अटलजींच्या संपूर्ण जीवन प्रवासात त्यांच्यावर हावी होत होता, तो त्यांच्यातील संवेदनशील कवी. त्यांच्या जीवन प्रवासाकडे पाहिल्यावर हे स्पष्ट होते की, त्यांच्या संपूर्ण राजकीय-सामाजिक जीवनात संवेदनशील कवी या रूपात त्यांना जी दृष्टी मिळाली होती, त्या संवेदनशील कवित्वानेच त्यांना ‘राष्ट्ररत्न अटलजी’ या व्यक्तित्वापर्यंत पोहोचविले. यावर टाकलेला एक दृष्टिक्षेप...
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, हे वृत्त कानाला स्पर्श करीत होते, पण मनाला विश्वास होत नव्हता. कारण अटलजी आमच्या दृष्टीने महान व्यक्तित्व होते. महान व्यक्तित्व मरत नसतात तर आपल्या कर्तृत्वाच्या बळावर काळासोबत त्यांचे नाव राहत असते. अटलजींच्या राष्ट्रसमर्पित जीवनयात्रेचा प्रवास पाहात असताना विविध अंगाने रंगलेले अटलजी लक्षात येतात. समर्थ कवी, समर्थ राजनेता, जनन्मान्य नेता, कणखर नेतृत्व, समर्थ वक्तृत्वाचे धनी असे अनेक भाव त्यांच्या व्यक्तिमत्वात होते. अटलजींच्या संपूर्ण जीवन प्रवासात त्यांच्यावर हावी होत होता, तो त्यांच्यातील संवेदनशील कवी. त्यांच्या जीवन प्रवासाकडे पाहिल्यावर हे स्पष्ट होते की, त्यांच्या संपूर्ण राजकीय-सामाजिक जीवनात संवेदनशील कवी या रूपात त्यांना जी दृष्टी मिळाली होती, त्या संवेदनशील कवित्वानेच त्यांना ’राष्ट्ररत्न अटलजी’ या व्यक्तित्वापर्यंत पोहोचविले.
अटलजींचे जीवन एक आंतर्द्वंद्व आणि त्याच्या आधारे चालविलेल्या जीवनयात्रेचा स्वाभाविक परिणाम आहे. त्यांच्या या आंतर्द्वंद्वस एका रचनेतून अनुभवता येऊ शकते. ’नवनीत’च्या १९६३ च्या डिसेंबर महिन्यातील अंकात ‘राजनीति की रपटीली राह में’ या शिर्षकात प्रकाशित झाले आहे. जे अटलजींच्या मूळ शब्दांतच मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. “मेरी सबसे बड़ी भूल है राजनीति में आना इच्छा थी कि कुछ पठन-पाठन करूंगा- उससे जुड़े व्यवसाय की पारिवारिक परंपरा को आगे बढाऊंगा, अतीत से कुछ लूंगा और भविष्य को कुछ दे जाऊंगा।” परंतु राजनीति की रपटीली राह पर कमाना तो दूर रहा, गांठ की पूंजी भी गंवा बैठा मन की शांति मर गई। संतोष समाप्त हो गया। एक विचित्र सा खोखलापन जीवन में भर गया। सत्ता का संघर्ष प्रतिपक्षियों से ही नहीं, स्वयं अपने दलवालों से हो रहा है। पद और प्रतिष्ठा को कायम रखने के लिए जोड़-तोड़, सांठ-गांठ आवश्यक है। निर्भीकता और स्पष्टवादिता खतरे से खाली नहीं है। आत्मा को कुचल कर आगे बढ़ा जा सकता है। स्पष्ट है, सांप-छछूंदर जैसी स्थिति हो गई है, न निगलते बनता है, न उगलते बनता है।” ज्यांना अटलजींच्या अंतर्मनाची थोडीबहुत जाणीव आहे, ते अटलजींच्या या रचनेला समजू शकतात. या अंतर्द्वंदानेच अटलजींना राजनीतीत कायम जागृत ठेवले. या अंतरद्वंदानेच त्यांना मानवीय चेतनेबरोबर सदैव जोडून ठेवले होते. खरं म्हणजे राजनेता अटलजींच्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा म्हणजे त्यांचे कवी असणे, हेच आहे. ते मनातील या द्वंदामुळेच कवी होते. वर्तमान राजनीतीत एका कवी हृदयाच्या व्यक्तीने देशाच्या उच्च पदापर्यंत पोहोचणं, ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे. अटलजींचा एक संघ स्वयंसेवक ते देशाचे पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास, जनसंघपासून भारतीय जनता पक्षापर्यंतचा प्रवास, एकात्म मानववादी, आदर्शवादाप्रती समर्पित अटलजींनी परराष्ट्र मंत्र्यांच्या रूपात राजनैतिक पटलावर कार्य करणं हेच त्यांच्या कर्मठतेचे प्रतीक आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेच्या वेळी आपल्या भाषणात त्यांनी हा मंत्र देऊन कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास निर्माण केला होता की, “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा।” त्यांचा हा विश्वास शत-प्रतिशत खरा ठरलेला आहे. दोन वेळा भाजप सरकार देशात स्थापित झाले आणि परिवर्तनाची एक लहर उठली.
