रत्नागिरीतील पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिकांनी आज पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. जैतापूर जवळील साखरीनाटे गावातील नागरिकांनी या प्रकल्पाविरोधात 'जेलभरो' आंदोलन पुकारले असून हजारोंच्या संख्याने नागरिक या आंदोलनामध्ये आज सहभागी होणार आहेत, त्यामुळे रत्नागिरीमधील पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे.
साखरीनाटे ग्रामस्थांनी विशेषतः गावातील आणि आसपासच्या परिसरातील कोळी समाजाने या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. जैतापूर येथे हा प्रकल्प होऊ देणार नसल्याची रोकठोक भूमिका या नागरिकांनी घेतली आहे. यासाठी शिवसेनेनी देखील या नागरिकांच्या आंदोलनाला आपला पाठींबा दिला आहे. रत्नागिरीतील शिवसेना आमदार राजन साळवी यांनी या आंदोलनाला आपला पाठींबा दिला आहे. त्यामुळे सध्या परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारत आणि फ्रान्स यांच्या संयुक्त विद्यमानाने उभारल्या जात असलेल्या या प्रकल्पाला त्यांच्या मंजुरीपासून स्थानिक ग्रामस्थांकडून विरोध होत आहे. तब्बल ९९०० मेगावॉट वीज निर्मितीची क्षमता असलेल्या हा प्रकल्प जगातील सर्वात मोठा अणुउर्जा प्रकल्प आहे. परंतु स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे गेल्या ८ वर्षांपासून हा प्रकल्प भिजत पडला आहे. या प्रकल्पामुळे कोकण किनारपट्टीची मोठी हानी होईल या भीती पोटी येथील स्थानिक नागरिक या प्रकल्पाला विरोध करत आहेत. तसेच येथील स्थानिक नेते देखील या प्रकल्पावरून सातत्याने राजकारण करत आले आहेत. त्यामुळे आजच्या आंदोलनामध्ये नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.