अकबर अली यांची कहाणी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
 
केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मीनंगडी गावात जन्मलेले अकबर अली. मल्याळम् चित्रपटसृष्टीतील चित्रपट दिग्दर्शक म्हणून अली एक वजनदार नाव आहे. केरळमध्ये नुकत्याच आलेल्या प्रलयंकारी महापुरात, संघ स्वयंसेवकांनी जे विलक्षण बचाव व मदत कार्य केले, त्याबद्दल अकबर अली यांनी फेसबुकवर प्रतिक्रियात्मक असे मनोगत प्रकाशित केले आहे, ते सर्व भारतीयांचे डोळे उघडणारे आहे. आपल्या या मनोगतात अकबर अली लिहितात-
संघ स्वयंसेवक गरिबांसाठी घरे बांधतात, परंतु कुणाच्याच लक्षात येत नाही. कारण ते याची प्रसिद्धी करत नाहीत. एकदा मी त्या स्वयंसेवकांना विचारले, ‘‘तुम्ही या कार्याची प्रसिद्धी का करत नाहीत?’’ ते म्हणाले, ‘‘आम्ही जे काही करतो ती मानव सेवा असते. हे आमचे कर्तव्य आहे, धर्म आहे आणि याची प्रसिद्धी करण्याची गरज नाही.’’ खरेच, हे त्यांचे कर्मच आहे. त्यांच्या कार्यावर शेकडो डाक्युमेंटरीज् बनू शकतात, परंतु ते याची कधीच संधी देत नाहीत. अपमान केला तरीही (विरोधक त्यांना शेणाचे संघी म्हणतात) ते आपले कार्य सुरू ठेवतात. शांतपणे...
 
 
केरळच्या महापुरात मासेमार्यांच्या कार्याचे सर्वांनीच कौतुक केले. त्यात बहुसंख्य सेवा भारतीचे कार्यकर्ते होते. परंतु, त्यांनी आपण स्वयंसेवक आहोत, हे जगजाहीर केले नाही.
लाखो स्वयंसेवकांनी मदतसामग्री गोळा केली. त्यांनी 300 हून अधिक मदत शिबिरे स्थापन केली आहेत. खाकी चड्डी आणि वाहनांवर फ्लेक्सचे बोर्ड दिसले की, ही मदत सामग्री कुठून आली, हे लक्षात यायचे. एवढीच काय ती त्यांची प्रसिद्धी. ते मीडियाच्या कॅमेर्याची वाट बघत नसत. ही मंडळी सतत घाई-गडबडीत असायची. अगदी स्वत:च्या कुटुंबाची आणि प्रकृतीची पर्वा न करता. काही चॅनेल्सच्या फूटेजमध्ये ही मंडळी झळकलीही. कारण, संपादकाला त्या फ्रेम्स काढून टाकता आल्या नव्हत्या. त्यामुळे चेहराविहीन गर्दीत काही खाकी चड्ड्या लोकांना दिसल्या.
 
 
मी हे सर्व लिहिण्यास का उद्युक्त झालो? न्यूज चॅनेल्सच्या बातम्यांमध्ये मी काही ‘स्मरणीय’ दृश्ये बघितलीत. डीवायएफआयची (कम्युनिस्टांची विद्यार्थी सेना) मंडळी बसेसमधून उतरत आहेत आणि मंत्री थोडे पाणी ओतून स्वच्छता उपक्रमाचे उद्घाटन करत आहेत... दोन दिवसांपर्यंत सेवा भारतीचे कार्यकर्ते शांतपणे सर्व काही, अगदी संडासदेखील साफ करीत होते... त्यांच्या या कामाचे कुठल्याही भाजपा नेत्याने उद्घाटन केले नव्हते... मीडियानेही त्याची चर्चा केली नव्हती... शेवटच्या टप्प्यात मात्र डीवायएफआयचे कार्यकर्ते बसेसमधून आलेत आणि त्याच्या बातम्यांनी वृत्रपत्रांचे रकाने भरून गेलेत. एवढेच नाही, तर प्राईम टाईमवर वृत्तवाहिन्यांनी चर्चाही घडवून आणली. मी एक दु:खद बातमी ऐकली की, बचत कार्य करताना ज्यांनी जीव गमविला त्यांचे मृतदेह अजूनही सापडलेले नाहीत. परंतु, ना मुख्यमंत्री पिनरायी विजयन् यांना, ना त्यांच्या कार्यकर्त्यांना, या लोकांच्या घरी जाऊन भेट द्यावीशी वाटली नाही.
 
