ते पंधरा दिवस : ६ ऑगस्ट, १९४७

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2018   
Total Views |


 
 
 
नेहमी प्रमाणे गांधीजींना अगदी पहाटे जाग आली. बाहेर काळोखच होता. ‘वाह’च्या शरणार्थी शिबिराजवळच गांधीजींचा मुक्काम होता. वाह हे तसं शहर नव्हतंच. होतं एक लहानसं गाव. मात्र इंग्रजांनी तिथे आपला लष्करी तळ उभारला होता. म्हणुन वाहला महत्व आले होते. प्रशासनिक भाषेत ते ‘वाह केंट’ असेच होते. त्या केंटमध्ये, म्हणजे वाहच्या त्या ‘कॅम्पात’, एका बंगल्यात गांधीजींचा मुक्काम होता. मात्र वाह चे शरणार्थी शिबिर जवळ असल्याने, त्या शिबिरातून येणारा घाणीचा वास फार तीव्र होता. त्या वासाच्या पार्श्वभूमीवरच गांधीजींनी आपली प्रार्थना आटोपली.
 
आज गांधीजींच्या काफिल्याला लाहोरला जायचे होते. साधारण अडीचशे मैलांचे अंतर होते. किमान सात / आठ तास तरी लागावेत अशी कल्पना होती. आणि म्हणून वाह लवकर सोडावे अशी योजना होती. त्याप्रमाणे अगदी पहाटे, सूर्योदय होत असतानाच गांधीजींनी वाह केंट सोडले आणि रावळपिंडी मार्गे ते लाहोर कडे निघाले.
 
लाहोर...! रावीच्या तटावर वसलेलं, शीख इतिहासातलं महत्वाचं शहर. प्राचीन ग्रंथात ‘लवपुर’ किंवा ‘लवपुरी’ या नावानं ओळखलं जाणारं शहर. सुमारे चाळीस टक्के हिंदू – शीख वस्ती असलेलं हे शहर. मार्चमध्ये मुस्लिम लीगने भडकवलेल्या दंगलींनंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणात हिंदू – शिखांनी स्थलांतर करायला सुरुवात केलेली.
 
 
लाहोर म्हणजे आर्य समाजाचा गड. अनेक कट्टर आर्य समाजी लाहोरात वाढले आणि त्यांनी संस्कृत भाषेलाही वाढविले. अनेक संस्कृत पाठशाळा लाहोरात होत्या. संस्कृत आणि भारत विद्याचे प्रकाशक ‘मोतीलाल बनारसीदास इथलेच. मात्र आता त्यांनीही गाशा गुंडाळायला सुरुवात केली होती.
 
 
लाहोर हे पाकिस्तानात जाणार असे संकेत स्पष्टपणे मिळाले होते. त्यामुळे महाराजा रणजीत सिहांच्या राजधानीचे आणि त्यांच्या समाधीचे हे शहर सोडणे शिखांना फार जड जात होते. शीतला मंदिर, भैरव मंदिर, दावर रोड वरील श्रीकृष्ण मंदिर, दूधवाली माता मंदिर, डेरा साहिब, भाभारीयान मधील श्वेतांबर आणि दिगंबर पंथीय जैन मंदिरं, आर्य समाज मंदिर यांचं काय होणार ही चिंता प्रत्येक हिंदूला लागलेली होती. प्रभू रामचंद्रांचे पुत्र लव, ज्यांनी हे शहर वसवलं असं म्हटलं जातं, त्यांचं मंदिर लाहोरच्या किल्यात होतं. आता आपलं आणि या मंदिराचं कसं होणार ही चिंता तेथील पुजाऱ्यांना लागून राहिलेली होती.
 
 
अशा या लाहोर शहरात, गांधीजी कॉंग्रेस कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणार होते. कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा अर्थच हिंदू किंवा शीख होता. तेथे कॉंग्रेसचे मुस्लिम कार्यकर्ते आता ‘मुस्लिम लीग’चं काम करू लागले होते. नव्याने निर्माण होऊ घातलेल्या पाकिस्तानात कॉंग्रेसचं अस्तित्व राहणार नव्हतं. मग कशाला उगाच कॉंग्रेस च्या वळचणीला स्वतःला बांधून घ्यायचं..? आणि म्हणूनच लाहोर मधल्या ‘बच्या-खुच्या’ कॉंग्रेस कार्यकर्त्यांना गांधींची ही भेट फार आशादायक वाटत होती...
 
