.... आणि म्हणे ‘भारत बंद’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Sep-2018
Total Views |
 
 
 
 
जिल्ह्यासह शहरात सर्व व्यवहार सुरळीत, नाशिकमध्ये ‘बंद’ची हाक ठरली फुसका बार
 

नाशिक : जनकौल प्राप्त भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आदींसारख्या राजकीय पक्षांनी काल दि. ९ सप्टेंबर रोजी दिलेली ‘भारत बंद’ची हाक नाशिकमध्ये केवळ एक फुसका बार ठरली आहे. शहरासह जिल्ह्यातील सर्व व्यवहार, शाळा, महाविद्यालये, खाजगी वाहतूकव्यवस्था यांचे व्यवहार सर्वत्र सुरळीत पाहावयास मिळाले. इंधन दरवाढ जरी सर्वसामान्यांच्या दृष्टीने असली तरी, त्यामागील वास्तवाची जाणीव नाशिककर नागरिकांमध्ये पाहावयास मिळाली. बंदचा उडालेला फज्जा हा सरकारवरील विश्वास अबाधित असण्याचे द्योतक ठरला आहे. शहरातील सर्व महाविद्यालये आणि शाळा यांत विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली. तसेच, व्यापारीवर्गाने आपले व्यवसाय सुरू ठेवल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

 

या वर्षात विरोधी पक्षांनी आणि काही कथित संघटनांनी विनाकारण बंद पुकारून अनेकदा नुकसान केले आहे. त्यामुळे आता ऐन सणासुदीच्या काळात आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा काळात बंद करणे हा केवळ राजकीय फार्स असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. सहामाही परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ न देणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे या बंदमध्ये आमचा सहभाग नाही, असे मत विविध शाळा महाविद्यालये यांच्या प्राचार्यांनी व्यक्त केलेगणेशोत्सव आला आहे. त्याचबरोबर गौरीचीही लगबग आहे. त्यामुळे सध्या व्यवसायाचे दिवस असताना अहेतूक बंदमध्ये आम्ही सहभागी होणार नसल्याचे व्यापारीवर्गाने बंदबाबत आपली भूमिका मांडताना सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून शहर वाहतूक बससेवा सकाळच्या सत्रात पाहावयास मिळाली. मात्र, रिक्षासह खाजगी वाहतूक व्यवस्था सुरू असल्याने नागरिकांचे हाल झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले नाही.

 

लासलगाव येथे बंदला अल्पसा प्रतिसाद

 

पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने सोमवारी ‘भारत बंद’ पुकारला होता. लासलगाव येथे दुपारी १२ च्या नंतर येथील सर्व नागरिकांनी व व्यावसायिकांनी आपले व्यवहार सुरळीत सुरू केल्याने या बंदला विशेष महत्त्व प्राप्त झाले नसल्याचे दिसून आलेलासलगाव शहरातील एसटी बससेवा, शाळा, महाविद्यालय, बाजार समिती तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने हे पूर्वपदावर आल्याने कोणताही परिणाम या बंदमध्ये दिसून आला नाही. भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज लासलगाव येथे राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच मनसेच्या वतीने लासलगाव येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅसचे दर कमी करावे तसेच शेतमालाला योग्य तो हमीभाव मिळावा, अशा अनेक मागण्यांचे निवेदन लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक शिवकुमार पांढरे यांना निवेदन देण्यात आले.

 

भल्लालदेवसाठी राजमातेचा अट्टाहास

 

विरोधी पक्षांच्या ‘भारत बंद’ची खिल्ली समाजमाध्यमांवरदेखील मोठ्या प्रमाणात उडविली गेली. बाहुबली चित्रपटाचा दाखला देत, ज्याप्रमाणे चित्रपटात राजमाता शिवगामिनी देवीने जनाधार नसताना भल्लालदेवला लोकांचा राजा बनविले, तसेच काहीसे केविलवाणे प्रयत्न सोनिया गांधी राहुल गांधींसाठी करत आहेत. मात्र, लोकंच्या मनात केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. अशा आशयाचे संदेश, छायाचित्र, व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होताना पाहावयास मिळाले.

