ठाणे: शहरातील खड्डे भरण्यासाठी पहिल्यांदाच अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला असून यासंदर्भात बुधवारी त्यांची अमेरिकन कंपनीच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. अशा तंत्रज्ञानाचा वापर करून भारतात पहिल्यांदा खड्डे भरण्यात येणार आहेत. अॅग्रीबाईंड नावाचे हे रसायन प्रामुख्याने अमेरिकेमध्ये रस्ते, सिमेंट काँक्रिटच्या मजबुतीसाठी, इरिगेशन चॅनल्स बनविण्यासाठी तसेच खड्डे भरण्यासाठी वापरले जाते. द्रव्य स्वरूपातील पॉलिसरसदृश्य हे रसायन खडीमध्ये मिसळून रस्ते तसेच खड्डे भरण्यासाठी वापरल्यास कमीत कमी पाच वर्षांपर्यंत रस्ते टिकू शकतात. सदरचे रसायन हे घातक, ज्वलनशील, स्फोटक नसून वापरण्यासाठी पर्यावरणाभिमुख आहे. या रसायनाचा वापर करून सुरुवातीला मीनाताई ठाकरे चौक, नागरी संशोधन केंद्र रोड या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येऊन खड्डे भरण्यात येणार आहेत. त्यानंतर या रसायनांची पडताळणी करून भविष्यात रस्ते बांधण्यासाठी या रसायनाचा कसा वापर करता येईल, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीला नगर अभियंता अनिल पाटील, कार्यकारी अभियंता प्रविण पापळकर, मोहन कलाल, चेतन पटेल आदी अधिकारी उपस्थित होते.