अटलजींच्या अंतर्मनात अस्तित्वात असलेल्या कवीनेच त्यांना राजनेता म्हणून या प्रवासात ‘सत्यम्, शिवम्, सुंदरम्’ या मार्गावरून कधीही विचलित केले नाही. राजनेता अटलजींचे चैतन्याने बहरलेले व्यक्तित्व म्हणजे कवितेने भारतीय राजकारणाला दिलेला एक उपहारच आहे. राजकारण हे काजळीचं कोठार असते आणि यात येणार्या प्रत्येकाला काळवंडून टाकण्यात राजकारण कोणतीही कसर सोडत नाही. ही स्थिती कोणत्याही एका पक्षाची नाही, ही सर्वत्र असलेली दलदल आहे. परंतु आश्चर्य तेव्हा होते, जेव्हा एखाद्या नेत्याची त्याचे विरोधकही स्तुती करतात. अटलजी या प्रकारातील तेजःपुंज तारा होते. १९३९ साली अटलजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. १९४६ ला ते प्रचारक बनले. जेव्हा त्यांना म्हटले जात असे की “तुम्ही श्रेष्ठ आहात, पण तुमच्या मातृसंस्थेत गडबड आहे,” तेव्हा अटलजींचे उत्तर असे, “वृक्ष खराब आहे आणि फळ चांगले आहे, हे कधीही होऊ शकत नाही. माझ्या मित्रांनो! मी जे काही आहे ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या माझ्या मातृसंस्थेमुळेच आहे. याच संघ निष्ठेतूनच त्यांच्या हृदयातून एक कविता झंकृत झाली. “हिंदू तन-मन, हिंदू जीवन; रग-रग हिंदू मेरा परिचय”. अटलजींच्या ओजस्वी भाषणांतले केवळ त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते प्रेरित होत नसत तर सर्व जनमानस प्रभावित होत असे. अटलजींच्या भाषणात शालीनता आणि शब्दांची मर्यादा यांचं असं विलक्षण मिश्रण असे की विरोधकही त्यांचे मित्र होत. त्यांनी संसद भवनात केव्हाही चुकीच्या शब्दांचा उपयोग केला नाही. जेव्हा अटलजी बोलत तेव्हा, पंतप्रधान नेहरूजी त्यांचे भाषण लक्ष देऊन ऐकत. आपल्या भाषणासंदर्भात अटलजी म्हणत, “माझ्या भाषणात माझ्यातील लेखक, कवीमन बोलते, परंतु राजनेताही गप्प राहत नाही. माझ्यातील राजनेता माझ्यातीलच लेखक आणि कवीसमोर विचार मांडतो आणि माझ्या आतील वक्ता त्या विचारांना अभिव्यक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. माझ्यातील राजनेता आणि कवी- लेखक यांच्यातील परस्पर समन्वय ही माझ्या भाषणात दिसून येते. माझ्या आतील सद्हृदयी कवी राजनेता अटल बिहारी वाजपेयींना कोणत्याही मर्यादेचं उल्लंघन करू देत नाही.” वाजपेयींच्या जिव्हेतून साक्षात सरस्वती बोलत आहे. या गोष्टीला पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूनींही स्वीकार केले आहे. अत्यंत शालिनतेने आपला विषय ठेवून विरोधी मंडळींनाही आपले मित्र बनविणारे विराट व्यक्तित्वाचे स्वामी अटल बिहारी वाजपेयीजी नेहमी जमिनीशी जोडलेले राहिले. ते भारतीय जनतेची नाडी उत्तम पद्धतीने जाणत होते. अशी उंची त्यांना अपेक्षित नव्हती, जी मुळापासून स्वत: ला वेगळे करेल. त्यासाठी ते म्हणतात.....
“मुझे इतनी उंचाई कभी मत देना
गैरों को गले न लगा सकू
इतनी रूखाई कभी मत देना।”
आणीबाणीच्या दरम्यान भारतीय लोकशाहीलाच बंदी बनविले गेले होते. १९७७ च्या निवडणुकीत संधी मिळताच भारतीय जनतेने इंदिरा गांधींच्या तानाशाही सरकारला उखडून फेकले, परंतु जनता पक्षाचा प्रयोग अयशस्वी ठरला. काही लोकांची महत्त्वाकांक्षा आणि एका वर्गाच्या वैचारिक ढोंगामुळे सर्व प्रयत्न संपुष्टात आले. तेव्हा अटलजीच होते, ज्यांनी मोकळ्या मनाने याचा स्वीकार केला.
