एका समाजशील उद्योजकाची गाथा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2018   
Total Views |




उद्योजक म्हटलं की केवळ पैशाचा विचार करणाऱ्या धनाढ्य व्यक्तीचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. पण, यालाही काही अपवाद असतात. त्यापैकीच एक नगरच्या संजय गुगळे यांची यथोगाथा...

 

एच. यु. गुगळे हे नाव अहमदनगर, पुणे, सोलापूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांतील लोकांना माहिती नसलेली व्यक्ती क्वचितच सापडेल. गेल्या ५० वर्षांपासून एच. यु. गुगळे हे नाव घराघरात पोहोचलं. अर्थातच, यामागे गुगळे कुटुंबीयांची मेहनत, त्याग, जिद्द आणि मनी सेवाभाव होता. हरकचंद्र गुगळे यांनी याची १९६८ साली मुहूर्तवेढ रोवली. ती पुढे रमेश, दिलीप आणि संजय गुगळे यांनी ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली. रणजीत, मुकूल, ऋषी ही नवी पिढीदेखील ही जबाबदारी सांभाळायला तयार होत आहे. क्लॉथ, बायोटेक, फार्मा, रिटेल, एन्टरटेनमेंट, रिअल इस्टेट, रेस्टॉरन्ट आणि बँकिंग अशा विविध क्षेत्रांत नगर, पुणे, बीड आणि बंगळुरू या ठिकाणी एच. यु. गुगळे परिवाराचं काम चालतं. मेहनत आणि सेवाभावी वृत्तीमुळे गुगळे कुटुंबीय आज यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहे. हे सगळं असलं तरी माणसाने आपलं मातीशी असलेलं नातं कधीच तोडू नये याची शिकवण या कुटुंबीयांकडे पाहिल्यावर मिळते. कारण प्रचंड यश आणि आर्थिक उलाढाल असली तरी, या परिवाराने आपली सामाजिक जाणीव नेहमीच जपली आहे.

 

 
 

गुगळे परिवारातील संजय गुगळे हे सामाजिक उपक्रमांत नेहमीच उत्साहाने सहभागी होतात. सध्या ते जगभरात नावाजलेल्या ‘स्नेहालय’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत. ‘स्नेहालया’च्या माध्यमातून ते विविध सामाजिक विषय हाताळतात. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. उद्योजक कुटुंबातील व्यक्ती सामाजिक चळवळीशी जोडलेली असणं हे दुर्मीळ आहे. ‘आपला उद्योग भला आणि आपण भले,’ अशी उद्योजकांची विचारधारा. मात्र, संजयजी याला अपवाद ठरले. घरात सुबत्ता आणि व्यवसायाचे जाळे असताना संजयजी इकडे कसे काय वळले, हा सर्वांना पडणारा मोठा प्रश्न आहे. याविषयी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना त्यांनी सांगितलं की, “मी अनेक वर्षांपासून जामखेडला राहत असताना विविध सामाजिक उपक्रम राबवायचो. जामखेड शहर लहान असल्याने उद्योगस्थापनेसाठी मोठे व्यासपीठ मिळत नव्हत. मात्र, एक दिवस पुण्याला सिग्नलवर एका लहान मुलाला रस्ता झाडताना बघितले. ज्या वयात हातात पेन्सिल हवी होती, खेळणी हवी होती, त्या हाताला झाडू घ्यावा लागतो हे पाहून मनोमन खूप वाईट वाटलं. आपण संवेदनशील आहोत, मात्र यांच्यासाठी आपण काहीच करू शकत नसल्याची खंतदेखील होती. पुढे व्यवसायामुळे जामखेड सोडून अहमदनगरला स्थलांतर झालं आणि माझे ‘स्नेहालय’चे प्रमुख गिरीश कुलकर्णी यांच्याशी भेट झाली आणि इथूनच मला खऱ्या अर्थाने सामाजिक कामाची संधी मिळाली.”

