हिरे वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच स्कॅनिंग, एमआरआयची सुविधा : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2018
Total Views |
 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/

धुळे, १६ सप्टेंबर :
सर्वसामान्य नागरिकाला उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सामाजिक संस्थांच्या सहकार्याने एमआरआय आणि स्कॅनिंगची सुविधा येत्या महिनाभरात करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा लाभक्षेत्र विकासमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाजवळील मैदानावर आयोजित अटल महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हीना गावीत, आमदार स्मिता वाघ, अनिल गोटे, सुरेश भोळे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, डॉ. कुलदीप कोहली, डॉ. रागिणी पारेख, डॉ. रामराजे आदी उपस्थित होते.
 
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शासकीय आरोग्यसेवेच्या माध्यमातून रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात येतात. मात्र सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ना. महाजन यांनी शासकीय व खासगी डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य शिबिरांची परंपरा सुरू केली आहे. शिबिराच्या माध्यमातून आरोग्य सेवा रुग्णांच्या घराघरापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. गरीब व गरजू रुग्णांवर पूर्णपणे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार आणि शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून करण्यात येतात. आतापर्यंत २५ लाख रुग्णांना आरोग्य शिबिराचा लाभ झाला आहे. केरळमध्ये पूर आला असताना वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन यांच्या नेतृत्वाखाली तेथे सर्वांत मोठे आरोग्य शिबिर घेत आरोग्य सेवा पोहोचविली. सर्वात मोठे आरोग्य शिबिर महाराष्ट्राचे होते, असेही त्यांनी नमूद केले.
 
 
मुख्यमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या महिन्यापासून ‘आयुष्यमान भारत’ योजना कार्यान्वित करण्यात येईल. या योजनेंतर्गत देशातील सुमारे ५० कोटी जनतेला पाच लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाच्या आरोग्य सेवा पुरविण्यात येतील. वैद्यकीय शिक्षण मंत्री महाजन म्हणाले, देशाचे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीनिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून शहरी, ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरजू, गरीब रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यात येत आहे. शिबिरात रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावरील औषधोपचार आणि आवश्कता भासल्यास शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्रपणे पाठपुरावा केला जातो. शिबिरात देशातील नामवंत शल्यचिकित्सक, शल्यविशारद सहभागी झाले आहेत. त्यामुळे रुग्णांना अद्ययावत वैद्यकीय सेवा मिळू शकणार आहे.
 
 
प्रत्येक व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचा मनोदय व्यक्त केल्यावर आरोग्य शिबिराची संकल्पना आकारास आली. एवढेच नव्हे, तर गरजूंना आरोग्य सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्यात येते. शिबिराच्या माध्यमातून किमान ३० हजार गरजू रुग्णांवर वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/

क्षणचित्रे :
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मंत्री महाजन यांचा ‘आरोग्य देवदूत’ म्हणून गौरव.
सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर नाईक यांच्या कार्याचाही केला मुख्यमंत्र्यांकडून गौरव.
देशातील नामवंत शल्यचिकित्सक, शल्यविशारदांची उपस्थिती.
शिबीरस्थळी सकाळपासूनच रुग्ण व नातेवाईकांची गर्दी.
अटल महाआरोग्य शिबिरासाठी विविध प्रकारच्या १९ समित्यांचे गठण.
शिबिरासाठी ९४ बाह्य रुग्ण कक्ष कार्यान्वित.
सुमारे तीन हजारांवर डॉक्टरांनी दिली मोफत वैद्यकीय सेवा.
एसटी महामंडळ, शैक्षणिक संस्थांतर्फे रुग्णांसाठी विशेष बसची सुविधा.
रुग्णांसाठी भोजन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
स्वयंसेवक अविरत सेवाकार्यात सहभागी.
आशा, अंगणवाडी सेविका, शिक्षकांचे मिळाले सहकार्य.
स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी केली मदत.
 
@@AUTHORINFO_V1@@