“क्षमा करो बापू, तुम हमको
बचन भंग के हम अपराधी
राजघाट को किया अपावन
मंजिल भूले, यात्रा आधी
जयप्रकाशजी, रखो भरोसा
टूटे सपनों को जोड़ेंगे
चिताभस्म की चिंगारी से
अंधःकार के गढ़ तोड़ेंगे।”
आणि इतिहास साक्षी आहे. अटलजींच्या नेतृत्वात बनलेल्या सरकारनेच जागतिक महाशक्ती असलेल्या देशांचा दबाव झिडकारून भारताला एक सशक्त परमाणू संपन्न राष्ट्र बनविले. देशात स्वच्छ आणि सुशासनाने युक्त राजकारणाचा प्रारंभ अटलजींनी केला. अटलजींचे कुशल नेतृत्व भारतीय जनता कधीही विसरणार नाही. मे १९९८ मध्ये पोखरणमधील परमाणू विस्फोट आणि १९९९ च्या मे-जून मधील कारगील युद्ध. कारगील युद्धाच्यावेळी अटलजींनी आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीचा परिचय जगाला दिला होता. राष्ट्रहिताला सर्वतोपरी मानून महासत्तांना त्यांची जागा दाखवून दिली. अणुस्फोटाच्या चाचणीनंतर जे तुफान उठले होते, त्याने देशाच्या सार्वभौमत्वावर कोणतीहीं झळ येऊ न देता ज्या पद्धतीने देशावर आलेले वादळ शांत केले, त्या अटलजींच्या चमत्कारिक राजनैतिकतेने सर्व भारतीय अवाक् झाले होते. यापूर्वी इंदिरा गांधींच्या शासन काळात अशा पद्धतीच्या अणुचाचणीची पूर्वतयारी झाली होती, पण अमेरिकेच्या दबावामुळे इंदिरा गांधी चाचणी करू शकल्या नव्हत्या. अटलजींनी राष्ट्रहित सर्वोपरी मानून जे अशक्य ते शक्य केले होते. अटलजी पाकिस्तानसोबत मैत्रीपूर्व संवाद करण्याचा प्रयत्न करीत होते. लाहोर बससेवा व अन्य वाटाघाटी हे त्यांचे प्रतीक होते, परंतु पाकिस्तानने त्यांच्या स्वभावानुसार पाठीत खंजीर खुपसला आणि भारतावर कारगील युद्ध लादले. अटलजींनी यावेळी आरपारची लढाई लढण्याचा निर्णय केला होता. कारगील युद्धात आपला पराभव होत आहे, हे लक्षात येताच पाकिस्तानने अमेरिकेसमोर गुडघे टेकून पाकिस्तानला वाचविण्याची याचना केली. त्यावेळच्या अमेरिकन राष्ट्रपतींनी अटलजींना वाटाघाटीसाठी चर्चेचे निमंत्रण दिले होते, परंतु अटलजींनी अमेरिकेचे निमंत्रण नाकारले होते. कोणत्याही समझोत्याकरिता अटलजी गेले नाहीत, तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी पाकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधानांना समज दिली होती की, “आता तुमचा सामना भारताच्या अशा पंतप्रधानाशी आहे, जो कोणाच्या पुढे झुकणार नाही.” शेवटी पाकिस्तानला कारगीलमधून पळ काढावा लागला होता. वॉशिंग्टनमध्ये बसलेल्या ’जगाच्या शहेनशहा’ला ही गोष्ट लक्षात आली की सौम्य, मितभाषी कवी, हृदयाचे अटलजी वास्तवात एक अढळ पर्वताप्रमाणे अटल आणि दृढनिश्चयी आहेत. राजकीय जीवनात असफलतेकडून सफलता आणि शून्यातून शिखराकडे, असे अनेक अनुभव अटलजींनी घेतले आहेत.
