दूर व्हावं अवनक रूप...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Sep-2018
Total Views |


 
 
 


गणेशाचं स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येक कार्यारंभ गणेशपूजनाने होतो. या देवतेची देवळं-राऊळं संपूर्ण देशभर आढळून येतात. इतकंच नव्हे, तर परदेशांमध्येही गणपतीची विविध रूपं आणि त्यासंबंधीच्या आख्यायिका पाहायला आणि ऐकायला मिळतात. अशा सर्व पद्धतीनं गणेश जनमानसात सामावलेला दिसतो.
गणेश ही अनेकांची आराध्यदेवता... बुद्धिवान, कलासक्त, शक्तिमान, सामर्थ्यवान अशी ही देवता, आपल्या जीवनशैलीमध्ये सहजी सामावली गेली आहे. किंबहुना ती आपल्या जगण्याचा एक भाग आहे. गणेशस्तवनाशिवाय कुठलीही मंगल वेळ साजरी होत नाही. देशातच नव्हे, तर परदेशामध्येही पूजनीय असणारा असा हा देव... दहाव्या-अकराव्या शतकापासून गणपतीची ही लोकप्रियता आणि माहात्म्य भारतापुरतंच मर्यादित न राहता आग्नेय, आशियाई देशांपर्यंत पोहोचलं आणि ही एक पूज्य देवता म्हणून मान्य करण्यात आली. अकराव्या शतकापासून गणपती सर्व मंगलकार्यांच्या प्रारंभी पूजला जात आहे. आपल्याकडील कोणत्याही धार्मिक विधीचा प्रारंभ गणेशपूजनाशिवाय संपन्न होत नाही. एकदा वाराणसीतल्या पं. राजेश्वरशास्त्री द्रविड या अत्यंत ख्यातकीर्त विद्वानांना श्रीगणेशाबद्दल विचारलं गेलं. तेव्हा त्यांनी सांगितलं, एखाद्या पूजेला शिव-पार्वतीला बसायचं असल्यास त्यांनीही प्रारंभी गणेशाची पूजा केली पाहिजे. मग विचारणा झाली, गणेश स्वत:च पूजेला बसला तर? उत्तर मिळालं, त्यानेही आधी ही पूजा केली पाहिजे. इतकं माहात्म्य मिळालेली ही देवता आहे!

 
 
गणपतीच्या पहिल्या प्राचीन मूर्तीचा उल्लेख साधारणत: तिसर्या शतकात आढळतो. संकिसा आणि मथुरा वस्तुसंग्रहालयामध्ये तिसर्या-चौथ्या शतकातल्या गणेशमूर्ती पाहायला मिळतात. पण, या आधीचा गणेशमूर्तींचा उल्लेख सातवाहनकालीन ‘गाथा सप्तशतीत’ आढळतो. पण, ती मूर्ती एखाद्या देवालयात स्थापन केली असल्याचं दिसत नाही. यात मूर्ती पारावर ठेवली होती, असा उल्लेख आहे. गणपती दु:खकर्ता होता तेव्हा यक्ष या भूमिकेत असावा. रामकृष्ण गोपाळ भांडारकरांच्या मताप्रमाणे, कालांतराने त्याचं ‘सुखकर्ता’ या रूपात दर्शन होऊ लागलं.प्रारंभीच्या गणेशाच्या मूर्ती दोन हातांच्या असत. नागयज्ञोपवीत धारण केलेल्या या मूर्ती आहेत. तेव्हापासूनच त्याच्या डाव्या हातात मोदकपात्र दिसायला लागलं. अशा मूर्ती साधारणत: पाचव्या शतकातल्या आहेत. काबूल (अफगाणिस्तान) येथे अशा मूर्ती आढळतात. या मूर्ती खिंगीलाशाही राज्यकर्त्यांच्या काळातल्या आहेत. काबूलपासून दक्षिणेला असणार्या गार्डिज या ठिकाणी अशी मूर्ती मिळाली. तिच्या पादपीठावर ‘महाविनायक’ अशी अक्षरं कोरलेली आहेत. काबूलच्या शोरबाजारात सरकारधार येथे व्याघ्रांबरयुक्त मूर्ती चौथ्या शतकातली असल्याचं आढळून आलं. विशेष बाब म्हणजे पुराणात गणपतीच्या गजमुखाबद्दलची गोष्ट आहे. त्यापूर्वीची म्हणजे मानवी मुख असणारी मूर्ती तंजावर येथे आढळून आली. नंतर गणपतीचं शिर धडावेगळं केलं गेलं तेव्हाचीही एक मूर्ती बद्रीनाथ येथील गौरीकुंडाच्या काठावर आढळून आली आहे. आकाराने मोठी असणारी ही मूर्ती शिर तुटलेल्या अवस्थेतील आहे. ही मूर्ती ‘मुंडकाटा गणेश’ या नावाने प्रसिद्ध आहे. कालांतराने गणपती चतुर्भुज, षडभुज, अष्टभुज, दशभुज असा घडवला गेला. अगदी वीस हातांपर्यंतची गणेशमूर्तीही उपलब्ध झाली आहे.

