सर्व कार्येऽषु सर्वदा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2018   
Total Views |


 

 

कोणत्याही कामाचा शुभारंभ होतो तो श्रीगणेशाच्या स्मरणाने... डोंबिवलीकरांसाठी तर फडके रोडवरील श्रीगणेश मंदिर म्हणजे साक्षात आराध्यदैवतच. या मंदिर संस्थानातर्फे वर्षभर अनेकविध सामाजिक उपक्रम राबविले जातात, ज्यामध्ये डोंबिवलीकरांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. तेव्हा, या संस्थानच्या स्थापनेपासून ते वर्तमान उपक्रमांची माहिती करुन देणारा हा लेख....
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 

 
 

डोंबिवलीला ‘सांस्कृतिक उपराजधानी’ हा मान या शहराच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे मिळाला. १९२२ च्या काळात ठाणे जिल्ह्यातील एक छोटेसे खेडे अशी डोंबिवली शहराची ओळख होती. या शहरात कोणत्याही शुभकार्याला पूजन करण्यासाठी एक मंदिर असावे, अशी संकल्पना येथील ग्रामस्थांच्या मनात आली. मंदिर गणेशाचे किंवा मारुतीरायाचे असावे, असे सर्वांचे मत होते. मग चर्चा, बैठका यातून ग्रामस्थांनी एकत्र येऊन दि. २२ मे १९२४ रोजी पूर्वेतील फडके रोडवर श्रीगणेश मंदिराची स्थापना केली. डोंबिवलीतील एका सद्‍गृहस्थांनी एक कौलारू घर या मंदिरासाठी दिले. कालांतराने याच ठिकाणी मारुती व गुरू दत्तात्रेयांच्या मूर्तींची प्रतिष्ठापनाही करण्यात आली. पुढे निरनिराळ्या स्वरूपात या मंदिराच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जात. या मंदिराचे पहिले विश्वस्त मंडळ १९२६ -२७ या काळात स्थापन झाले व १९३६ मध्ये मंदिराची घटना तयार झाली. सुशिक्षित मंडळींनी विचारविनिमय करून त्यात “हे मंदिर सर्व जातीजमातींसाठी खुले असेल,” हे स्पष्ट केले. त्यावेळी या मंदिराचे मासिक उत्पन्न होते केवळ दोन रुपये. महिलांमार्फत पौरोहित्य करण्याचा विषय आज कौतुकाचा असला तरी १९३० साली मात्र तो तसा अजिबात नव्हता. याच काळात अंबूबाई गोडबोले यांना या मंदिराचे पौरोहित्य करण्याचा मान मिळाला आणि सामाजिक क्षेत्रात अलौकिक काम करण्यास या संस्थानाच्या वतीने सुरुवात झाली.

 

