फ्री सीरियन आर्मी व रोजावा सेनेचे संबंध- भाग 2

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2018   
Total Views |


 

 

मागील लेखात सांगितल्याप्रमाणे एफएसएला शस्त्रास्त्र, लॉजिस्टिक, वाहने यांची कमतरता भासू लागली व सैनिकांना पगार द्यायलाही पैसा नव्हता, पण अशातच अमेरिकेने १२३ अमेरिकन डॉलरचे अमारक साहाय्य (Non lethal aid) दिले. तरीही त्यामुळे उणीव भरून निघू शकली नाही. एप्रिल २०१३ पासून एफएसएचे सैनिक हळूहळू या शस्त्रसज्ज, भक्कम आर्थिक पाठबळ असलेल्या व असादविरोधी असणाऱ्या ‘अल- नुस्रा फ्रंट’ किंवा ‘जभात अल-नुस्रा’ या अल-कायदाशी संबंधित इस्लामी संघटनेकडे आकर्षित होऊ लागले.१ ऑगस्ट २०१४ मध्ये अबू युसूफ या इसिसच्या उच्चस्तरीय पुढाऱ्याने सांगितल्याप्रमाणे अमेरिका, तुर्कस्तान व अरब सेनाधिकाऱ्यांना प्रशिक्षित केलेले सैनिक आता इसिसमध्ये भरती होत आहेत.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 

जॉर्डनमधील अबू सय्यफ म्हणून ओळखला जाणारा सलाफी-जिहादी पुढारी मोहम्मद शलाबी. हा सलाफी-जिहादी चळवळीमुळे व अमेरिकेच्या विरोधात हल्ल्याची योजना आखल्याच्या आरोपाखाली दोषी ठरून १० वर्षांचा कारावास भोगून आला आहे. एफएसए आणि सीरियामधील असादविरोधी इतर सुन्नी मूलतत्त्ववादी यांच्या उद्दिष्टांमध्ये मूलतः फरक आहे, कारण अशाच प्रकारचे मत जॉर्डनमधील अबू सय्यफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलाफी-जिहादी पुढारी मोहम्मद शलाबीने जुलै २०१३ ला mmon news कडे व्यक्त केले- “दृष्टिकोन आणि उद्देशाच्या दृष्टीने धर्मनिरपेक्ष आणि इस्लामी लढाऊ लोकांमध्ये मोठा फरक आहे. उदाहरणार्थ- एफएसएला लोकशाही धर्मनिरपेक्ष राजवट लादायची आहे व एकदा राजवट कोसळल्यावर त्यांना त्यांचे स्थान पाश्चिमात्य विचारांशी जोडण्यात काहीच अडचण नसेल. आत्ताच, जभात अल- नुस्रा, सलाफी गट आणि इतर लढाऊ लोकांना परमेश्वराच्या कायद्याची अंमलबजावणी करायची आहे की, ज्याची परिणती अपरिहार्य संघर्षामध्ये होईल. आम्ही सर्वसमर्थ परमेश्वराच्या (शरिया) कायद्याचे राज्य आणायला सीरियामध्ये आलो आहोत. जर आपण अत्याचारी शासनाच्या पाडावानंतर पवित्र कुराणाचा अवलंब केला नाही, तर परिस्थिती आत्ता आहे तशीच राहील. याचा अर्थ असा होईल की, गेल्या दोन वर्षांत आमचा रक्तपात व्यर्थ गेला. एफएसएमधील पलटणी इस्लामी शासनप्रणाली लागू करायला तीव्रपणे नकार देत आहेत.”

 

पाकिस्तानातील पेशावरमधील (पाकिस्तानी) तालिबानी नेता म्हणाला की, ‘‘आम्ही सीरियामधील संघर्षात आमच्या मुजाहिद्दीन सहकार्यांसोबत लढण्याचे ठरवले आहे. आमच्या बांधवांना आमच्या साहाय्याची गरज आहे, आम्ही शेकडो लढाऊ लोक पाठवले आहेत.” तर दुसरा पाकिस्तानी तालिबानी नेता म्हणाला, ‘‘आमच्या अरब मित्रांच्या विनंतीवरून आम्ही सीरियामध्ये लढाऊ लोक पाठविण्याचे ठरवले आहे. आमचे अरब बंधू आम्हाला इथे साहाय्य करण्यास आले आहेत, त्यामुळे आम्ही संबंधित देशांमध्ये त्यांना साहाय्य करण्यास बांधील आहोत.”

