गणेश मूर्तितील चिह्नसंकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2018   
Total Views |


 
 
 आराध्य देवी-देवतांच्या लौकिक आणि अलौकिक वैश्विक गुणवत्ता आणि मानवाच्या स्वतःच्या मानसिक-भावनिक-शारीरिक क्षमतांचा योग्य परिचय करून देण्यासाठी बहुमुखी, बहुभूज मानवसदृश मूर्तींची निर्मिती झाली. तिसऱ्या-चवथ्या शतकातील गुप्तकालीन सर्व व्यक्त कलांमध्ये श्रीगणेश ही देवता, सातत्याने निर्माण झालेली दिसते. या काळातच मूर्तींच्या निर्मितीमध्ये असंख्य ज्ञानशाखांचा संयुक्त अभ्यास केला गेला आणि त्या बरोबरच शिल्प आणि मूर्तींच्या निर्मिती तंत्रामध्ये विलक्षण प्रगती झाली.
 

मुंबई-नाशिक-कोल्हापूर-औरंगाबाद-जळगाव-धुळे-पुण्यासह कोकण-गोवा-पश्चिम महाराष्ट्र-खानदेश-विदर्भ-मराठवाडा असा सकल सश्रद्ध महाराष्ट्र प्रदेश, सध्या दहा दिवसांच्या श्री गणेशोत्सवाच्या भक्तिरसात समरसतेने रंगून जाताना दिसत आहे. प्राचीन भारतीय मूर्तिशास्त्र आणि त्याच्या चिह्नसंकेतांचा अभ्यास करताना एका गंमतीच्या वास्तवाकडे लक्ष वेधले गेले. ब्रह्मा+विष्णू+महेश या त्रिमूर्तीसह सर्व देव-देवतांच्या प्रतिमांकडे आपण सर्व लहान आणि थोर खूप गंभीर आदरानेच बघतो. मात्र, बाळकृष्ण, बाल हनुमान, गणपतीबाप्पा अशा काही देवता मात्र आबालवृद्धांच्या लाडक्या सखा, मित्र व स्नेही आहेत. याला कारणही खास आहे. त्याचा संदर्भ असा आहे की, देवतेप्रती असलेल्या उपासक आणि साधकाच्या नात्यानुसार, देवतेच्या व्यष्टीनुसार, अलौकिक गुण वैशिष्ट्यांनुसार आणि प्राचीन भारतीय मूर्तिशास्त्रात स्पष्ट विश्लेषणांसह मूर्तींचे पाच प्रकार सांगितले गेले आहेत. योगमूर्ती, भोगमूर्ती, वीरमूर्ती, उग्रमूर्ती आणि अभिसारिकामूर्ती असे हे मूर्तींचे पाच प्रकार आहेत.

 

मंगलदायी आणि मनोहारी अशा मुद्रेतील आपल्या आवडत्या आराध्य गणपतीबाप्पाचे कुटुंबकबील्यासह दर्शन घेण्यासाठी गर्दी करणारे सर्व सामाजिक-आर्थिक स्तरातील श्रद्धाळू नागरिक शहर आणि खेड्यातील भरवस्तीतील देवळांमध्ये आणि श्री गणेशोत्सवाच्या मंडपात आता अलोट गर्दी करतील. यातील प्रत्येकाला गणपतीबाप्पा आपला वाटतो; कारण तो विघ्नहर्ता आहे, जो संकटसमयी आपल्याला धीर देतो, अशी प्रत्येक उपासक आणि दर्शकाची श्रद्धा आहे. आपला बाप्पा प्रेरणा, चेतना, ऊर्जा आणि आनंदाचा अखंड-अविरत स्रोत आहे. गावांगावातील प्रत्येक गणेशोत्सवात आणि श्रीगणेशाच्या मंदिरांत आरतीच्या वेळी असा अनुभव प्रत्येकाने घेतलाच असेल. आनंदाची प्रेरक भावना सतत अशा मूर्तींमध्ये प्रसारित होत असते. अशा देवळांत आणि मंडपांत नेहमीच चेतनादायी उत्साह असतो. ही असते श्री गणेशाची आनंददायी ‘भोगमूर्ती’.

