोपवले. डॉ. मीरा केसकर यांनी हे कार्य अत्यंत निष्ठेने केले आहे. त्यासाठी त्यांनी शास्त्रीबुवांचे ग्रंथ, त्यांच्या कार्यकाळातील मंडळाचे अहवाल, आद्य शंकराचार्यांची गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्रे यांवरील भाष्य, शास्त्रीबुवांचे ‘कीर्तन’ मासिकातील इ. स. १९२० सालचे लेखन, त्यांचे जुने छोटेखानी चरित्र या आणि अशाच अन्य साधनांचा अभ्यास केला. लेखिका म्हणतात, आठव्या वर्षीच डोळ्यांपुढे कायमचा अंधार पसरलेला असता खेड्यात राहणारा एक मुलगा... कसा शिकतो, स्वावलंबी होतो आणि प्रगाढ विद्वान होऊन डोळस जगाचे डोळे दीपवणारा पराक्रम कसा करतो, याची ही कहाणी केवळ अद्भुत आहे. ती सत्यकथा आहे. चरित्र नायकाविषयीचा आदर आणि चरित्रलेखनाविषयीचे गांभीर्य, तळमळ यांचा प्रत्यय या लेखनातून येतो. तसेच प्रसंगवर्णन, चरित्रनायकांचा व्यक्तिमत्त्व विकास, इतरही व्यक्तिचित्रणे यातील बारकावे आणि भाषेचा प्रवाहीपणा व लालित्य हे वाखाणण्यासारखे आहेत.
 

चरित्रातील सहा प्रकरणांपैकी पहिल्या प्रकरणात शास्त्रीबुवांचे पूर्वज कोकणातील आडिवरे येथून मिरज संस्थानात कारभारी म्हणून दाखल झाले. ही कौटुंबिक पूर्वपरंपरा वर्णन केली आहे. शास्त्रीबुवांचे पिता गोपाळराव भिडे व माता रुक्मिणीबाई यांचे द्वितीय सुपुत्र सदाशिवशास्त्री आणि त्यांचे ज्येष्ठ बंधु तात्या यांच्या बालपणातील वातावरण, प्रत्ययकारी रीतीने उभे केले आहे. देवीच्या साथीत बाल सदाशिव अंध झाला. पण मोठे बंधू, मित्र, आईवडील यांच्या आधाराने तो स्वावलंबी होत गेला. शास्त्रीबुवांच्या शिक्षणाचे पुढील टप्पे, वासुदेवशास्त्री वाटवे आणि त्यानंतर तेलंगणशास्त्री यांच्याकडील शिक्षणाच्या हकिगतातून त्यांची स्वतंत्र प्रज्ञा कशी आकारास आली, याची हकिगत लेखिकेने उत्तमप्रकारे मांडली आहे. त्यांचे अल्पकालीन वैवाहिक जीवन आणि पार्श्वसंगीतासारखे काहीसे दुय्यम असे कौटुंबिक जीवन यातील प्रसंग खुबीने, लालित्यपूर्ण शैलीत लेखिका मांडते आणि शास्त्रीबुवांच्या गीताधर्माच्या अथक प्रचारकार्याला प्राधान्य देते. शास्त्रीबुवांचा व्यासंग, प्रखर, अचूक स्मरणशक्ती, विविध विषय आणि जीवनातील अनेकविध अंगांना धरून गीताधर्माचा आणि रामायण-महाभारतासारख्या प्राचीन महाकाव्यांचा संदेश सामान्यांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची तल्लख बुद्धिमत्ता या सर्व वर्णनांमधून दिसून येतो. त्याने वाचक स्तिमित होतो. लो. टिळकांच्या कर्मयोगप्रधान गीतार्थाला पाठिंबा देऊन त्याचा प्रचार करतो हे त्यांचे मोठे कार्य होय. त्यांचे संगीत शास्त्रातील प्राविण्य व त्याचे तपशील हेही वाचनीय आहेत.

 

शास्त्रीबुवांच्या प्रवचनाच्या विषयांमधून त्यांची पुरोगामी, स्वतंत्र विचारसरणी दिसून येतो. तशीच चरित्राच्या अखेरीस मान्यवरांनी त्यांना वाहिलेल्या श्रद्धांजलींचा जो समावेश पुस्तकात केला आहे. त्यावरूनही त्यांची महती पटते. शास्त्रीबुवांचे समग्र कार्य या चरित्रातून सविस्तरपणे आपल्याला कळतेच आणि भगवद्गीतेचे पुन्हा नव्याने वाचन करावे, अशी प्रेरणा होते. भगवद्गीतेचे वाचन, मनन हे लेखिकेचे अत्यंत आवडीचे असल्याने हे चरित्र अत्यंत रसाळ झाले आहे. तसेच त्यातील मान्यवरांच्या श्रद्धांजली, भिडेशास्त्रींनी बाबाराव सावरकर यांच्या ‘राष्ट्रमीमांसा’ या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेचा समावेश, शास्त्रीबुवांच्या सत्कार, मानपत्रे यांचा सामावेश यामुळे त्याच्या अस्सलपणाला वजन प्राप्त झाले आहे. मात्र, संस्कृत श्लोकांचे अर्थ मराठीत दिले असते तर ते अधिक योग्य झाले असते. प्रस्तुत चरित्र मात्र सर्वत्र उपलब्ध नसून ते लेखिका किंवा गीता धर्म मंडळ, पुणे यांच्याकडून उपलब्ध होऊ शकते.

 
 

पुस्तकाचे नाव : ‘गीताधर्मयोगी भिडेशास्त्री’

लेखिका : डॉ. मीरा केसकर

प्रकाशक : गीता धर्म मंडळ, पुणे

पृष्ठसंख्या : १५२

किंमत रु. : १७०

-सुनीति पेंडसे

@@AUTHORINFO_V1@@