ते पंधरा दिवस : ८ ऑगस्ट, १९४७

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2018   
Total Views |
 
 
 
 
 
यंदा श्रावणात अधिक मास आलेला. त्यानुसार आज षष्ठी. गांधीजींची गाडी पटना शहराजवळ पोहोचतेय. सकाळचे पावणे सहा झालेले. सूर्योदय नुकताच होऊ घातलाय. गांधीजींच्या बाजूला असलेल्या खिडकीतून त्या किंचित ढगाळलेल्या आभाळावर पसरलेली गुलाबी छटा अगदी रमणीय दिसतेय. गाडीच्या खिडकीतून, प्रसन्न वाटणारा गार वारा येतोय. त्या वाऱ्याबरोबरच कोळशाचे काळे बारकेसे कण आत येत असले, तरी एकूण वातावरण आल्हाददायक आहे. उत्साही आहे.
 
 
मात्र गांधीजींना का कोणास ठाऊक, पण उत्साह जाणवत नाहीये. असं कधी होत नाही फारसं. कितीही प्रतिकूल घटना घडल्या तरी मनाची उभारी कायमच असते. गांधीजींना आठवलं. बरोबर पाच वर्षांपूर्वी, आजच्याच दिवशी त्यांना आणि जवाहरलाल यांना ब्रिटीश शासनाने अटक केली होती. क्रिप्स मिशन असफल झाल्यानंतर गांधीजींनी ब्रिटीश शासनाविरुद्ध एक मोठे आंदोलन उभारण्याचा निश्चय केला होता. त्या संबंधी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीची बैठक मुंबईत भरली होती. ८ ऑगस्ट, १९४२ च्या संध्याकाळी भरलेल्या त्या बैठकीत गांधीजींनी आवाहन केले, “अंग्रेजो, भारत छोडो..” आणि बैठक संपता, संपताच त्यांना अटक झाली. पाच वर्षांपूर्वीचा तो दिवस, अन आजचा दिवस. त्या दिवशी स्वातंत्र्य दृष्टीपथात ही नव्हते. तरीही उत्साह कायम होता. आज मात्र, आठवड्या भरात आपण स्वतंत्र होणार हे निश्चित दिसतेय. तरीही मनाची उभारी धरत नाहीये...!
 
 
गेले दोन, तीन दिवस ‘वाह’च्या शरणार्थी शिबिरात आणि लाहोरात त्यांनी जे बघितलं, त्यामुळे गांधीजी अस्वस्थ आहेत. त्यांना कळतच नाही, ‘हिंदू आपापली घरंदारं सोडून का पळून येताहेत..? मुसलमानांना पाकिस्तान हवं होतं, ते त्यांना मिळालं. आता ते कशाला काही करतील..? हिंदूंना पळून यायची काहीच गरज नाही. आपण लाहोरात जे म्हटलं, तसंच करूया. आपलं उर्वरित जीवन नवीन झालेल्या पाकिस्तानात घालवूया.’ या विचारांनी गांधीजींना जरा बरं वाटलं. गाडी पटना स्टेशनमध्ये प्रवेश करत होती. मोठ्या संख्येने लोकं गांधीजींच्या स्वागताला जमलेली दिसत होती. त्यांचा जयजयकार ही करत होती. मात्र तरीही, गांधीजींना का कोणास ठाऊक, पण त्या घोषणांमधे उस्फूर्तता जाणवली नाही..!
 
 
 
 
 
 
गांधीजींची गाडी पटना स्टेशनात प्रवेश करत असतानाच, निझामाच्या हैदराबादेतही सकाळचे सहा वाजले आहेत. पाऊस नसल्याने अगदी सकाळी सुद्धा उस्मानिया विद्यापीठाच्या परिसरात उष्मा जाणवतोय. अंबरपेठ मधल्या या विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये मात्र तणावाचं वातावरण आहे.
 
