आमार सोनार बांगलादेश!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2018   
Total Views |




जगातील जवळजवळ दोन डझन देश फिरायचा योग आला असला, तरीही एकदातरी बांगलादेश व पाकिस्तानला भेट द्यावी, अशी मनीषा बाळगून होतो. कारण, दोन्हीही देश आपल्या स्वातंत्र्यापूर्वीचा एकसंध भारत होता. त्यामुळे तेथील भूभाग, लोकजीवन, खाद्यसंस्कृती याबद्दल एक उत्सुकता होती. मागील आठवड्यात बांगलादेशला जायचा योग आला. तीन दिवस मुक्काम होता. निमित्त होते, ऊर्जा विषयीच्या कॉन्फरन्सचे. मात्र, मनात अनेक विचारांचे काहूर असल्याने बांगलादेशातील प्रत्येक क्षण न्याहाळत होतो.


तंत्र्यापूर्वीच्या भारतावर इंग्रजांचे आधिपत्य होते. पाकिस्तान किंवा बांगलादेश नकाशावर नव्हतेच. जवळजवळ १९४० पर्यंत तेव्हाचा संपूर्ण भारत देश परदेशी राजवटीला हुसकावून लावण्यात व्यग्र होता. धर्माच्या आधारावर कुठेही मतभेद नव्हते. सर्वांचे लक्ष्य एकच- ते म्हणजे स्वातंत्र्यप्राप्ती! इंग्रजांना चाहूल लागली होती की, आता आपण अजून जास्त दिवसांचे पाहुणे नाही. संपूर्ण देश महात्मा गांधींच्या नेतृत्वात लढा देत होता. मात्र, स्वातंत्र्याची चाहूल लागताच मो. अली जिना व पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांनाही स्वतंत्र भारताचे पंतप्रधानपद खुणावत होते. तेथूनच द्विराष्ट्र संकल्पनेची मुहूर्तमेढ झाली. जिनांना वेगळा देश हवा होता आणि तोही धर्माच्या आधारावर. त्यांचे म्हणणे होते की, मुसलमान व हिंदू हे दोन वेगळे धर्म आहेत आणि त्यांच्यात काहीही साम्य नसल्याने, वेगळा देश पाकिस्तान या नावाने हवा होता. ‘पाक’चा अर्थ शुद्ध! इंग्रजांनादेखील ‘फोडा आणि झोडा’ या नीतीवर विश्वास होताच आणि दि. १४ ऑगस्ट, १९४७ ला एका ‘शुद्ध-पवित्र’ देशाची निर्मिती झाली ती म्हणजे ‘पाकिस्तान!’ तत्कालीन भारताच्या उत्तरेकडच्या भागाला पश्चिम पाकिस्तान, तर पश्चिम भागाला पूर्व पाकिस्तान संबोधले गेले. पश्चिम पाकिस्तानला जम्मू-काश्मीर, पंजाब, गुजरात या राज्यांच्या सीमा लाभल्या, तर पूर्व पाकिस्तानला पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम, पूर्वोत्तर राज्यांच्या सीमा लाभल्या. म्हणजेच पश्चिम पाकिस्तान ते पूर्व पाकिस्तान प्रवास करायला तेव्हा भारतातूनच किंवा चीनमार्गे प्रवास करणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे पाकिस्तानच्या निर्मितीनंतर पश्चिम पाकमध्ये बसून पूर्व पाकवर नियंत्रण ठेवणे शक्यच नव्हते. पूर्व पाकची लोकसंख्या पश्चिम पाकपेक्षा जास्त होती, तरीही राजकीय सेनेची सूत्रे पश्चिम पाककडे होती. उर्दू भाषा काही क्षेत्रांपुरतीच मर्यादित असूनही ती संपूर्ण देशाची राष्ट्रभाषा घोषित झाली. पूर्व पाकला ते मान्य नव्हते. त्यातच १९७० मध्ये ‘भोला’ नावाचे महाभयंकर वादळ आले व पूर्व पाकला पाक सरकारकडून काहीही मदत न मिळण्याची भावना दृढ झाली. शेख मुजिबुर रेहमान यांच्या नेतृत्वाखाली मोठी चळवळ उभी राहिली व १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानचे रूपांतर एका वेगळ्या देशात झाले ते म्हणजे आजचा बांगलादेश! बांगलादेशाच्या निर्मितीत भारताची भूमिका कशी निर्णायक होती, हे आपण जाणतोच. तर अशा या निर्माण झालेल्या बांगलादेशामध्ये जाण्याचा योग आला.

 

