जैव इंधनाचे 'उड्डाण'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Sep-2018   
Total Views |



 

सोमवारच्या स्पाइस जेटच्या विमानात छत्तीसगढमध्ये तयार केलेल्या जैव इंधनाचा वापर करण्यात आला होता. परंतु आपल्या देशात जैव इंधनाचा वापर करण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हे. यापूर्वीही जैव इंधनाचा देशात वाहतूकीसाठी वापर करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. भारताच्या जैव इंधन धोरणावर या लेखाच्या माध्यामातून टाकलेला एक दृष्टीक्षेप...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
 
जैव इंधन म्हणजे वनस्पतीपासून मिळणारे तेल होय. यामध्ये जेट्रोफाच्या बियांपासून काढलेले तेल प्रामुख्याने वापरले जाते. जेट्रोफा ही युफोर्बियेसी कुळातील वनस्पती असून त्याचे मूळ अमेरिकेत आहे. जेट्रोफा वनस्पतीची उंची साधारण तीन ते चार मीटरपर्यंत असते आणि प्रतिकूल हवामानात व विपरित परिस्थितीमध्येही ते जोमाने वाढते. जेट्रोफाव्यतिरिक्त करंज वनस्पतीपासूनही जैव इंधन मिळवले जाते. सध्या छत्तीसगढ आणि राजस्थान या दोन्ही राज्यांत जेट्रोफा आणि करंज वनस्पतींची व्यावसायिकस्तरावर लागवड केली जात आहे. स्वयं साहाय्यता गट आणि ‘मनरेगा’च्या माध्यमांतूनही याची लागवड केली जात असून या राज्यात जैव इंधनाचे उत्पादनही घेण्यात येत आहे. छत्तीसगढचे मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह यांनी २००५ साली ‘डीजल नहीं अब खाडी से, डीजल मिलेगा बाडी से,’ अशी घोषणा दिली होती. ‘बाडी’ म्हणजेच ‘शेत.’ त्यांची ही घोषणा आता प्रत्यक्षात उतरली असून सोमवारच्या स्पाइस जेटच्या विमानात छत्तीसगढमध्ये तयार केलेल्या जैव इंधनाचा वापर करण्यात आला होता.
 

दुसरीकडे राजस्थानने केंद्रातील मोदी सरकारने घोषित केलेल्या ‘राष्ट्रीय जैव इंधन धोरण - २०१८’ला देशात पहिल्यांदा मंजुरी दिली. राजस्थानमध्ये जवळपास ७० लाख हेक्टर पडीक जमीन आहे, जी देशात सर्वाधिक आहे. शिवाय राजस्थानमध्ये आतापर्यंत जेट्रोफा आणि करंजची सुमारे साडेसात कोटी झाडे लावण्यात आली आहेतछत्तीसगढ आणि राजस्थानबरोबरच मध्य प्रदेश राज्यानेही जैव इंधनाच्या निर्मितीला चालना मिळावी म्हणून काम सुरू केले आहे. अन्य राज्यांनीही या दिशेने प्रयत्न केल्यास पाण्याची उपलब्धता नसलेल्या शेतकऱ्यांचा जेट्रोफा वा करंज या वनस्पतीच्या लागवडीतून तर आर्थिक फायदा होईलच, पण देशालाही स्वस्तात इंधन उपलब्ध होईल.

 

राष्ट्रीय जैव इंधन धोरण-२०१८

 

केंद्रीय मंत्रिमंडळाने १६ मे २०१८ रोजी ‘राष्ट्रीय जैव इंधन धोरण-२०१८’ला मंजुरी दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जागतिक जैव इंधनदिनी’ या धोरणाचे लोकार्पण केले. या धोरणात पेट्रोलमध्ये मिसळण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचा परिघ वाढवण्यात आला. नव्या धोरणानुसार खाण्यासाठी अयोग्य धान्य-गहू, तांदूळ, सडलेले बटाटे आणि बीट, स्वीट सॉरगम, मक्याची दाणे काढलेली कणसे, कसावा, ऊसाचा रस आदींच्या वापराला परवानगी देण्यात आली. याशिवाय अखाद्य तेलबिया, वापरलेले खाद्यतेल, लघु कालावधीतील पिकांपासून जैव डिझेलच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. शिवाय सध्याच्या दरानुसार एक कोटी लीटर इथेनॉल या जैव इंधनाची निर्मिती केली, तर २८ कोटी रुपयांच्या परकीय चलनांचीही बचत होऊ शकते, तर केंद्राच्या नव्या धोरणाबरहुकूम जैव इंधनाची निर्मिती आणि वापर करण्यात येईल, तर दरवर्षी देशाच्या चार हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते, हे विशेष.

 

जैव इंधनामुळे होणारे फायदे

 

जैव इंधन जेट्रोफा, करंज यांचे तेल, भाजीपाल्यापासून तयार केलेले तेल, पुनर्वापर करण्याजोगे ग्रीस, नील हरित शैवाळ, नव्या जैव इंधन धोरणानुसार अनुपयुक्त धान्य, सडके बटाटे व बीट आदींपासून तयार केले जाते. जीवाश्म इंधन म्हणजेच पेट्रोल-डिझेलऐवजी या जैव इंधनाचा वापर करण्यात येतो. खरे म्हणजे एअरलाइन्स इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए) नामक ग्लोबल असोसिएशनने याबाबत काही गोष्टी निर्धारित केल्या आहेत. असोसिएशनने विमानोड्डाण क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या कार्बन उत्सर्जनात २०५० पर्यंत ५० टक्क्यांपर्यंत घट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. एका अंदाजानुसार जैव इंधनाच्या वापरामुळे विमान उड्डाण क्षेत्रातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बनचे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. म्हणजेच जैव इंधनाच्यावापरांमुळे हवेच्या प्रदूषणात मोठी घट होऊन पर्यावरण रक्षणाचेही काम मोठ्या प्रमाणात होईल. याचा फायदा सर्वच नागरिकांना होणार आहे.