 
हे साधारण चाळीस वर्षांपूर्वी स्थापन झालेलं विद्यापीठ. अगदी नक्की सांगायचं तर सन १९१८ साली. मीर उस्मान अली खान या हैदराबादच्या नवाबानं स्थापन केलेलं. त्यामुळे पहिल्यापासून उर्दूचा आणि मुसलमानी संस्कृतीचा पगडा जाणवणारा. मात्र गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठातलं वातावरण गढूळ झालेलं. निझामानं घोषित केलंय की तो हैदराबाद संस्थानाला भारतात विलीन करणार नाही म्हणून. आणि त्यातून ‘प्रेरणा’ घेऊन रझाकार आणि मुस्लिम गुंड, हे विद्यापीठातील हिंदू मुलांना धमकावू लागले आहेत. अगदी थोड्या फार असलेल्या हिंदू मुलींनी तर गेल्या महिन्याभरापासून विद्यापीठात येणंच सोडलंय. पण हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांचं तसं नाही. ती कुठं जातील..?
 
 
तशातच त्या हॉस्टेलच्या मुलांना बातमी लागलीय की मुस्लिम पोरांनी हॉस्टेलमध्ये लाठ्या, काठ्या, तमंचे, बंदुका वगैरे आयुधं आणून ठेवली आहेत. हिंदू मुलांना विद्यापीठाबाहेर हुसकवण्यासाठी या अस्त्र-शस्त्रांचा उपयोग होणार आहे. त्यामुळे काल रात्रभर, हॉस्टेल मधील हिंदू पोरं झोपू शकली नाहीत. त्यांना भीती होती की रात्रीच आपल्यावर आक्रमण होईल आणि आपल्याला रात्रीच्या काळोखातच विद्यापीठ सोडून पळून जावं लागेल. मात्र सुदैवानं कालची रात्र तर निभावली. आज मात्र ही हिंदू मुलं थांबण्याच्या मनःस्थितीत नाहीत. सकाळच्या या वेळेस, हॉस्टेल परिसरात सामसूम असताना पळून जाणे योग्यं, असं सर्वांचं मत झालंय. त्यामुळे विद्यापीठ वसतिगृहाच्या हिंदू भागातून सुमारे तीनशे घाबरलेली मुलं, लपत, छपत परिसराच्या बाहेर पळून जाताहेत...!
 
 
मुंबईतील दादरच्या सावरकर सदनात काहीशी गडबड चालू आहे. तात्याराव पुढील काही दिवसांसाठी दिल्लीला जाणार आहेत. ते ही विमानाने. तात्यारावांचा हा पहिलाच विमान प्रवास. मात्र याचे त्यांना किंचितही अप्रूप नाही. ते काहीशे विषण्ण आहेत. ‘खंडित हिंदुस्थान’, ही कल्पनाच त्यांना सहन होत नाहीये. इंग्रजांना पळवून लावण्यात आयुष्याचा अंगार केला, तो अखंड हिंदुस्थानासाठी. आणि म्हणूनच दीन, दुबळ्या, लाचार नेतृत्वानं फाळणी स्वीकारली, याचा तात्यारावांना फार त्रास होतोय. त्यातून पश्चिमेकडून आणि पूर्वेकडून येणाऱ्या बातम्या. हिंदू – शिखांचा होत असलेला नरसंहार. ते लाखोंच्या संख्येत येणारे विस्थापित. हे सारं फार भयानक आहे..! आणि म्हणूनच, या सर्व बाबींवर विचार करण्यासाठी हिंदू महासभेची एक आवश्यक राष्ट्रीय बैठक उद्यापासून दिल्लीत बोलावली आहे. देशातले प्रमुख हिंदू पुढारी या बैठकीसाठी दिल्लीला जमणार आहेत. या मंथनातून काही चांगले निघेल अशी तात्यारावांना अपेक्षा आहे. अकरा वाजताचे विमान आहे. दादर ते जुहू हे तसे फारसे अंतरही नाही. तेव्हा निघायला अजून वेळ आहे.
 
