बिशपच्या अत्याचाराविरुद्ध नननी पुकारला लढा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Sep-2018   
Total Views |

 


 
 
केरळमधील हे प्रकरण बिशपपदावर असलेल्या एका ज्येष्ठ ख्रिस्ती धर्मप्रसारकाने आपल्याच कार्यक्षेत्रात असलेल्या एका ननशी कसा कथित गैरव्यवहार केला, यावर झगझगीत प्रकाश टाकणारे आहे. चर्च आणि त्यातील धर्मगुरूंचे आक्षेपार्ह वर्तन याबद्दल विविध देशांमधील माध्यमांमधून या आधी खूप काही प्रसिद्ध झाले आहे. आपल्या देशातील केरळ राज्यात एका बिशपने केलेल्या कथित अत्याचाराचे जे प्रकरण गाजत आहे त्याची कल्पना यावरून यावी.
 
 

ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून अन्य धर्मीयांचे धर्मांतर करण्यासाठी ज्या नाना गैरप्रकारांचा वापर केला जातो, त्याच्या बातम्या वाचण्यात येत असतात. आपल्या पदाचा वापर करून, त्या पदाचा गैरफायदा घेऊन धर्मगुरूंकडून अत्याचार करण्याचे अनेक प्रकार विदेशात घडले आहेत आणि चर्चला त्याची जबर किंमत मोजावीही लागली आहे. सध्या आपल्या देशातील केरळ राज्यात असेच एक प्रकरण सध्या खूप गाजत आहे. पण, अत्याचार करणाऱ्या बिशपविरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ज्या ननवर अत्याचार झाला तिने पोलिसांमध्ये तक्रार करून ७५ दिवस उलटून गेले तरी काही कारवाई केली जात नाही, याला काय म्हणावे?

 

केरळमध्ये सध्या चर्चेत असलेले प्रकरण एका बिशपशी संबंधित आहे. त्या बिशपचे नाव फ्रँको मुलक्कल. या बिशपने कोट्टायम कॉन्व्हेंटच्या एका ननवर मे २०१४ ते सप्टेंबर २०१६ दरम्यान तेरा वेळा अत्याचार केल्याची तक्रार आहे. याबाबतची तक्रार करून दीड महिना उलटून गेला असला तरी कारवाई होत नसल्याबद्दल विविध ख्रिस्ती संघटना रस्त्यावर उतरल्या असल्या तरी काही घडताना दिसत नाही. त्या ननवर झालेला अन्याय सहन न झाल्याने अन्य काही ननही रस्त्यावर उतरल्या. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. केरळ राज्याचे पोलीस प्रमुख चौकशीच्या कामात मोडता घालत आहेत, असा थेट आरोप आंदोलन करणाऱ्या नननी केला आहे. चर्चही अशा घटनांकडे कसे दुर्लक्ष करते, तेही या निमित्ताने दिसून आले आहे. पीडित महिलेने चर्चकडे अनेक तक्रारी करूनही त्याची दखल न घेतली गेल्याने अखेर तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी जेवढ्या गंभीरपणे या प्रकरणाची दखल घ्यायला हवी होती, तेवढ्या गंभीरपणे ती घेतली नसल्याचे लक्षात येते. किती उथळपणे चौकशी चालू आहे त्याचे उदाहरण म्हणजे पोलिसांनी पीडित महिलेची सात वेळा चौकशी केली, पण ज्याच्यावर गुन्हा केल्याचा आरोप आहे त्याची फक्त एकदाच चौकशी करण्यात आली. आंदोलन करणाऱ्या एका नननेच ही माहिती दिली आहे.