 
मला माहीत आहे की, कार्य संपल्यावर या चेहराविहीन खाकी चड्ड्या घरी जातील आणि पुन्हा ‘शेणाचे संघी’ म्हणून त्यांना हिणविणे सुरू होईल. ज्यांच्यामुळे हा प्रलय घडला आणि ज्यांनी या चिखलातही कमाई केली, त्यांची तोंडभर हसत असलेली छायाचित्रे वृत्तपत्रांत झळकू लागतील... हा आम्हा सर्वांचाच अनुभव आहे...
स्वयंसेवकांनो, मी मात्र स्वत:ला तुमच्यापासून दूर ठेवू शकणार नाही. मी स्वत: प्रत्यक्ष तुमच्यासोबत येऊ शकलो नाही, याचे मला दु:ख आहे. पण मी तुमच्यासोबतच होतो... टीव्ही चॅनेल्सच्या फूटेजमध्ये त्वरित नाहीशा होणार्या खाकी चड्ड्यांसोबत... आपल्या नाजूक हातांनी पोळ्या लाटत असलेल्या मुलांसोबत... तांदळाच्या थैल्या भरत असणार्या हातांसोबत... डोक्यावर प्रचंड वजनी ओझे घेऊन जाताना दम टाकणार्यांसोबत... संडास साफ करणार्या हातांसोबत...
हे सर्व सेवा भारतीचे कार्यकर्ते करीत होते, असा दावा मी करणार नाही. त्यांनी अगदी एक टक्का जरी केले असेल, तरी त्या एक टक्क्याची पावती देण्यास टाळाटाळ का म्हणून? पिनरायी विजयन् यांच्या हृदयाच्या जागी दगड आहे की काय?
 
 
सेवा भारती! मी अत्यंत प्रामाणिकपणे, हृदयापासून तुम्हाला धन्यवाद देतो. ज्यांनी तुम्हाला टाळले... त्यांचा भलेपणा त्यांच्यापाशी... परंतु, ज्यांना तुमच्या मदतीच्या हाताचा स्पर्श झाला, ते सदासाठी तुमच्यासोबत असतील.
संघाच्या कुटुंबीयांना माझी एक विनंती आहे. आमची बदनामी करणार्या मीडियावर काही काळासाठी का होईना, पण आपण सर्वांनी बहिष्कार घातला पाहिजे. हे मदतीचे कार्य संपू द्या. आम्ही सर्व म्हणू... सेवा भारतीचे कार्यकर्ते भारतमातेचे अत्यंत आवडते पुत्र आहेत!
 