 
ज्या वेळेस गांधीजी वाह वरून लाहोरच्या दिशेने निघाले होते, त्याच वेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गुरुजी के कराची हून सिंध प्रांतातल्या हैदराबाद शहरात जाण्यासाठी निघाले होते. गांधीजीं प्रमाणे गुरुजीसुद्धा भल्या पहाटे चार वाजता काळोखातच उठले होते. त्यांची दिनचर्याच तशी होती. सकाळी ६ वाजता सूर्योदय होत असताना प्रभात शाखेवर त्यांनी प्रार्थना म्हटली आणि शाखेनंतर एक लहानशी बैठक घेतली. सिंध प्रांतातल्या प्रमुख शहरांमधील संघचालक, कार्यवाह आणि प्रचारक या बैठकीला उपस्थित होते. ही सर्व मंडळी कालच्या कार्यक्रमालाही हजर होती. हिंदू – शीख कुटुंबांना भारतात सुरक्षित परत कसं आणता येईल, याची योजना तयार होत होती.
 
 
 
 
गुरुजी कार्यकर्त्यांच्या व्यथा ऐकत होते. समस्या समजून घेत होते. शेजारीच बसलेले डॉ. आबाजी थत्ते, व्यवस्थितपणे अनेक गोष्टी टिपून घेत होते. काल संघाच्या जाहीर बौद्धिकात सांगीतलेलंच गुरुजींनी परत एकदा त्या वरिष्ठ कार्यकर्त्यांना सांगितलं. नियतीनं संघावर सोपवलेली, हिंदूंच्या सुरक्षेची जबाबदारी देखील विशद करून सांगितली. त्यांना धीर दिला. संगठन क्षमतेनं आपण बऱ्याच असाध्य अश्या गोष्टी सहज करू शकतो, हे ही सांगितलं.
 
 
बैठकीनंतर या सर्व कार्यकर्त्यांबरोबर गुरुजींनी अल्पाहार घेतला अन साधारण ९ च्या सुमारास गुरुजी हैदराबादकडे जाण्यास निघाले. मोटार कार असणारे काही स्वयंसेवक कराचीत होते. त्यातीलच एकाच्या मोटारीने गुरुजी, आबाजी, प्रांत प्रचारक राजपाल जी पुरी आणि सुरक्षतेसाठी म्हणून एक स्वयंसेवक ह्या गाडीत बसले. वरून दिसत नसलं तरी तो स्वयंसेवक आणि मोटारीचा चालक, हे पूर्णपणे शस्त्र सज्ज होते. अशीच एक दुसरीही मोटार या मोटारीच्या मागे निघाली. त्यात इतर वरिष्ठ कार्यकर्ता होते.
 
ह्या मोटारींच्या मागे आणि पुढे संघाचे स्वयंसेवक मोटारसायकल वरून जात होते. एखाद्या सेनापतीला न्यावं, तसं तिथले स्वयंसेवक, त्या दंगलींच्या अत्यंत अस्थिर वातावरणातही, गुरुजींना हैदराबाद ला नेत होते.
 
कराची – हैदराबाद हा रस्ता उण्यापुऱ्या ९४ मैलांचा. आणि रस्ताही तसा बरा होता. त्यामुळे साधारण दुपारच्या भोजनाच्या वेळी हैदराबाद ला पोहोचावं ही कल्पना होती. रस्त्यात, गाडीत बसलेले प्रांत प्रचारक राजपालजी, गुरुजींना तिथल्या भयावह परिस्थितीची कल्पना देत होते.
 