 

म्हणजे असादविरोधी लढा आता केवळ सीरियापुरता मऱ्या दित न राहता सीमा पार करून जॉर्डन व पाकिस्तान संबंधित जिहादी अतिरेक्यांपर्यंत पोहोचला होता व ते सीरियामध्ये आपल्या बांधवांना (?) साहाय्य करण्यास शस्त्रांसह उतरले होते आणि त्यांचा हेतू त्यांनीच स्पष्ट केल्याप्रमाणे शरिया कायदा लागू करणे हा होता. त्यांच्या दृष्टीने एफएसए ही धर्मनिरपेक्ष लोकशाही संघटना होती व म्हणूनच अमेरिका त्यांना साहाय्य करत होती. म्हणजे शरिया कायदा हा धर्मनिरपेक्ष नाही व लोकशाहीविरोधी आहे, हे तेच अप्रत्यक्षरित्या मान्य करत आहेत. एफएसए व जभात अल-नुस्राला सीरियामधील असाद राजवट अत्याचारी वाटत होती पण त्याला पऱ्या यी राजवट किंवा शासनप्रणाली ही एफएसएच्या दृष्टीने वेगळी होती व जभात अल-नुस्राच्या दृष्टीने वेगळी होती. एफएसए असाद सरकारला लोकशाहीविरोधी म्हणत होती तर जभात अल-नुस्रा एफएसएला धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी म्हणून विरोध करत होती. आता एफएसएचा लढा असाद सरकारशी व जभात अल- नुस्राशी होता तर जभात अल-नुस्राचा लढा असाद सरकारशी व एफएसएशी होता आणि असाद सरकारचा लढा एफएसए व जभात अल-नुस्राशी होता. प्रत्येक गट एकाच वेळी दोघांशी लढत होते व मधल्या मध्ये सामान्य जनता भरडली जात होती.

 

असादविरोध, आंदोलकांना संरक्षण व पाठिंबा म्हणून सीरियन सेनेतून बंड करून निर्माण झालेल्या बंडखोर एफएसएमध्येच आता बंडाळी माजली होती. नेतृत्वबदलाने काही फरक पडेल, असे वाटून फेब्रुवारी २०१४ मध्ये कर्नल कासीम सादेद्दीला एफएसएच्या सेनाध्यक्ष पदावरून काढून ब्रिगेडियर अब्दुल- इल्लाह अल- बशीरला नेमण्यात आले, पण फार काही आमूलाग्र बदल झाला नाही. जर्मन पत्रकार जार्गन तोदेनहॉफरनी इसिसव्याप्त प्रदेशाचा २०१४ मध्ये १० दिवसांचा दौरा केला होता, त्यादरम्यान त्याला इसिस नेतृत्वाकडून असे कळले की, जर एफएसएला उत्तम शस्त्रास्त्रे मिळाली तर ती ते आम्हालाच विकतील. एफएसए आमचे सर्वोत्तम शस्त्रविक्रेते आहेत.” एफएसएमध्ये वाढत चालेल्या अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराने व इसिसला केलेल्या छुप्या पाठिंब्यामुळे व साहाय्यामुळे एफएसएचा अस्त जवळ आणला व इसिसचा उदय करून त्याला पाय रोवण्यास साहाय्य केले.

 

असाद राजवट सामान्य नागरिकांच्या अधिकारांची, स्वातंत्र्याची गळचेपी करतेय म्हणून त्याला विरोध करण्यासाठी हजारो सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले व शांततामय मोर्चात सामील झाले. मग यातीलच काही नागरिक एफएसएमध्ये सामील झाले. असाद राजवटीचा पाडाव व सामान्य आंदोलकांचे संरक्षण करून स्वातंत्र्य मिळवणे, या उद्देशाने एफएसएची स्थापना करण्यात आली. त्यामुळे ह्यात कुठेही विशिष्ठ धार्मिक शासनप्रणाली लादण्याचा उल्लेख नव्हता. पण एफएसए विरोधात जभात अल- नुस्रा व इसिसने शरियत कायदा लागू करण्याचे जाहीर केले. कालांतराने एफएसएमधील लोक जभात अल-नुस्रा व इसिसमध्ये सामील होऊ लागले. एफएसएमधील लोक कसे काय इतक्या कमी कालावधीत अत्यंत कडव्या धार्मिक, मूलतत्त्ववादी अशा अतिरेकी संघटनेत सामील झाले? एक अत्याचारी राजवट जाऊन दुसरी अत्याचारी राजवट लादून काय साध्य होणार होते? एफएसएच्या अंतर्गत समन्वयाच्या अभावामुळे, आर्थिक दुर्बलतेमुळे व गोंधळामुळे ते सुसंघटित, आर्थिक सुबत्ता असणाऱ्या व प्रशिक्षित अशा जभात अल-नुस्रा व इसिसमध्ये सामील झाले, हे प्रशासकीय व आर्थिक कारण होते की धार्मिक कारण होते, यावर चिंतन होणे गरजेचे आहे.

 

अशातच सप्टेंबर-ऑक्टोबर २०१४ मध्ये कोबानमधील एफएसए सेनेने रोजावाच्या वायपीजीसह युती करून इसिस व असाद विरोधात एकत्र लढा पुकारला. एफएसए- वायपीजी संबंध आधी कसे होते? त्यांनी वायपीजीशी युती का केली? त्याचा एफएसएवर व वायपीजीवर काय परिणाम झाला यावर पुढील लेखात चर्चा करू.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@