१९४२ पासून गावाच्या गरजांतून नागरिकांच्या सोयीसाठी या मंदिराच्या आवारात क्रियाकर्माची सुविधा सुरू झाली. ती आजवर चालू आहे. १९५० नंतर मंदिराच्या गाभाऱ्यात कीर्तनाद्वारे ज्ञानयज्ञ सुरू झाला. तोही आजतगायत सुरू आहे. पण यापूर्वीची पद्धत वेगळी होती. ही मंडळी प्रबोधन करत व त्या बदल्यात मंदिराला रोख रक्कम दिली जात असे. मंदिराच्या उत्पन्नात याचा सहभाग असे. १९२८ चा गणेशोत्सव, १९५२ चा महालक्ष्मी उत्सव हे ग्रामस्थांनी सुरू केलेले उत्सव समाजासाठी मंदिरात आले आणि इथेच स्थिरावले. आजही हे उत्सव मंदिरात साजरे होतात. मंदिराचे कार्यक्षेत्र केवळ धार्मिक, वैदिक इतके संकुचित राहिलेले नाही. देणग्या तसेच दानपेट्यांच्या माध्यमातून मिळणारा निधी या संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यासाठी वापरला जातो. १९६५ नंतर मात्र कीर्तनाच्या सेवेचा प्रसाद या मंडळींना मिळू लागला. वै.ह.भ.प.शिरवळकर बुवा, आफळेबुवा, निजामपूरकर बुवा, पटवर्धन बुवा, कोपरकर बुवा यांसारख्या दिग्गज मंडळींचा सहवासही त्या काळात कीर्तनाच्या माध्यमातून संस्थानाला लाभला. ही नित्य कीर्तनाची परंपरा आजतगायत सुरू आहे. १९८५ ते १९९५ या काळात ‘भारतीय संस्कृत दर्शन’ हा भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारा अभिनव अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. पौराणिक ग्रंथ, उपनिषदे, वेद, भारतीय पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, संतवाङ्मय, ब्रह्मसूत्रे या साऱ्याचा त्यात समावेश होता. हे विद्यापीठ मंदिराने चालविले. मंदिराने सर्व सुविधा पुरविल्या, पण विद्यार्थ्यांच्या अभावामुळे कालांतराने हा उपक्रम बंद करण्यात आला. मंदिरामध्ये दुर्मीळ धार्मिक संदर्भग्रंथांचे अभ्यासिकेसह अद्ययावत वाचनालयही सुरू होते. याचबरोबर ध्यानमंदिर, योग मार्गदर्शन यांसारख्या सुविधाही उदयास येऊन स्थिरावल्या आहेत. बदलत्या काळानुसार व्यसनमुक्ती केंद्र, कुटुंबव्यवस्था टिकविण्यासाठी समुपदेशन या सेवा मंदिराने हाती घेतल्या. कालानुरूप मंदिराचा वाढता व्याप, इतर देवदेवतांची स्थापना, नित्यनैमित्तिक धार्मिक उत्सव, भक्तांची वाढती संख्या हा आकडा दिवसागणिक वाढत आहे. सद्यस्थितीला मंदिराचा व्याप वाढल्यानंतर देवासमोर जमा होणारा निधी व मंदिराला मिळणाऱ्या देणग्या यांचा समाजासाठी उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून गरजूंना मदत केली जाते.

 

गांडूळ खत प्रकल्प

मंदिरात मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या निर्माल्याचा योग्य विनियोग व्हावा व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी निर्माल्य पाण्यात टाकू नये व पाणी दूषित करू नये, या हेतूने निर्माल्य खत प्रकल्प सुरू करण्यात आला. १९९० च्या सुमारास एमआयडीसीमध्ये शासनाकडून नाममात्र दरात भूखंडही या प्रकल्पासाठी देण्यात आला. या ठिकाणी उत्तम खत होऊ लागले. नर्सरीज, शेतकरी यांच्याकडून मागणी येऊ लागली. तसेच देवळात येणाऱ्या काही भाविकांसाठीही अत्यल्प दरात हे खत उपलब्ध करून देण्यात आले.

 

रुग्णवाहिका व सोनोग्राफी सेंटर

१९९२ -९३ च्या काळात मंदिराने शहरातील रुग्णांसाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध करून दिली.ही रुग्णवाहिका सेवा २०१३ पर्यंत सुरू होती. मात्र वाढत्या शहरीकरणानंतर या शहरातील अत्यावश्यक सुविधांमध्येही वाढ झाल्याने संस्थांच्या वतीने ही रुग्णवाहिका वनवासी क्षेत्रात काम करणाऱ्या बाबा आमटे यांच्या आश्रमाला दान केली. तसेच २० वर्षांपूर्वी शहरातील गरजू रुग्णांसाठी अत्यल्प दरात डॉ. पटवर्धनांच्या इस्पितळात सोनोग्राफी सेंटर सुरू करण्यात आले. आता ही सेवा सुरू आहे. मात्र, आता हे सोनोग्राफी सेंटर इंदिरा चौकातील डॉ. दाते यांच्या इस्पितळात सुरू आहे. याचे नाव श्रीगणेश अल्ट्रा सोनोग्राफी सेंटर असे आहे. मंदिर परिसरात मंदिराद्वारे तसेच इतर संस्थांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांचे उत्तम सहकार्य मिळाले. काही गरजू रुग्णांना आर्थिक मदतही संस्थेच्या माध्यमातून केली जाते

 

श्री गणेशवाटिका

श्रीगणेश मंदिरालगत महापालिकेकडून मिळालेल्या भूखंडावर ज्येष्ठ नागरिक समाधानाने विसावा घेतात. तसेच तेथे ज्येष्ठांचे अनेक कार्यक्रम संपन्न होत असून ते समाधानी आहेत. तसेच गणेशवाटिकेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ओपन जीमची यंत्रसामग्री बसविण्यात आली आहे. त्याचाही ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपयोग करीत आहेत.