 
 
अकोला -
 
निझामाच्या हद्दीला लागून असलेलं, वऱ्हाडातलं मोठं शहर. कापसाचं आगार, कापसाच्या अमाप उत्पादनानं समृद्ध झालेल्या मालगुजारांचं गाव.  कालपासून अकोल्यात बरीच गडबड सुरु आहे. स्वातंत्र्य आता उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. आठवड्याभरात आपला देश स्वतंत्र होणार. मग या स्वतंत्र देशात मराठी भाषिकांचे स्थान काय आणि कसे असणार..? मराठी भाषिक प्रांताची किंवा प्रांतांची रचना कशी असणार, यावर चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातले मोठमोठे पुढारी एकत्र आले आहेत. मराठी भाषिकांच्या या झगड्यात, धनंजयराव गाडगीळांनी सुचविलेल्या सूत्रांवर कालपासून चर्चा चालू आहे.
 
 
पंजाबराव देशमुख, ब्रिजलाल बियाणी, शेषराव वानखेडे, बापुजी अणे हे तसे स्थानिक यजमानच. यांच्याशिवाय शंकरराव देव, पंढरीनाथ पाटील, पुनमचंद रांका, श्रीमन्नारायण अग्रवाल, रामराव देशमुख, दा. वि. गोखले, धनंजयराव गाडगीळ, गोपाळराव खेडकर, द. वा. पोतदार, प्रमिलाताई ओक, ग. त्र्यं. माडखोलकर, जी. आर. कुळकर्णी हे नेते ही या बैठकीत सामिल झालेले आहेत. असे एकूण १६ पुढारी, मराठी भाषिकांचं भविष्य ठरविण्यासाठी या अकोल्यात एकत्र आलेले आहेत.
 
 
काल बरीच चर्चा झालीय. विदर्भातल्या पुढाऱ्यांना, विदर्भ वेगळाच हवा आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातले पुढारी एकसंध महाराष्ट्राचं स्वप्न बघताहेत. या सर्वांमधून, सर्वांना पटेल असा तोडगा काढायचा आहे. बहुदा तो संध्याकाळपर्यंत निघेल, असं वाटतंय.  या सर्व गदारोळात एक लहानशी घटना घडतेय. महाराष्ट्रातल्या कोकण भागात, रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यात, अगदी लहानश्या ‘तेरये’ गावी, एक मराठी शाळा प्रारंभ होतेय..! सकाळी बरोबर ११ वाजता, सरस्वतीच्या फोटोला माल्यार्पण करून ग्रामस्थ या शाळेची सुरुवात करताहेत.
 
 
दिल्लीत दुपारचे साडेबारा वाजताहेत. सूर्य डोक्यावर आग ओकतोय. ऑगस्टचे दिवस असूनही पाऊस फारसा नाही. व्हॉईसरॉय हाऊस समोरच्या विस्तीर्ण पोर्च मध्ये जोधपुर स्टेटची काळ्या रंगाची, अलिशान गाडी थांबते. मजबूत फेटे बांधलेले धिप्पाड दरवान गाडीचे दार अलगद उघडतात. गाडीतून हलकेच उतरतात, ‘कदंबी शेषाचार वेंकटाचार’. जोधपुरच्या महाराजांचे दिवाण. किंवा जोधपुरच्या दरबारी भाषेत सांगायचं तर जोधपुरचे प्रधानमंत्री.
 
 
सी. एस. वेंकटाचार या नावाने ओळखले जाणारे हे सद्गृहस्थ बंगलोरचे. कन्नड भाषिक. इंडियन सिव्हील सर्व्हंट परीक्षेत उत्तीर्ण झालेले. अत्यंत बुद्धीमान. सध्या जोधपुर स्टेटचे सर्व निर्णय यांच्याच सल्ल्याने घेतले जाताहेत. आणि म्हणूनच, व्हॉईसरॉय, लॉर्ड माउंटबेटन यांनी वेंकटाचार यांना भोजनासाठी, त्या चारशे एकर पसरलेल्या विस्तीर्ण राजप्रासादात बोलावले आहे.
 