परंतु त्यांनी आपली वाणी आणि व्यवहारात कधीही मर्यादेचं उल्लंघन केले नाही. कार्यकर्त्यांना ते सागंत की, “आपला पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, जे नेता आहेत ते कधीतरी कार्यकर्ता होते. पक्षाचे संघटनात्मक कार्य कुशलतेने चालविण्यासाठी अशा प्रकारचे कार्य विभाजित केले जाते. जे वेगवेगळ्या दायित्वात रूपांतरित होते. आपण केवळ विजयी होण्यासाठी येथे नाही आहोत. कारण जय-पराजय तर होतच राहतील, पण पराभव आपला मार्ग बदलू शकणार नाही आणि विजय आपल्याला मार्गभ्रष्टही करू शकणार नाही कारण आपण राष्ट्रहिताच्या भट्टीत तयार झालेल्या विटांप्रमाणे आहोत.” १९९४ मध्ये सर्वश्रेष्ठ संसदपटूचा सम्मान अटलजींना प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी जे भाषण केले होते, त्या भाषणातील एक-एक शब्द लोकशाही आणि संस्कृतीप्रेमी भारतीयांसाठी मैलाचा दगड ठरणारा आहे. त्यांनी सांगितले की, “मी माझ्या मर्यादांशी मी परिचित आहे. मला माझ्यातील कमतरतेची जाणीव आहे. निर्णायक जनतेने मला येथे संसदेत निवडून दिले आहे. ती निवड करताना त्यांनी माझ्यातील न्यूनतेला नजरअंदाज केलेले आहे. हा देश अद्भुत आहे आणि अनोखाही. येथे कोणत्याही दगडाला शेंदूर फासून प्रणाम करतात. लोकशाही हा काही खेळ नाही. लोकशाही ही एक नैतिक व्यवस्था आहे. संविधान आणि न्यायपालिकेचेही स्वतःचे एक महत्त्व आहे, परंतु लोकशाही एक ढांचा बनून राहिली आहे. ती एका कर्मकांडात जर परिवर्तित झाली तर, मोठी समस्या निर्माण होईल. अशाने लोकशाहीच्या प्राणशक्तीचा र्हास होईल. त्या प्राणशक्तीचा र्हास होऊ देऊ नये, हीच आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हेच कारण आहे की, अटलजी आपल्या जीवन प्रवासात एक आश्चर्य बनले होते. प्रत्येक नेतृत्व त्यांच्या आचरणातून तयार होणार्या मापदंडाच्या कसोटीवर मापले जाते. अटलजी आपल्या प्रत्येक कृतीतून, कार्यातून संपूर्ण जगात आपली मातृसंस्था राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या विचारधारेचा जणू परिचयच देते होते. अटलजी राजकारणात येणे, हे ते स्वतः आपले अपुरेपण मानत होते. परंतु सत्य काही वेगळेच आहे. सत्य हे आहे की, ते राजनेता होते, कवी होते. तरीही ते स्वत:मध्ये अपुरेपणाचा अनुभव करीत होते. हाच विचार त्यांच्या जीवनाची सत्यता तसेच एक मोठी पुंजी होती. त्यांच्या याच वास्तविक विचाराने आपल्याला परिपूर्ण समजणारी अनेक व्यक्तित्वं अटलजींसमोर खुजी ठरली. अटलजींचा हा विचार फक्त विनम्रता नव्हती तर, एक इमानदारीचा विश्वास होता. देशाला स्वाभिमानी राष्ट्र बनविण्यात जनसामान्यांमध्ये जे अपुरेपण होते, त्याचा हा एकप्रकारे संकेतच होता. याच चिंतनाला अटलजी आपल्या भाषणात कवी हृदयातील पीडेने प्रस्तुत करीत असत. यामुळेच देशातील सामान्य नागरिक अटलजींच्या श्वासामध्ये आपल्या हृदयातील ठोक्यांचा ताल अनुभवत असे. अटलजींच्या भाषणात, लेखनात आणि कवितांमध्ये क्लिष्टता कधीही नव्हती. पूर्ण निरपेक्षतेने जनसामान्यांसोबत त्यांच्याच भाषेत संवाद करण्याची अटलजींची ही एक आराधना होती. जेव्हा भारतातील पूर्व पंतप्रधानांच्या यश-अपयश आणि त्यांच्या उपलब्धींचे विश्लेषण होईल तेव्हा इतिहासात अटलजींचे कार्यकर्ता ते पंतप्रधानपदापर्यंतचा संपूर्ण प्रवास सुवर्णाक्षरांत लिहिला जाईल. अटलजींनी पंडित नेहरुजींच्या समाजवादी अर्थव्यवस्थेला नरसिंह रावांनंतर विसर्जन करून टाकले आणि उदारमतवादीमुक्त अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून उदयोन्मुख सक्षम भारताचा पाया तयार केला. कवी अटलजींनी आपल्या चिंतनातून देशाचेही चिंतन केले. याकरिता हा भारत देश अटलजींचा सदैव ऋणी राहील आणि भारतमातेच्या सच्चा सुपुत्राच्या रूपात सदैव त्यांना स्मरण करीत राहील.
- अमोल पेडणेकर