 

या घटनेबाबत चर्च मूग गिळून गप्प असले तरी त्याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न चर्चची बाजू घेणाऱ्यांनी चालविला असल्याचे दिसून येत आहे. केरळमधील एकमेव अपक्ष आमदार पी. सी. जॉर्ज यांनी तर कळसच केला. त्यांनी सरळसरळ त्या ननलाच जाहीरपणे दोषी ठरविले. तिच्यावर अत्यंत असभ्य भाषेत जाहीर आरोप केले. पी. सी. जॉर्ज कोट्टायमच्या पुंजर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. आधी काँग्रेसमध्ये असलेले जॉर्ज आता अपक्ष आहेत. त्यांनी असे वादग्रस्त विधान प्रथमच केले नसून तशी विधाने करण्याबद्दल त्यांची ख्याती आहे. पी. सी. जॉर्ज यांच्या विधानामुळे आंदोलन करणारेही संतापले आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नननी दिला आहे, तर राष्ट्रीय महिला आयोगाने सदर आमदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केरळच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. केरळ महिला फेडरेशननेही जॉर्ज यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. भाकपनेते डी. राजा, मार्क्सवादी नेत्या सुभाषिणी अली यांनीही जॉर्ज यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

 

जालंधर डायसिस (बिशपच्या अधिकार क्षेत्रातील प्रदेश) च्या या बिशपविरुद्ध वातावरण तापत असले तरी काही कारवाई होताना दिसत नाही. कोचीमध्ये जॉईंट ख्रिश्चन कौन्सिलच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात, या घटनेबाबत सरकार आणि विरोधक गप्प असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले. पैशाचा वारेमाप वापर आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे बिशप मुलक्कल यास हात लावला जात नसल्याचा आरोप या सभेत करण्यात आला. महिलेच्या नुसत्या जबाबावरून अत्याचार करणाऱ्यास अटक केली जाऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले असले तरी गुन्हेगार अद्याप मोकाट कसा, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले. दडपणामुळे कोणी बोलत नाही. चर्चच्या विविध स्तरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ज्यांच्यावर आरोप आहे त्या फ्रँको मुलक्कल यांनी पत्रकार परिषद घेऊन तोंड उघडले तर अनेक बुरखे गळून पडतील. त्यामुळेच त्यांना पाठिंबा आणि संरक्षण दिले जात असल्याचा आरोप जोसेफ वर्गीस यांनी केला आहे. ख्रिश्चन धर्मात सुधारणा करण्याचे कार्य करीत असलेल्या विविध स्वतंत्र संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. उच्च न्यायालयाचे माजी न्या. केमाल पाशा आणि फादर ऑगस्टिन वाटोली आदींनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पोलीस आणि बिशप (फ्रँको मुलक्कल) यांची अभद्र युती झाली असून बिशप यांच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज न करण्यामागे पोलिसांचा हात असल्याचा आरोप न्या. केमाल पाशा यांनी केला आहे.

 

केरळमधील हे प्रकरण बिशपपदावर असलेल्या एका ज्येष्ठ ख्रिस्ती धर्मप्रसारकाने आपल्याच कार्यक्षेत्रात असलेल्या एका ननशी कसा कथित गैरव्यवहार केला, यावर झगझगीत प्रकाश टाकणारे आहे. चर्च आणि त्यातील धर्मगुरूंचे आक्षेपार्ह वर्तन याबद्दल विविध देशांमधील माध्यमांमधून या आधी खूप काही प्रसिद्ध झाले आहे. आपल्या देशातील केरळ राज्यात एका बिशपने केलेल्या कथित अत्याचाराचे जे प्रकरण गाजत आहे त्याची कल्पना यावरून यावी. अन्य धर्मीयांचे धर्मांतर करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा सर्व मार्गांचा वापर चर्चकडून या आधी झाला आहे आणि होत आहे. पांढऱ्या झग्याआड घडलेले हे असेच आणखी एक काळे कृत्य. मान खाली घालावयास लावणारे, पण त्याचे चर्चला काही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही. त्या बिशपवर चर्चने काही कारवाई केल्याचे आढळून आलेले नाही. या सर्व प्रकरणाची साद्यंत चौकशी करण्याची जबाबदारी केरळ पोलिसांची आहे. केरळ पोलीस अजून तरी थंड असल्याचे दिसत आहे. ख्रिश्चन लॉबीचा केरळमध्ये एवढा प्रभाव आहे का की ज्यामुळे ते एका बिशपला हात लावण्यास धजावत नाहीत?

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@