 
भोजन राजकीय शिष्टाचारात संपन्न होतेय. जोधपुर सारखे विशाल आणि संपन्न संस्थान हे नेहमीच ब्रिटीशांचे पाठीराखे राहिले असल्याने, त्या संस्थानाच्या प्रतिनिधीच्या रुपात वेंकटाचार यांना हा सन्मान मिळतोय. भोजनासाठी त्यांना बोलावण्याचा, लॉर्ड माउंटबेटन यांचा हेतू स्पष्ट आहे. त्यांना लवकरात लवकर जोधपुर संस्थानाचे विलीनीकरण हवे आहे. भारतावरचे नियंत्रण सोडण्यापूर्वी त्यांना या लहान सहान कटकटी नको आहेत. भोजनानंतर राजकीय शिष्टाचाराच्या ज्या गप्पा झाल्या त्यात वेंकटाचारांनी स्पष्ट केलं की जोधपुरचे संस्थान, भारतात विलीनीकरण करण्यास तयार आहे.
 
 
ही बातमी फार चांगली आहे. गेले काही दिवस, जिन्ना, जोधपुरच्या संस्थानाला पाकिस्तानमध्ये विलीन होण्यासाठी तऱ्हेतऱ्हेची आमिषं देत होते. भोपाळचा नवाब आणि त्याचा सल्लागार जफरुल्लाखान, ही दोघं, जोधपुर, कच्छ, उदयपुर आणि बडोदे संस्थानाच्या महाराजांना भेटून त्यांना पाकिस्तानात सामिल होण्याचे फायदे सांगत होते. जीनांनी भोपाळच्या नवाबामार्फत जोधपुर संस्थानाच्या तरुण महाराजांना सांगितले की त्यांनी फक्त १५ ऑगस्टला आपल्या संस्थानाला स्वतंत्र घोषित केले, तरी त्यांना खालील सुविधा मिळतील –
 
• कराची बंदरावरच्या सर्व सुविधांवर जोधपुर संस्थानाचाही हक्क राहील.
• जोधपुर संस्थानाला पाकिस्तानातून शस्त्र पुरवठा केला जाईल.
• जोधपुर – हैदराबाद (सिंध) या रेल्वेमार्गावर जोधपुरचा हक्क असेल.
• जोधपुर संस्थानाच्या दुष्काळग्रस्त भागासाठी पाकिस्तानाद्वारे धान्य उपलब्ध केले जाईल.
 
अर्थात दिवाण वेंकटाचार यांना या सर्व गोष्टींमधला फोलपणा माहित होता, म्हणून त्यांनी भारतात विलीन होण्यासंबंधी महाराजांचे मन वळवले अन एक गंभीर पेचप्रसंग सुटला..!
 
 
दक्खनचे हैदराबाद  -

निझामाच्या राजधानीचे हैदराबाद. आज सकाळपासूनच शहरात वातावरण तंग आहे. सकाळी, सकाळी उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेल मधून ३०० हिंदू मुलं जीव वाचवून पळाले, याचा रझाकारांना भयंकर राग आलेला आहे. शहरात ठिकठिकाणी हिंदू व्यापाऱ्यांवर हल्ले सुरु झालेले आहेत. तिकडे वारंगलहून येणारी बातमी ही चिंताजनक आहे. संपूर्ण वारंगल जिल्ह्यात हिंदू पुढाऱ्यांच्या घरावर दगडफेक होतेय. हिंदूंची दुकानं लुटल्या जाताहेत, जाळल्या जाताहेत. आणि म्हणूनच, दुपारी हैदराबादेतील एका व्यापाऱ्याच्या घरी, शहरातील हिंदू व्यापारी एकत्र जमले आहेत. त्यांनी व्हॉईसरॉय लॉर्ड माउंटबेटन आणि जवाहरलाल नेहरू यांना पाठविण्यासाठी एक लांबलचक टेलिग्राम तयार केला आहे –
 