 

युवकांसाठीचे उपक्रम

शहरातील लहानमोठ्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, आध्यात्मिक, वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने ‘युवा भक्ती-शक्ती दिन’ हा कार्यक्रम केला जातो. सदर उपक्रमास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. नवोदित गायकांसाठी संगीत रविवार, श्रीगणेश मंदिर संस्थानच्या युवा मंडळींचे ढोल, लेझीम, ध्वजपथक कार्यरत असून या पथकानेही डोंबिवलीतील मानाचे पथक म्हणून स्वतःची ओळख प्रस्थापित केली आहे.

 

नववर्ष स्वागत यात्रा

डोंबिवली शहराची जगाने दखल घ्यावी, अशी नववर्ष स्वागत यात्रा ही गणेश मंदिर संस्थान व नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने आयोजित करण्यात येते. १९९९ साली मंदिराला ७५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने शहरात एखादा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करावा, तसेच एखादा समाजाला जोडणारा कार्यक्रम होणे आवश्यक आहे, असे विश्वस्तांच्या मनात आले.तसेच त्या काळातील तरुणाई इंग्रजी नववर्षाचे करीत असणारे स्वागतही प्रशस्त वाटत नव्हते. तेव्हा सर्वांच्या विचारविनिमयातून आपण मराठी नववर्षाचे स्वागत करावे, असा विचार समोर आला. हे स्वागत शोभायात्रेच्या स्वरूपात असावे, असे निश्चित करण्यात आले. त्याकाळी या शोभायात्रेला शहरातील किमान ५० हजार नागरिक उपस्थित राहावेत, असे प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्या कार्यक्रमाला प्रथमवर्षी मिळालेला प्रतिसाद विलोभनीय होता. दरवर्षी या शोभायात्रेत सहभागी होणाऱ्याच्या संख्येत वाढ होत आहे. यंदाचे वर्ष हे शोभायात्रेचे १९ वे वर्ष होते. मूळ शोभायात्रेला बगल न देता त्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रमही राबविण्यात येतात. ‘भविष्याचा वेध घेणारी डोंबिवली’ या संकल्पनेवर विविध कार्यक्रम शहरात निरनिराळ्या संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आले. मूळ विषयाबरोबर कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, महिला सुरक्षा, पर्यावरण, प्लास्टिकमुक्ती, असे विविध विषय या शोभायात्रेच्या माध्यमातून हाताळण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षापासून मंदिराच्या वतीने २६ जानेवारी व १५ ऑगस्ट या दिवशी ध्वजवंदनाचा कार्यक्रम करण्यात येत आहे.

 

वाचनालय

विद्यार्थ्यांच्या उत्तम भवितव्यासाठी दोन वर्षांपूर्वी महापालिकेचे प्र. के. अत्रे ग्रंथालय संस्थेच्या वतीने चालविण्यासाठी घेण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, माफक दरात विविध प्रकारचे संगणकीय प्रशिक्षणही देण्यात येते. तसेच अपंग व अंध व्यक्तींसाठी वाचनालयही चालविले जाते. विविध प्रकारचे धार्मिक ग्रंथ, इंग्रजी पुस्तकेही येथे ठेवण्यात आली असून त्याचा लाभ कुमारवयीन मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण घेतात. येत्या वर्षात संस्थांच्या वतीने डोंबिवली शहरातील चिमुकल्यांसाठी उद्यान बनविण्याचे काम सुरू आहे. तसेच एक अत्यल्प दरातील डायलिसीस सेंटरही उभारण्याचा संस्थेचा मानस असल्याचे संस्थेचे अध्यक्ष राहुल दामले यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@