बांगलादेशची आजची लोकसंख्या १६ कोटी. पाकिस्तानची १७ कोटी व आजच्या भारतातल्या मुस्लिमांची संख्या २२ कोटी. यावरून लक्षात येईल की, द्विराष्ट्रवादाची संकल्पना किती पोकळ होती. आजही मुस्लीम समाजाचा विचार केला, तर भारतातले मुस्लीम हे सर्वार्थाने तुलनेत जास्त स्वतंत्र व समाधानी आहेत. आपण तूर्त बांगलादेशचा विचार केल्यास, बांगलादेशचे क्षेत्रफळ पाकिस्तानपेक्षा एकचुतर्थांश आहे व लोकसंख्या पाकिस्तानपेक्षा जास्त. म्हणूनच आपल्याला बांगलादेशमध्ये चालणाऱ्या रेल्वेगाड्यांचे जे चित्र दिसते ते खरोखरच पाहण्यात आले. लोक गाडीत खचाखच भरलेले, टपावर बसलेले, असे दिसतात. सार्वजनिक वाहतूक सेवा-बसेसमध्येदेखील तेच चित्र. बसेसची स्थिती म्हणजे ५०-५० वर्षे जुन्या बसेस! आपल्या बजाज कंपनीच्या ऑटोरिक्षा भरपूर दिसतात. ऑटोरिक्षांना जाळीचे दार लावलेले. कारण सिग्नलवर सामान हिसकावण्याची भीती. सायकलरिक्षा मोठ्या प्रमाणात. सर्व चालक रंगीबेरंगी लुंगी घातलेले व प्रचंड मेहनती दिसतात. सायकली व दुचाकीपण असतातच. ढाका ही बांगलादेशची राजधानी. हे शहर प्रचंड लोकसंख्येचे, मुंबईपेक्षा दुप्पट म्हणजेच २ कोटी ५० लाख लोकसंख्या! जगातील सर्वात जास्त वेळ ‘रहदारी ठप्प’साठी प्रसिद्ध! पहिल्यांदाच सायकल व दुचाकीस्वारदेखील चारचाकींच्या बरोबरीने रहदारीमध्ये ताटकळत पाहिले. ढाका विमानतळ ते हॉटेल हा सात किमीचा प्रवास आम्ही दीड तासांत पूर्ण केला. तेथे गंमतीने म्हणतात की, एक किलोमीटरच्या प्रवासाला चालत दहा मिनिटं, तर गाडीने तीस मिनिटं लागतात. रस्त्यांरस्त्यांवर आपल्याकडच्यासारखेच ठेले, विक्रेते दिसतात. खाण्यापिण्याची चंगळ, कटींग चहा तसेच. लोकांमध्ये नम्रता जाणवली. तेथे साधारणत: ७० टक्के समाज मुस्लीम, १५ टक्के ख्रिश्चन, तर १० टक्के हिंदू समाज आहे. तेथील ढाकेश्वरी मंदिरात जाण्याचा योग आला. ते १२ व्या शतकातील मंदिर आहे. तसेच रमणा काली मंदिर. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भारताच्या केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी आठ कोटींची मदत घोषित केल्याने तेथील हिंदू खूश आहेत.

 

बांगलादेशात गरिबी मोठ्या प्रमाणात आहे. १९४७ ते १९७१ पर्यंतचा काळ पूर्णत: प्रगतीच्या दृष्टीने व्यर्थच गेला. शेख मुजिबूर रहमान यांची जर १९७२ मध्ये हत्या नसती झाली, तर त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती झाली असती, अशी लोकांची मान्यता आहे. आज तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून त्यांची कन्या शेख हसीना आहे. त्यांचा जगातील कर्तबगार महिलांपैकी एक, असा लौकिक आहे. खऱ्या अर्थाने विकासाची गंगा १९९५ पासून सुरू झाली आहे. आज त्यांचा विकासाचा दर सात टक्के एवढा आहे. भारताकडून त्यांना भरपूर आशा आहे. आज भारत देश त्यांना वीजपुरवठा करीत आहे. पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात मदत करीत आहे. त्यांच्या मनात पाकिस्तानविषयी राग आहे व ते पाकिस्तानला शत्रूसमान मानतात. बांगला भाषा व संस्कृतीविषयी त्यांना अत्यंत अभिमान आहे. जागोजागी रवींद्रनाथ टागोरांची गीतं ऐकायला मिळतात. भारतातल्या प. बंगालपेक्षाही जास्त बंगाली अस्मिता बांगलादेशमध्ये पाहायला मिळते. तेथील मिठाई प्रसिद्ध आहे. सांस्कृतिकदृष्ट्या देश फार प्रगत आहे. लोकांमध्ये वागण्यात नम्रपणा, आदरातिथ्य फारच. तेथील ‘कस्तुरी’ या हॉटेलमध्ये जेवायला गेलो असता त्या मालकाने- कासवारभाई या मुस्लीमबंधूने ज्या प्रकारे शुद्ध शाकाहारी जेवण, नंतर विड्याचे पान, खीर खाऊ घातली, ते कधीच विसरू शकणार नाही! वर आमच्याकडून पैसे घेण्यास नकार दिला. यावरून एकच अनुभव आला, माणुसकीला जात, धर्म, पैसा यांच्या मर्यादा नसतात. तेथील राष्ट्रीय भाषा बंगालीच. आमच्या चालकाला इंग्रजी, हिंदीही येत नव्हते. मी त्याला विचारले की, ढाक्याची ‘आबादी’ किती, तर त्याला कळले नाही, ‘पॉप्युलेशन’ किती, तरी कळले नाही; मात्र ‘जनसंख्या’ लागलीच कळले. त्याला ‘व्हेजिटेरीयन’ खाना किंवा ‘शाकाहारी’ खाना याचा अर्थ कळला नाही, मात्र ‘निरामिष’ खाना हा शब्द कळला. बंगाली भाषा ही इतर भारतीय भाषांप्रमाणे संस्कृतप्रचुरच आहे व तिथल्या मुस्लिमांना त्याचा अभिमान आहे. बांगलादेशची अवस्था पाहून एकच जाणवते की, देशांना कृत्रिम सीमा लादून कुणा व्यक्तीचा फायदा होऊ शकतो, जनतेचा नव्हे! जे मुस्लीम भारतात राहिले, त्यांचे जीवनमान एक भारतीय म्हणून, पाकिस्तानी नागरिक किंवा बांगलादेशी नागरिकांपेक्षा फारच प्रगत म्हणावे लागेल. आज बांगलादेशी नागरिकाला कोलकात्याची आठवण येते. लोंढेच्या लोंढे आज सीमेवरून भारतात का येऊ इच्छितात? यातच भारतीय संस्कृतीच्या सर्वसमावेशकतेची संस्कृती लक्षात येते!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@