‘संघर्ष’से ‘सुवर्ण’तक...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Sep-2018   
Total Views |


 


आशियाई स्पर्धेत देशासाठी ‘सोनेरी’ कामगिरी करणाऱ्या मेहनती खेळाडूंपैकी एक स्वप्ना बर्मन. तिचा हा सुवर्णपदकापर्यंतचा खडतर प्रवास आणि संघर्ष प्रत्येकासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

 

मंजिल उन्हीं को मिलती है,

जिनके सपनों में जान होती है,

पंख से कुछ नहीं होता,

हौसलो से उड़ान होती है...।

 

हा शेर आपण अनेक वेळेस ऐकत असतो. मात्र, फार कमी जणं असतात, जे कोणत्याही गोष्टींचा विचार न करता बिनधास्त स्वप्न पाहतात आणि येईल त्या परिस्थितीवर मात करत यशाचे शिखर गाठतात. अशाच प्रकारचे एकसे एक जिगरबाज खेळाडू सध्या जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून आपल्यासमोर येत आहेत. या खेळाडूंनी कठीण परिस्थितीवर मात करत देशासाठी ‘सोनेरी’ कामगिरी केली आहे. आता या मेहनती खेळाडूंमध्ये स्वप्ना बर्मन हिचादेखील समावेश झाला असून तिचा हा सुवर्णपदकापर्यंतचा खडतर प्रवास आणि त्यासाठी तिने केलेला संघर्ष आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. पश्चिम बंगाल राज्यातील जलपाईगुरी या शहरात स्वप्ना बर्मन लहानाची मोठी झाली. 21 वर्षीय स्वप्नाने इंडोनेशिया देशात जकार्ता येथे सुरू असलेल्या 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ‘हेप्टाथलोन’ या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तिच्या या ऐतिहासिक सोनेरी कामगिरीमुळे तिच्या कुटुंबीयांसोबतच संपूर्ण भारतभर जल्लोष साजरा केला गेला. ‘हेप्टाथलोन’ या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी स्वप्ना ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. स्वप्नाने भारतासाठी सुवर्ण कामगिरी केली असली तरी तिचा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर राहिला आहे.

 

घरात अठरा विश्वे दारिद्य्र आणि त्यात वडिलांचं आजारपण या सर्वांतून वाट काढत ती इथपर्यंत पोहोचली. राहण्यासाठी बर्मन कुटुंबाला पक्के घर नसून आजही ते पत्र्याच्या शेडमध्येच गुजराण करतात. स्वप्नाचे वडील पंचम बर्मन हे रिक्षा चालवून घराचा गाडा चालवायचे. त्यात तिची आई बशोना बर्मन चहाच्या मळ्यात मोलमजुरी करून त्यांना हातभार लावायची. यात स्वप्नाच्या खेळाचा आणि प्रशिक्षणाचा खर्चही जास्त असायचा. तरी घरच्यांनी तिला कोणत्याही गोष्टींसाठी कधी नकार दिला नाही. मात्र, घरचा कणा असलेले पंचम बर्मन यांना 2013 साली पॅरालिसिसचा झटका आला आणि त्यानंतर ते अंथरुणाला कायमचे खिळून पडले. अगोदरच घरात गरिबी असल्याने घरातील सर्वांसाठीच हा मोठा धक्का पचविणे फार अवघड होते. पण, तरीही अजिबात खचून न जाता यातून स्वप्ना आणि तिच्या कुटुंबीयांनी परिस्थितीशी संघर्ष केला पाहिजे, झगडलं पाहिजे असाच सकारात्मक विचार केला. आई बशोना व स्वप्नाने हार न मानता वडिलांचे आजारपण आणि कुटुंबाचा गाडा सांभाळून दोघींनी आपला संघर्ष अविरत चालूच ठेवला.

 

घरातील कर्ता पुरुष आजारपणाने घरात झोपून असताना स्वप्नाने आपला सराव थांबवला नाही की, आपल्याकडे आवश्यक गोष्टी नाहीत याची कधी तक्रारही केली नाही. याउलट, आहे त्याच परिस्थितीमध्ये तिने आपला सराव वाढवला. या दरम्यान स्वप्ना स्थानिक आणि छोट्या-छोट्या टुर्नामेंटमध्ये भाग घेऊन मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमांतून घर चालविण्यासाठी आपल्या आईला स्वप्ना मदत करायची. यामुळे तिला अनेक दुखापतींचा सामना करावा लागायचा. जणू काही झालंच नाही, असं समजून सावरत ती पुन्हा नव्या जोमाने सरावाला लागायची. आपण आपल्या मुलींसाठी काहीच करू शकत नाही, तिला आवश्यक सुविधा पुरवू शकत नाही, याचे तिच्या आईला खूप दुःख वाटायचे. मात्र, आज तिने आमच्या आयुष्यात आनंद फुलवला असल्याचे तिच्या आईने स्वप्नाच्या विजयावर प्रतिक्रिया देताना सांगितले. सध्या स्वप्नाच्या पाड्यावर जोरदार जल्लोष चालू आहे. एवढ्या बिकट परिस्थितीवर मात करत स्वप्नाने तिच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याने तिच्या आईला आनंदाश्रू लपवता आले नाहीत. तिची आई दिवसभर कालिमाता मंदिरात बसून होती आणि आपल्या लाडकीच्या विजयासाठी प्रार्थना करत होती. त्यामुळे तिला आपल्या लाडक्या लेकीचा खेळही पाहता नाही आला, याची खंत तिच्या आईला आहे. मात्र, लेकीच्या सोनेरी कामगिरीवर ती खुश आहे.

 

प्रशिक्षण असो की, खेळासाठी आवश्यक असलेले बूट, अशा छोट्या-छोट्या गोष्टींसाठी स्वप्नाला झगडावं लागलं. खेळासंबंधित असलेले साहित्य अत्यंत महाग असल्याने ते ती खरेदी करू शकत नव्हती. त्यामुळे तिचे प्रशिक्षक बकौल सुकांत हे तिला मोफत प्रशिक्षण द्यायचे. तसेच अनेक वेळेस स्वखर्चाने स्पर्धेसाठीदेखील पाठवायचे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होतीच, मात्र स्वप्नाच्या दोन्ही पायांच्या बोटाला 6-6 बोटे असल्यामुळे तिच्या मापाचे बूट मिळत नसत आणि यामुळे तिला आवश्यक ग्रीप मिळायची नाही. तसेच सरावादरम्यान तिचा बूट लवकर फाटायचा. यामुळे तिला योग्य नंबरच्या बुटांसाठी आजही झगडावं लागत आहे. स्वप्नाचा संघर्ष एवढ्यावरच थांबत नाही तर, स्पर्धेच्या अगोदर दोन दिवस ती प्रचंड आजारी होती. तिला जबड्यामध्ये प्रचंड वेदना होत्या. तरीही गालाला पट्टी लावून मैदानावर उतरत तिने ऐतिहासिक कामगिरी बजावली. यातूनच तिच्या या कामगिरीमागे प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटी असल्याचे दिसून येते. तिच्या या जिद्दीला आणि संघर्षाला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम...!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@