पाटणा : बिहारमध्ये एका तरुणाला जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणी दरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बिहार पोलिसांनी १५० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. रुपेश झा असे या तरुणाचे नाव होते. बिहारच्या सीतामढीमधील सिंगहरिया गावात तो राहत होता. आपल्या आजीच्या वर्षश्राद्धाचे सामान आणण्यासाठी रुपेश घरातून बाहेर पडला होता. त्याच्यासोबत त्याचा मित्रही होता. सामान आणताना पिकअपच्या चालकासोबत रुपेशचा वाद झाला. त्यावेळी तेथे भली मोठी गर्दी जमली होती. या जमलेल्या जमावाने रुपेशला काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. रुपेश जमावाकडे दयेची भीक मागत होता. परंतु जमावाने मारहाण चालूच ठेवली.
पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा रुपेश रक्तबंबाळ झाला होता. पोलिसांनी त्याला पाटणाच्या पीएमसीएच रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान रुपेशचा मृत्यू झाला. क्षुल्लक कारणांवरून सामुहिक मारहाणीचे प्रकार वाढले आहेत. यामुळे रुपेशसारख्या निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला. मॉब लिंचिंगची बिहारमधील ही तिसरी घटना आहे. लोकांनी कायदा आपल्या हातात घेऊ नये. असे पोलिसांकडून सांगण्यात आले.