 
 
शिल्पकारांनी गणपतीला बालगणेशापासून अनेक रूपात घडवलं. काही ठिकाणी नागफण्यावर नृत्य करणारी गणेशमूर्तीही बघायला मिळते. पण, अशा प्रकारच्या गणेशमूर्ती श्रीकृष्ण मूर्तीवरून बेतलेल्या आहेत. गणेशाच्या वाहनांचा विचार करता उंदीर, मोर आणि सिंह यांचा उल्लेख होतो. वसुंधरेने गणेशाला उंदीर हे वाहन दिलं, असं म्हणतात. काही ठिकाणी गणपतीचे वाहन असणारा उंदीर समोर ठेवलेले मोदक पळवत असताना पाहायला मिळतं. हे दृश्य साकारणार्या शिल्पाकृतीही बघायला मिळतात.
 
 
 
गणेश मयूरेश्वर म्हणून घडवला जातो तेव्हा तो मोरावर स्वार असतो. मोरोबा, मोरगाव आदी नावांवरूनसुद्धा गणेशाबरोबर मोराचा सहवास सिद्ध होतो. विशेषत: महाराष्ट्रात अशा मूर्ती आढळतात. गणपतीच्या अनेक रूपांपैकी एक रूप आहे ते हेरंबाचं... हे गणेशरूप सिंहावर आरूढ असतं. गणेश एकमुखाचा आहे तसाच दोन, तीन अथवा पाच मुखांचा असतो. पंचमुखी गणेश उंदीर वाहनासह असेल, तर तो महागणपती म्हणून संबोधला जातो. वाहन सिंह असेल तर त्याला ‘हेरंब’ म्हणतात. गणेश सर्व संप्रदायांमध्ये पूज्य मानला जातो. शैव, वैष्णव, शाक्त हे सर्व संपद्राय गणेशाचे पूजक आहेत. गणेशासंबंधातल्या काही पुराणकथा गणेशमूर्ती ओळखण्यास साह्यभूत ठरतात. शाक्त संप्रदायात गणपतीचा समावेश झाला तेव्हा घडवल्या गेलेल्या मूर्ती ‘उच्छिष्ट गणेश’ म्हणून ओळखल्या जातात. या रूपात गणपतीच्या मांडीवर त्याची पत्नी दाखवलेली असते. हा गणेश प्रणयाराधनेच्या अवस्थेत असतो.

 
 
गणपती शिव-पार्वतीच्या सान्निध्यात असल्याचीही बरीच शिल्पं उपलब्ध आहेत. तो वडीलबंधू कार्तिकेयासवे माता-पित्यासह दाखवला जातो. भारताच्या विविध भागांमध्ये गणेशाच्या अशा अनेक मूर्ती पाहायला मिळतात. आठव्या शतकापर्यंत तामिळनाडूतील दैवतांमध्ये गणेश प्रविष्ट झाला नव्हता. हे आताच्या काळात लोकप्रिय झालेल्या ‘वातापी गणेश’ या गाण्यावरूनही लक्षात येतं. कर्नाटकमध्ये बदामी (वातापी) येथील एका मंदिराच्या गाभार्यात वर्तुळाकृती शाळुंका रीत्या अवस्थेत आढळते. त्यावरून येथील गणपती कदाचित तामिळनाडूत गेला असावा, असं अनुमान काढलं गेलं. गणपती आणि कार्तिकेय या दोन भावांमधील स्पर्धा, भांडण हे अगदी बालस्वभावाला साजेल, असं दिसून येतं. हे प्रसंगही शिल्पबद्ध केलेले दिसतात.

