मुंबई : संपूर्ण देशात आंनदाचे, उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे. सगळ्यांचाच लाडका पाहुणा गणपती बाप्पा वाजतगाजत घरोघरी आला आहे. ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करत गुरुवारी घरोघरी आणि प्रत्येक शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
मुंबईतील मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच सुरुवात झाली आहे. मुंबईतील गणपती पाहण्यासाठी राज्यभरातील भाविकांची रिघ लागली आहे. दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी बुधवारी रात्रीपासूनच गर्दी लागली आहे. मुखदर्शन आणि नवस फेडण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक मान्यवर गणराया चरणी येण्याची शक्यता मंडळातर्फे व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील श्री कसबा गणपती मंडळ, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ, श्री गुरुजी तालीम मंडळ, श्री तुळशी बाग मंडळ व केसरीवाडा गणेशोत्सव या मानाच्या पाचही गणपतींची प्राणप्रतिष्ठा दुपारी होणार आहे. बुधवारी गणरायाच्या पूजेसाठी, तसेच सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी लोकांची दिवसभर सर्वत्र सुरू होती.
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गुरुवारीही गर्दी पाहायला मिळाली. मुंबईतून निघणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या भरुन निघत आहेत. खासगी बस आणि ट्रॅव्हल्सचीही बुकींग फुल आहे. दरम्यान मुंबई-गोवा मार्गावर वाहतूक तुलनेने सुरळीत सुरू होती. कोकणातही दीड, पाच, सात आणि अकरा दिवसांच्या गणपतींचे आगमन झाले आहे. अनेक भाविकांनी सकाळीच गणेश मूर्ती आणून पूजा व विधी सुरू केले होते.
उद्योगपती मुकेश अंबानी, अभिनेता सलमान खान, नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुजा आणि शिल्पा शेट्टी आदींच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले आहे. साऱ्यांनी टि्वटरद्वारे गणपती बाप्पाचे पोस्ट केला आहे. सर्वत्र वाजतगाजत उत्साहात गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे.