ते पंधरा दिवस : १५ ऑगस्ट, १९४७

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2018   
Total Views |





आज भारत मुळी झोपलेलाच नाहीये. दिल्ली, मुंबई, कलकत्ता, मद्रास, बंगलोर, लखनऊ, इंदूर, पाटणा, बडोदे, नागपुर..... किती म्हणून नावं घ्यावी. अक्षरशः काल रात्री पासून, देशाच्या कानाकोपऱ्यात जल्लोष आहे. आणि म्हणुनच या पार्श्वभूमीवर, काल आणि आजचा, पाकिस्तान मधे दिसून आलेला निरुत्साह, डोळ्यात भरतोय..!

 

रात्रभर शहरात फिरून, स्वातंत्र्याचा आनंद व्यक्त करणारे सर्व, आपापल्या घरी पोहोचले आहेत. आता त्यांना प्रतीक्षा आहे ती वर्तमानपत्रांची. या स्वातंत्र्यसोहळ्याचं वर्णन त्यांनी कसं केलं असेल..? मात्र आज वर्तमानपत्र जरा उशिराच आले. कारण प्रत्येकाला मध्यरात्रीची बातमी छापायची होती. प्रत्येकाने आज आठ कॉलम चा मथळा दिलेला आहे.

 

दिल्लीच्या ‘हिंदुस्थान टाइम्स’ चे शीर्षक आहे – India Independent : British Rule Ends.
कलकत्त्याच्या ‘स्टेट्‍समन’ ने शीर्षक दिलंय – Two Dominions are Borne.
दिल्लीच्या ‘हिंदुस्थान’ ने भला मोठा मथळा लावलाय – ‘शताब्दियों की दासता के बाद, भारत में स्वतंत्रता की मंगल प्रभात’.
मुंबई च्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ने शीर्षक लावलंय – Birth of India’s Freedom.
कराची हून निघणाऱ्या ‘डॉन’ ने लिहिलंय – Birth of Pakistan – an Event in History.

____ ____ ____ ____

कलकत्ता सुध्दा रात्रभर जागं होतं. लोकांना स्वातंत्र्याचा अनुभव पुरेपूर घ्यायचा होता. मात्र एक फार मोठा चमत्कारिक बदल शहरात जाणवतोय. कुठेही हिंदू – मुस्लिम तणावाचा लवलेश ही नाही. अवघ्या दोन – तीन दिवसांपूर्वी पर्यंत जे हिंदू आणि मुसलमान, एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्याच्या मागे होते, तेच आता गळ्यात गळे घालून फिरताहेत. शहरात हिंदू – मुस्लिम ऐक्याच्या जोरदार घोषणा दिल्या जाताहेत. आणि या जादुई चमत्काराचं निःसंशय श्रेय आहे, ते बेलियाघाट मधे, हैदरी मंझील सारख्या सुमार घरात वस्तीला असलेल्या गांधीजींचं..!

 

हैदरी मंझील हे सध्या कलकत्त्याचं तीर्थक्षेत्र झालेलं आहे. काल पासून लोकांचे जथ्थे च्या जथ्थे, दुरूनच का होईना, पण गांधीजींचे दर्शन घ्यायला येताहेत. आजही तसंच दृश्य राहील, अशी चिन्हं आहेत.

 

गांधीजींसाठी आजचा दिवस नेहमी सारखाच, सर्वसामान्य असा उगवला होता. रोजच्याप्रमाणे पाहटे तीन वाजता त्यांना जाग आली. आजच्या त्यांच्या कामात, शौचकुपाची सफाई हे काम देखील त्यांनी जोडलं होतं. ते सर्व करून, गांधीजी रोजच्या सारखेच फिरायला निघाले. आज ते दिवसभर उपास करणार होते आणि अधिकांश वेळ सूत कताई करणार होते..!

____ ____ ____ ____

 

सिंगापुर.

 

भारतात सकाळचे साडे आठ वाजत असताना, तिकडे दूर सिंगापुरात सकाळचे अकरा वाजताहेत. ऑर्चर रोड, वाटरलू स्ट्रीट, सेरंगून रोड इथे भारतीय समुदायाने, भारताच्या स्वातंत्र्या प्रीत्यर्थ, मोठमोठे ध्वजवंदनाचे कार्यक्रम ठेवले आहेत.

या कार्यक्रमासाठी राष्ट्रगीत कुठले असेल, या बाबत सध्या संभ्रम आहे. आणि म्हणून, सिंगापुर च्या भारतीयांनी हे गीत, राष्ट्रगीत म्हणून म्हणायला सुरुवात केली आहे –


सुधा, सुख चैनकी बरखा बरसे
भारत भाग हैं जागा I
पंजाब, अवध, गुजरात, मराठा
द्रविड़, उत्कल, बंगा
चंचल सागर, विन्ध हिमाला
नीला जमुना गंगा
तेरे नित गुण गाये
तुझसे जीवन पायें
सब तन पाये आशा
सूरज बनकर जग पर चमके
भारत भाग हैं जागा II
जय हो, जय हो, जय हो, जय जय जय जय हो...!

____ ____ ____ ____

 

कलकत्ता. बेलियाघाट.

 

सकाळचे ९ वाजताहेत. भारत शासनाच्या ‘सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचे’ अधिकारी, आपली उपकरणं घेऊन गांधीजींची प्रतिक्रिया घेण्यास आलेले आहेत. मात्र गांधीजींचं उत्तर सपाट आहे – “माझ्या जवळ सांगण्या सारखं काहीच नाहीये.”. परत जेंव्हा त्यांना आग्रह करण्यात आला की ‘तुम्ही बोलले नाहीत, तर ते बरं दिसणार नाही..’, तेंव्हा ही गांधीजींचं तेच सरळ – सपाट उत्तर आहे, “माझ्या जवळ कसलाच संदेश नाही. हे बरं दिसणार नसेल, तर तसं..!”

काही वेळाने बी. बी. सी. चे प्रतिनिधी आले. यांचं प्रसारण जगभर ऐकलं जाणार होतं. मात्र त्यांनाही गांधीजींनी तेच उत्तर दिलं.

____ ____ ____ ____

 

 
 
 
दिल्ली. व्हॉइस रिगल पॅलेस.

 

पूर्वीच्या व्हॉइसरॉय लोकांचं निवासस्थान. राजप्रासाद. आज मात्र ते गव्हर्नमेंट हाऊस झालेलं आहे. आणि भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, लॉर्ड माउंटबेटन आज येथेच शपथ घेणार आहेत.
 

ह्या गव्हर्नमेंट हाऊस चा भला मोठा दरबार हॉल, आजच्या प्रसंगासाठी सज्ज झालाय. सकाळची वेळ असूनही, आतील एकूण एक दिवे, झुंबरं प्रकाशमान केलेली आहेत.

 

बरोबर नऊ वाजता औपचारिक कार्यक्रम सुरु झाला. चांदीच्या तुतारीने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. पाठोपाठ शंखध्वनी झाला. ह्या व्हॉइसरॉय हाऊस ने, त्याच्या जीवनातला पहिलाच तुतारीचा आवाज आणि शंखध्वनी ऐकला.

 

नवीन मुख्य न्यायाधीश, सर हरीलाल जयकिशनदास कनिया यांच्या समोर कडक पोशाखातले माउंटबेटन उभे राहिले. त्यांनी बायबल चा मुका घेतला आणि शपथेचा उच्चार केला. दरबार हॉल, मंत्री, कॉंस्टीट्युएंट असेंब्ली चे सदस्य, आणि अधिकारी यांनी भरून गेलेला आहे. नेहमी अशा प्रसंगी उपस्थित राहणारे राजे – राजवाडे, आज मात्र अनुपस्थित आहेत.

____ ____ ____ ____

 

कलकत्ता. बेलीयाघाट
 

सकाळी ८ वाजता गांधीजींनी, त्यांच्या ब्रिटीश मैत्रीण, मिस अगाथा हेरीसन हिला, सूत कताई करता करता पत्र डिक्टेट केलं. त्यात त्यांनी गमतीनं लिहिलं, ‘तू राजाजींमार्फत पाठविलेलं पत्र मिळालं. अर्थात राजाजींना ते स्वतः येऊन देणं शक्यच नव्हतं. कारण काल रात्रीपासून त्यांच्या गव्हर्नर हाऊस मधे सर्वसामान्य माणसं जमा झालेली आहे, इंग्रजांचं घर पाहायला..!’

 

यानंतर गांधीजींनी पश्चिम बंगाल च्या नवनियुक्त मंत्र्यांना पत्र डिक्टेट केलं. यात प्रामुख्यानं त्यांनी त्यांची आवडती तत्वं, ‘सत्य, अहिंसा आणि नम्रता’ यांचे पालन करण्याचा आग्रह केला. सत्तेबद्दल गांधीजींनी इशारा देताना म्हटलं, “लक्षात ठेवा, सत्ता भ्रष्ट करते. विसरू नका, तुम्ही गरिबांची सेवा करण्यासाठी येथे आलेला आहात.”

 


कलकत्त्याच्या हैदरी मंझील येथे, गांधीजींना भेटायला आलेले, पश्चिम बंगाल चे गव्हर्नर, चक्रवर्ती राजगोपालाचारी. 
 

थोड्या वेळाने, अर्थात सकाळी दहा वाजेच्या सुमारास, पश्चिम बंगाल चे नवनियुक्त गव्हर्नर, चक्रवर्ती राजगोपालाचारी, गांधीजींना भेटायला आले.

 

ही भेट फार हृद्य होती. स्वातंत्र्यासाठी संघर्ष केलेल्या दोन तपस्वींची ही भेट...!

 

भेटताच, राजाजींनी म्हटलं, “बापू, अभिनंदन. तुम्ही कलकत्त्यात अक्षरशः जादू केलीत..” मात्र गांधीजींचं उत्तर काहीसं वेगळं होतं. ते म्हणाले, “पण मी समाधानी नाही. जेंव्हा पर्यंत ते आपापल्या, दंग्यांनी होरपळलेल्या घरांमध्ये परत जात नाहीत, तेंव्हा पर्यंत काही झालंय असं वाटतंच नाही.”

 

राजाजींनी त्यांना काल रात्रीच्या कार्यक्रमाचे किस्से सांगितले. गांधीजींचा उपास होता. त्यामुळे काही खाण्याचा प्रश्नच नव्हता. सुमारे तासाभराने राजाजी परत निघाले.

____ ____ ____ ____

 

मुंबई. दादर. सावरकर सदन.
 

सकाळ पासून तात्याराव (अर्थात विनायक सावरकर) काहीसे खिन्न आहेत. त्यांनी काहीही खाल्लेलं नाही. ही खंडित भारताची भावना त्यांना खूप आतवर दुखावून गेली आहे. अत्यंत दुर्बल लोकांच्या हाती आपण देश सोपवतोय, असं त्यांना मनापासून वाटतंय.

 

तरीही स्वातंत्र्याचा आनंद आहे. ते स्वातंत्र्य, ज्याच्यासाठी दोन, दोन काळ्या पाण्याच्या शिक्षा भोगल्या. पंधरा वर्षांची स्थानबद्धता भोगली. समुद्राच्या त्या अथांग पाण्यात उडी टाकली. अंदमानातली ती काळी कोठडी सहन केली. कोल्हुच्या चरकातून तेल काढलं... ते स्वातंत्र्य..!

 

दहा वाजत आलेले आहेत. हिंदू महासभेचे अनेक कार्यकर्ते तात्यारावांना भेटायला आलेले आहेत. त्या सर्वांच्या उपस्थितीत, क्रांतिवीर विनायक दामोदर सावरकरांनी दोन ध्वज उभारले. एक – भगवा. अखंड हिंदुस्थानाचं प्रतिक म्हणून. आणि दुसरा, भारताचा राष्ट्रध्वज – तिरंगा. या दोन्ही ध्वजांना पुष्प अर्पित करून, तात्याराव काही वेळ स्तब्ध उभे राहिले.

____ ____ ____ ____

 


 
 
स्वातंत्र्याची पहिली सकाळ... दिल्लीच्या गव्हर्नर हाऊस च्या परिसरात दिसून आलेला लोकांचा उत्साह...! 
 
दिल्ली. कौन्सिल हाउस.

 

सकाळचे साडे दहा वाजताहेत. अधिकृत रित्या भारताचा राष्ट्रध्वज म्हणून ‘अशोक चक्रांकित तिरंगा’ फडकविण्याचा शासकीय कार्यक्रम आहे. व्हॉइस रिगल पॅलेस मधून, शपथ घेतलेले सर्व मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि कॉंग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते कौन्सिल हाऊस कडे यायला सुरुवात झालेली आहे. कार्यक्रम छोटा आणि साधासाच आहे. थोड्याच वेळात नेहरू राष्ट्रध्वज फडकवतील.
 

मात्र, या टेकडीवर असलेल्या, गोलाकार आकाराच्या कौन्सिल हाउस च्या अवती भवती मोठ्या संख्येने लोकं जमा झालेली आहेत. स्वतंत्र भारताचे नागरिक आहेत हे सर्व. इंग्रजांच्या काळात सामान्य भारतीयाला येथे प्रवेश नव्हता. आता मात्र तसं नाही. म्हणून, आनंद, कुतूहल, उत्साह, जल्लोष या सर्व भावनांच्या संमिश्र गोंधळात ही माणसं ‘वंदे मातरम’ च्या घोषणा देताहेत. गांधी आणि नेहरूंचा जय जयकार करताहेत. काय करू अन काय नाही, असं त्यांना झालंय.

 

नेहरू येतात. त्यांचे मंत्रिमंडळाचे सहकारी सुध्दा त्यांच्या बरोबर आहेत. एडविन लुटीयन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी बांधलेल्या, टेकडी वरच्या ह्या कौन्सिल हॉल मधे, पहिल्यांदाच तिरंगा फडकविला जातोय. अजून राष्ट्रगीत ठरलेलं नाही. त्यामुळे लोकांनी वंदे मातरम चा जयजयकार करून आसमंत दणाणून टाकलं...!

____ ____ ____ ____

 

लाहौर.

 

डी. ए. व्ही. कॉलेज. दुपारचे दोन वाजताहेत.
 

कॉलेज च्या परिसरात आणि हॉस्टेल मधे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संचालित केलेले ‘पंजाब सहायता समिती’ चे शरणार्थी शिबिर आहे. लाहौर मेडिकल कॉलेज मधले स्वयंसेवक डॉक्टर्स, विद्यार्थी, काही महिला डॉक्टर आणि नर्सेस मिळून हे वीस खाटांचं, एक लहानसं हॉस्पिटल चालवताहेत. साऱ्या पश्चिम पंजाब मधून हिंदू आणि शीख, आपली घर – गृहस्थी, शेती – वाडी, दुकान, कारखाने यांच्यावर पाणी सोडून, सर्वस्व गमावलेल्या अवस्थेत, या शिबिरात पोहोचताहेत.

 

काल रात्रीपासून, संपूर्ण हिंदुस्थान स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करत असताना, येथे परिस्थिती फारच भयंकर झालेली आहे. हिंदू – शिखांचे अनेक जथ्थे, कसाबसा आपला जीव वाचवून, या शिबिरात पोहोचत आहेत. त्या सर्वांच्या कहाण्या, ह्या अक्षरशः सुन्न करणाऱ्या आणि त्याच वेळेस प्रचंड चीड आणणाऱ्या आहेत. अनेकांच्या बहि‍णींना, बायकांना, त्या मुस्लिम गुंडांनी उचलून नेलंय. तर काहींच्या बायकांनी विहिरीत उड्या टाकल्या आहेत.

 

रोज बरोबर दीड वाजता कुलवंत सिंह, ह्या लहानश्या हॉस्पिटल मधल्या रुग्णांसाठी आणि डॉक्टर, नर्सेस साठी जेवण आणतो. हे जेवण लाहौर च्या ‘भाटी गेट’ ह्या हिंदू मोहोल्ल्यात, संघाचे काही स्वयंसेवक तयार करतात. मात्र गेल्या तीन – चार दिवसांपासून हे ही कठीण होत चाललंय.

आज सव्वा दोन / अडीच वाजले तरी ‘कुलवंत सिंह कां आला नाही’, म्हणून बघायला दीनदयाल हा स्वयंसेवक गेला. दीनदयाल हा संघाचा, एका भागाचा कार्यवाह आहे. अर्ध्या वाटेवर त्याला काही लोकं दिसले. हा जवळ जाऊन बघतो, तर भर रस्त्यात कुलवंत सिंह रक्ताच्या थारोळ्यात पडलाय. शेजारीच त्याची मोटार सायकल ही आडवी पडलीय. आणि त्या मोटार सायकलला बांधलेल्या डब्ब्यांमधून भाजीच्या रस्स्याचे ओघळ, त्याच्या पसरलेल्या रक्तात मिसळले जात आहेत...!

दिल्लीत मंत्र्यांनी दरबार हॉल मधे शपथ घेण्याचा कार्यक्रम चालू असताना, बेलियाघाट, कलकत्त्यात गांधीजी ‘मुसलमानांना सुरक्षित राहू द्या’, असं पत्र मंत्रिमंडळाला लिहित असताना, लाहौर मधे, मुस्लिम गुंडांनी, जखमी हिंदू – शीख रुग्णांना जेवण पोहोचविणाऱ्या, संघ स्वयंसेवक, कुलवंत सिंहाला, भर रस्त्यात, भर दुपारी, चाकूने भोसकून ठार मारले...!

____ ____ ____ ____

 

दिल्ली. इंडिया गेट वरील मैदान.

 

सार्वजनिक रित्या तिरंगा फडकविण्याचा एक भव्य कार्यक्रम आयोजित केल्या गेलेला आहे. लोकांनी मैदान अक्षरशः तुडूंब भरलंय. पावसामुळे, कुठे कुठे चिखल आहे. तरीही लोकांना त्याचे काहीच नाही. उत्साह आणि जल्लोष शिगेला पोहोचलाय...

बरोबर साडे चार वाजता नेहरू तिरंगा फडकवतात. नुकताच पाऊस पडून गेलेला आहे. आणि तिरंगा, आकाशात वर वर जात असतानाच, तिरंग्याच्या मागे, एक सुंदर इंद्रधनुष्य दिसू लागतं.. अक्षरशः मंत्रमुग्ध व्हावे, असे दृश्य..! माउंटबेटन तर एकटक हे दृश्य बघतच राहतात..!

____ ____ ____ ____

 

कलकत्ता. बेलीयाघाट.

संध्याकाळचे साडे पाच वाजताहेत.

 

गांधीजींची आजची सायं प्रार्थना ही बेलीयाघाट मधल्याच राश बागान मैदानात आयोजित केलेली आहे. स्वतंत्र भारतातली ही गांधीजींची पहिली सायं प्रार्थना. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर लोकं येतील हा अंदाज आहे.

 

आपण ‘पायीच मैदानात जाऊ’, असा गांधीजींचा हट्ट आहे. तसं मैदान जवळ आहे. इतर वेळी पाच मिनिटे लागतात. मात्र आज मैदानात भलतीच गर्दी आहे. तीस हजारांच्या क्षमतेचं हे मैदान अगदी गच्च भरलंय अन ओसंडून वाहतंय. त्यामुळे आज गांधीजींना, मैदानातील व्यासपीठापर्यंत जाण्यास वीस मिनिटे लागली.

 

प्रार्थना आणि थोडी सूत कताई झाल्यावर गांधीजी शांतपणे आणि संथपणे बोलू लागले, “काल मी जे बोललो, तेच परत सांगतोय. तुम्हा कलकत्ता वासीय हिंदू – मुसलमानांचे अभिनंदन. तुम्ही अशक्य ते शक्य करून दाखवलं. आता मुसलमानांना मंदिरात प्रवेश द्या आणि हिंदूंना मशिदीत. म्हणजे हे ऐक्य अधिक मजबूत होईल..!”