 

देवळात स्थापन झालेल्या देवतेच्या मूर्तीला, मूळ ‘विग्रह मूर्ती’ असे संबोधित केले जाते. अशा मूर्ती निर्माण करण्यासाठी काही निश्चित मार्गदर्शक सूत्रे फार प्राचीन साहित्यात उपलब्ध आहेत. अशी निश्चित सूत्रे साधारणपणे भूमिती, अंकगणित, खगोलशास्त्र, मानवी शरीरशास्त्र, मानसशास्त्र अशा आणि इतर निवडक ज्ञानशाखांच्या एकत्रित अभ्यासाने बनवली गेली. देवळात आणि मंदिरांत स्थापन झालेल्या मूर्ती एकसंध दगडातून घडवलेल्या असतात अथवा विशिष्ट धातूंपासून बनवलेल्या असतात. सार्वजनिक उत्सवात श्री गणेशाची मूर्ती अथवा कालिमातेची जी मूर्ती स्थापन केली जाते, त्या मूर्तीला ‘उत्सव विग्रह मूर्ती’ असे संबोधित केले जाते. अशा मूर्ती निसर्गात उपलब्ध मातीपासून हातांनी घडवल्या जातात. प्राचीन लिखित संकेतांनुसार उत्सव विग्रह मूर्ती आकाराने लहान असतात. उत्सव संपन्नतेनंतर त्यांचे योग्य विधीने, योग्य मार्गांनी विसर्जन केले जाते. आधुनिक काळात बदलत्या जीवनशैली आणि बदलत्या निसर्गचक्रानुसार, मूर्तींच्या विसर्जनासाठी पर्यावरणपूरक अशा वेगळ्या पद्धतींना मान्यता मिळाली आहे.

 

मूर्तिशास्त्राच्या मूळ प्राचीन संकेतांनुसार सामान्यतः श्रीगणेशाची मूर्ती नेहमी चतुर्भुज शरीरमुद्रेत असते. गजानन म्हणजे गज+आनन, ज्याचे आनन म्हणजे मुख किंवा तोंड हत्तीचे आहे अशी देवता. स्कंदपुराणात काही ठिकाणी याला ‘पंचानन’ म्हणजे पाच तोंडांची देवता, असेही संबोधित केले गेले आहे. याच्या तोंडातील डावा दात तुटलेला आहे. श्रीगणेश त्याच्या वरच्या उजव्या हातात अंकुश, पुढचा उजवा हात वरदमुद्रेत, वरच्या डाव्या हातात पाश आणि पुढच्या डाव्या हातात मोदकपात्र अशी आयुधं आणि वस्तू धारण करतो. या मुद्रेतील बाप्पा रक्तवर्णाचा आहे, त्याचे पोट मोठे असल्याने तो लंबोदर आहे, त्याचे कान मोठ्ठे आहेत आणि त्याने पिवळे वस्त्र धारण केले आहे. डाव्या खांद्यावर यज्ञोपवित म्हणजे पवित्र जानवे असून कपाळावर त्याला रक्तचंदनाचा टिळा आवडतो, लाल रंगाची फुले त्याला अतिशय प्रिय आहेत. महत्त्वाची गोष्ट अशी की, बाप्पाच्या या मंगलमय मुद्रेच्या प्रत्येक अंगाला तर्कसंगत चिह्नसंकेत आहेत. श्रीगणेशाच्या मूर्तीतील हे पाठ्यपुस्तक आणि त्यातील चिह्नसंकेत, मानवी मन आणि बुद्धी याच्याशी व्याजोक्ती, अन्योक्ती, दृष्टांत अशा अनेक माध्यमांतून सतत नि:शब्द संवाद करत असतात.

 
 

 

नवव्या शतकातील, गण समुदायांसह नृत्यमुद्रेतील श्रीगणपती मूर्ती, लखनौ राज्य संग्रहालय.