“For more than a month, Muslim goondas, military and police reign of terror, loot, incendiarism there and murder are prevailing. There is no protection to non Muslims life, property and honour. Non Muslims are forcibly deprived of and penalised even for the most elementary self-defence preparations, whereas Muslims are openly allowed and even supplied with arms. The police act as spectators when and where Muslims are strong, but become active and shoot mercilessly when Hindus gather for self-defence.” (Indian Daily Mail / Singapore / 9th August, 1947) 
 
  
अगदी देशाच्या मध्यावर असलेल्या निझामाच्या या हैदराबाद संस्थानातही हिंदू सुरक्षित नाहीत. त्यांचा कोणी वालीच नाही..!
 
तात्याराव सावरकरांचा हा पहिलाच विमान प्रवास. त्यांच्या बरोबर हिंदु महासभेचे चार कार्यकर्ते ही आहेत. विमान दिल्लीच्या विलिंग्टन विमानतळावर दुपारी अडीचच्या सुमारास उतरलं. विमानतळाबाहेर हिंदु महासभेचे असंख्य कार्यकर्ते जमा झालेले आहेत. ‘वीर सावरकर अमर रहे..’, ‘वंदे मातरम...’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेलाय. कार्यकर्त्यांचे पुष्पहार स्वीकारत तात्याराव बाहेर निघाले. त्यांच्यासाठीच्या मोटारीत बसले. इतर मोटारी आणि मोटार सायकलींचा ताफा, मंदिर मार्ग वरील ‘हिंदु महासभा भवना’ कडे निघाला..!
 
भारतात दुपारचे तीन वाजत असताना, तिकडे दूर लंडनमध्ये सकाळचे साडे दहा वाजताहेत.
 
लंडनच्या मध्यवर्ती भागातील शेफर्ड बुश गुरुद्वारा मधे शीख पुढारी जमायला सुरुवात झालेली आहे. इंग्लंडमध्ये राहणारी ही शीख मंडळी, भारतात घडणाऱ्या घटनांनी चिंतित आहेत. पश्चिम पंजाब मधे असलेली कोणाची बहीणच मुस्लिम गुंडांनी पळवून नेली आहे, तर कोणाचे नातेवाईक भर रस्त्यावर कापल्या गेले आहेत. त्यातून विभाजनाची रेषा अजून ठरायची आहे. पंजाब चे विभाजन होण्याचे दुःख इंग्लंड मधील शिखांना चांगलेच जाणवतेय. या साठी संपूर्ण पंजाब भारतामध्ये विलीन करणं आणि जनसंख्येची अदलाबदल करणं हाच एक उपाय आहे. मात्र गांधीजी आणि नेहरू हे दोघंही जनसंख्येच्या अदलाबदली बाबतीत आडमुठे आहेत. नेहरूंनी शीख समुदायालाच अपील केलंय की, ‘बॉर्डर कमिशन’ वर विश्वास ठेवा.
 
या सर्व घटनांचा, इंग्लंड मधील शीख समुदायाला प्रचंड राग आलाय. आणि म्हणूनच इंग्लंड मधील शीख पुढारी आज लंडन मधे एकत्र येऊन १०, डाउनिंग स्ट्रीट वर पंतप्रधान एटली यांना एक निवेदन देणार आहेत, की ‘निर्दोष शिखांची हत्या थांबवा. पंजाब चे विभाजन न करता तो प्रांत भारतात विलीन करा’. लंडन मधे चांगलीच गर्मी जाणवतेय. बरोबर साडे अकरा वाजता शीख पुढाऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ एटलींना भेटायला डाउनिंग स्ट्रीट कडे निघालेय..!
 
 
पंजाब च्या दक्षिण – पूर्व भागात, ऑगस्ट ची दुपार आपल्या ऐन भरात आहे. अधिक मासाचा श्रावण असुनही पावसाची चिन्ह फारशी नाहीत. काही दिवसांपूर्वी शिंतोड्यांसारखा पाऊस पडला. पण बस. तितकाच.
 