’१७, यॉर्क रोड’ वरील नेहरूंच्या घरातील त्यांचे कार्यालय. नेहरूंच्या पुढ्यात, काल ५ ऑगस्टला लॉर्ड माउंटबेटन यांनी लिहिलेलं पत्र आहे. त्याला उत्तर द्यायचंय. माउंटबेटन नी केलेली मागणी मोठी विचित्र आहे.
काही वेळ विचार करून, नेहरू या पत्राचे उत्तर डिक्टेट करू लागतात.
“प्रिय लॉर्ड माउंटबेटन,
तुमच्या पाच ऑगस्टच्या पत्राबद्दल आभार, ज्यात आपण त्या दिवसांची सूची पाठविली आहे, ज्या दिवशी यूनियन जेक फडकविला जावा. याचा अर्थ मी असा घेतो की भारतातील सर्व सार्वजनिक स्थानांवर आमच्या राष्ट्र ध्वजाबरोबर यूनियन जेक ही फडकवला जाईल. 
 
 
या सूचीतील फक्त एकाच दिवसाबद्दल समस्या आहे. तो दिवस म्हणजे १५ ऑगस्ट. आमचा स्वतंत्रता दिवस. या दिवशी यूनियन जेक फडकवणं योग्य होईल असं वाटत नाही. अर्थात लंडनच्या ‘इंडिया हाउस’ वर या दिवशी यूनियन जेक देखील फडकविला तर आम्हाला चालेल.
 
मात्र जे इतर दिवस आपण सुचविले आहेत – १ जानेवारी – सैन्य दिवस; १ एप्रिल – वायुसेना दिवस; २५ एप्रिल – अन्झाक दिवस; २४ मे – राष्ट्रकुल दिवस; १२ जून – (ब्रिटन च्या) राजाचा वाढदिवस; १४ जून – सयुंक्त राष्ट्रसंघाचा ध्वज दिवस; ४ ऑगस्ट – (ब्रिटन च्या) राणीचा वाढदिवस; ७ नोव्हेंबर – नौसेना दिवस; ११ नोव्हेंबर – विश्व युध्दात दिवंगत झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ दिवस, या दिवसांविषयी आम्हाला समस्या नाही. या दिवशी सर्व सार्वजनिक स्थानांवर यूनियन जेक देखील फडकविण्यात येईल.”
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज मुंबईत होते. स्वतंत्र भारतातील पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून घोषणा होऊन फक्त दोनच दिवस उलटले होते. कायदा विभाग त्यांच्याकडे सोपवला जाईल, असे स्पष्ट संकेत होते. त्यामुळे त्यांच्या मुंबई च्या निवास स्थानी त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांची, विशेषतः शेड्यूल कास्ट फेडरेशन च्या कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. त्यांचा लाडका नेता, स्वतंत्र भारताच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात, मंत्री झालेला होता..!
 
 
 
 
बाबासाहेबांना मात्र या सर्व गडबडीत थोडा एकांत हवा होता. त्यांच्या डोक्यात अनेक विचार चालले होते. विशेषतः देशाच्या पश्चिम भागामध्ये उसळलेल्या हिंदू – मुस्लिम दंगलींच्या बातम्या त्यांना अस्वस्थ करत होत्या. या बाबतीत त्यांचे विचार अगदी स्पष्ट होते. ते फाळणी होऊ देण्याच्या पक्षात होते. कारण हिंदू आणि मुसलमान यांचं सहअस्तित्व शक्य नाही, हे त्यांचं ठाम मत होतं.
 
मात्र फाळणीला संमती देताना त्यांची मुख्य अट होती ती जनसंख्येच्या अदलाबदलीची. ‘प्रस्तावित पाकिस्तानातील सर्व हिंदू – शीख यांनी भारतात स्थलांतर करावं आणि भारतातील सर्व मुसलमानांनी, नवीन होऊ घातलेल्या पाकिस्तानात जावं. एवीतेवी फाळणी धर्माच्या आधारानेच झाली आहे ना..? मग लोकसंख्येची अदलाबदल करून पुढे शांततेने तरी जगता येईल.’
 
मात्र कॉंग्रेस पुढाऱ्यांच्या हट्टा पायी हे शक्य झालं नाही, याचं बाबासाहेबांना दुखः होत होतं. जनसंख्येची अदलाबदल जर नीट, व्यवस्था बांधून केली असती, तर लाखो निर्दोष लोकांना प्राण गमविण्याची ही वेळच आली नसती, असं त्यांना राहून राहून वाटत होतं. विशेषतः गांधीजींच्या ‘भारतात हिंदू – मुस्लिम हे भावा भावा प्रमाणे राहतील’ ह्या वक्तव्याचा त्यांना प्रचंड राग येत होता.
 