 

सर्वकालीन भारतीय शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकारांनी आपली कला, सहजप्रेरणा अथवा अंत:प्रेरणेने सादर केली. या सर्व निर्मितीत कलाकारांनी स्वातंत्र्य घेतले. मात्र, चित्र आणि मूर्तींची मांडणी वास्तव शैलीत न करता नेहमीच स्वतःच्या मुक्त आणि स्वतंत्र शैलीत केली. गणपतीबाप्पाच्या मूर्ती आणि प्रतिमा हे याचे उत्तम उदाहरण आहे. अशी स्वतंत्र शैली आणि त्या शैलीला मिळालेली लोकमान्यता या बरोबरच हिंदू सांस्कृतिक समाजाने, कलाकारांच्या व्यक्तिस्वातंत्र्याला आणि व्यक्ततेला बंधनविरहित स्वीकृती अशा अनेक कारणांनी गणेशमूर्तींच्या निर्मितीत अनेक प्रयोग होत राहिले. जोपर्यंत मूर्तींची निर्मिती, श्रद्धेच्या आणि भक्तीच्या अधिष्ठानातून होत होती, तोपर्यंत प्रत्येक मूर्तिकाराने त्यातील चिह्नसंकेतांचा पूर्ण अभ्यास केलेला होता. ज्यावेळी श्रीगणेशाच्या मूर्तींची निर्मिती व्यवसाय म्हणून सुरू झाली, तेव्हापासून मूर्तिशास्त्राच्या संकेतांकडे मूर्तिकार आणि दर्शकांचे पूर्ण दुर्लक्ष झाले. संकेतांनुसार बाप्पाचा डावा दात तुटलेला आहे, चारी हातात असलेली चिह्नं निश्चित आहेत. मूर्ती चिकणमातीने बनवायची असते आणि त्याचा आकारही मर्यादित असतो. आजच्या काळातील मूर्तींमध्ये या संकेतांकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे जाणवते.

 

दुर्लक्षित मूर्तीसंकेत वगळता, समाजाच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गंभीर अथवा आनंददायी घटना, प्रसंग, यशस्वी व्यक्ती, बदलणारे राजकीय प्रवाह, नैसर्गिक संकटे, आर्थिक प्रगती अथवा अपयश अशा अनेक ग्रहणशील गोष्टींचे संदर्भ, सार्वजनिक गणेशोत्सवांच्या मंडप सजावटीत संवेदनाशील मूर्तिकारांनी आणि सार्वजनिक मंडळांनी घेतलेले आपल्याला नेहमीच लक्षात येते. श्रीगणेशाच्या शिल्प आणि मूर्तींच्या निर्मितीचा आणि प्रसाराचा इतिहास फार रंजक आहे. मुळात भारतीय मूर्तिकलेला हडप्पा संस्कृतीपासून म्हणजे साधारण चार हजार वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. सिंधू नदीच्या खोऱ्यातून सुरू झालेली मूर्तिकलेची सुरुवात, तिसऱ्या शतकातील मौर्य राजवटीमध्ये थोडी प्रगत झाली. गांधार, मथुरा, अमरावती अशा मूर्तिकलेच्या विविध शैली विकसित झाल्या. मात्र, श्रीगणेशाच्या मूर्ती गुप्तकालीन साम्राज्यात तिसऱ्या-चवथ्या शतकांत विकसित झालेल्या शैलीमध्ये प्रथम उपलब्ध झाल्या.

 

 

तिबेटी चित्रशैलीतील बहुभूज, रक्तवर्ण श्रीगणेश मूर्ती

 

याच गुप्तकाळात श्रीगणेशाच्या मूर्ती, तिबेट, ब्रह्मदेश, तत्कालीन सयाम म्हणजे थायलंड, तत्कालीन काम्पुचिया म्हणजेच कंबोडिया, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा, बाली अशा पूर्वेकडील दूरदूरच्या प्रदेशात पोहोचल्या होत्या. तत्कालीन संस्कृती विस्तार प्रथेप्रमाणे त्या प्रदेशातील नागरिकांपर्यंत हिंदू जीवनशैली आणि गौतम बुद्धाची सम्यक सूत्रे पोहोचावी, या हेतूनेच श्रीगणेशाच्या मूर्तींचा प्रवास अशा दूरच्या प्रदेशात झाला. आजही छायाचित्रांसह याच्या नोंदी त्या त्या प्रदेशांतील मंदिरे, संग्रहालये आणि लिखीत इतिहासात उपलब्ध आहेत. इंडोनेशियातील ‘२०००० रुपिया’ या किंमती चलनी नोटेवरील बांडुंग शहरातील जालन गणेश प्रतिमा मुद्रित होणे, ही कुठल्याही धर्मव्यवस्थेचे दडपण झुगारून, श्रद्धासंस्कृतीला प्राधान्य देणारी एक महत्त्वाची घटना.

