पत्रास कारण की...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2018   
Total Views |



 
आंतरराष्ट्रीय पातळीवर देशादेशांमधील संबंधही कलेकलेने बदलत असतात. आजचे शत्रू उद्याचे मित्रही होऊ शकतात, तर घनिष्ट मैत्रीत एकाएकी वितुष्टही निर्माण होऊ शकते. अमेरिका आणि उत्तर कोरियाचेही अगदी तसेच.
 
पूर्वी एकमेकांमधून विस्तवही न जाणार्‍या, अणुहल्ल्याची धमक्या देऊन महासत्तेला डोळे दाखविणार्‍या उत्तर कोरियाने चर्चेचे दरवाजे किमान उघडण्याचे सौजन्य दाखविले आणि जूनमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि किम जाँग ऊन यांची सिंगापूर येथे ऐतिहासिक प्रथम भेट पार पडली. या भेटीमध्ये कोरियाने अणवस्त्रांचा वापर कमी करत तो नष्ट करण्याच्या अमेरिकेच्या मूलभूत सूचनेबाबत सकारात्मकताही दर्शविली. पण, ही प्रक्रिया नेमकी कधी, कशी सुरू होईल आणि त्याची कालमर्यादा किती असेल, याबाबत मात्र अद्यापही दोन्ही देशांमध्ये पुढे चर्चा सरकलेली नाही. पण, किमान समाधान एवढेच की, एकमेकांच्या वार्‍यालाही उभे न राहणारे हे दोन्ही देश चर्चेच्या माध्यमातून संवाद प्रक्रियेत सामील झाले. उ. कोरिया-अमेरिका संबंध सुधारणेच्या या पहिल्या अध्यायाचे म्हणूनच ‘एक नवीन सुरुवात’ म्हणून जगभरातूनही स्वागत झाले. या दोन्ही देशांच्या गाठीभेटीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार्‍या द. कोरियासोबतही उ. कोरियाने सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करत कोरियन द्वीपकल्पात शांतता कशी नांदेल, यासाठीच्या वाटाघाटींना वेग दिला. एकूणच काय तर कधीही चर्चा करून समस्यांची उत्तरे शोधण्यात स्वारस्य नसलेला उ. कोरिया चर्चेच्या केंद्रस्थानी आला.

पहिल्या भेटीनंतर आता उ. कोरिया अमेरिकेसोबतच्या दुसर्‍या भेटीसाठी उत्सुक असल्याचे समजते. तसे अधिकृत पत्रच ऊन यांनी ट्रम्प यांना पाठविले पण, या पत्रातील इतर तपशील मात्र ‘व्हाईट हाऊस’ने किम यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सार्वजनिक करणार नसल्याची भूमिका घेतली पण, प्राथमिक माहितीनुसार, ऊन यांनी ट्रम्प यांच्या भेटीची वेळ मागितली असून अणवस्त्र प्रसारबंदीवरील इतर महत्त्वपूर्ण बाबींची या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. अमेरिकेनेही ऊन यांच्या आपुलकीपूर्ण पत्राचे स्वागत केले असून अमेरिकाही उ. कोरियासोबत चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले आहे.

विशेष बाब म्हणजे, ट्रम्प-ऊनच्या पहिल्या भेटीनंतर उ. कोरियामध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत, असे वरकरणी तरी म्हणता येईल. कारण, उ. कोरियाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्तच्या जंगी संचलनावेळी सैनिकी शक्तीचे जाहीर शक्तिप्रदर्शन करण्यात आले असले तरी अणवस्त्रांचा यामध्ये दरवर्षीप्रमाणे समावेश मात्र कटाक्षाने करण्यात आला नव्हता. अमेरिकेच्या डोळ्यातूनही ही बाब निसटली नाही आणि म्हणूनच उ. कोरियासोबत पुढील सकारात्मक चर्चेसाठी तयार असल्याचे ‘व्हाईट हाऊस’कडून स्पष्ट करण्यात आले.

ऊन यांच्या या पत्राचे ट्रम्प यांनी ट्विटरवरून स्वागत केले. ऊन यांचे कौतुक करत ट्रम्प म्हणतात, “Thank you do Chairman Kim. We will both prove everyone wrong!” आता तसे सत्यात उतरल्यास जागतिक शांततेचा विचार करता, तो ट्रम्प यांचा मास्टरस्ट्रोक ठरेल. खरं तर ट्रम्प यांच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीआधी अमेरिकेलाही उ. कोरियाचा तडीस लावण्याची इच्छा आहे, जेणेकरून जे ट्रम्प यांच्या पूर्वसुरींना जमले नाही, ते त्यांनी किती सहजपणे ‘करून दाखविले’ असा संदेश अमेरिकन जनतेत आपसूक जाईल. ट्रम्प यांनी परराष्ट्र नीतीमध्ये घेतलेली आघाडी काही देशांना अगदी खुश करणारी, तर काहींचे कंबरडे मोडणारी ठरली. जसे इस्रायलशी सलगी, तर इराणवर निर्बंध. त्यामुळे एकीकडे ‘अमेरिका फर्स्ट’चा नारा देणारे ट्रम्प पूर्णत: अमेरिकाकेंद्रित परराष्ट्र धोरणांचा अवलंब करताना दिसतात पण, अजूनही अफगाणिस्तानमधून अमेरिकेने पूर्णपणे अंग काढून घेतलेले नाही. तेव्हा, अमेरिकेला नेमकी जागतिक शांतता अपेक्षित असेल तर आधी अफगाणिस्तानला स्थिरस्थावर करणे क्रमप्राप्त आहे. एकूणच, ट्रम्प यांची धरसोड वृत्ती त्यांच्या धोरणांतही प्रतिबिंबीत होते. ती अमेरिकेसाठी किती फायद्याची, किती तोट्याची ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण, आता अमेरिका-उ. कोरिया संबंध नव्याने आकार घेत आहेत, ही सकारात्मक बाब म्हणावी लागेल.

 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@