 

साप्ताहिक सुटीमुळे मनमाड बंद

 

पेट्रोल व अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीला विरोध करण्यासाठी काँग्रेससह विविध विरोधी पक्षांनी पुकारलेला ‘भारत बंद’आज मनमाड येथे शांततेत पार पडला. मनमाड येथील सर्व व्यापारी आस्थापना, दुकाने यांचा सोमवार हा बंद म्हणजेच साप्ताहिक सुट्टीचा वार असल्याने दुकाने बंदच होती. जीवनावश्यक सेवा जसे दूध, वैद्यकीय सेवा, वृत्तपत्रे आदी सेवा व शाळा महाविद्यालये नियमित सुरू होती. बँका व विमा कंपन्या सामान्यपणे सुरू होत्या. मनमाड बसडेपोत प्रवाशांची वर्दळ पाहावयास मिळाली. मनमाड बस आगारातून नियमितपणे बस धावत होत्या. पोस्टातदेखील ग्राहकांनी व्यवहारासाठी गर्दी केली होती. बंद कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय शांततेत पार पडला.

 

गरज एकत्रित प्रयत्नांची

 

भारत बंद करून गॅस, पेट्रोलची दरवाढ कमी होणार नाही. त्यासाठी विरोधक आणि सरकार यांनी एकत्रित प्रयत्न करावयास हवे. परस्पर समन्वयाने ते शक्य आहे. हे विरोधकांनी समजून घ्यायला हवे. केवळ विरोधासाठी विरोध म्हणजे आजचा बंद आहे.

 

- साक्षी बोरसे,

अभियांत्रिकी विद्यार्थिनी, नाशिक.

 

बंद केवळ राजकीय हेतूसाठी
 

भाजप सरकारचे काम आणि वेग यामुळे विरोधक सैरभैर झाले आहेत. त्यांच्याकडे सध्या कोणताही मुद्दा नाही. विषयांची जुळवणी करून केवळ देखावा म्हणून बंद वगैरे करण्याकडे त्यांचा कल आहे. सततच्या बंदमुळे आमच्यासारख्या सामान्यांना त्रास होतो. त्यामुळे या बंदकडे मी दुर्लक्ष करत आहे.

- मंजिरी जोशी, गृहिणी, नाशिक

 

हा तर केवळ पब्लिसिटी स्टंट

 

मोदी सरकार दिवसरात्र काम करून देशहिताचे कार्य करत आहे. त्यामुळे त्यांचे पाय खेचण्यासाठी आजचा बंद हा केवळ एक पब्लिसिटी स्टंट आहे. पेट्रोल आपण आयात करतो. त्यामुळे त्याची दरवाढ ही आपल्या हातात नाही. हे न समजण्याइतके आम्ही अजाण नाही. अशा बंदमुळे दरवाढ कमी होणार नाही. शेवटी सगळा निर्णय सरकारच्या हातात आहे, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. मोदी सरकार तारणहार आहे, असे माझे मत आहे. या बंदला माझा विरोध आहे.

- वेदांत कुलकर्णी, अभियांत्रिकी विद्यार्थी, नाशिक

 

बंद हा समस्येवर उपाय नाही

 

कोणत्याही समस्येवर बंद हा उपाय नाही. व्यापार बंद करून आपण आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान करत आहोत. याचे भान बंदकर्त्यांनी जपावयास हवे. मी व्यक्तिश: या बंदच्या विरोधात आहे. आम्ही ज्ञानदानाचे कार्य करतो, तिथे अशा घटनांचा व्यत्यय येऊ नये यासाठी आम्ही आधीच जाहीर केले होते की, आमची शाळा बंदमध्ये सहभागी असणार नाही. आज आमच्या शाळेत 80 टक्के उपस्थिती आहे. इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थीदेखील बंदला झुगारून शाळेत आले आहेत. 

- प्राचार्या साक्षी भालेराव, मध्यवर्ती हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे शिशुविहार बालक मंदिर, इंग्लिश मीडियम स्कूल, नाशिक

 

परीक्षांमुळे बंदमध्ये सहभागी नाही

 

शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. त्यांचे शैक्षणिक नुकसान करणे, हे आमचे धोरण नाही आणि तशी आमची मनीषाही नाही. त्यामुळे या बंदमध्ये आम्ही सहभागी होणार नाही. नित्य नित्यनियमांप्रमाणे आम्ही शालेय वाहतूक सुरू ठेवणार आहोत.

- भगवंत पाठक, जिल्हा कार्याध्यक्ष, श्रमिक सेना, नाशिक

 

नाशिकमध्ये काय होते सुरु अन काय होते बंद

 

या सेवा होत्या बंद : खबरदारीचा उपाय म्हणून मेनरोड, महत्मा गांधी मार्ग येथील तुरळक दुकाने. शहर बस सेवा

या सेवा होत्या सुरु : रेल्वे, मेडिकल, दवाखाने, किराणा व भाजीपाला दुकाने, सरकारी व निमसरकारी कार्यालये, शाळा महविद्यालये, स्कूल बस , रिक्षा, पेट्रोल पंप,

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@