 

इंडोनेशिया हा जगातील एक मोठा मुस्लीम प्रजा आणि राज्यकर्त्यांचा देश. या देशाच्या २०००० हजार रुपिया या किंमती चलनी नोटेवर बांडुंग शहरातील प्राचीन मंदिरातील जालन गनेसाची प्रतिमा छापली गेली. त्यावेळी जागतिक आर्थिक क्षेत्रांत खळबळ उडाली होती. इंडोनेशिया सरकारच्यावतीने तत्कालीन वित्तमंत्र्यांनी या नोटेसंदर्भात केलेले निवेदन फार महत्त्वाचे आहे. त्याकाळात इंडोनेशिया हा देश आर्थिक अडचणीत होता आणि हे निवेदन जगभरातील वर्तमानपत्रांत छापले गेले होते. वित्तमंत्री म्हणाले, “बांडुंग शहरातील ‘जालन गनेसा’ ही आमच्या देशाच्या प्राचीन संस्कृतीतील विघ्नहर्ता देवता आहे. देशाला या आर्थिक अडचणीतून ‘जालन गनेसा’ नक्की सोडवू शकेल, अशा श्रद्धेने सरकारने ‘जालन गनेसा’ची प्रतिमा नोटेवर छापली आहे.”

 

 

इंडोनेशियातील २०००० रुपिया या किंमती चलनी नोटेवरील बांडुंग शहरातील श्रीगणेश प्रतिमा

 

भारतीय मूर्तीकलेचे वैशिष्ट्य असे की, सर्व देव-देवतांच्या मूर्ती मानवसदृश मात्र काल्पनिक स्वरूपाच्या होत्या. हिंदू-जैन-बौद्ध धर्मसंकल्पनेतील उत्तम मूल्य आणि मानवाच्याच उत्तम गुणवत्तांचा परिचय करून देण्यासाठीच अशा मूर्ती निर्माण झाल्या. मानवी मनाचे आणि बुद्धीचे सामर्थ्य, चित्त आणि वृत्तीचा मेळ, मनोव्यापार, संयम आणि एकनिष्ठेने ज्ञानप्राप्ती, ऊर्जा आणि चेतना, अदृश्य आत्म्याचा परिचय अशा विविध उद्देशाने अन्य अनावृत्त मूर्तींची निर्मिती झाली. आराध्य देवी-देवतांच्या लौकिक आणि अलौकिक वैश्विक गुणवत्ता आणि मानवाच्या स्वतःच्या मानसिक-भावनिक-शारीरिक क्षमतांचा योग्य परिचय करून देण्यासाठी बहुमुखी, बहुभूज मानवसदृश मूर्तींची निर्मिती झाली. तिसऱ्या-चवथ्या शतकातील गुप्तकालीन सर्व व्यक्त कलांमध्ये श्रीगणेश ही देवता, सातत्याने निर्माण झालेली दिसते. या काळातच मूर्तींच्या निर्मितीमध्ये असंख्य ज्ञानशाखांचा संयुक्त अभ्यास केला गेला आणि त्या बरोबरच शिल्प आणि मूर्तींच्या निर्मिती तंत्रामध्ये विलक्षण प्रगती झाली. औरंगाबाद जवळच्या अजंटा लेण्यातील चित्रकला आणि कैलास मंदिराची अद्भूत शिल्पकला निर्मिती ही भारतीय शिल्प-चित्र-मूर्तीकलेच्या प्रगत तंत्राची उदाहरणे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@