सरकार पळ काढणारे नसून प्रतिसाद देणारे: मुख्यमंत्री

    25-Sep-2018
Total Views |


 


 

नवी मुंबई: माथाडी कामगारांचे आराध्य दैवत असलेले स्वर्गीय नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ८५व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते माथाडी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. माथाडी कामगारांचे वेतन, भविष्य निर्वाह निधी यासंदर्भातील मोबाईल एपचे लोकार्पणही करण्यात आले. या दरम्याने मुख्यमंत्र्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील तसेच उपाध्यक्ष संजय पवार यांच्या पदांना अनुक्रमे कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाचा दर्जा देत असल्याची घोषणाही केली.

 

मराठा, बहुजन समाजाच्या कल्याणासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे. तर मराठा तरुणांनी नोकऱ्या मागणारे नव्हे, तर देणारे बनावे अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यादरम्यान व्यक्त केली. आमचे सरकार हे प्रश्नांपासून पळ काढणारे नसून प्रतिसाद देणारे आहे आणि प्रश्नांना उत्तरे शोधणारे आहे असेही मुख्यमंत्री यांनी पुढे आपल्या भाषणात सांगितले.

 

'मराठा, बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आमचे सरकार प्रामाणिक आणि गांभीर्याने प्रयत्न करीत असून ही स्व. अण्णासाहेब पाटील यांना खरी श्रद्धांजली असणार आहे. मराठा समाजातील तरुणांना शिक्षण, व्यवसाय, रोजगार यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अण्णासाहेब पाटील महामंडळ अध्यक्षांना कॅबिनेट दर्जा देणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोच्या माध्यमातून ५२ घरांचे नियोजन करण्यात आले आहे. माथाडी कामगारांसाठी २६०० घरे आरक्षित आहेत. पुढील तीन महिन्यात अजून ५० हजार घरांचे नियोजन करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. माथाडी कायद्याला ५० वर्ष झाली असून हा कायदा देश पातळीवर राबविला पाहिजे. या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमवेत सिडकोचे अध्यक्ष आणि आमदार प्रशांत ठाकूर सुद्धा उपस्थित होते.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/