असा नेता आता होणे नाही!

Total Views |

 
 
 
1991 मध्ये पी. व्ही. नरिंसह राव यांच्या मंत्रिमंडळात डॉ. मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने त्यांनी आपल्या अर्थसंकल्पातून अनेक धाडसी निर्णय घेतले, यामुळे अर्थव्यवस्थेला काही झटकेही बसले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या या अर्थसंकल्पावर, विरोधी पक्षाचे नेते असलेले अटलबिहारी वाजपेयी यांनी सडकून टीका केली- ‘‘डॉ. मनमोहन सिंग यांना ‘झटका मटन’ आवडत असले, तरी अर्थव्यवस्थेला असे झटके देणे योग्य नाही, अर्थव्यवस्थेत बदल करताना त्यात संतुलन राखले गेले पाहिजे, घाईगर्दीत कोणतेही बदल केले जाऊ नये.’’ अशी टीका आपल्या नेहमीच्या शैलीत वाजपेयी यांनी केली.
 
 
ही टीका अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या कानावर गेली. नोकरशाहीतून राजकारणात आलेले संवेदनशील डॉ. मनमोहन सिंग, वाजपेयी यांच्या या टीकेमुळे दुखावले गेले. त्यांनी अर्थमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी केली. पंतप्रधान पी. व्ही. नरिंसह राव यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना दूरध्वनी करून ही बाब सांगितली. आपल्या टीकेचा एवढा गंभीर परिणाम झाल्याचे लक्षात येताच वाजपेयी यांनी लगेच डॉ. मनमोहन सिंग यांना दूरध्वनी केला- ‘‘राजकारणात असे चालत असते. माझी टीका तुमच्यावर व्यक्तिगत स्वरूपात नव्हती, तर तुमच्या आर्थिक धोरणावर होती.’’ असे सांगत वाजपेयी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांची समजूत घातली आणि राजीनामा देण्यापासून त्यांना परावृत्त केले. तेव्हापासून या दोघांची दाट मैत्री झाली.
 
 
16 ऑगस्टला अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यानंतर रात्री त्यांच्या 6 कृष्ण मेनन मार्ग या निवासस्थानी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अंत्यदर्शनासाठी तसेच दुसर्या दिवशी राष्ट्रीय स्मृतिस्थळावर अंत्यसंस्कारासाठी पोहोचले, तेव्हा त्यांनाही दाटून आले होते. राजकारणातील एक दिलदार मित्र गमावल्याचे दु:ख त्यांच्या चेहर्यावरून स्पष्टपणे दिसत होते. वाजपेयींचे व्यक्तिमत्त्व असे लाघवी होते. राजकारणात राहणार्या माणसाला मित्र कमी आणि शत्रू जास्त असतात, असे म्हटले जाते. पण, वाजपेयी यांचे व्यक्तिमत्त्व याच्या उलट होते, त्यांना शत्रू कमी आणि मित्र जास्त होते.
 
 
त्यांच्या निवासस्थानी, त्यानंतर 6 दीनदयाल उपाध्याय मार्गावरील भाजपाच्या मुख्यालयात त्यांच्या अंत्यदर्शनासाठी तसेच नंतर अंत्ययात्रेत सर्वपक्षीय नेत्यांनी आणि सर्वसामान्य जनतेने जी गर्दी केली, त्यामुळे वाजपेयी यांच्या लोकप्रियतेची कल्पना यावी. प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाजपेयी गेल्या जवळपास 8 ते 9 वर्षांपासून सार्वजनिक जीवनापासून दूर होते. कुणाशीच त्यांचा संपर्क आणि बोलणे नव्हते. काही मोजके लोक वगळता त्यांच्या निवासस्थानी, वाजपेयी यांच्याशी बोलण्याची सोडा, त्यांना पाहण्याची संधीही कुणाला मिळत नव्हती. मात्र, तरीसुद्धा वाजपेयी यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता, आपल्या घरातील कुणा वडीलधार्या माणसाचे निधन झाल्याची भावना सर्वदूर होती. त्यामुळेच अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेत लाखोंचा जनसागर उसळला होता. राजधानीत राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर एवढी मोठी अंत्ययात्रा आम्ही पाहिली नाही, असे जाणकार सांगत होते.
 
 
अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सर्वपक्षीय प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत संघ आणि भाजपाचेच नाही, तर सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी या सभेत व्यक्त केलेल्या भावना बोलक्या होत्या- ‘‘आपल्या जिवंतपणी आम्हा सर्वांना एकत्र आणण्यासाठी नेहमी धडपडणार्या अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या मृत्यूनंतरही या शोकसभेच्या निमित्ताने आम्हा सर्वांना एकत्र आणले,’’ असे उद्गार त्यांनी काढले.
 
