मणिशंकर निलंबनाचे नाटक अन् सिद्धूची हिरोगिरी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2018   
Total Views |


 

मणिशंकर अय्यर असतील काय किंवा सिद्धूसारखे नेते, यांना आपण काय बोलतोय, कसे वागतोय, कोणाच्या कार्यक्रमाला हजेरी लावतोय त्याचे काहीही सोयरेसुतक नाही. मोदींसाठी अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या अय्यरांना काँग्रेसने आधी निलंबित केले आणि आता पुन्हा पक्षात सामावून घेतले, तर दुसरीकडे इमरान खानच्या शपथविधीला गेलेल्या सिद्धूने थेट पाकी लष्करप्रमुखाला मिठी मारली.
 
 

आपला पक्ष नैतिकता, साधनशुचिता पाळणारा पक्ष आहे,’ असा डांगोरा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पिटत असतात. ‘‘कोणाही व्यक्तीबद्दल आपण अनादराने बोलत नसतो,’’ असे राहुल गांधी म्हणत असले तरी त्यांच्या पक्षातील काही नेत्यांना ते मान्य नसल्याचे दिसून आले आहे. काहीही मागचा-पुढचा विचार करता ही मंडळी बोलत असतात आणि स्वत: तर अडचणीत येतातच, पण पक्षालाही अडचणीत आणतात. काँग्रेसचे असेच एक नेते मणिशंकर अय्यर यांचे नाव यामध्ये आघाडीवर आहे. ते नेहमीच काहीतरी वादग्रस्त बोलत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल त्यांनी मागील वर्षी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून त्यांच्यावर सर्वच स्तरांमधून तीव्र टीका झाली होती. पंतप्रधान मोदी यांची त्यांनीनीचअसा शब्द वापरून संभावना केली होती. लोकशाहीत भाषणस्वातंत्र्य असले तरी कोणाबद्दल वाट्टेल ते बोलण्याचा अधिकार कोणालाच नाही. पंतप्रधानांबद्दल बोलण्याचा तर नाहीच नाही, पण मणिशंकर अय्यर यांच्याकडे तेवढे तारतम्य नसल्याने त्यांच्या जिभेचा तोल सुटला आणि ते काहीही बरळत सुटले. त्यावेळी गुजरातमध्ये निवडणुका होणार होत्या. त्या निवडणुकीच्या तोंडावर अय्यर यांनी मुक्ताफळे उधळल्याने काँग्रेसची पंचाईत झाली. या विधानाचा फटका बसू शकतो, हे लक्षात घेऊन पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना माफी मागण्यास सांगितली, पण योग्य प्रकारे माफी मागितल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. आठ महिन्यांपूर्वी घडलेली ही घटना पुन्हा आठवण्याचे कारण म्हणजे, ज्या काँग्रेसने त्यांना निलंबित केले होते, त्याच पक्षाने आता त्यांच्यावरील निलंबन मागे घेतले आहे. आपल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी यांची पुन्हा मनापासून माफी मागितल्याचे तरी ऐकिवात नाही. मग निलंबन मागे कशाला घेतले? निलंबनाचे नाटक करण्याची काय आवश्यकता होती? त्यावेळी अय्यर यांचे वक्तव्य पक्षाला अडचणीचे ठरेल, असे वाटल्याने त्यांना पक्षाने दूर सारले. ‘आम्ही मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर,’ असलाच हा सर्व प्रकार होता, हे दिसून येते. राहुल गांधी हे आपणास वरिष्ठ नेत्यांबद्दल खूप आदर असल्याचे सांगतात, पण त्यांच्या पायाखाली काय जळत आहे, ते मात्र त्यांना दिसत नाही, असे कसे म्हणणार? जनतेची स्मरणशक्ती ही अल्पकाळ असते, असे म्हटले जाते. ते लक्षात घेऊन मणिशंकर अय्यर यांना, त्यांची सर्व पापकर्मे माफ करून पक्षाने पुन्हा काँग्रेसमध्ये सहभागी करून घेतले, हा याचा अर्थ! पण, निलंबनाची कृती आणि निलंबन मागे घेण्याचा निर्णय हा सर्व प्रकार निव्वळ नाटकबाजी आहे, हे जनतेने ओळखले आहे. वेळ आली की, आपली स्मरणशक्ती उत्तम असल्याचे हीच जनता काँग्रेससारख्या पक्षास दाखवून दिल्यावाचून राहणार नाही! काँग्रेसने मणिशंकर अय्यर यांना शुद्ध करून घेतल्याने आता पुन्हा ते बेताल बोलण्यास मोकळे झाले आहेत!