कार्यकर्त्यांच्या गराड्यातून थोडं बाहेर येऊन बाबासाहेब त्यांच्या अभ्यासिकेत बसले होते. त्यांच्या मंत्रालया संबंधी पुढे काय काय करता येईल, याचाच ते विचार करत होते. त्यातच त्यांना आठवलं की आज हिरोशिमा दिवस आहे. आजच्याच दिवशी अमेरिकेने जापान वर अणुबॉम्ब टाकला होता. त्याला दोन वर्ष पूर्ण होताहेत. आणि त्या आठवणीने बाबासाहेब विषण्ण झाले. आज संध्याकाळी मुंबईतील वकिलांच्या संस्थांनी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यात नेमकं काय बोलायचं यावर विचार करण्यात ते गढून गेले..!
 
 
आज सूर्योदय सहा वाजून सतरा मिनिटांनी झाला. पण त्याच्या पूर्वीच गांधीजींचा लाहोरसाठीचा प्रवास सुरु झाला होता. निघाल्यावर तासाभरातच रावळपिंडीला थांबणे झाले. तिथल्या कार्यकर्त्यांनी आवर्जून थांबवून घेतले होते. सर्वांसाठी सरबत आणि सुक्या मेव्याची व्यवस्था होती. गांधीजींनी फक्त लिंबाचे सरबत तेवढे घेतले. साधारण दीड वाजेच्या सुमारास गांधीजींचा हा काफिला लाहोर जवळ पोहोचला. भोजन करून गांधीजी लगेचच कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीला संबोधित करणार होते.
 
ज्या कॉंग्रेस पदाधिकाऱ्याच्या घरी गांधीजींचे भोजन होणार होते, त्याचे घर हिंदू बहुल वस्तीतच होते. मात्र गांधीजींनी जे दृश्य बघितलं, ते मन विषण्ण करणारं होतं. काही जळालेली घरं आणि दुकानं रस्त्यात दिसत होती. मारुतीच्या एका मंदिराचे दार कोणी उचकटवून खाली टाकले होते. त्या मोहोल्ल्याला जणू प्रेतकळाच आली होती.
 
गांधीजी हे अत्यंत मित आहार घेणारे. थोडसं शेळीचं दूध, सुका मेवा आणि द्राक्ष नाही तर इतर कोणतेही एखादे फळ. बस. इतकेच. या सर्व गोष्टींची व्यवस्था झालेली होती. गांधीजींबरोबर आलेल्या काफिल्यातील इतरांचीही जेवणाची व्यवस्था होती. साधारण दोन – अडीच वाजता, जेवणं वगैरे आटोपल्यावर, गांधीजी कार्यकर्त्यांच्या बैठकीत आले.
 
नेहमी प्रमाणे प्रार्थना आटोपल्यावर ही सभा प्रारंभ झाली. गांधीजींनी स्मित करत कार्यकर्त्यांना बोलायला सांगितले. आणि अक्षरशः बांध फुटावा, तसे कार्यकर्ते बोलू लागले. हे सर्व कार्यकर्ते चिडले होते, वैतागले होते – आपल्याच नेतृत्वावर. त्यांना शेवटपर्यंत आशा होती की गांधीजींनी म्हटलंय, ‘फाळणी होणार नाही. आणि झालीच, तर ती माझ्या देहाचे दोन तुकडे झाल्यावरच.’ म्हणजे फाळणी काही होत नाही. होणार नाही. त्यामुळे ते सर्व तसे निर्धास्त होते.
 
