विश्वातील भारत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Sep-2018   
Total Views |


 

 

विश्वातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारताला अधिक उजवे ठरवणाऱ्या अश्या बऱ्याच बाबी आहे. भारतीय मंदिरातील कोरीव काम, शिल्प आणि वास्तुरचना ही जगातील इतर राष्ट्रांतील नागरिकांना नेहमीच अचंबित करत आली आहे. त्यामुळे अशा धार्मिक राष्ट्राला जगासमोर आणण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 

जगाच्या पाठीवरील देशांची जर मांडणी करावयाची झाली तर आजमितीस आपल्याला विकसित, विकसनशील आणि अविकसित या व्याख्यांच्या पलीकडे जावे लागेल आणि एका देशातील नागरिक दुसऱ्या देशाला किती समजून घेतोय याची उजळणी करावी लागेल. म्हणजेच संस्कृती, संगीत, साहित्य, पर्यटन याच्या पल्याड जाऊन त्या देशातील खाद्यसंस्कृती, कलाकौशल्य हेही समजून घ्यावे लागेल. त्यातूनच समजलेला देश आणि न समजलेला देश अशीही व्याख्या करावी लागेल. भारताचे आकर्षण संपूर्ण विश्वाला ऐतिहासिक काळापासून आहे. त्यामुळे आजच्या एकविसाव्या शतकातही अमेरिकन, ब्रिटन, स्कँडेव्हियन देशातील नागरिक भारतात येत असतात. त्यांचा हेतू पर्यटन, आयुर्वेद उपचार, योग अशा तत्सम प्रकारात बव्हंशी पाहावयास मिळतो. विश्वातील इतर राष्ट्रांतून येणाऱ्या पाहुण्यांना भारत देश समजून घेण्याची इच्छा असते. मात्र, आठ-दहा दिवसांत संपूर्ण भारत समजून घेणे शक्य होत नाही आणि या अतिथींना भारत देश समजून देण्याची सुविधाही आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे अशा पाहुण्यांना देश समजून देण्यासाठी, देशाविषयी त्यांची जाण विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेकडून अर्थात आयसीसीआर ‘अंडरस्टँडिंग इंडिया’ हा कार्यक्रम तयार केला जात आहे. विश्वातील भारत नेमका कसा आहे आणि भारतातील विश्व नेमके कसे आहे, हेच यातून उलगडण्यात येणार आहे. पाश्चिमात्त्य राष्ट्रातील संस्कृती ही जरी भारतवासीयांनी अनुसरली असली तरी, पश्चिमात्त्यांना भारतीय संस्कृतीची अभिलाषा आहे, हेही तितकेच सत्य आहे.

 

भारताचे वर्णन वैश्विक पातळीवरील राष्ट्रात ‘अतुल्य भारत’ असेच केले जाते. मात्र या भारताची अतुल्यता समजून घेणे आणि भारतीयांनी ती विश्वाला समजून सांगणे हेच बदलत्या जागतिकीकरणाचे समीकरण ठरणार आहे. जगातील इतर राष्ट्रे एका सीमित नैसर्गिक साधनाने संपन्न आहेत. मात्र, भारत हा उत्तुंग पर्वतरांगा ते तप्त वाळवंट, गोडवा देणाऱ्या नद्या ते अथांग पसरलेले समुद्रकिनारे, धबधबे, खोल दऱ्या यांनीही समृद्ध आहे. त्यामुळे अशा भारताचे जागतिक पटलावरील स्थान हे कायम अबाधित राहणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना आखल्या जात आहे. त्याचाच एक भाग ‘अंडरस्टँडिंग इंडिया’ आहे. विश्वातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारताला अधिक उजवे ठरवते ते म्हणजे धार्मिक पर्यटन. भारतात असणारे धार्मिक पर्यटनाचे महत्त्व खचितच अन्य देशांत आढळते. भारतीय मंदिरातील कोरीव काम, शिल्प आणि वास्तुरचना ही जगातील इतर राष्ट्रांतील नागरिकांना नेहमीच अचंबित करत आली आहे. त्यामुळे अशा धार्मिक राष्ट्राला जगासमोर आणण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. पाश्चिमात्त्यांना कायमच पूर्वेकडील देशांतील मसाल्याचे पदार्थ खुणावत राहिले आहेत. भारतीय खाद्यपदार्थांना येणारी चव, त्यातील सत्त्व आणि पोषणमूल्य यांच्यामागे भारतीय मसाले आहेत, याची कल्पना 16 व्या शतकातच पाश्चिमात्त्यांना आली होती.

 
 
जगाला भारत समजून सांगताना भारतीय खाद्यसंस्कृतीचीही ओळख होणे आवश्यक आहे. याच धारणेतून ‘अंडरस्टँडिंग इंडिया’ या कार्यक्रमात याचाही समावेश करण्यात आला आहे. सरकारी धोरणाच्या अनुकूलतेमुळे आणि सकारात्मक आणि वैकासिक दृष्टिकोनामुळे आजमितीस भारतीय पर्यटन व्यवसाय समृद्ध होण्याच्या मार्गावर आहे. एका सर्वेक्षणानुसार पर्यटन क्षेत्रातील विकासाचा हाच वेग कायम राहिला तर येणाऱ्या काही वर्षात भारताचा पर्यटन क्षेत्रात जगात तिसरा क्रमांक असेल. आधुनिक युगात पर्यटन म्हणजे केवळ मौज, मजा, मस्ती एवढेच नाही तर, वैचारिक आदानप्रदान, औद्योगिक गुंतवणूक, प्रकल्प संरचना अभ्यास असेही आहे. त्यामुळे राष्ट्रविकासासाठी केवळ आर्थिक पर्याय म्हणून पर्यटनाकडे न पाहता वैचारिक प्रगल्भतेचे साधन म्हणून पाहावयास हवे. भारताची ओळख या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून देताना आपणाला काही बाबींवर काम करणेदेखील आवश्यक आहे. परदेशी महिलांची सुरक्षितता हा त्यातील प्राधान्यक्रमाचा विषय आहे. तसेच, जगातील इतर राष्ट्रांप्रमाणे स्वच्छता राखणे, आपल्याच स्मृतिस्थळांची आपण अशोभा न करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रातील नैसर्गिक साधनसंपत्ती ही माझी वैयक्तिक संपत्ती आहे आणि तिचे रक्षण करणे, ती समृद्ध करणे, हेच माझे कर्तव्य आहे, हा भाव मनी जपणे आवश्यक आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@