खजुराहोच्या शिल्प‘कळा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2018   
Total Views |


 


मानवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक कृतीची शिल्पे कोरलेली खजुराहोतील मंदिरे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. चंदेल राजांनी ११व्या शतकात उभारलेली ही २५ मंदिरे ओळखली जातात, ती प्रत्येक शिल्पाकृतीवरील नक्षीकाम, कलाकुसर, भिंती, घुमट आणि कळसांमुळे. शेकडो वर्षांपासून भारतीय संस्कृतीचा घटक बनून राहिलेली खजुराहो मंदिरशिल्पे पाहायला जगभरातून लाखो पर्यटक दरवर्षी भेट देतात. मंदिरातील कलाकृतींचा आस्वाद घ्यायला येणाऱ्या पर्यटकांचा आता मात्र गेल्या ५० वर्षांपासून इथे केल्या जाणाऱ्या देखभाल-दुरुस्तीमुळे हिरमोड होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’कडून खजुराहोतील खराब, पडलेल्या, तुटलेल्या मंदिर, कलाकृतींची, शिल्पांची दुरुस्ती केली जाते, पण फक्त सपाट दगडांच्या साहाय्याने! म्हणजेच आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्षांपूर्वी तंत्रज्ञानाचा, अभियांत्रिकीचा आजच्या काळातल्या शब्दावली आणि व्याख्येप्रमाणे विकास झालेला नसतानाही मुक्या, भावविहीन दगडांना बोलते केले, सौंदर्याची नवी दृष्टी दिली, त्याच कलाकृतींचा ऱ्हास नव्या युगात केला जात आहे. नक्षीदार आणि कलाकुसरीने नटलेल्या शिल्पांना हटवून दुरुस्तीच्या नावाखाली आता तिथे मोठ्या प्रमाणावर केवळ सपाट दगड रचून ठेवण्याचे अभिरुचीहीन काम होताना दिसत आहे, ज्यामुळे खजुराहोचे सौंदर्य नष्ट होऊन त्या मंदिरांना अवकळा प्राप्त होत आहे. असे का होत आहे पण? भारतात कलाकारांची, शिल्पकारांची, पाथरवटांची कमतरता अजिबात नाही. आजही राजस्थानच्या उदयपूर, जयपूर, बारा आणि ओडिशाच्या भुवनेश्वर, कोणार्क या ठिकाणी दगडांना बोलते करणारे कितीतरी कलाकार आहेत. मात्र, त्यांचे साहाय्य न घेता आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्याची, तो वारसा पुढल्या पिढीला हस्तांतरित करण्याची इच्छाशक्ती नसल्याने सध्या खजुराहोत देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली फक्त दगडांवर दगड लावण्याचे काम केले जात आहे. आताही खजुराहोच्या मंदिरांच्या अवस्थेबद्दल खजुराहो मंदिर संरक्षण सहायक असलेल्या जी. के. शर्मा यांनी असाच आरोप करत, हे दर्जाहीन काम माझ्या कारकिर्दीत नव्हे तर आधीच्याच अधिकाऱ्यांच्या काळात झाल्याचे सांगत हात वर केले. त्यामुळेच यापुढे कदाचित आणखी काही वर्षांनी आपल्याला हजार वर्षापूर्वीच्या मंदिरांच्या रूपात फक्त दगडांवर रचलेले दगड पाहावे लागतील, असेच म्हणावे लागते.

 

भाषिक संघर्षाचा भडका

 

मुस्लीम मतांच्या गठ्ठ्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे लाचार रूप अवघ्या देशाने नुकतेच पाहिले. कालपरवाच बंगाली या आपल्या मातृभाषेच्या सन्मानासाठी राज्य सरकारविरोधात पश्चिम बंगालमधल्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले. राज्यातल्या इस्लामपूर ठाण्यांतर्गत द्वारीभिट्टा माध्यमिक विद्यालयासमोर हे विद्यार्थी आंदोलन करत होते. विद्यार्थ्यांचा आरोप होता की, पश्चिम बंगाल सरकार बंगाली भाषेबाबत भेदभाव करत असून उर्दू भाषेवर विशेष मेहेरबानी केली जात आहे. ज्या शाळेमध्ये उर्दू भाषा शिकणारे विद्यार्थीच नाहीत, त्या शाळेतही राज्य सरकारने तीन-तीन उर्दू शिक्षकांची नियुक्ती केली, तर ज्या शाळेत विद्यार्थी आपली मातृभाषा-बंगालीचे शिक्षण घेतात, त्या शाळेत एकाही शिक्षकाची नियुक्ती केली जात नाही. याविरोधात या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सरकारचा निषेध करत आपल्या मागण्या शासन व प्रशासनासमोर ठेवल्या. ममता बॅनर्जी सरकारच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाला विरोध करत विद्यार्थ्यांनी बंगाली भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांचीही नेमणूक करण्याची मागणी केली. पण विद्यार्थ्यांच्या विरोध प्रदर्शनाने जळफळाट झालेल्या ममता बॅनर्जींनी त्यांचे आंदोलन मोडण्याचा आदेश दिला. आदेश मिळताच पोलिसांनी निःशस्त्र विद्यार्थ्यांवर हल्ला, लाठीमार, गोळीबार करत आंदोलन दाबून टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पोलिसांच्या हल्ल्यात राकेश सरकार या १९ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर विप्लव सरकार आणि तापस वर्मन हे विद्यार्थी गंभीर जखमी झाले. सोबतच शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जखमी झाल्या. एवढे होऊनही मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी उद्दामपणे या सर्वांच्यामागे भाजप आणि रा. स्व. संघाचा हात असल्याचा उफराटा आरोप केला. खरे म्हणजे मुस्लीम मतांसाठी स्वतःचे राज्यही घुसखोरांच्या, रोहिंग्यांच्या हातात देणाऱ्या ममता बॅनर्जी याच विद्यार्थ्यांच्या मृत्युला आणि आंदोलनाला जबाबदार आहेत. बंगाली भाषिक जनता ही नेहमी स्वतःच्या भाषेप्रति जागरूक असल्याचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत पाहायला मिळते, पण बंगाली लोकांची हीच भाषिक अस्मिता, वारसा आणि संस्कृती संपवायला निघालेल्या ममतांना त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. सुरुवातीला मार्क्सवाद्यांवर असाच आरोप करणाऱ्या ममतादेखील कम्युनिस्टांच्याच पावलावर पाऊल ठेवत कारभार करू लागल्या. अशा या ममतादीदींचा निषेध करावा, तेवढा कमीच!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@