 
फिरोजपुर, फरीदकोट, मुक्तसर, भटिंडा, मोगा... या भागांमध्ये जमिनी भेगाळलेल्या आहेत. विहिरींचं पाणी आटलंय. झाडं वाळताहेत. गुरं – ढोरं तडफडून प्राण देताहेत. अन भरीला पश्चिम आणि उत्तर पंजाब मधून शरणार्थी हिंदू – शिखांचे जथ्थेच्या जथ्थे येताहेत. सर्वस्व हरवलेली, जिवलग गमावलेली, अब्रू लुटल्या गेलेली ही माणसं...
 
 
कोणाच्या चुकीनं हे सारं घडतंय..?
 
 
तात्याराव सावरकरांचं मुंबईहून दिल्लीकडे निघालेलं विमान आकाशात असताना, निझामाच्या हैदराबाद आणि वारंगल मधे रझाकारांचे अत्याचार सुरु असताना, दिल्लीच्या व्हॉईसरॉय हाऊसमध्ये जोधपुरच्या दिवाणांचा, लॉर्ड माउंटबेटन बरोबरचा खाना संपत असताना.... पटना युनिव्हर्सिटीच्या सभागृहात गांधीजींचा विद्यार्थ्यांशी संवाद चाललेला आहे. विद्यार्थी काहीसे आक्रमक आहेत, चिडलेले आहेत. कॉंग्रेस चे काही स्थानिक पुढारी विद्यार्थ्यांमध्ये बसून त्यांना शांत करताहेत.
 
 
गांधीजी त्यांना, आज सकाळच्या प्रार्थना सभेत सांगितलेलंच, संथपणे सांगताहेत, “१५ ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन उपास करून साजरा करा. त्या दिवशी चरख्यावर सूतकताई करा. परिसर स्वच्छ ठेवा...”  “दक्षिण आफ्रिकेतील गोरे राज्यकर्ते उन्मत्त झाले आहेत. ते तेथील भारतीयांना घृणास्पद वागणूक देत आहेत. जागतिक पातळीवर त्यांचा निषेध व्हायला हवा.”
विद्यार्थी या आशेवर जमले आहेत की गांधीजी फाळणी संबंधी, स्वतंत्र होऊ घातलेल्या आपल्या देशासंबंधी काही बोलतील. पण त्यांचा अपेक्षाभंग झालाय..!
 
 
कलकत्त्यात दंगल उसळलेली आहे.
 
याला दंगल म्हणणं धाडसाचं आहे. कारण मारा एकीकडूनच होतोय. प्रतिकार फारसा नाही. हिंदूंच्या वस्त्यांवर मुसलमानी गुंड त्वेषानी आक्रमण करताहेत. कलकत्त्यातल्या हिंदूंना, बरोबर एका वर्षापूर्वीचा, १४ ऑगस्ट, १९४६ चा ‘डायरेक्ट एक्शन डे’ आठवतोय, जेव्हा मुस्लिम लीगच्या गुंडांनी कलकत्त्याच्या रस्त्यांवर हिंदूंच्या रक्ताचे पाट वाहिले होते.
 