 
ही पोस्ट टाकल्यावर अकबर अली लिहितात- तुम्हाला वाटेल की मी भाजपाचा आहे म्हणून हे सर्व लिहीत आहे. परंतु, अनेकांना माहीत नसेल की चार वर्षांपूर्वी मी कट्टर कम्युनिस्ट होतो. तेव्हाही मी संघाचे हे मौन-कार्य बघत होतो. पून्तुरा येथे दंगली भडकल्या होत्या, तेव्हा माझे मुस्लिम बांधव मला सोडून गेले होते. या संघ स्वयंसेवकांनीच माझा जीव वाचविला होता. तोपर्यंत मी त्यांना माझा शत्रूच मानत होतो. नंतर मला षष्ठमंगलम् (तिरुवनंतपुरम्जवळील एक गाव) येथे ठेवण्यात आले, तिथेही ते मला, मी कम्युनिस्ट आहे हे माहीत असूनही, सर्वोपरी मदत करीत राहिले. मला कुठलाच भेदभाव दिसला नाही. अशा रीतीने मी संघाच्या जवळ आल्यावर, मला त्यांच्या अनेक कार्यक्रमांत भाग घेण्याची संधी मिळाली. तेव्हा मला समजले की, संघाच्या बॅनरखाली इतके प्रचंड काम सुरू आहे. जसे, सक्षम नावाची संस्था अंधांसाठी कार्य करीत आहे, हे कुणालाच माहिती नाही. मी इतकी अनाथालये कधीच बघितली नव्हती. तेलपाणी दिलेल्या एखाद्या मशीनप्रमाणे, प्रसिद्धीच्या मागे न धावता ते इतकी सर्व कार्ये करीत असतात. या महापुरात स्वयंसेवकांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पुरात अडकलेल्यांना वाचविले आहे. पुरामुळे उफाणत वाहणार्या नदीत उड्या टाकून लोकांचे जीव वाचवताना मी त्यांना बघितले आहे.
 
 
अकबर अली यांचे संघाविषयी हे जे मत झाले, ते संघसाहित्य वाचून नाही झाले. बौद्धिक ऐकून किंवा संघाच्या वरिष्ठ अधिकार्यांची भाषणे ऐकून झाले नाही. केवळ आणि केवळ, संघ स्वयंसेवकांच्या आचरणाने त्यांच्यात मतपरिवर्तन झाले. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येकाविषयी, मग तो कट्टर विरोधकही का असेना, ‘शुद्ध सात्त्विक प्रेम अपने कार्य का आधार हैं।’ ही भावना मनात ठेवून स्वयंसेवकांनी कार्य केले आहे, करत आहेत. हा आत्मीय प्रेमभावच, विरोधकांना संघाविषयीचे गैरसमज टाकून देण्यास प्रेरित करीत असतो. त्यामुळे जेव्हा, देशात केरळ पूरग्रस्तांसाठी मदतनिधी मागत असताना लोक प्रतिक्रिया द्यायचे की, कशाला त्यांच्यासाठी मदत मागता? भररस्त्यात गाईंना कापणारे आणि तिचे मांस भक्षण करणारे हे लोक आहेत. मरू द्या त्यांना! भोगतील आपल्या कर्माची फळे! तेव्हा संघाचे कार्यकर्तेही थबकायचे. त्यांच्याही मनात चलबिचल व्हायची, पण क्षणिकच. विरोध करून, द्वेष करून, मनात भेदभाव, सूडाची भावना ठेवून संघाचे काम वाढले नाही. आपल्या स्नेहमयी आत्मीय प्रेमाच्या ओलाव्यानेच संघाने सर्वांची मने जिंकली आहेत.
 
 
 
आज फेसबुक, टि्वटर इत्यादी सोशल मीडियावर विरोधकांची यथेच्छ निंदानालस्ती, वस्त्रहरण करण्याच्या प्रकारांना ऊत आल्याचे दिसून येईल. हा सर्व प्रकार संघाच्या कार्यपद्धतीच्या विपरीत आहे. स्वयंसेवकांनी आधीच मुसलमान आणि त्यात कम्युनिस्ट असलेल्या अकबर अलींबाबतही असाच भेदभाव केला असता, तर अकबर अलींचे मतपरिवर्तन झाले असते का? याचाही सर्वांनी विचार केला पाहिजे. शुद्ध सात्त्विक प्रेम, अपने कार्य का आधार हैं।
प्रेम जो केवल समर्पण भाव कोही जानता हैं।
दिव्य ऐसे प्रेम में ईश्वर स्वयं साकार हैं।
संघकार्यपद्धतीला प्रकट करणारे हे संघगीत प्रत्येकाने आपल्या हृदयात नंदादीपाप्रमाणे सतत तेवत ठेवून त्याच्या मंद प्रकाशात मार्गक्रमण केले पाहिजे, असे वाटते.
@@AUTHORINFO_V1@@