संघाचा पराभव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

सत्य व सत्त्वशील व्यक्तीच्या पापणीच्या केवळ एका उघडझापीनेही, खोटारडेपणा व दंभावर उभारण्यात आलेला लाल किल्लाही कसा ढासळून खचतो, याचा प्रत्यय, 17 ते 19 सप्टेंबर रोजी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या व्याख्यानाने आला. भविष्यातील भारताबाबत संघाचा दृष्टिकोन या विषयावरील व्याख्यान व नंतर जिज्ञासूंच्या प्रश्नांना उत्तरे देऊन डॉ. मोहनजींनी, संघ हा विषय 360 अंशातून सर्वांसमोर मांडला. एक अमोघ, संयमी, तर्कशुद्ध, मंत्रमुग्ध करणारे वक्तृत्व, उपस्थित श्रोत्यांना आपल्या सोबत नेत विचारविश्वाची अलगद सैर कशी घडवून आणते, याचे हे ढळढळीत उदाहरण होते. भारतातील आतापर्यंतच्या ख्यातनाम उत्कृष्ट वक्त्यांची स्मृती धूसर करणारे मोहनजींचे हे वक्तृत्व होते, असे म्हणण्यात किंचितही अतिशयोक्ती नाही. या तीन दिवसांत मोहनजींनी इतके वैचारिक खाद्य दिले आहे की, जणूकाही छप्पन भोगांचा महाप्रसादच! अर्थातच, प्रसादाची रुची आणि तो ग्रहण करण्याची पात्रता असणारेच त्याकडे आकृष्ट होतील.
 
 
मृतमांसभक्षी, केवळ जखमांनाच टोचे मारणारे अथवा गायीच्या स्तनांना चिपकूनही अमृततुल्य दुधाऐवजी केवळ रक्तपानच करणारे या दिशेकडे फिरकणारही नाही, हेही तितकेच सत्य. मुळात हा प्रसादयज्ञ त्यांच्यासाठी नव्हताच. पाश्चात्त्यांच्या, चर्चच्या खरकट्यावर बुरशीप्रमाणे पसरून ज्यांना तृप्तीची ढेकरे येतात, त्यांचा अपेक्षेप्रमाणे या व्याख्यानांवरून मनोरंजक थयथयाट सुरू झाला आहे. सत्याचा सूर्य तळपू लागताच, दिवाभीतांची फडफड अंधार शोधण्याकडे होऊ लागावी, तशी स्थिती या वामपंथी, सेक्युलर विचारवंत व इतिहासकारांची झाली आहे. असो. खूप विचार आहेत. खूप मुद्दे आहेत. खूप स्पष्टीकरणे आहेत. कुठले कुठले मुद्दे घ्यावेत, प्रश्नच आहे. एकच घेतो. संघाचा पराभव. या भारताला एकात्म, अखंड, समरस, शक्तिशाली, बळकट बनविण्याच्या प्रयत्नात असलेल्या संघाला, याचे श्रेय नको आहे, असे डॉ. मोहनजी म्हणाले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर इतिहासात जर संघाची अशी नोंद झाली तर तो संघाचा पराभव असेल, असेही ते म्हणाले. एक प्रकारे मोहनजींनी कर्मयोगच सांगितला आहे. भगवद्गीतेच्या तिसर्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात-
 