 
एका वर्षानंतर, तशीच परिस्थिती निर्माण होताना दिसतेय. जुन्या कलकत्त्याच्या भागात हिंदूंच्या दुकानांवर चालून आलेल्या मुस्लिम समुदायाला थोपवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी एक फळी उभारली. त्या अधिकाऱ्यांवरच गावठी बॉम्ब फेकण्यात आले. डेप्युटी पोलीस कमिशनर एच. एस. घोष, चौधरी आणि एफ. एम. जर्मन हे तीन वरिष्ठ पोलीस अधिकारी गंभीररित्या जखमी झाले असून, थोडक्यात बचावले आहेत. मात्र या आक्रमणात सहा हिंदू ठार, तर साठ गंभीर रित्या जखमी झालेले आहेत. बंगालचे प्रमुख सुऱ्हावर्दींच्या या राज्यात, दंगलखोरांना अटक होणे तर दूरच, उलट त्यांचा सन्मान होईल अशी चिन्ह आहेत. नवीन नियुक्त झालेले गव्हर्नर, चक्रवर्ती राजगोपालाचारी तरी या परिस्थितीकडे लक्ष देतात का, ही शंकाच आहे. आठ ऑगस्टचा दिवस मावळायला आलाय. कलकत्ता अजूनही धुमसतंय. हैदराबाद, वारंगल आणि निझामशाहीतल्या इतर गावांमध्ये हिंदूंच्या घरांवर आणि दुकानांवर हल्ले चालूच आहेत. दिल्लीच्या हिंदू महासभा भवनात देशभरातले पुढारी स्वातंत्र्यवीर सावरकरांबरोबर सल्ला मसलत करताहेत. नुकतीच तात्यारावांची आणि पंडित मदन मोहन मालवीय यांची प्रदीर्घ बैठक आटोपली आहे.
 
 
तिकडे दूर वऱ्हाडातल्या अकोला शहरात विदर्भाच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांमध्ये ‘अकोला करार’ झालेला आहे. या द्वारे संयुक्त महाराष्ट्रात दोन उपप्रांत असतील. ‘पश्चिम महाराष्ट्र’ आणि महाविदर्भ. या दोन्ही उपप्रांतांना स्वतंत्र कायदे मंडळ, मंत्रिमंडळ आणि वरिष्ठ न्यायालये असतील. मात्र या संपूर्ण प्रांतासाठी एकच गव्हर्नर आणि एकच लोकसेवा आयोग असावा, हे ठरले आहे. त्यामुळे, आत्ता, रात्र चढत जात असताना, अकोल्यात मराठी नेतृत्वाची मेजवानी चालली आहे.
 
 
कराचीमधल्या आपल्या अस्थायी निवासस्थानात, बॅरीस्टर जिन्ना, त्यांच्या ११ ऑगस्टच्या, विधीमंडळात द्यायच्या भाषणाची तयारी करून नुकतेच उठले आहेत. त्यांची आता झोपायची वेळ झालेली आहे. गांधीजी कलकत्त्याला जाणाऱ्या गाडीत बसले आहेत. बाहेर किंचित पाऊस पडतोय. गांधीजींचा डबा एक / दोन ठिकाणी गळतोय. खिडकीतून येणारा वारा आता जास्त गार झाल्यामुळे मनुने नुकतीच खिडकी बंद केली आहे.
 
 
दिल्लीत व्हॉईसरॉय हाऊसच्या अभ्यासिकेत अजूनही दिवा लागलेला दिसतोय. लॉर्ड माउंटबेटन त्यांच्या विस्तीर्ण महागोनी टेबलावर आजचा अहवाल, लंडनच्या भारत सचिवांसाठी लिहून ठेवताहेत. नेहमी ते डिक्टेशन देतात. आज मात्र त्यासाठी वेळच झालेला नाहीये. उद्या त्यांचा सेक्रेटरी याला टाईप करून लंडनला पाठवेल.
 
आठ ऑगस्टचा शुक्रवार आता संपायला आलाय. या अखंड भारताची फार मोठी लोकसंख्या अजूनही जागीच आहे. सिंध, पेशावरचा पर्वताळ प्रदेश, पंजाब, बंगाल, निझामाचा मोठा भूभाग झोपू शकलेला नाही. बरोबर पुढल्या शुक्रवारी, सकाळी, या अखंड भारताचे तीन तुकडे होणार आणि दोन देश साकार होणार..!
 
 
 
- प्रशांत पोळ
 
 
मागील लेख तुमच्या वाचनातून राहिला असेल तर त्याची लिंक खालीलप्रमाणे : ७ ऑगस्ट १९४७
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@