 

 
 

संजयजी गेल्या १५ वर्षांपासून ‘स्नेहालय’ संस्थेशी जोडले गेले आहेत. त्याअगोदर जामखेडला लहानमोठे होईल तसे ते सामाजिक उपक्रम राबवायचे. मात्र, ‘स्नेहालय’शी जोडल्यापासून त्यांच्या कामात सातत्य आले आणि अनेक मोठे उपक्रम त्यांच्या हातून घडले. सुरुवातीला त्यांनी कॅ. सुब्बोराव यांच्यासोबत एका युथ कॅम्पचे आयोजन केले होते. देशभरातून जवळपास ५०० मुलं या कॅम्पला आली होती. हा कॅम्प यशस्वी पार पडल्यानंतर संजयजींना आत्मविश्वास आला आणि त्यांनी अजून जोमाने कामाला सुरुवात केली. ‘स्नेहालय’शी जोडल्यानंतर त्यांनी या परिवाराला घेऊन महिला आणि मुलांसाठी उपक्रम राबवायला सुरुवात केली. सामाजिक चळवळींमध्ये काम करताना दररोज तीन तास ‘स्नेहालया’च्या कामाला वेळ द्यायचा आणि उरलेला वेळ स्वतःच्या व्यवसाय वाढीसाठी द्यायचा, असं त्यांनी ठरवलं. मात्र, आज अशी परिस्थिती आहे की, संजयजी ‘स्नेहालय’ परिवाराशी एवढे जोडले गेले आहेत की, त्यांनी पूर्ण दिवस ‘स्नेहालय’ परिवाराला दिला तरी कमी पडतो.

 

 
 

‘स्नेहालया’च्या माध्यमातून वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काम केलं आहे. त्यांनी १५० एचआयव्हीग्रस्त मुलांना स्वत:च्या पायावर उभं केलं असून १५० एचआयव्हीग्रस्त व इतर २०० मुलं अशा एकूण ३५० मुलांचा ही संस्था सांभाळ करते. यामध्ये त्यांचं शिक्षण, आरोग्य, आहार या गोष्टी स्वत: संस्था पाहते. त्याचबरोबर ‘बालभुवन’ प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत २ हजार २०० मुलांना शिक्षण दिलं आहे. त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं आहे. त्याचबरोबर कुमारीमातांसाठी ‘स्नेहांकुर’ हा प्रकल्पदेखील चालवला जातो. या प्रकल्पाद्वारे आतापर्यंत १ हजार २०० कुमारीमातांचा त्यांनी सांभाळ केला आहे. तसेच आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त मुलांना दत्तक दिलं आहे. त्यांचं हे काम जरी ‘स्नेहालया’शी संबंधित असलं किंवा त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असलं तरी ते स्वत:च्या गुगळे परिवारातर्फेदेखील सामाजिक काम करतात. त्यांच्या कापड व्यापाराशी संबंधित असलेल्या सर्व शाखांमध्ये दरवर्षी मातीचे गणपती विकले जातात. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मूर्ती घेणार्यांकडून ऐच्छिक देणगी मागितली जाते आणि जमणारे पैसे हे सामाजिक संस्थेला दान केले जातात. यावर्षी त्यांनी एक हजारांपेक्षा जास्त वडाची झाडे शाळांना भेट दिली आहेत. तसेच फार्मा आणि बायोटेकच्या माध्यमांतून शेतीसंबंधित विविध प्रयोग राबवले जातात. त्यांच्या या कामांविषयी ते समाधानी असून समाजाची, पीडित-वंचितांची सेवा करायची संधी मिळाली, हे ते स्वत:चे भाग्य समजतात. त्यांचं कुटुंब फक्त त्यांच्या तीन मुलांपर्यंत मर्यादित नसून ते म्हणतात की, “माझं कुटुंब हे माझं ‘स्नेहालय’ आहे. तिथली ३५० मुलं आणि माझी तीन मुलं अशी एकूण ५३ जणांचं माझं कुटुंब आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@