 

“अर्थात, मी कुठे कुठे मुसलमानांना त्रास दिल्या गेल्याच्या बातम्या ऐकतोय. लक्षात घ्या, कलकत्ता, आणि अर्थातच हावडा ही, येथे एकाही मुसलमानाला त्रास होता कामा नये.”

 

गांधीजींनी मग काल मध्यरात्री, राजभवनात घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख केला. ते म्हणाले, “काही लोकांना वाटतं, स्वातंत्र्य मिळालं म्हणजे आपल्यावरचे सर्वच निर्बंध संपले. आपण कसंही वागू शकतो. पण हे बरोबर नाही. आज भल्या पहाटे राजभवनात जे काही झालं, ते फारच दुर्भाग्यपूर्ण होतं. आपण ह्या स्वातंत्र्याचा नीट उपयोग केला पाहिजे. जे युरोपियन भारतातच राहतील, त्यांच्याशी आपण तोच व्यवहार केला पाहिजे, जो आपल्याला त्यांच्याकडून अपेक्षित होता.”

या सायं प्रार्थनेनंतर गांधीजींनी आपला चोवीस तासांचा उपवास, लिंबाचे सरबत घेऊन संपवला.

____ ____ ____ ____

 

अनेक वर्षांचा अंधकार संपवून देश परत एकदा स्वतंत्र झालाय. गेल्या अनेक पिढ्यांच्या गुलामगिरीने, काहीशी निबर झालेली मानसिकता बदलण्याचे फार मोठे आव्हान समोर आहे. विभाजन झालेले आहे. पण ते कुठल्याही निकषांवर नाही. जीनांनी मुसलमानांसाठी पाकिस्तान बनविला, असे म्हटले तर नवीन निर्माण झालेल्या पाकिस्तानपेक्षा जास्त मुसलमान हिंदुस्थानात आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आग्रह केलेली, जनसंख्येच्या अदलाबदली ची योजनाही कॉंग्रेस ने फेटाळून लावली आहे. देशाच्या अनेक भागात, धार्मिक विद्वेषाचा अक्षरशः वणवा पेटलाय. तो जास्त पसरेल अशीही चिन्ह आहेत..

 

काश्मीर चा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. फार मोठा भूभाग असलेलं निझामाचं संस्थान आजही हिंदुस्थानात शामिल झालेलं नाही, आणि हिंदूंना छळतंय. गोवा अजूनही पोर्तुगीजांच्या पारतंत्र्यात आहे. पांडिचेरी, चंदननगर सुध्दा हिंदुस्थानात परत आलेले नाहीत. नेहरूंच्या हट्टामुळे नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स आपण गमाऊन बसलो आहोत.

 

आज स्वातंत्र्याचं स्वागत करीत असताना, हे चित्र बघितलं की छाती दडपते. हे सर्व भूभाग नसल्याने, संरक्षण दृष्ट्‍या, सामरिक दृष्ट्‍या आपण फारच कमकुवत झालेलो आहोत. नेतृत्वाच्या दुबळेपणाने आणि दूर दृष्टी नसल्याने, देशाच्या भविष्या समोर आज प्रश्नचिन्ह उभं आहे.

 

देश स्वतंत्र होऊन, एका नव्या युगात प्रवेश करत असताना, ह्या सर्व प्रश्नांची मालिका, समोर फेर घालून नाचत आहे.

एखाद्या बळकट, दमदार आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वाच्या हाती देश सोपविला, तरच या देशाचं भविष्य उज्वल होईल, हे नक्की..!
 
- प्रशांत पोळ

(उद्या दिनांक १६ ऑगस्ट ला, या लेखमालेचा अंतिम भाग, 'पंधरा ऑगस्ट नंतर ...', संदर्भ सूची सकट प्रकाशित होईल).
 
 
 
मागील लेख तुमच्या वाचनातून राहिला असेल तर त्याची लिंक खालीलप्रमाणे : १४ ऑगस्ट १९४७ 
 
 

@@AUTHORINFO_V1@@