 

जैव इंधनाधारित विमान उड्डाण

 

सोमवारी भारताने जैव इंधनाचा वापर करून पहिल्यांदाच विमान उड्डाण यशस्वी करून दाखवले. विकसीत देशांमध्ये जैव इंधनाधारित विमान उड्डाण याआधीपासूनच होत असले तरी विकसनशील देशांमध्ये भारत अशी कामगिरी करणारा पहिला देश ठरला आहेजैव इंधनावर विमानोड्डाणाची गरज का निर्माण झाली? याचा विचार करता भारताचे तेलावरील परावलंबित्व दृष्टीसमोर येते. पेट्रोलियम उत्पादनांच्या बाबतीत भारताची स्वयंपूर्णता फक्त १८ टक्के इतकीच आहे. यामुळेच भारताला आपली तेलाची आयात कमी करायची असून त्यासाठी जैव इंधनाचा वापर करण्याची योजना आहे. भारताने आगामी चार वर्षांत जैव इंधन-इथेनॉलचे उत्पादन तिपटीने वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. असे झाल्यास तेलाच्या आयातीच्या खर्चात १२ हजार कोटींची बचत होणार आहे.

 

आधीही झाले होते जैव इंधनावर विमानोड्डाण?

 

सोमवार, दि. २६ ऑगस्ट २०१८ रोजी देशातले पहिले जैव इंधनावर आधारित विमान आकाशात झेपावले. मात्र, त्याआधीही जैव इंधनावरील विमानाने भारतातून उड्डाण केले होते, अशी माहिती काही प्रसारमाध्यमांतून समोर आली. मध्य प्रदेशातील बैतूल येथे राहणाऱ्या अनिवासी भारतीय सॅम वर्मा यांनी आपण देशातले पहिले जैव इंधनाधारित विमान उडवल्याचा दावा केला आहे. बालाजीपुरमचे संस्थापक आणि उद्योगपती असलेल्या सॅम वर्मा यांनी याविषयी सांगितले की, “मी १९७० सालापासून विमान उडवत असून माझ्या गावात मी जेव्हा विमान नेले तेव्हा तिथल्या लोकांमध्ये त्याचे मोठेच कुतूहल दिसले. हे पाहून मी एक स्वस्त विमान तयार करायचा संकल्प केला आणि ३५ लाख रुपये खर्च करून एक चार आसनी विमान बैतूल येथे तयार केले. या विमानासाठी कमी खर्चाच्या इंधनाचा शोध घेत असता अमेरिकेतील जेट्रोफा, ऊसाची चिपाडे आदींचा वापर करुन तयार केलेल्या तेलाच्या निर्मितीतंत्राची माहिती मला मिळाली. याच तंत्राने मी माझ्या कारखान्यात तेल तयार केले आणि ते माझ्या विमानासाठी वापरले. यासाठी अबकारी विभागाची परवानगीदेखील मी घेतली. ‘गरुड’ नावाने तयार केलेल्या या विमानात पिस्टल इंजीन होते, जे जैव इंधनाच्या आधाराने चालवणे सोपे नव्हते. मात्र नंतर जवळपास २०० लीटर जैव इंधन-तेल विमानाच्या दोन्ही विंगमध्ये भरल्यानंतर माझे विमानोड्डाण यशस्वी झाले. ४ फेब्रुवारी २००३ रोजी मी हे विमान घेऊन एका अमेरिकन वैमानिकासह आकाशात झेप घेतली आणि नंतर नागपूरच्या विमानतळावर उतरवले. या विमानात संपूर्णपणे जैव इंधनाचा वापर करण्यात आला होता आणि हेच देशातले पहिले जैव इंधनाधारित विमानोड्डाण होते.” सॅम वर्मा यांनी स्वतःबद्दल आणि स्वत:च्या जैव इंधनाधारित विमानाबद्दल दिलेली ही माहिती रोचक असली तरी त्यांनी याआधी ही माहिती सार्वजनिक केली का आणि नसेल केली तर का नाही? असेही प्रश्न निर्माण होतात.

 

जैव इंधनावर रेल्वेगाडीही धावली होती

 

जैव इंधनाचा वापर करून विमानोड्डाणाची सध्या चर्चा होत असली तरी त्यावर आधारित रेल्वेगाडीही देशात धावली होती. भारतीय रेल्वेने छत्तीसगढची राजधानी रायपूर ते धमतरीदरम्यानच्या छोट्या मार्गावरील रेल्वेगाडीमध्ये जैव इंधनाचा वापर केला होता. रेल्वेने हे पाऊल आपला इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी आणि प्रदूषणात घट व्हावी म्हणून उचलले होतेविमानोड्डाणासाठी वापरण्यात येणाऱ्या एटीएफ इंधनाची किंमत आणि त्यामुळे होणारे प्रदूषण आदी गोष्टी पाहता जैव इंधनाचा पर्याय उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. भारताने राष्ट्रीय जैव इंधन धोरणालाही याच वर्षी मंजुरी दिली आहे, ते पाहता या क्षेत्रातील उद्योग-व्यवसायाला तर प्रोत्साहन मिळेलच आणि शेतकरी व उत्पादकांनाही फायदा होईल. देशाची पेट्रोलियम उत्पादनांच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे हळूहळू का होईना, वाटचाल सुरू झाल्याने हजारो कोटी रुपयांची बचतही होईल, हे महत्त्वाचे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


@@AUTHORINFO_V1@@