मात्र तीन जूनला सारेच काही बदलले. फाळणीची घोषणा झाली. ती देखील कॉंग्रेसच्या संमतीने झाली. आता पुढल्या आठ – पंधरा दिवसात आपलं जितकं सामान घेता येईल, तितकं घेऊन निर्वासितासारखं भारतात जायचं. आयुष्याची अक्षरशः उलथापालथ होतेय, अन ती ही आपण कॉंग्रेसचे कार्यकर्ते असताना...!  गांधीजींवर कार्यकर्त्यांच्या प्रश्नांची अक्षरशः सरबत्ती होत होती. अन गांधीजी अगदी शांतपणे हे सारं काही ऐकत होते. शेवटी पंजाब कॉंग्रेस कमिटी च्या अध्यक्षांनी त्या कार्यकर्त्यांना थांबवलं, आणि गांधीजी काय म्हणतात, ते ऐकून घेण्याची विनंती केली.
 
लाहोर शहरातील ते सात – आठशे कॉंग्रेस कार्यकर्ते एकदम शांत झाले. अन आता गांधीजींच्या तोंडून आशादायक कोणते शब्द बाहेर पडतात, याची वाट पाहू लागले....!
 
याच वेळेला सिंध प्रांताच्या हैदराबादमध्ये गुरुजींचं भोजन संपलेलं होतं, आणि ते तिथल्या कार्यकर्त्यांबरोबर गप्पा मारीत होते. आबाजींनी त्यांना एक – दोन वेळा म्हणून बघितलं की थोड्या वेळ आराम करा. वामकुक्षी घ्या. पण त्या सर्व वातावरणात, गुरुजींना वामकुक्षीसाठी का होईना, पण क्षणभरही आडवं होणं शक्यच नव्हतं.
 
हैदराबादचे कार्यकर्ते गुरुजींना सांगत होते, मागील वर्षीचा नेहरुंचा किस्सा.
 
नेहरूंना हैदराबादेत सभा घ्यायची होती. तोपर्यंत फाळणी घोषित झालेली नव्हती. सिंध प्रांतात मुसलमानांची संख्या ही प्रामुख्याने खेड्या – पाड्यात जास्त होती. मात्र कराचीचा अपवाद सोडता सारी शहरं ही हिंदू बहुल होती. लरकाना आणि शिकारपूरला ६३% च्या वर हिंदू होते तर हैदराबादेत एक लाखाच्या आसपास, अर्थात ७०% च्या वर हिंदू होते.
 
मात्र तरीही मुस्लिम लीगची फाळणीसाठीची चळवळ जोरात आणि पूर्णपणे हिंसक होती. त्यामुळे संख्येने फक्त ३०% असूनही, मुसलमानांनी आपला दबदबा निर्माण केला होता. सर्व सार्वजनिक ठिकाणी हिंदूंच्या विरोधात बॅनर्स लागली होती. सिंध
मंत्रिमंडळातील मुस्लिम लीगचा मंत्री खुर्रम तर सरे आम धमकी देत होता की आम्ही हिंदूंच्या बायका पोरी उचलून नेऊ.
 
या मुसलमानांच्या गुंडगिरीला पुरून उरणारी एकच संस्था होती. ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. हैदराबादेत संघाच्या शाखांची संख्या चांगली होती. प्रांत प्रचारक राजपाल पुरींचा या भागात नियमित प्रवास असायचा. आणि म्हणूनच जेव्हा १९४६ मधे जवाहरलाल नेहरूंची हैदराबाद होणारी सभा, मुस्लिम लीगचे गुंड उधळून लावणार आहेत आणि नेहरूंची हत्या करणार आहेत असं कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना समजलं, तेव्हा त्यांना नेमकं काय करावं ते सुचलंच नाही. मग सिंध कॉंग्रेस चे वरिष्ठ नेते चिमन दास आणि लाला कृष्णचंद यांनी राजपाल पुरींची भेट घेतली आणि नेहरूंच्या सुरक्षेसाठी संघाची मदत मागितली. राजपालजींनी हो म्हटलं आणि मुस्लिम लीगचं हे आव्हान स्वीकारलं.
 
