अमेरिकेचे बंटी अन् बबली...
गरिबांच्या, पीडितांच्या, संकटग्रस्तांच्या नावाने पैसा जमवायचा आणि नंतर तो आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी वापरायचा, हा शिरस्ता आपल्याकडे अथवा जगभरातही नवीन नाही. भारतात तर गुजरात दंगलीपासून कालपरवा जम्मू-काश्मीरच्या कठुआतील अत्याचार प्रकरणापर्यंत अन्यायग्रस्तांना सहानुभूती दाखवत त्यांच्या नावावर स्वतःचे खिसे भरणारे कितीतरी लोक इथे दिसतील. तिस्ता सेटलवाड वा इंदिरा जयसिंग यांच्यासारखे लोक तर अशी प्रकरणे न्यायालयात गेल्यावर कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी सैरभैर झालेलीही पाहायला मिळाली. आपण फार मोठे समाजकार्य करत असल्याचा आव आणणारी ही मंडळी हा पैसा देशातून आणि परदेशातून दोन्हींकडून ओरबाडताना दिसली, पण सध्याच्या सरकारने परदेशातील देणग्यांचा हिशोब देण्याची अट घातल्यापासून अशा लोकांची रसद बऱ्यापैकी कमी झाली, त्यावरूनही या लोकांचा आरडाओरडा सुरू आहेच. भारतात ही अवस्था तर तिकडे परदेशातही लोकांना गंडा घालण्याचे प्रकार सतत होताना दिसतात. नुकतेच अमेरिकेतील असलेच एक प्रकरण उघड झाले असून महिला आणि तिच्या बॉयफ्रेंडवर ठकविण्याचा आरोप करण्यात आला आहे. रस्त्याकडेला झोपणाऱ्या, राहणाऱ्या जॉनी बॉबरिट नामक व्यक्तीवर वा त्याच्यासारख्या लोकांवर अशी नामुष्कीची वेळ येऊ नये, या उदात्त हेतूने कैट मैकक्लुरे या महिलेने ‘#गोफडीग’ कॅम्पेनच्या नावाने पैसा गोळा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिचा बॉयफ्रेंडही या महिलेसह पैसा गोळा करण्याच्या कामाला लागला. सुरुवातीला दोघांनाही जास्तीत जास्त १० हजार डॉलरचा निधी जमा होण्याची आशा होती. प्रत्यक्षात मात्र १४ हजार दात्यांनी त्यांच्याकडे ४ लाख डॉलरची रक्कम सुपूर्द केली आणि काय आश्चर्य, आतापर्यंत गरिबांचा कळवळा दाटून आलेल्या महिलेची आणि तिच्या बायफ्रेंडची मती फिरली. दोघांनीही जमा झालेला पैसा स्वतःच्या खाजगी सोयीसुविधांवर, ऐशोआरामावर उडवायला सुरुवात केली. आहे ना गंमत? एकीकडे या दोघांचे हे गाडीघोडे, बंगले खरेदी सुरू असतानाच जॉनी बॉबरिट याने याविरोधात तक्रार दाखल केली. जॉनीने केलेल्या आरोपांनुसार “या जोडप्याने त्याला वापरलेली गाडी, लॅपटॉप आदी गोष्टी दिल्या खऱ्या, मात्र हे दोघे बीएमडब्ल्यूतून फिरतात लास वेगासला सुट्ट्या घालवतात. मला मात्र अजूनही रस्त्यावरच झोपावे लागते.” म्हणजेच दयाळूपणाचा आव आणून ठकवण्याचे धंदे इथेही जोरात झाले. आता या प्रकरणाची चौकशी होते की नाही, हेच पाहायचे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/