
बंगळूरू : कर्नाटकमध्ये राज्याभिषेक होऊन अवघे चार महिनेही न उलटलेल्या जनता दल-कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी सरकारपुढील शुक्लकाष्ठ काही केल्या संपताना दिसत नाहीत. एकीकडे मुख्यमंत्री कुमारस्वामी मला प्रशासन जनतेसाठी काम करू देत नाही म्हणून सार्वजनिकरित्या आसवे गाळत असताना दुसरीकडे त्यांचे सख्खे थोरले बंधू आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री एच. डी. रेवण्णा यांना मात्र सत्तेचा चांगलाच माज चढला आहे. याच माजातून त्यांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून वाटप करायचे खाद्यपदार्थ पुराग्रस्तांकडे फेकून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकाराबद्दल कर्नाटकसह संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे पुत्र असलेले एच. डी. रेवण्णा यांनी हासन जिल्ह्यातील रामनाथपूर येथे हा प्रताप केला आहे. या भागाला नुकताच पुराचा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर मंत्री रेवण्णा या भागातील पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी गेले होते. पूरग्रस्तांना भेटल्यानंतर त्यांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून वाटप करण्यासाठी आणलेले खाद्यपदार्थ व बिस्कीटपुडे चक्क त्यांच्याकडे फेकण्यास सुरूवात केली. विशेष म्हणजे या प्रकारे बिस्कीटपुडे फेकत असताना रेवण्णा यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव जणू एखाद्या जनावराला खाद्य खाऊ घालत असल्याप्रमाणे होते. या कृत्याचे व्हिडीओदेखील समाजमाध्यमांतून तसेच अनेक प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाले आहेत.
एकीकडे केरळसह दक्षिण भारतातील अनेक ठिकाणी पुराचा तडाखा बसला आहे. या भागाच्या मदतीसाठी सारा देश एकवटला असून आता या भागासाठी मदतीचा ओघही एखाद्या महापुराप्रमाणे सुरू झाला आहे. केरळसह दक्षिण भारताने या संकटातून सावरावे यासाठी संपूर्ण देशभरातून प्रार्थना केली जात आहे. असे असताना दुसरीकडे माजी पंतप्रधान तथा जनता दल सेक्युलरचे सर्वेसर्वा असलेले एच. डी. देवेगौडा यांचे पुत्र, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे बंधू आणि राज्य सरकारमधील मंत्री रेवण्णा यांनी हे असे अमानवी कृत्य केल्याने त्यांच्यावर कर्नाटकसह देशभरातून टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, रेवण्णा यांचे पुत्र प्रज्वल रेवण्णा यांनी आपल्या पित्याच्या या कृत्याबाबत माफी मागत आपले वडील घाईत असल्याने त्यांच्या हातून असे घडल्याचे सांगत सारवासारव केली.