नेहरूंची मोठी सभा हैदराबादला झाली. संघाची सुरक्षा व्यवस्था चोख होती. त्यामुळे सभेत कुठलीही गडबड झाली नाही की कुठलाही व्यत्यय आला नाही..! (‘Hindus in Partition – During and After’, www.revitalization.blogspot.in – V. Sundaram, Retd IAS Officer)
 
हैदराबादला कार्यकर्त्यांचं एकत्रीकरण बरंच मोठं झालं. दोन हजारांच्या वर कार्यकर्ते आले होते. गणवेशातलं उत्तम सांघिक झालं. मग गुरुजी बोलायला उठले. स्वाभाविकतः अधिकांश मुद्दे हे कराचीतल्या भाषणाचेच होते. गुरुजींनी आग्रहाने विषय मांडला की “नियतीनं एक फार मोठं काम आपल्या संघावर सोपवलं आहे. राजा दाहीर सारख्या शूर वीरांच्या सिंध प्रांतात आपल्याला तात्पुरती माघार घ्यावी लागत आहे. त्यामुळे सर्व हिंदू – शीख बांधवांसह, त्यांच्या परिवारासह, त्या सर्वांना सुरक्षितपणे भारतात नेण्यासाठी आपल्याला प्राणांची बाजी लावायची आहे.” “आपली पूर्ण श्रध्दा आणि विश्वास आहे की झुंडशाही पुढे नमून स्वीकारलेली ही फाळणी कृत्रिम आहे. आपण उद्या नक्कीच परत अखंड होऊ. पण सध्या हिंदूंची सुरक्षा हे आपल्यापुढील मोठे आव्हान आहे.” आपल्या बौद्धिकाचं समापन करताना गुरुजींनी संघटनेचं महत्व अधोरेखित केलं. “आपल्या संघटन शक्तीच्या बळावर अनेक असाध्य वाटत असलेली कामं लीलया करू शकतो. आणि म्हणूनच धीर धरा. संघटनेच्या माध्यमातून आपला पुरुषार्थ दाखवू या..!”
 
 
 
 
बौद्धिकानंतर गुरुजी स्वयंसेवकांशी भेटत होते. त्यांची विचारपूस करत होते. अश्या अस्थिर वातावरणात, विपरीत परिस्थितीत गुरुजींचे हे धीराचे शब्द, त्या सर्व स्वयंसेवकांना लाख मोलाचे वाटत होते. त्यांना उभारी देत होते.
आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत, गांधीजी शांतपणे बोलू लागले,
 
“मला फार वाईट वाटतंय की पश्चिम पंजाबमधून सर्व बिगर मुस्लिम पळून चालले आहेत. काल ‘वाह’च्या शरणार्थी शिबिरात मी हेच ऐकले. आणि आज इथे लाहोरातही हेच ऐकतोय. हे असं व्हायला नको. जर तुम्हाला वाटतंय की लाहोर आता मरण पावतंय किंवा मरणार आहे, तर त्यापासून दूर पळू नका. उलट त्या मरण पावणाऱ्या लाहोर बरोबर मृत्यूला सामोरं जा. जेव्हा तुम्ही भीतीच्या प्रभावाखाली येता, तेव्हा प्रत्यक्ष मरणापूर्वीच तुम्ही मेलेले असता. हे उचित नाही. मला वाईट वाटणार नाही, जेव्हा मला अशी बातमी येईल की पंजाब मधील माणसं घाबरून नाही, तर धैर्यानं मरणाला सामोरी गेली..!”
 
गांधीजींची ही वाक्यं ऐकून दोन मिनिटे तर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना काय म्हणावे तेच कळेना. कोणी तरी तापलेल्या लोखंडाचा उकळता रस आपल्या कानात ओततोय, असंच त्या तिथे बसलेल्या प्रत्येक कॉंग्रेस कार्यकर्त्याला वाटत होतं..! ‘मुस्लिम लीग च्या गुंडांनी केलेल्या प्राणघातक हल्यात येणाऱ्या मृत्यूला धैर्याने सामोरे जा..?’
लाहोरला येताना, रस्त्यात गांधीजींना एका कार्यकर्त्यांनं सांगितलं की ‘भारताचा राष्ट्रध्वज जवळ जवळ तयार झाला आहे. फक्त मधला चरखा काढून त्यात सम्राट अशोकाचे प्रतीक चिन्ह, ‘अशोक चक्र’ ठेवले आहे.’
 