 

नवज्योतसिंग सिद्धू याची वादग्रस्त गळाभेट

 

आपल्या तोंडाची टकळी सतत चालू ठेवण्याबद्दल प्रसिद्ध असलेला राजकारणी म्हणजे काँग्रेसवासी झालेला माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू. पूर्वी भाजपचा खासदार असलेला हा क्रिकेटपटू काँग्रेसवासी झाला आणि आता तो अमरिंदरसिंह मंत्रिमंडळात मंत्री आहे. पाकिस्तानमध्ये इमरान खान या क्रिकेटपटूस पंतप्रधानपदाची शपथ देण्याच्या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण या महाशयांना देण्यात आले होते. काही भारतीयांनी ते निमंत्रण नाकारले, पण सिद्धू याने मात्र ते स्वीकारले आणि तो या सोहळ्यास उपस्थित राहिला. त्याने खरे म्हणजे त्या समारंभाला जायला पाहिजे होते की नाही, याबद्दल दुमत असू शकते. आपली सदैव कुरापत काढणारा, काश्मीरमध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे हिंसाचार घडविणाऱ्या पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांच्या शपथविधीला जायचेच कशाला? असे अनेकांना वाटले असेल. पण, सिद्धूमहाशय तिकडे गेले. त्या समारंभात पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची सिद्धू याने गळाभेट घेतली. ही गळाभेट सिद्धूमहाशयांना घ्यावीच कशी वाटली? ज्या लष्करप्रमुखाच्या इशाऱ्यावरून भारतावर सातत्याने हल्ले केले जात आहेत, त्या लष्करप्रमुखाची पंजाबचा एक मंत्री गळाभेट घेतो म्हणजे हद्दच झाली! नवज्योतसिंग सिद्धू याने हा जो आगाऊपणा केला, त्याची पंजाबमध्ये आणि उर्वरित भारतातही तीव्र प्रतिक्रिया उमटली. सिद्धूचा ज्या पंजाब मंत्रिमंडळात समावेश आहे, त्या राज्याचे मुख्यमंत्री, सिद्धूने जी कृती केली ती त्याला नक्कीच टाळता आली असती, असे म्हणतात. ‘ही भेट खटकणारी होती,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करून अमरिंदरसिंह म्हणाले, ‘‘सीमेवर भारतीय सैनिक दररोज मारले जात असताना सिद्धू यांनी अशी कृती करायला नको होती. अखेर लष्करप्रमुखच असे आदेश देत असतात आणि सैनिक फक्त त्या आदेशांचे पालन करीत असतात.’’ सिद्धू याने भारतात परतल्यानंतर या सर्व प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘‘मी पहिल्या रांगेत होतो आणि ते मला भेटायला आल्यानंतर त्यांना मी कसे टाळणार?,’’ असा त्याचा युक्तिवाद होता. ‘‘पाकिस्तानी लष्कराचे तीनही प्रमुख सर्वांना भेटत होते. तसेच बाजवा मला भेटले,’’ असे सिद्धू म्हणतो. ‘‘पहिली गोष्ट म्हणजे, ते प्रथम माझ्याकडे आले. ते चीमा, संधू आणि सिद्धू प्रमाणे जाट आहेत.’’ बाजवा म्हणाले की, ‘‘मी जनरल असलो तरी मलाही क्रिकेटपटू बनायचे होते. मला शांतता हवी आहे,’’ असेही त्यांनी मला सांगितले.

 
 

सिद्धू याने जी कृती केली, त्याचा सगळीकडून निषेध केला जात आहे. ज्या भाजपचा खासदार म्हणून सिद्धू मिरवत होता, त्या पक्षाने ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे झालेले निधन लक्षात घेऊन तरी त्याने हा दौरा रद्द करायला हवा होता. ‘आता माझा त्या पक्षाशी काय संबंध,’ असे या कृतीद्वारे वागून त्याने कृतघ्न वृत्तीच दाखविली. या शपथविधी समारंभात सिद्धू हा पाकव्याप्त काश्मीरचे अध्यक्ष मसूद खान यांच्या शेजारी बसला होता. कोठे बसायचे, हे त्याच्या हातात नसले तरी नकार देणे त्याच्या हातात होते. तो जर त्याने दिला असता तर सगळ्या देशाने त्याला उचलून घेतले असते. वाजपेयी १९९९ मध्ये बसमधून पाकिस्तानात नवाझ शरीफ यांना भेटण्यास गेले होते, पण त्यानंतर आता २०१८ पर्यंत पाकिस्तान कसे वागत आला आहे, हे सिद्धू याला माहीत नव्हते काय? त्याला काँग्रेस पक्षाने पाकिस्तानात जाण्यास परवानगी कशी काय दिली? सिद्धूने पाकिस्तानात जाऊन आणि त्यांच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेऊन देशवासीयांची नाराजी मात्र ओढवून घेतली आहेमणिशंकर अय्यर काय किंवा नवज्योतसिंग सिद्धू काय, हे दोघेही काँग्रेसच्याच माळेचे मणी आहेत म्हटल्यावर अधिक काय बोलणार?

@@AUTHORINFO_V1@@