 
सक्ता: कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत।
कुर्याद्विद्वांस्तथासक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम्।।25।।
हे अर्जुना! ‘या कर्माचे फळ मला मिळेल’ या प्रकारे कर्मात आसक्त होत अनेक अज्ञानी जीव जसे कर्म करतात, आत्मज्ञानी विद्वानानेही लोकसंग्रहासाठी अनासक्त होऊन तीच कर्मे केली पाहिजे. थोडक्यात, आत्मज्ञानी म्हणजे कर्मयोगी व्यक्तीने कुठलेही कार्य अत्यंत आस्थेने, परंतु अनासक्त होऊन केले पाहिजे. यात लोकसंग्रह हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आला आहे. हे सर्व कर्मयोगी लोकसंग्रहासाठी करत असतात, असे भगवान म्हणतात. लोकसंग्रह म्हणजे लोकांचा संग्रह नाही. लोकसंग्रह शब्दाचा शांकरभाष्यात सविस्तर ऊहापोह नसला, तरी लोकमान्य टिळकांनी ‘गीतारहस्य’ ग्रंथात आणि आचार्य विनोबांनी गीता प्रवचनांमध्ये यावर भाष्य केले आहे. संस्कृत शब्दकोशात लोकसंग्रहाचा अर्थ बघितला तर तो- मानवकल्याण किंवा मानवजातीची सांत्वना किंवा शांती करणे या अर्थाने आला आहे. लोकसंग्रहावर विनोबांचे भाष्य सोपे व नेमके आहे. विनोबा म्हणतात- कर्मयोग्याच्या कर्माने आणखी एक उत्तम फळ मिळते आणि ते म्हणजे, समाजासमोर एक आदर्श. कर्मयोगी सदैव कर्मरत असतो. कारण कर्मातच त्याला आनंद मिळतो. त्यामुळे समाजात दंभ वाढत नाही. कर्मयोगी स्वत: तृप्त झाला, तरी कर्म केल्यावाचून त्याला राहवत नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात-
आधी होता संतसंग। तुका झाला पांडुरंग।।
त्याचे भजन राहीना। मूळ स्वभाव जाईना।।
आधी संतसंग होता, त्यामुळे तुकाराम पांडुरंग झाला. परंतु, त्याच्या भजनाचे तार काही तुटत नाहीत. कधी मूळ स्वभाव सुटतो का? भजनाने परमेश्वर मिळाला म्हणून काय मी भजन सोडून देऊ? भजन तर आता आमचा सहजधर्म (स्वभाव) झाला आहे. कर्माच्या शिडीने शिखरावर पोहचले. परंतु, शिखरावर पोहचल्यावरदेखील कर्मयोगी शिडी सोडत नाही. ती त्याच्यापासून सुटूच शकत नाही. त्याच्या इंद्रियांना ती कर्मे करण्याची सवयच पडून गेली असते. अशा तर्हेने स्वधर्म कर्मरूपी सेवेच्या शिडीचे महत्त्व तो समाजाला जाणवून देत असतो.
 
 
 
समाजातून ढोंग, पाखंड मिटविणे फार मोठी गोष्ट आहे. ढोंग, पाखंडाने समाज बुडतो. कर्मयोगी जर चूप बसला, तर दुसरेदेखील त्याला पाहून हातावर हात ठेवून चूप बसतील. कर्मयोगी तर नित्य-तृप्त झाल्यामुळे आंतरिक सुखात तल्लीन होऊन शांत बसेल. परंतु, दुसरी व्यक्ती मनातून रडत रडत कर्म-शून्य होण्याची भीती असेल. यामुळे दंभ, पाखंड वाढेल. म्हणून सर्व कर्मयोगी म्हणा किंवा संत म्हणा, शिखरावर पोहोचल्यावरही साधनेचा पदर अतिशय सतर्कतेने पकडून असतात. आमरण स्वधर्माचरण करीत असतात.
 
 
अशा रीतीने कर्मयोग्याने फळाची इच्छा सोडली, तर त्याला अशी अनंत फळे प्राप्त होतात. त्याची शरीरयात्रा चालत राहील. शरीर व बुद्धी दोन्ही सतेज राहतील. ज्या समाजात तो विचरेल, तो समाज सुखी होईल. त्याची चित्तशुद्धी होऊन ज्ञानही मिळेल आणि समाजातून ढोंग, पाखंड संपून जीवनाचा पवित्र आदर्श प्रकट होईल.
थोडक्यात, समाजाच्या सांत्वनेसाठी, समाजाच्या शांतीसाठी, समाजासमोर सर्वोच्च पवित्र आदर्श सतत ठेवण्यासाठी कर्मयोगी व्यक्तीने त्याची स्वधर्म-कर्मे सतत करीत राहणे यालाच लोकसंग्रह म्हटले आहे.
संघ प्रत्येक काम अतिशय आस्थेने पण अनासक्तवृत्तीने करतो. तो कुठल्याही कामाचे श्रेय घेऊ इच्छित नाही, याचे हे मर्म आहे आणि जर इतिहासात यदाकदाचित, या भारत देशाला संपन्न, समरस, बलशाली बनविण्याचे श्रेय त्याच्या खाती चढविण्यात आले तर तो संघाचा पराभव ठरेल, असे जेव्हा सरसंघचालक म्हणतात, त्याचा हा मथितार्थ असतो.
 