 
वाजपेयी यांचे राजकीय विचार सर्वांना नेहमीच पटले असतील असे नाही, पण एक उमद्या मनाचा आणि दिलदार व्यक्ती म्हणून आपले पक्षीय मतभेद बाजूला ठेवत सर्वांनीच त्यांच्यावर निस्सीम प्रेम केले. सामान्यपणे कोणत्याही शोकसभेत, गेलेल्या व्यक्तीवर (मग तो प्रत्यक्षात कसाही असला तरी) चांगले बोलले जाते. ती एक औपचारिकता असते. कारण मरणान्ती वैराणी, म्हणजे मृत्यूनंतर वैर संपते. मात्र, वाजपेयी यांच्या शोकसभेत सहभागी झालेला प्रत्येक पक्षाचा नेता अगदी आपल्या अंत:करणातून बोलत होता, मनापासून बोलत होता. त्यात कोणत्याच प्रकारची औपचारिकता नव्हती. होत्या त्या मनातील प्रामाणिक आणि निखळ भावना. प्रत्येकाला बोलताना दाटून आले होते. डोळ्यांत अश्रू दाटले होते. यात जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला होते तसेच पीडीपीच्या नेत्या आणि राज्याच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचाही समावेश होता. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना तर भाषण करताना शब्द फुटत नव्हते. वाजपेयी आणि अडवाणी यांची 65 वर्षांची मैत्री! भाजपामध्ये ‘राम-लक्ष्मण’ म्हणून ही जोडी ओळखली जायची. या जोडीतला राम गेला आणि लक्ष्मण आता एकटा पडला. ‘‘आपल्या मित्र, मार्गदर्शक आणि नेत्याला श्रद्धांंजली वाहण्याची वेळ आल्यावर येईल, याची आपण कधी कल्पनाच केली नव्हती,’’ असे अडवाणी यांनी म्हणताच सवार्र्ंनाच दाटून आले होते.
 
 
वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहणार्यांमध्ये जसे नेते होते, तसेच अभिनेतेही होते, संत होते, महंत होते. त्यामुळेच अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांंजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना- अगदी भाजपावर सडकून टीका करणार्या नेत्यांना- दीनदयाल उपाध्याय मार्गावरील भाजपा मुख्यालयात येण्यातही काही गैर वाटले नाही. भाजपाशी 36 चा आकडा आहे असे आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरिंवद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, माकपचे नेते सीताराम येचुरी, कॉंग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांच्यापासून अनेकांचा यात समावेश होता. 6 कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी जाऊन हे नेते वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहू शकत होते, यातील अनेकांनी तसे केलेही. पण, पुन्हा या नेत्यांची पावले वाजपेयी यांच्यावरील प्रेमापोटी भाजपा मुख्यालयाकडे वळली, हेच वाजपेयी यांचे मोठेपण आहे!
 
 
 
काही दिवसांपूर्वी लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांचे निधन झाले. संपूर्ण आयुष्य माकपसाठी वेचलेल्या सोमनाथ चटर्जी यांना काही राजकीय घडामोडींमुळे त्यांच्या शेवटच्या काळात माकपने दिलेली वागणूक माणुसकीला शोभणारी नव्हती. त्यामुळे सोमनाथ चटर्जी यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव पक्षाच्या ध्वजात गुंडाळण्यासाठी पाठवलेला पक्षाचा ध्वज चटर्जी यांच्या कुटुंबीयांनी परत पाठवला होता. चटर्जी यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेल्या पश्चिम बंगाल माकपच्या अध्यक्षांना चटर्जी यांच्या समर्थकांनी अंत्यदर्शन न घेताच परत पाठवले होते. चटर्जी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी माकपच्या मुख्यालयात ठेवण्याचा तर प्रश्नच नव्हता!
 
या पार्श्वभूमीवर अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर भाजपाची भूमिका विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भूमिका एक आदर्श निर्माण करणारी होती. पंतप्रधान मोदी तर आपल्या सुरक्षेची कोणतीही पर्वा न करता पायी चालत अंत्ययात्रेत सहभागी झाले. वाजपेयी हे खर्या अर्थाने ‘भारतरत्न’ होते. काही पदव्यांमुळे माणसाचे महत्त्व वाढते, तर काही माणसांमुळे त्या पदवीला महत्त्व प्राप्त होते. तसेच ‘भारतरत्न’चे अटलजींमुळेच झाले. ‘भारतरत्न’मुळे अटलजींचे नाही, तर अटलजींमुळे
 
‘भारतरत्न’चे महत्त्व वाढले!
वाजपेयी यांच्या निधनामुळे भाजपाचीच नाही, तर संपूर्ण देशाची अपरिमित हानी झाली आहे. वाजपेयी देशाची आन, बान आणि शान होते. आचार्य अत्रे यांच्या शब्दांत सांगायचे, तर अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा नेता गेल्या दहा हजार वर्षांत झाला नाही, पुढील दहा हजार वर्षांत होणार नाही...!
श्यामकांत जहागीरदार
9881717817