अस्गार्दिया-एक नवे जग!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2018   
Total Views |




अस्गार्दिया देशाची संकल्पना इगोर रउफोविच अशुरबेली यांची असून ते प्रकाशन, संचार, विज्ञान, शिक्षण आणि अंतरिक्षातील धोक्यापासून वाचण्यासाठीच्या क्षेत्राशी संबंधित आहेत.

 

आज जगात बहुतांश ठिकाणी हिंसेने, दहशतवादाने थैमान घातलेले दिसते. धर्माच्या, जातीच्या, वंशाच्या, वर्णाच्या आधारावर एकमेकांचा जीव घ्यायला उठलेली माणसेही कित्येक ठिकाणी दिसत आहेत. जगात घडणाऱ्या या नकारात्मक गोष्टी पाहूनच यापासून मुक्त असा एखादा देश निर्माण करू शकतो का? असा एक विचार पुढे आला. पृथ्वीवर एखाद्या नव्या देशाची निर्मिती करणे सहजासहजी शक्य नसल्याने असा देश अंतरिक्षात निर्माण केला तर? हाच विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जून महिन्यात ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे एका शानदार समारंभात अंतरिक्ष देश अस्गार्दियाचा पाया रचला गेला. अंतरिक्ष देश अस्गार्दियाचे मुख्य उद्दिष्ट अंतरिक्षात शांतता स्थापन करणे आणि लोकांना पृथ्वीवरील वाद-विवादापासून मुक्ती देणे, हा आहे. अस्गार्दिया देशाची संकल्पना इगोर रउफोविच अशुरबेली यांची असून ते प्रकाशन, संचार, विज्ञान, शिक्षण आणि अंतरिक्षातील धोक्यापासून वाचण्यासाठीच्या क्षेत्राशी संबंधित आहेत. एकेकाळी रशियाच्या अलमाज-अंते या कंपनीच्या सीईओपदी राहिलेले इगोर अशुरबेली अझरबैजानमधील अब्जाधीश उद्योगपती आहेत. अस्गार्दिया या अंतरिक्ष देशाच्या स्थापनेसाठी त्यांनीच आर्थिक रसद पुरवली. इगोर हेच या अंतरिक्ष देशाचे राष्ट्रप्रमुखही आहेत. अस्गार्दियाच्या नाण्यांवरही इगोर यांची प्रतिमा छापलेली आहे. व्हिएन्ना येथे अस्गार्दिया देशाची स्थापना झाल्यानंतर या देशाचे राष्ट्रगीत वाजविण्यात आले. सोबतच एका रशियन अंतराळवीराचा आधीच ध्वनिमुद्रित केलेला संदेशही ऐकविण्यात आला. याचवेळी ३५० लोकांना भोजन देण्यात येऊन त्यांच्यासाठी संगीत-गायन-नृत्याचा कार्यक्रमही सादर झाला. यावेळी अस्गार्दियाचे राष्ट्रप्रमुख इगोर अशुरबेली यांनी लोकांना संबोधित केले आणि त्यांच्या देशात कलेला महत्त्वाचे स्थान असेल, असे सांगितले. कारण कला लोकांना जोडते तर शस्त्रांमुळे लोकांमध्ये वाद-भांडणे होतात, असे त्यांचे मत आहे.

 

सध्या तरी अस्गार्दिया एक काल्पनिक अंतरिक्ष देश असल्याचे दिसते, पण या देशाने स्वतःचे संविधान, नियम आणि काही उद्देशही तयार केले आहेत. अस्गार्दियाच्या संविधानानुसार राष्ट्रप्रमुखपदी असलेली व्यक्ती पाच वर्षे त्या पदावर राहील आणि त्यानंतर निवृत्त होईल. ज्याचे वय ८२ झाले आहे, त्यांना मात्र हे पद पाच वर्षांच्या आतही सोडावे लागेल. अशावेळी अस्गार्दियाची संसद आणि स्पेस कौन्सिल दोघे मिळून राष्ट्रप्रमुखपदी योग्य व्यक्तीला नियुक्त करतील. जगातील वाद-विवाद-भांडणे संपून सर्वांनी एकत्रितपणे, शांत सहजीवन जगावे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अस्गार्दिया या अंतरिक्ष देशात धर्म आणि राजकीय पक्षांना बंदी असणार आहे. सध्या अस्गार्दिया नामक अंतरिक्ष देशाची लोकसंख्या २ लाख ४६ हजार इतकी असून संसद सदस्यांची संख्या १४६ आहे. अस्गार्दिया या अंतरिक्ष देशाचे सदस्य होणेदेखील सोपे-सुलभ आहे. यासाठी तुम्हाला फक्त अस्गार्दिया देशाच्या संकेतस्थळावर जाऊन एक अर्ज भरावा लागेल. इथे तुम्हाला अस्गार्दियाच्या संविधानाला सहमती दर्शवावी लागेल, त्यानंतर तुम्हाला अस्गार्दियाचे नागरिकत्व मिळेल.

 

अस्गार्दियाच्या संविधानात एका स्वप्नील जगाचा नजारा पाहायला मिळतो. या संविधानातील प्रुमख गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत

१. अंतरिक्ष आणि ब्रह्मांडात शांततामयरीत्या राहणे हे प्रमुख लक्ष्य आहे.

२. सर्व नागरिकांना बरोबरीचा अधिकार असेल. मग ते कोणत्याही धर्माचे, जातीचे, भाषेचे, गरीब वा श्रीमंत असोत.

३. अस्गार्दियामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि विचार हाच धर्म असेल.

४. कोणालाही विचार व्यक्त केल्यानंतर त्रास दिला जाणार नाही. फक्त कोणत्याही अनैतिक दुष्प्रचाराला सहन केले जाणार नाही.

 

अस्गार्दियाच्या संविधानात काही गोष्टींबाबत कडक नियम तयार केलेले आहेत -

१. माहितीच्या सुरक्षेसाठी सरकारचे त्यावर संपूर्ण नियंत्रण असेल आणि

२. देशाचे कायदे संसद आणि जनमताव्यतिरिक्त राष्ट्रप्रमुखांच्या आदेशानेही तयार होतील.

 

सध्यातरी काल्पनिक देश असलेला अस्गार्दिया दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. कोणी याला मानवी बुद्धीचा चमत्कारही म्हणू शकतो. पण असा एखादा देश असावा, ही खरेच आपली गरज आहे का? असा एखादा देश अंतरिक्षात का होईना अस्तित्वात आल्यास त्यांचे पृथ्वीवरील देशांशी संबंध कसे असतील? आपण पृथ्वीलाच वाद-विवादमुक्त ठेऊ शकतो का, असे प्रश्न निर्माण होतात. या सर्वच प्रश्नांची उत्तरे खरेच मिळतील का?


@@AUTHORINFO_V1@@