पुणे विद्यापीठाच्या नाशिक, अहमदनगर उपकेंद्रांसाठी ५० कोटींची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2018
Total Views |



नाशिक: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक व अहमदनगर उपकेंद्राला प्रशासकीय मंजुरी द्यावी, तसेच उपकेंद्रांच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी द्यावी, यासाठी विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमित पाटील व आ. अनिल कदम यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली. यावेळी त्यांना उपकेंद्राच्या उभारणीसाठी निधीच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. तसेच सदर निवेदन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयातही देण्यात आले. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र उस्मानाबाद येथे तर नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र लातूर येथे आहे. त्याच धर्तीवर नाशिक व अहमदनगर या उपकेंद्रांच्या सक्षमीकरणासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. यापूर्वी अमित पाटील यांनी राज्यपाल व शिक्षण राज्यमंत्री तसेच विद्यापीठाचे कुलगुरू यांनाही निवेदन दिले होते. नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ उपकेंद्राचे सक्षमीकरण होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. जिल्ह्यातील कृषिक्षेत्रामध्ये द्राक्षे व कांदा यांच्याशी निगडित मोठे व्यापार केले जातात. जिल्ह्यातील युवकांकरिता मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊन व्यवसाय करण्याची संधीही उपलब्ध होणे शक्य असल्याने नाशिकचे उपकेंद्र लवकरात लवकर उभे राहावे यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

 

उपकेंद्रात सुरू होऊ शकतात हे अभ्यासक्रम

 

वायनरी अभ्यासक्रम तसेच अन्नधान्य प्रक्रिया उद्योग अभ्यासक्रम, पर्यटन अभ्यासक्रम, आयात - निर्यात संदर्भात अभ्यासक्रम व नाशिक जिल्ह्यातील विविध मोठे कारखाने यांच्या संयुक्त विद्यमाने अभ्यासक्रम सुरू केले जाऊ शकतात.
 

पहिल्या टप्प्यात किमान दहा कोटी मिळावे

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी ६३ एकर जागा नाशिकमध्ये आरक्षित करण्यात आलेली असून केवळ निधी होऊ न शकल्याने बांधकाम सुरू होऊ शकलेले नाही. निधी उपलब्ध झाल्यास या जागेवर बांधकाम सुरू होऊ शकणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात किमान १० कोटी रुपयांचा तरी निधी देऊन या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी आ. कदम व सिनेट सदस्य अमित पाटील यांनी विनोद तावडे यांना केली.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

@@AUTHORINFO_V1@@