 
 
संघाचे स्वयंसेवक समाजात अनेकानेक समाजोपयोगी कामे करीत असतात. त्याची कुठे वाच्यता न करता करत असतात. हे अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु, आजकाल, या सत्कामांचे श्रेय संघाला मिळाले पाहिजे, म्हणून काही संघहितैषी धडपडत असतात. भाषणे देतात. लेख लिहितात. चर्चा करतात. प्रसंगी दुसर्यांवर टीकाही करतात. हे सर्व संघाच्या दृष्टीने अनावश्यक आणि निरर्थक आहे, हे समजून घेतले पाहिजे. आपले नाव व्हावे, आपले नाव भारताच्याच नाही, तर जगाच्या इतिहासातही सुवर्णाक्षरांनी नोंदविले जावे, अशी संघाची कधीच इच्छा नव्हती आणि आजही नाही. अर्थातच पुढेही राहणार नाही. हा विषय मोहनजींच्या भाषणात बरेचदा येतो. परंतु, अशा प्रकारच्या व्याख्यानातही त्यांनी तो हेतुपुरस्सर आणला असावा. जेणेकरून, संघाला त्याचे श्रेय देण्याची जी काही धडपड संघाच्या हितैषींची सुरू आहे, त्याला आळा बसावा.
 
 
संघाचा हा कर्मयोग आहे. त्या अर्थाने संघ स्वयंसेवकांनी कर्मयोगी असले पाहिजे. आपण किती टक्के कर्मयोगी आहोत याचे मूल्यमापन करून, शिडीच्या आणखी किती पायर्या आपल्याला चढायच्या आहेत, याचा अंदाज प्रत्येकाने घेतला पाहिजे.
संघ दिसायला खूप सोपा आहे. परंतु, समजून घ्यायला तितकाच कठीण आहे, असे जे म्हणतात, त्याचे हे कारण आहे आणि म्हणून संघाला समजून घेणे, संघाच्या बाहेर राहून शक्य नाही. त्यासाठी संघातच यायला हवे. संघाला आतून बघायला हवे. तरच संघ समजण्याची थोडीफार शक्यता आहे, असे जे सरसंघचालकांनी म्हटले, त्याचेही हेच कारण असले पाहिजे.
संघाची आजची स्थिती पाहू जाता, संघाला आणखी काही मिळवायचे आहे, असे काही उरलेलेच नाही. आत्मतृप्तीचा आनंद घेत, संघ सुखनैव जीवनक्रमण करत राहू शकतो. परंतु, तो तसे करू इच्छित नाही किंवा तसे तो करू शकत नाही. कारण तो कर्मयोगी आहे आणि कर्मयोग्याने लोकसंग्रह केलाच पाहिजे, असा शास्त्राचा आदेश आहे. ज्यांना बातमीमूल्य आहे अशा अनेक मुद्यांना मोहनजींनी आपल्या भाषणातून स्पर्श केला असल्यामुळे सर्वांचे लक्ष तिकडेच अधिक असणार. परंतु, म्हणून मोहनजींनी संघाच्या वैशिष्ट्यांचाही जो काही उल्लेख केला त्याकडे दुर्लक्ष होऊ नये, असे वाटले म्हणून हा लेख लिहिण्याचा प्रयत्न.
@@AUTHORINFO_V1@@