ही बातमी गांधीजींना चांगलीच उद्विग्न करणारी होती. चक्क अशोक चक्र..? सम्राट अशोकाने भरपूर हिंसा केली. नंतर बौद्ध धर्म स्वीकार केला असेल. पण पूर्वी हिंसा केलीच होती ना..? अश्या हिंसा करणाऱ्या राजाचे प्रतीक चिन्ह आपल्या राष्ट्रध्वजात..? नाही. कदापि नाही... आणि म्हणूनच कार्यकर्त्यांची बैठक संपल्यावर, गांधीजींनी महादेव भाईंना एक वक्तव्य तयार करून वर्तमानपत्रांना द्यायला सांगितलं.
 
गांधीजी सांगू लागले, “मला आज माहिती मिळाली आहे कि भारताच्या राष्ट्रध्वजाबद्दल अंतिम निर्णय घेण्यात येत आहे. मात्र जर या ध्वजात मध्यभागी चरखा नसेल तर या ध्वजाला मी प्रणाम करणार नाही. आपल्याला माहीतच असेल की भारताच्या राष्ट्रध्वजाची कल्पना सर्वप्रथम मी केली होती. आणि अशा राष्ट्रध्वजात चरखा नसेल तर मी त्या राष्ट्रध्वजाची कल्पनाही करू शकत नाही..!’
 
 
 
सहा ऑगस्टची संध्याकाळ. मुंबईत आकाशात तुरळक ढग होते. पाऊस पडण्याची शक्यता वाटत नव्हती.
 
मध्य मुंबईच्या एका चांगल्या सभागृहात, मुंबईतील वकिलांच्या संघटनांनी एक कार्यक्रम ठेवला होता – स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागताचा.
 
कार्यक्रम खूप छान रंगला. बाबासाहेबांनीही मनमोकळेपणाने भाषण केलं. भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमेवर उसळलेल्या हिंसाचाराच्या आगडोंबाबाबत ही ते बोलले. पाकिस्तानासंबंधी त्यांची जुनीच भूमिका, परत एकदा त्यांनी अत्यंत मजबूत तर्कांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला. लोकसंख्येच्या अदलाबदलीची आवश्यकताही त्यांनी मंडळी.
 
एकूण कार्यक्रम छान जुळून आला होता. बाबासाहेबांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली होती आणि अधिकांश वकील मंडळींना ती पटलीही होती.
सहा ऑगस्टच्या रात्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गुरुजी हे सिंध प्रांतातल्या हैदराबादेत, हिंदूंच्या भविष्याची योजना बनवून त्यांना सुरक्षित भारतात आणण्याचा विचार करत होते. त्यांच्या झोपण्याची वेळ होऊन गेलेली होती.
 
गांधीजी साधारण तासाभरापुर्वीच लाहोरमधून पटना मार्गे कलकत्त्यासाठी निघाले होते. त्यांची ट्रेन अमृतसर – अंबाला केंट – मोरादाबाद – वाराणसी करत तीस तासानंतर पाटण्याला पोहोचणार होती. होऊ घातलेले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू, दिल्लीतील ’१७, यॉर्क रोड’, या त्यांच्या निवासस्थानी व्यक्तिगत पत्र लिहित होते. त्यांच्या झोपण्याची सर्व तयारी झालेली होती. तिकडे दिल्लीतच गृहमंत्री वल्लभभाई पटेल हे त्यांच्या अभ्यासिकेत संस्थानांच्या फाईल्स घेऊन बसले होते. वेळ थोडा होता आणि या कालावधीत उरलेल्या संस्थानांना, भारतात सामिल करून घ्यायचं होतं..!
 
 
सहा ऑगस्टची रात्र जशी जशी चढत चालली होती, तसतशी पश्चिम पंजाब, पूर्व बंगाल, सिंध, बलोचीस्तान या ठिकाणी राहणाऱ्या हिंदूंच्या घरावर भीतीची छाया गडद होत चालली होती. हिंदू – शिखांच्या घरांवरचे हल्ले तीव्र झाले होते. आणि त्यांच्या घरांना लागलेल्या आगीच्या ज्वाळा दुरूनही दिसत होत्या...!
 
 
 
प्रशांत पोळ
 
 
 
मागील लेख तुमच्या वाचनातून राहिला असेल तर त्याची लिंक खालीलप्रमाणे : ५ ऑगस्ट १९४७
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@