 
 
गणेशाच्या बुद्धिमत्तेसंबंधातील कथा सर्वज्ञात आहेत, त्याचप्रमाणे त्या कथांमधून तो माता-पित्यांचा परमभक्त होता, हेदेखील दिसून येतं. काही ठिकाणी या कथांचं चित्रीकरणदेखील दिसून येतं. गणपतीच्या नृत्य करतानाच्या असंख्य मूर्ती आढळतात. त्या भारतातल्या अनेक मंदिरांवर आणि परदेशातल्या संग्रहालयांमध्ये दिसून येतात. नृत्यगणेशाची मूर्ती घरात ठेवू नये, असा एक गैरसमज आढळतो. या स्वरूपातील गणेश घरात असेल तर तो नाचवतो, असं समजतात. मात्र, या विचारात तथ्य नाही. अशी मूर्ती ठेवू नये असं मानलं, तर घरात गणेशाची बसलेली मूर्त ठेवली तर ती बसवते, असा अर्थ होईल. त्यामुळे यात तथ्य नाही. समर्थ रामदासांनी दासबोधाच्या प्रारंभीच नृत्यगणेशाला वंदन केलं आहे. एवढंच नाही, तर रायगडावरच्या राणीवशाच्या एका चौकटीवर चतुर्भुज आसनस्थ गणपती आहे, तर दुसर्या दाराच्या चौकटीवर नृत्यगणेशाचं शिल्पांकन आहे. गणेशाला नृत्याच्या क्षेत्रात प्रवेश करताना पाहून लक्ष्मीने त्याला नुपूर आणि अंगद दिल्याचा उल्लेख पुराणात आढळतो.

 
 
गणेशाच्या काही मूर्ती विशेष लक्ष देण्यासारख्या आहेत. उदा. वाराणसीत गणेशाची एक अद्भुत प्रतिमा आढळते. तिला यक्षगणेश असं म्हणतात. या गणेशप्रतिमेच्या सोंडेवर लहान आकारातल्या तीन हत्तींचं शिल्पांकन आहे. अशा गणेशाचं वर्णन ‘दंष्ट्रालग्नाद्विपघटा’ असं केलं आहे. या गणपतीचं वर्णन स्कंदपुराणातल्या काशीखंडात आढळतं. तिथे सहा हत्ती असावेत, असं म्हटलं आहे. आणखी एक गणेशपट्ट वारासणीला आढळला. त्यावर चार गणपती आसनस्थ दाखवले असून मधेच एक हत्ती शिल्पांकित केला आहे. याला पंचविनायकपट्ट असं म्हणतात. उत्तरेत काही ठिकाणी नवग्रहाबरोबर सूर्याच्या जागी गणपती दाखवलेला आहे. आपल्याकडील आणि इतरत्र आढळणार्या सप्तमातृकापट्टामध्ये एका टोकाला शिववीरभद्र आणि दुसर्या टोकाला गणपती सामान्यत: अनिवार्यपणे दाखवलेला असतो. बीड जिल्ह्यातील केशवपुरी येथील देवळात गणेश राक्षसाशी लढतानाचं दृश्य चित्रित केलं आहे.
 
 
 
असं माहात्म्य आणि कीर्ती लाभलेल्या सुखकर्ता आणि दु:खहर्ता गणपतीचा सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्यांनी सुरू केला. सामाजिक एकोपा, सामंजस्य, सहवास निर्माण व्हावा, हा यामागील उद्देश होता. आजही याच उद्देशाने हा मंगलमय महोत्सव साजरा व्हायला हवा. त्याला मिळत असणारं अवनक रूप दूर होईल आणि एका चांगल्या स्वरूपात हा उत्सव पार पडेल, अशी आशा करू या...
डॉ. गो. बं. देगलूरकर
 
 
 
 
 
 
 
 

@@AUTHORINFO_V1@@