पाय गमावलेल्या जवानाची मिरवणूक

    28-Aug-2018
Total Views | 37

सीमेवर टाकळीच्या रमेश मगरची नक्षलवाद्यांशी झुंज
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर अश्‍वमेध पब्लिक स्कूल, ग्रामस्थांतर्फे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

 
 
चाळीसगाव :
नक्षलवाद्यांशी लढा देत असताना लँडमाईनवर पाय पडून जखमी झालेल्या तालुक्यातील टाकळी प्र.दे.येथील रमेश मगर या जवानाला आपला डावा पाय गमवावा लागला. या जवानाने देशसेवेसाठी जी मृत्यूशी झुंज दिली, त्याअनुषंगाने रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर अश्वमेध पब्लिक स्कूल येथील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी जवानाचे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले.
 
 
याप्रसंगी अश्वमेध पब्लिक स्कूलच्या प्राचार्या उज्ज्वला निरखे यांनी जवानाचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर नार्‍यांनी परिसर दुमदुमून गेला. शाळेतील महिला शिक्षिकांनी राखी बांधून आपल्या देशाचे रक्षण करणार्‍या भावाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी एस.एस.बी. जवान शरद पवार आणि जवान प्रदीप शिरसाठ उपस्थित होते.
 
 
याप्रसंगी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी गावात जंगी मिरवणुकीचे आयोजन केले होते. अश्वमेध पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सुभाष पाटील व अनन्या फाउंडेशनच्या अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी दूरध्वनीद्वारे जवानाचे शब्दसुमनांनी स्वागत केले.
 
छत्तीसगडमध्ये झाली होती चकमक
दंतेवाडा छत्तीसगड येथे पेट्रोलिंग ड्यूटीवर जात असताना ३० जून रोजी लँडमाईन ब्लास्ट झाला. यावेळी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत त्यांनी दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. २००३ पासून सेवेत असलेल्या रमेश मगर यांनी आतापर्यंत १४ वर्षे देशसेवेत दिली. यापुढचेही आयुष्य देशसेवेतच व्यतीत करण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121